आपल्या गाडीचा मेन्टनन्स ठेवावा लागतो हे आपल्याला माहीत असतं, पण असाच आपल्या फ्रीज चा मेंटनन्स ठेवला तर आपला फ्रीज सुद्धा नवीन घेतल्या सारखाच परफॉर्मन्स देऊ शकतो हे आपल्याला माहीत आहे का?
दिवसातून कितीतरी वेळा वापरलं जाणारं आपल्या घरातलं सगळ्यात महत्वाचं उपकरण म्हणजे फ्रिज!
एकवेळ घरातला टीव्ही बिघडला तरी आपल्याला चालेल पण जर आपला फ्रिज एखाद दिवशी बिघडला तर आपल्यला ब्रम्हांडच आठवेल.
रोजचं तापवलेलं दूध ठेवणं, आठवड्याभराच्या भाज्या ठेवणं ते उरलेलं अन्न ठेवण्यापर्यंत फ्रिजचा आपल्याला उपयोग होत असतो..
या शिवाय बर्फ, थंड पाणी हे ऍडेड बेनिफिट्स आहेतच.
थोडक्यात काय तर फ्रिजचे अनेक फायदे आपण गृहीत धरलेले आहेत पण आपण त्यावर पूर्णतः अवलंबून आहोत.
आणि त्याशिवाय आपलं आयुष्य अवघड होऊन बसेल असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही.
पण या फ्रिजबद्दल आपल्याला खरंच किती माहिती असते?
फ्रिज व्यवस्थित चालू राहावा म्हणून कोणता भाग कधी बदलायचा, कोणते खाद्यपदार्थ कुठे ठेवायचे? याबद्दल आपण अनभिद्न्य असतो..
तुम्हाला तुमच्या फ्रीजचा पुरेपूर वापर करता यावा, तुमच्या फ्रिजच्या प्रत्येक भागाची तुम्हाला ओळख व्हावी
आणि जर फ्रिजची काळजी घेण्याबाबतीत तुमच्याकडून काही चूक होत असेल तर ती तुमच्या लक्षात यावी म्हणून या लेखात आम्ही तुम्हाला फ्रिजबद्दल, काही महत्वाच्या गोष्टी सांगणार आहोत.
फ्रीज बद्दल माहिती असाव्यात अशा महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या ते बघा
१. फ्रिजचे फिल्टर नियमीतपणे बदलावे लागतात
रात्री फ्रिजमध्ये उरलेली आमटी ठेवताना चुकून झाकून ठेवायची विसरली तर सकाळी चहाला आमटीचा वास लागतो ना?
कारण फ्रिजमध्ये आमटी तशीच उघडी राहिल्याने तो वास आतल्याआत फिरून दुधाला लागतो!
फ्रिजला जे ‘एअर फिल्टर्स’ असतात ते फ्रिजच्या आतली हवा स्वच्छ ठेवतात ज्यामुळे फ्रीजमधल्या एका पदार्थाचा वास दुसऱ्याला लागत नाही.
हे ‘एअर फिल्टर्स’ एका ठरविक कालावधीनंतर निकामी होतात आणि बदलावे लागतात.
आपल्याला याबद्दल फार माहिती नसते आणि आपण जवळजवळ नाहीच किंवा अगदीच फ्रिज बिघडल्यावर त्याकडे लक्ष देतो.
पण जर आपण नियमितपणे हे फिल्टर्स बदलले तर फ्रिज जास्ती चांगला मेंटेन होईल.
आपला फ्रिज कोणत्या कम्पनीचा आहे ते बघून ‘एअर फिल्टर्स’ नेमके कधी बदलायचे हे ठरवता येईल.
२. फ्रिजमध्ये पदार्थ ठेवताना शिस्त पाळा
तुम्ही कधी कांदा चिरलेली सूरी विसळून न घेता त्याच सुरीने आंबा कापून खाल का?
कल्पनेनेच शहारा आला ना? मग फ्रिजमध्ये दूध आणि चटणी एकाच कप्यात ठेवत असाल तर हा मुद्दा तुमच्यासाठी महत्वाचा आहे.
नॉनव्हेजचे पदार्थ सगळ्या खालच्या कप्यात, त्यावरती उरलेलं-सुरलेलं आणि सगळ्यात वरती दूध, दही, ताक असे तुमच्या सोयीने तुम्ही कप्पे ठरवून घेऊ शकता.
भाज्या आणि फळ नेहमी त्याकरता दिलेल्या ट्रेमधेच ठेवावीत.
फ्रिजमध्ये अन्न ठेवताना सगळ्यावर झाकण ठेवणं अत्यंत गरजेचं आहे कारण कधीकधी फ्रिजमध्ये पाणी गळून ते आपल्या अन्नात जाऊन अन्न नासवू शकतं.
३. फ्रिजमध्ये अन्न खराब होतच नाही हा गैरसमज आहे.
आज भाजी करायचा कंटाळा आला किंवा भाजी कमी पडली की आपण फ्रिज उघडून बघतो, काल परवाची भाजी असली तरी “चांगली असेल, फ्रिजमध्येच तर होती..” असं म्हणून ती वाढून घेतो पण फ्रिजमध्ये अन्न खराब होऊच शकत नाही असं मात्र तुम्हाला वाटत असेल तर तो एक मोठा गैरसमज आहे.
हां, हे मात्र खरं आहे की फ्रिजमध्ये अन्न जास्त ताजं राहतं आणि लवकर खराब होत नाही.
पण तरीही असे काही बॅक्टरीया आहेत जे फ्रिजच्या इतक्या खालच्या तापमानात सुद्धा तग धरतात. त्यामुळे फ्रिजमधलं सुद्धा खूप शिळं अन्न खाऊ नये.
४. फ्रिजचं तापमान २ ते ४ डिग्री सेल्सिअस इतकं हवंच
फ्रिजमध्ये सुद्धा बॅक्टरीया वाढतात हे वरती आपण बघितलंच.
त्यामुळे फ्रिजच्या तापमानाकडे नीट लक्ष ठेवणं गरजेचं आहे.
तुम्हाला माहीत आहे का की रूम टेम्परेचरला जर एखादा पदार्थ ठेवला तर त्यात बॅक्टरीयाची प्रचंड वेगाने वाढ होते?
इतकी की वीस मिनिटात बॅक्टरीया आहे त्याच्या दुप्पट होतात!
पण २ ते ४ डिग्रीला बॅक्टरीयाची वाढ स्थगित होते आणि अन्न जास्त वेळ ताजं राहतं.
महिन्यातून एकदा थर्मामीटरने फ्रिजचं तापमान तपासून बघावं, जर ते २ ते ४ डिग्री पेक्षा जास्त येत असेल तर सर्व्हिस इंजिनिअरकडून फ्रिज तपासून घ्यावा.
५. तुमच्या फ्रिजचा सगळ्यात थंड भाग कोणता ते माहीत करून घ्या
तुमच्या फ्रिजचा सगळ्यात थंड भाग म्हणजे बर्फाचा कप्पा.. फ्रिझर.. हे साहजिकच आहे नाही का?
पण या कप्याच्या खालोखाल सगळ्यांत थंड कप्पा म्हणजे भाज्यांच्या ट्रेची मागची बाजू (सगळ्यात खालच्या कप्प्याची मागची बाजू) का माहितीये?
कारण फ्रिजचं दार कितीही वेळा उघडबंद केलं तरी बाहेरची गरम हवा दर वेळेला इतक्या आतपर्यंत पोहोचत नाही.
बाहेरच्या गरम हवेचा परिणाम इतर कप्यांवर होतो, यावर नाही.
त्यामुळे फ्रिजमध्ये अन्न पदार्थ ठेवताना या ही मुद्दयाचा विचार केला पाहिजे.
नॉनव्हेज, चीज हे पदार्थ शक्यतो सगळ्यात थंड भागात ठेवावेत जेणेकरून ते जास्त टिकतील.
६. तुमच्या फ्रीजचा सगळ्यात गरम भाग कोणता ते माहीत करून घ्या
आपला हात फ्रीजचा कोणत्या भागाला वारंवार लागतो?
दार, बरोबर?
दाराचा आतला भाग दिवसातून तुम्ही जितक्यांदा फ्रिज उघडता तितका बाहेरच्या हवेला डायरेक्ट एक्सपोज होतो त्यामुळे त्याचं तापमान फ्रिजच्या इतर भागांच्या तुलनेत बऱ्यापैकी उष्ण असतं म्हणून तिकडे लवकर खराब होणारे पदार्थ ठेवणं टाळावं, ते फ्रिजच्या आतल्या बाजूलाच सुरक्षित असतील.
फ्रिजच्या दाराच्या कप्यांमध्ये शक्यतो मसाले, सॉस वगैरे गोष्टी ठेवाव्यात की ज्या टिकायला खूप कमी तापमानाची गरज नाही.
७. तुमच्या फ्रिजला ड्युअल एवापोरेटर आहे का?
ड्युअल एवापोरेटरचं काम म्हणजे फ्रिजची दोन वेगवेगळी तापमानं ‘मेंटेन’ करणे.
फ्रिजचं तापमान हे ४ डिग्री पर्यंत हवं आणि फ्रिझरच ० डिग्री.
ड्युअल एवापोरेटर नसेल तर ही दोन्ही तापमानं अशी मेंटेन न होता कमी जास्त होत राहतात आणि त्याचा परिणाम म्हणजे अन्न खराब होतं.
त्यामुळे पुढच्या वेळेला फ्रिज घेताना हा मुद्दा लक्षात ठेवा.
८. रबर सीलचं महत्व जाणून घ्या
फ्रिजच्या दाराला असलेलं रबर सील, ज्याला आपण गॅस्केट म्हणतो, त्याचा फार महत्वाचा उपयोग असतो.
एकतर या गॅस्केटमुळे बाहेरची उष्ण हवा आत जाऊ शकत नाही.
त्यामुळे फ्रिजचं तापमान हवं तेवढंच राहतं आणि यामुळे फ्रिजमध्ये अन्न जास्त वेळ टिकतं.
दुसरं म्हणजे फ्रिजचं दार बंद केल्यावर ही गॅस्केट फ्रिजला सील करते आणि त्यामुळे बाहेरचं काही आत सहजी जाऊ शकत नाही.
मधुनधुन ही गास्केट बाहेर काढून साफ करून घ्यायला लागते.
आणि जर एखाद्या ठिकाणी ही गॅस्केट खराब झाली असेल किंवा बारीकशी चीर जरी असेल तरी ती लवकरात लवकर बदलून घेऊन आपल्या फ्रिजची काळजी आपणच घेतली पाहिजे.
९. तुमच्या फ्रिजच्या खाली धूळ आहे का?
आपण एकदा फ्रिज एका जागेवर ठेवला की फार तर फार महिन्यातून त्याच्याखालून केर काढून घेऊन, पुसून घेतो.
काही काही घरात तर ते सुद्धा नाही, डायरेक्ट गणपती, दसरा, दिवाळीच्या आधी.
पण यामुळे काय होतं की फ्रिजखाली बरीच धूळ होते आणि ही धूळ फ्रिजच्या कन्डेन्सर कोईलवर साचत जाते.
(फ्रीजचा कन्डेन्सर कॉईल सहसा फ्रिजच्या खालच्या बाजूला असतो)
कन्डेन्सर कॉईलचं काम फ्रिजला थंड ठेवणं हे आहे त्यामुळे जर त्याच्यावर खूप धूळ झाली तर कालांतराने तो खराब होऊ लागतो, फ्रिज जास्त विजेचा वापर करायला लागतो आणि फ्रिजचं एकूण आयुष्य कमी होतं.
त्यामुळे फ्रिजच्या खालून नियमितपणे झाडून पुसून घेऊन तिथे आजिबात धूळ होऊ दिली नाही तर कन्डेन्सर कॉईलला उष्णता बाहेर फेकायला सोपं जाईल आणि फ्रीजचा कॉम्प्रेसर जास्त काळासाठी चांगला राहील.
१०. फ्रिज खचाखच भरल्यावर काय होतं?
उरली आमटी… ढकल फ्रिजमध्ये, थोडा चिरलेला टोमॅटो शिल्लक आहे.. बघ फ्रिजमध्ये जागा आहे का!!
असं करत करत आपण बऱ्याच गोष्टी फ्रिजमध्ये ठेवतो, कधीकधी तर फ्रिजचं दार लागत नसतानाही आपण आतमध्ये आवराआवर करतो आणि कसंबसं त्यात सगळं कोंबल्यावर स्वतःची पाठ थोपटतो!
गंमत म्हणजे कधीकधी त्या पदार्थाबद्दल पूर्णपणे विसरून जातो आणि तो तसाच फ्रिजमधे पडून राहतो.
तुम्हालाही ही सवय असेल तर सावधान!
कारण फ्रिजमध्ये खूप गर्दी झाली तर फ्रीजमधल्या थंड हवेचं आतल्या आत नीट सर्क्युलेशन होत नाही आणि त्यामुळे मग एकेक पदार्थ लवकर खराब व्हायला लागतात.
त्यामुळे शक्यतो जे पदार्थ बाहेर ठेवलेले चालतात ते बाहेरच ठेवावेत उगाच जागा आहे म्हणून फ्रिजमध्ये ठेऊ नयेत.
आणि आठवड्यातून एकदा फ्रिजमध्ये काय काय आहे याचा आढावा घेऊन जे संपवता येण्यासारखं आहे ते संपवून टाकून फ्रिजमधली गर्दी कमी केली पाहिजे.
मित्रांनो आणि मैत्रिणींनो, रोजच आपल्या उपयोगी येणाऱ्या या फ्रिजबद्दल ही माहिती तुम्हाला नव्हती ना?
पण आता या टिप्स वापरून तुम्ही तुमच्या फ्रिजची कार्यक्षमता आणि त्याचं आयुष्य सुद्धा वाढवू शकता!
मग लागा कामाला.. आणि हो या टिप्स तुमच्या नातेवाईकांबरोबर आणि मित्रमंडळीबरोबर नक्की शेअर करा!
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.