एक कथा आपल्या पौराणिक इतिहासात नेहमी सांगितली जाते. एखादे अमुल्य द्रव्य नदीपात्रात सांडले आणि नदीला अमृताचे दिव्य झाले, लक्ष्मणासाठी द्रोणागिरी पर्वत आणताना त्यातील एखादे ढेकूळ रस्त्यात पडून एखादि डोंगर रांग तयार झाली आणि म्हणून त्या डोंगरावर असंख्य औषधी वनस्पती सापडतात.
महाराष्ट्र हा छत्रपति शिवाजी महाराजांचा प्रदेश. महाराजांनी रायगडावर देह ठेऊन आज ३५० वर्षे झाली तरीही ते महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात असंख्य जयजयकारांनी , पोवाड्यांनी, चरित्रकथनातुन, पराक्रमांच्या आठवणीतून, त्यांच्या आणि त्यांच्या मावळ्यांच्या वंशजांमधून, त्यांच्या धारातीर्थांमधून आणि गड किल्ल्यांच्या चिराचीरांमधून आजही जिवंत आहेत. महाराष्ट्रात जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुला मुलीमध्ये महाराज आहेत. अगदी त्यांच्या सर्व गुणांसकट ते त्याच्या-तिच्या रक्त नसानसातून वाहत आहेत. तुम्ही सह्याद्री वर भटकत असाल तर सह्यद्रिवरून वाहणाऱ्या वार्यातून महाराजांचे आणि मावळ्यांचे श्वास तुमच्या शरीरात भिनत आहेत. रायगडावर जेंव्हा जेंव्हा तुम्ही मेघडाबरीसमोर नतमस्तक होता, समाधीसमोर ध्यानस्थ होता, तेंव्हा महाराज तुमच्या शरीरात आणि नसानसात भिनतात.
आज स्वराज्याचे कार्य पुन्हा एकदा घडवण्याची गरज आहे. अशा वेळी पुन्हा एखादा शिवबा जन्माला येण्याची वाट पाहण्यापेक्षा तुमच्यात अससेल्या शिवबाला एक जाग द्या . आऊसाहेबांनी जी शक्ती महाराजांना दिली, तुकाराम महाराजांनी आणि समर्थांनी जो मंत्र राजांना दिला, महाराजांनी जो मंत्र या महाराष्ट्राला दिला तो तुमच्या शरीरातही सुप्त वास करीत आहे. त्याला जागे करा. तुमच्यातल्या शिवरायांना जागे करा. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत कुंडलिनी जागृती हा मंत्र सांगितला आहे. महाराष्ट्राची हि सर्व श्रेष्ठ कुंडलिनी शिवाजी नावाची अपरिमित ताकद आहे. हि जागृत करणे गरजेचे आहे.
माझ्यातील महाराज मी कसे जागे करेन?
माझ्यातील महाराज जागृत करण्याची पहिली पायरी म्हणजे माझ्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक घटनेला सामोरे जाताना, महाराज या ठिकाणी कसे वागले असते त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करणे. जो ह्यात यशस्वी होईल, तो स्वतःमध्ये महाराजांचा अंश खर्या अर्थाने भिनवु शकेल. आज आम्ही शिवचरित्राची पारायणे केली आहेत. महाराजांच्या आयुष्यातली प्रत्येक घटना आम्हास ठाऊक आहेत. या ठिकाणी थोरले महाराज कसे वागले, काय बोलले, काय सांगून गेले आम्हास माहित आहे. ज्या ज्या ठिकाणी महाराजांचा स्पर्श झाला ती जागा आम्ही फिरलो आहोत, ती हवा आम्ही आमच्या फुफ्फुसात तुडुंब भरली आहे, ती हवा आता आमच्या नसानसातून भिनू द्या.
आयुष्याचे उद्दिष्ट्य ठरवा
महाराजांच्या आयुष्याचे उद्दिष्ट्य ठरलेले होते. ‘अवघ्या मराठीयांचे गोमटे करणे आहे’! सर्व हिंदवी राज्य स्थापन करून स्वातंत्र्य प्रस्थापित करणे. यासाठीच माझा जन्म आहे आणि मी तेच करणार आहे. महाराज राज्याभिषेक कर्ते शककर्ते झाले कारण त्यांचे हे उद्दिष्ट्य सतत त्यांच्या समोर होते. राज्याभिषेकाचे नाही, मराठीराज्य निर्मितीचे. आणि ते सिद्ध झाले. बरे ते केवळ आपल्यापुरते सिद्ध झाले नाही, आपल्या नंतर सव्वाशे वर्षे मराठी शक्ती जाज्वल्य अभिमानाने झूज्ती राहिली. कारण महाराजांनी आपला नव्हे आपल्या पुढच्या पिढ्यांचा विचार करून ठवला होता. पेशवे पद राजांनी निर्मिले, पुढे त्यांनीच महाराष्ट्राचे रक्षण केले. वतनदारी पद्धती चे विष महाराष्ट्रातून कायमचे हद्दपार केले राजांनीच. आपले उद्दिष्ट्य ते असावे.
म्हणजे अगोदर मी ठरवेन मला आयुष्यात काय करायचे आहे. मग ते राजकारणच असेल असे नव्हे. मला एक माणूस म्हणून यशस्वी व्हायचे आहे, उत्तम संसार करायचा आहे इथपासून मला विशिष्ठ क्षेत्रात नामवंत व्हायचे आहे. पण हे उद्दिष्ट्य वयाच्या विसाव्या वर्षापर्यंत आमच्या समोर हवे. अगदी कदाचित थोडा उशीर झाला तरी चालेल पण जे उद्दिष्ट्य ठेवले आहे आजपासून फक्त आणि फक्त त्यावरच माझे लक्ष्य हवे. मग जर गड किल्ल्यांचा वसा मी घेतला तर पूर्णतः त्यातच मी लक्ष का देऊ नये? आपली हौस हीच आपली दिशा जाहली तर आयुष्य सुखकर होते. त्यामुळे मी जेंव्हा मरेन तेंव्हा मला स्वतः ला कुठे पहायचे आहे हे आज ठरवा.
नियोजन- अफझुलखान प्रसंग
महाराजांच्या सर्व मोहिमांचा पहिला टप्पा म्हणजे चोख नियोजन. अफझलखान सारख्या प्रसंगात चारही बाजूने तुमच्या क्षमतेपेक्षा जास्त संकटे कोसळत असताना, राजे धीराने उभे राहिले ते या नियोजनाच्या जोरावरच. लक्षात घ्या महाराज फुशारक्या मारत नाहीत; ते व्यावहारिक बोलतात, व्यावहारिक वागतात. ‘येऊ दे अफझल, चिंधड्या उडवतो’ वगैरे फक्त चित्रपटात शोभणारी वाक्ये ते फेकत नाहीत. ते म्हणतात, “या संकटातून मी वाचेन कि नाही माहित नाही, पण अफझल इथून जिवंत परत जात नाही”. वाक्याचा उत्तरार्ध आपल्या नियोजनवरचा विश्वास आहे आणि पूर्वार्ध व्यावहारिक दृष्टीकोन.
तुमच्या आयुष्यातील कुठल्याही गोष्टीचा कणा नियोजन आहे का? अगदी सहलीला निघण्यापासून ते आयुष्यातील ध्येय गाठ्ण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीचे नियोजन झालेच पाहिजे. नियोजन नंतर प्रत्येक उप विभागाचे कार्य ठरवलेले असावे, म्हणजे ते कार्य कदाचित तुम्हीच कराल, पण त्या त्या वेळी तेच काम परफेक्ट व्हावे. भेटीला आपल्याबरोबर कोण कोण येणार हे राजांनी पक्के केले. बाकीच्यांना आपापली सैन्ये घेऊन कोकण, देश सील करून ठेवले, पण महाराज जेंव्हा प्रतापगड उतरू लागले तेंव्हा सगळ्यांनी आम्ही तुमच्याबरोबर येतो म्हणून गलका केला. महाराज म्हणाले “ज्याला जी कामे नेमून दिली आहेत त्यांनी ती चोख केली तर भवानीच्या आशीर्वादे करून आपल्याला यश नक्की मिळेल”. महाराजांनी हि जी नेमून दिलेली कार्ये आहेत ते आपल्या नियोजनाचे ‘उपविभाग’. अशा अनेक उपविभागांचे कार्य एकत्र मिळून चांगले होते तेंव्हा नियोजित कार्य यश देतेच.
यात आर्थिक नियोजनाचा भागही फार महत्वाचा आहे. आपण मराठी माणसे ‘पैशाच्या श्रीमंतीपेक्षा मनाची श्रीमंती महत्वाची” वगैरे भावनिक गोतावळ्यात आर्थिक दृष्ट्या सबळ होण्याचे विसरतोच. गुजराती आणि मारवाडी बांधवांच्या तुलनेत आम्ही आज आर्थिकदृष्ट्या प्रचंड मागासलेले आहोत याचे कारण आर्थिक नियोजनाचा अभाव. राजांनी आर्थिक नियोजनात ढिसाळपणा दाखवला असता तर? तर महाराजांच्या बात फुकाच्या तल्या असत्या. एक मोठे काम अंगावर घेऊन न झेपल्यामुळे अर्धवट राहिले अशी इतिहासाने या कार्याची नोंद घेतली असती. पण नाही राजांचे कार्य चोख होते आणि म्हणूनच आई भवानीने त्यांना यश दिले.
सन्मान
महाराजांच्या व्यक्तिमत्वाचा हा सर्वात सोनेरी गुण. महाराजांनी नेहमी दुसर्याचा सन्मान ठेवला. आई वडिलांचा सन्मान ठेवला. बर्याचदा आपण आपल्या आई वडिलांना गृहीत धरतो. त्यांना काय कळणार किंवा त्यानं सांगून उपयोग नाही इथपासून बर्याचदा मी हा कधी विचारच केला नव्हता अशी आपली स्थिती होते. वास्तविक ते तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा घटक आहेत. महाराज आणि आऊसाहेबांचे समंध आम्हास ठाऊक आहेतच. वडिलांबरोबर महाराजांचा फारसा सहवास घडला नाही.पण त्यांनाही राजे आपल्या कामाविषयी कळवत होते, सल्लामसलत करीत होते हे समजते. सभासद बखरीत थोरले महाराज गेल्याची बातमी कळल्यानंतर राजांच्या तोंडचा एक संवाद नमूद आहे,” आमच्या पराक्रमचि पत्रे आम्ही वरचेवर थोरल्या महाराज साहेबास कळवीत होतो…आता कोणासाठी पुरुषार्थ करावा।” तुम्ही काहीही करा, सतत तुमच्या आई वडिलांना कळवीत राहा, त्यांचे आशीर्वाद घेत राहा आणि चर्चा करीत राहा.
तुमच्या सारखाच तुमच्या समोर चीही व्यक्ती आहे, माणूस आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे. म्हणजे स्त्री चा सन्मान हा सर्वात महत्वाचा भाग आहेच. स्त्री सन्मान म्हटले कि आपल्याला पहिल्यांदा स्त्रियांवरचे अत्याचार आठवतात आणि मी ते करीत नाही म्हणून मी स्त्रीचा आदर ठेवतो असे आम्हास वाटते. पण तुमची आई, बहिण , प्रेयसी, बायको आणि कुठलीही परस्त्री हिला माणूस म्हणून आपण काही अधिकार देणार आहोत कि नाही? स्त्री जेवढे प्रेम आपल्या माणसांवर करते तेवढा पुरुष करीत नाही. त्यामुळे स्त्रीच्या मनाचा आदर करणे प्रत्येक राष्ट्राचे पहिले कर्तव्य आहे. एक स्त्री सुखी असेल, तिच्या अस्तित्वाचा आदर होत असेल तरच
पण अगदी मी ज्याच्याशी भांडतो तो माणूस आहे त्यालाही माझ्यासारखे ह्रुदय आहे आणि त्यालाही भावना आहेत हे आम्ही विसरतो. मग गोष्ट धर्माची असो व जातीची. महाराजांनी जे केल नसतं ते आम्ही का करावं ? महाराजांनी ब्राह्मण मराठा, महार भेद केला नाही, मग आम्ही का करावा?महाराजांनी कधी कुणाला तू विशिष्ठ जातीचा आहेस म्हणून तू आम्हाला त्याज्य आहेस असे म्हटलेले आठवते का? मग आम्ही असा दळभद्री विचार का करावा? प्रत्येक व्यक्तीचा सन्मान करायला शिका.
एक पाऊल वर चढा
सभासद बखरीत एक वाक्य आहे ‘पस्तीस परगण्यांच्या जहागिरीतून एक करोड होनांचे राज्य निर्माण केले ये गोष्टी छोटी जाहली नाही’. महाराजांनी आपल्या परिस्थितीत कार्य करण्यास सुरुवात केली. जहागीरदराचा मुलगा म्हणून त्यांच्या पदरी काही सकारात्मक गोष्ठी होत्या, जसे पैसा, काही अधिकार किंवा मोर्तूब. मात्र महाराजांचे कार्य त्यांच्या तत्कालीन परिस्थितीपेक्षा फार वेगळे आणि मोठे ठरले. एका जहागीरदाराच्या मुलाचा राजा होणे हि सोप्पी गोष्ट नव्हती. तोही सार्वभौम राजा. ज्याच्याकडे स्वतःचे राज्य आहे. स्वतःचे सैन्य, झेंडा, मुद्रा, प्रशासन हि बाब सोप्पी नव्हती. महाराज जन्माला आले एका गडावर आणि त्यांनी देह ठेवला दुसर्या गडावर. ज्यावर जन्म घेतला तो त्यांच्या वडिलांच्या जहागिरीचा भाग होता आही ज्यावर देह ठेवला तो त्यांनी स्थापिलेल्या राज्याची राजधानी होती. यातच महाराजांनी स्वतःच्या आयुष्यात काय केले हे सिद्ध होते.
आम्ही सुद्धा काही गोष्टी घेऊन जन्माला येतो. त्यात काही आमच्या अनुकूल तर काही प्रतिकूल. प्रतिकूल परिस्थितीवर मत करून आल्या अनुकूल परिस्थितीमध्ये भर घालणे हे पुरुषार्थाचे लक्षण आहे. आज तुमची जी अवस्था आहे, आर्थिक, सामाजिक त्यात सातत्याने भर घालीत राहा.
“वडीले मळविले खाउन राहणे पुरुषार्थ नव्हे”- आऊसाहेब
जे आम्हास मिळाले वडिलोपार्जित आहे, ती संपत्ती ते नाव, मानमरातब यावर जगणारा पुत्र करंटा समजावा. महाराजांनी शहाजी महाराजांच्या मदतीनेच आपले कार्य सूरु केले. मात्र केवळ त्यातच त्यांनी आपली व्याप्ती मर्यादित ठेवली नाही. ते कार्य खूप मोट्ठे केले. फक्त कार्य नाही, त्यासाठी लागणाऱ्या गोष्टीची तजवीज त्यांनी केली. त्यामुळे सार्वभौम राजा झाल्यावर महाराजांकडे दोन करोड होनांचा खजिना, साडेतीनशे किल्ले, दीड लक्ष सैन्य असा एका राजाला लागणारा सर्व लवाजमा होता. केवळ मला राज्य स्थापायचेय या फुकाच्या स्वप्नात ते राहिले नाहीत. राज्य स्थापिले तर ते निभावणे सुद्धा तितकेच गरजेचे. औट घटकेचे राज्य काय कामाचे? महाराजांनी काय केले? त्यांनी असे राज्य स्थापिले जे त्यांच्या पश्चात तिपटीने वाढले, अटकेपर्यंत गेले, देशाची चौथाई मराठ्यांकडे आली. म्हणजे राजांनी जे केले ते शाश्वत होते.
आम्ही जे काही कार्य करू तेही असे शाश्वत हवे. आमच्या पुढील पिढ्यांनी ते वाढवावयास हवे आणि त्याचा सुगंध आमच्या नंतरही दरवळला पाहिजे.
व्यावहारिक जगा
आम्ही मराठी मुले बर्याचदा स्वप्नात आणि वृथा अभिमानात जगतो. आम्ही वाघ, मराठ्यांची ताकद वगैरे अभिमानास्पद वल्गना करताना वास्तवात आम्ही खरेच वाघ आहोत का? हे पाहायला विसरतो. आज महाराष्ट्रात मराठी माणसाची किंमत कमी होत आहे, आमच्या पाठीमागून महाराष्ट्रात आलेले गुजराती मारवाडी शेट्टी बांधव येथे संपत्ती निर्माण करतात, आलिशान घरे बांधतात, आमचा कोकण देश विदर्भ गरिबीत दिवस काढतो तरीही फुकाचे अभिमान मिरवत आम्ही फिरतो. महाराजांनी हे होऊ दिले असते का? महाराजंनी स्वराज्याचे स्वप्न पहिले आणि ते पूर्ण केले. केवळ मी मराठी म्हणजे शूर वगैरे वल्गना करीत ते बसले नाहीत.
मुळे केवळ मोठे टीळे लावत, तलवारी पाजळीत फोटो काढण्यात पुरुषार्थ नव्हे हे हे ध्यानी घ्या. मराठी संस्कृती तिचा इतिहास अभिमानास्पद आहेच. पण आपल्या येणाऱ्या पिढ्यांनी आपला अभिमान बाळगावा असे कार्य आपल्या हातून होणे गरजेचे नाही का?
आणि हा अभिमान केवळ राज्य प्राप्ती राज्य वृद्धी, सैन्य अशा बाबतीत नाही अगदी रोजच्या संसारी, व्यवहारातील जगण्यातही आपण निर्माण करू शकतो. महाराजांचा आदर्श हा केवळ राजकारणातील किंवा सार्वजनिक आयुष्यातील लोकांसाठीच नाही. अगदी तुमच्या काही मोठ्या महत्वाकांक्षा नसतील आणि चार चौघांसारखे आयुष्य जगायचे असेल तरीही ते समर्थांच्या वचना प्रमाणे ‘सचोटीने’ आणि समर्थ पणे जगावे.
आज आपला देश एका फार मोठ्या राजकीय आंदोलनातून जात आहे. येणाऱ्या काळात बर्याच उलथापालथी होणार आहेत. पुढच्या वीस वर्षात देशाच्या भविष्याची दिशा ठरणार आहे. या सगळ्या बदलांचे नेतृत्व महाराष्ट्राकडे असणे गरजेचे आहे. महाराजांनी हाच प्रयत्न केला नाही का?
त्यांचे कार्य आपल्याला शेवटपर्यंत न्यायचे आहे. त्यासाठीच… तुमच्या अंतर्मनात ध्यानस्थ शिवाजी महाराजांना साद घालणे गरजेचे आहे.
।। जय शिवाजी ।।
वाचण्यासारखे आणखी काही….
शिवाजी – द ग्रेट मॅनेजमेंट गुरु…
मराठी माणसाचे प्रोसेस इंजिनिअरिंग
मराठी संस्कृती- २०१८ च्या उंबरठयावर!
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.