व्ही. उमा शंकर गुरु, हे बंगलोरमध्येच लहानाचे मोठे झालेले एक आयटी इंजिनिअर आहेत.
या चाळीस वर्षात त्यांच्या डोळ्यां देखत हिरव्यागार बंगलोरचं एक सिमेंट-विटांचं जंगल झालं आहे, पक्षी गायब होऊन गाड्या आणि माणसं वाढली आहेत.
आणि ही आहे त्यांची सगळ्यात मोठी खंत….
खरंतर उमा शंकर यांचा निसर्गाजवळ जाण्याचा प्रवास २०१४ मधेच सुरु झाला.
ट्राफिक, हॉर्न, प्रदूषण, मोठमोठाल्या इमारती या सगळ्याला वैतागून त्यांनी निसर्गाच्या सानिध्यात जास्तीत जास्त वेळ घालवता यावा म्हणून २ एकर जमीन घेतली आणि शेती सुरु केली.
उमा शंकर सांगतात की, त्यांना शेतीची हौस तशी पहिल्यापासूनच होती.
पण खरी सुरुवात ही २०१५ पासून झाली जेव्हा, त्यांनी खरेदी केलेल्या जमिनीत त्यांनी प्रत्यक्ष भाज्या आणि फुलं लावली.
ते सांगतात की जसे जसे ते निसर्गाच्या जवळ जायला लागले तसं तसं त्यांना जाणवू लागला की, आपण कमीतकमी साधनसामुग्री वापरून जगू शकतो.
जगायला फार काही लागत नाही पण आपणच स्वतःसाठी ‘लक्झरी’ नावाची एक कन्सेप्ट तयार करून ठेवली आहे.
त्यांच्या मते लक्झरी म्हणजे महागड्या वस्तू, चैनीच्या वस्तू, दिसायला सुंदर अशा विकत घेता येणाऱ्या वस्तू नसून आपल्याला समाधान देणारा, एखादा अनुभव सुद्धा असू शकतो.
निसर्गाच्या जवळ जायची ओढ आणि हा विचार, याचमुळे कदाचित उमा शंकर यांना फक्त विटा, सिमेंट वगैरे गोष्टी न वापरता स्वतःचं घर बांधायची अनोखी कल्पना सुचली असेल.
शहरीकरणाला वैतागून, आधी जमीन घेऊन शेती करून आता उमा शंकर यांनी स्वतःचं घर बांधायला सुरुवात केली.
ते सुद्धा कोणत्याही नेहमी वापरल्या जाणाऱ्या कन्स्ट्रक्शन सामुग्रीचा वापर न करता…
केवळ माती, लाकूड आणि चूना यासारख्या नैसर्गिक गोष्टींचा वापर करून.
आणि ते ही दहा लाखांच्या आत! आहे की नाही कमाल?
पण असं घर बांधता येईल ही कल्पना मुळात उमा शंकर यांना कशी सुचली असेल?
उमा शंकर यांनी २०१७ मध्ये तामिळनाडूच्या एका आर्किटेक्टच्या वर्कशॉपमध्ये भाग घेतला आणि आपण आपली पारंपरिक पद्धत वापरून घर बांधू शकतो हा आत्मविश्वास त्यांना याच वर्कशॉपमधून मिळाला.
आपल्या पूर्वजांनी वापरलेल्या बांधकामाच्या पद्धती, त्यांनी बांधकामासाठी वापरलेली साधनं याची माहिती आणि अभ्यास हा वर्कशॉपचा एक महत्वाचा भाग असल्याचं उमा शंकर सांगतात.
याचमुळे आपणही असं घर, ज्यात कुठल्याही आर्टिफिशिअल बांधकामाचं सामान न वापरता बांधू शकू असं उमा शंकरना वाटलं आणि त्यांनी काही कामगारांच्या मदतीने स्वतः हे काम सुरु केलं.
आपलं स्वतःचं घर स्वतःच्या हाताने बांधण्यासारखं दुसरं कुठलं सुख नाही…
हे सुख अनमोल आहे असं उमा शंकर सांगतात.
या सुखामागचं गुपित हेच आहे की लक्झरीची व्याख्या त्यांनी त्यांच्यापुरती बदलली आहे.
म्हणूनच त्यांच्या घरात लागतील तेवढ्याच, गरजेच्या अशाच गोष्टी त्यांनी ठेवायचं ठरवलं आहे. प्रचंड सामान म्हणजे लक्झरी हे त्यांना मान्यच नाहीये.
२०१७ मध्ये वर्कशॉप नंतर, उमा शंकर यांनी विचार करून, घराचा प्लॅन आखला आणि २०१८ मध्ये काही कामगारांना घेऊन घराचं काम सुरु केलं.
त्यांच्या २ एकर जमिनीतल्याच एका भागात त्यांनी घर बांधायचं ठरवलं होतं.
आता, उमा शंकर यांना बांधकामासाठी आजकाल वापरल्या जाणाऱ्या विटा, सिमेंट, स्टील यातलं काही एक वापरायचं नव्हतं..
मग ते घर नेमकं कशातून साकारणार आहेत?
उमा शंकर यांना आपले ‘ड्रीम हाऊस’ फक्त माती, लाकूड, चुना, आणि गूळ वापरून बांधायचे आहे.
अख्या बांधकामात एरवी वापरलं जाणारं कोणतंही सामान वापरलं नसलं तरी घर व्यवस्थित आणि भक्कम आहे..
त्याबाबतीत कुठेच हयगय झाली नाहीये. अशाप्रकारे फक्त नैसर्गिक साहित्य वापरून, कमी खर्चात इतकं सुंदर घर कसं उभं राहणार आहे याबद्दल माहिती देताना उमा शंकर सांगतात की घराच्या फाउंडेशनसाठी दगड वापरला जाणार आहे आणि त्यावर अख्ख घर कॉबने उभारलं आहे..
कॉब म्हणजे काय?
चिखल, भाताचं गवत, वाळू, चूना आणि गूळ याचं मिश्रण! हो चक्क, गूळ!!
हो बरोबर, उमा शंकर यांनी हेच सगळं वापरून त्यांचं ड्रीम हाऊस बांधलं आहे.
‘गूळ’ नैसर्गिक बॉंडिंग चे काम करून आणि त्याची कॉबच्या मिश्रणाला एकत्र धरून ठेवण्यासाठी मदत होते.
गूळ, अँटी-फंगल आणि अँटी-बॅक्टेरियल असल्याने जुन्या काळात किल्ले सुद्धा, चुना आणि गूळ यांच्या मिश्रणातुन बांधले गेलेले आहेत.
दगडाच्या फाउंडेशनवर या कॉबचे गोळे करून, विटांसारखे एकमेकांवर रचून, भिंती बांधून घराचं बांधकाम सुरु केलं.
भिंती अजून भक्कम व्हाव्यात यासाठी त्यांची रुंदी सुद्धा जास्त, म्हणजे दीड फूट इतकी ठेवली.
भिंती उभारून झाल्यावर, प्लास्टरच्या ऐवजी माती आणि चुना वापरला.
मंगलोरी कौलांच्या छताला आधार म्हणून स्टीलच्या ऐवजी लाकडाचा वापर केला आणि घराला फरशा न लावता मातीनेच सारवून घेतलं, फक्त बाथरूममध्ये टाईल्सच्या ऐवजी टेराकोटाचे दगड वापरले.
अगदी सुरुवातीपासूनच, घराचं प्लॅन आखतानाच उमा शंकर यांनी घर कमीतकमी खर्चात बांधायचं ठरवलं होतं.
मातीच्या वापराने हे शक्य झालं असल्याचं उमा शंकर सांगतात.
याचबरोबर फर्निचरमध्ये जास्त खर्च करायचा नाही हे ठरवल्यामुळे सुद्धा त्यांना कमीतकमी खर्चात त्यांचं ड्रीम हाऊस साकारता आलं आहे.
ते सांगतात खिडक्यांना सुद्धा टीक लाकडाच्या ऐवजी साधं आंब्याचं लाकूड वापरलं आहे..
याने quality मध्ये काहीही फरक पडला नाही, फक्त जास्तीचा खर्च वाचला.
दोन मजल्याच्या या दोन बेडरूमच्या इको फ्रेंडली घरात फर्निचर काय असेल?
त्याबद्दल सुद्धा उमा शंकर यांचं जबरदस्त प्लॅनिंग आहे. बेडसाठी अगदी लाकूड सुद्धा न वापरता ते फरशीवर कॉबचाच उपयोग करून उंचवटा तयार करून कायमस्वरूपी, न हलवता येणार बेड तयार करणार आहेत!
हॉलमध्ये बसायची सोय पण याच पद्धतीने ते करणार आहेत.
बाकी फर्निचर जसं की स्वयंपाकघरातली कपाटं आणि बेडरूममधली कपाटं यासाठी बांबू वापरून त्यावरून फिनिशिंग म्हणून कॉबचा थर लावणार आहेत.
घराबद्दल बोलताना उमा शंकर सांगतात की बांधकामासाठी पारंपरिक सामान वापरून कॉस्ट कटिंग जरी केलं असलं तरी घराच्या बाबतीत हयगय कुठेच केली नाहीये.
उलट यापद्धतीने घर बांधल्यामुळे ते एरवी पेक्षा अधिक चांगलं झालं आहे..
याचा अजून एक फायदा त्यांना असा झालाय की कॉबच्या भिंती असल्यामुळे बाहेर थंडी असली तरी घरात छान उबदार वाटतं आणि याचमुळे उन्हाळ्यात थंड वाटतं त्यामुळे एसीची सुद्धा गरज भासणार नाही..
दोन महिन्यात उमा शंकर यांच्या ड्रीम हाऊसचं काम पूर्ण होईल.
त्यांनी त्यांच्या आयुष्यात काटेकोर प्लॅनिंग करून त्यांच्या जीवनशैलीत बदल घडवून आणला आणि ते जे पर्यावरणाला देणं लागत होते ते चुकतं केलं..
मित्रमैत्रिणींनो, आपण सुद्धा त्यांच्या या गोष्टीवरून प्रेरणा घ्यायला हरकत नाही… हो ना?
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.