स्वच्छ सुंदर घरांचे कोपरे, अडचणीच्या जागा पाहिल्या तर हमखास बारीक सारीक किटक फिरताना दिसतात.
आपण घर कितीही साफसूफ ठेवायचा प्रयत्न केला तरी काही किटक आपली जागा बळकावतातच.
काही ठिकाणी झुरळ, पाली, मुंग्या यांचा अगदी मुक्त संचार असतो.
त्यात झुरळ, पाल बघितल्यावर ईऽऽऽऽ असा मोठा आवाज कोणीतरी काढतंच.
या लेखात आपण निरुपद्रवी पण नकोशा वाटणाऱ्या पालींना कसं हटवायचं ते पाहू….
खरंतर घरात फिरणारी पाल घातक किंवा विषारी नसते. उलट घरात फिरणारे इतर किटक खाऊन आपलं घर स्वच्छ ठेवायला ती मदतच करते.
पण पालींचा मुक्त संचार घरात नकोसा होतो.
घराच्या सांधिकोपऱ्यात पाली बिनधास्त आपला संसार थाटतात. घरात फिरणाऱ्या पालींना इंग्रजीत गिकॉस म्हणतात.
त्या घातक नसतात. पण गिल मोनस्टर, मेक्सिकन बीडेड लिझर्ड, कमोडो ड्रॅगन या तीन पालींच्या जाती मात्र विषारी असतात.
त्यामुळे घरातल्या पालींना मारण्यापेक्षा फक्त हाकलून लावणं योग्य ठरेल.
१. कोपरे स्वच्छ ठेवणे :
घरातल्या सांधिकोपऱ्यात पालींचा घरोबा असतो. बेसिनखालची ओलसर जागा, लाकडी काम असलेल्या जागा पालींना सुरक्षित वाटतात. अशा जागा कायम स्वच्छ आणि कोरड्या ठेवल्या पाहिजेत.
२. लसूण :
लसणाचा उग्र वास पालींना सहन होत नाही. म्हणून दारं, खिडक्यांवर लसूण पाकळ्या लावून ठेवल्यास पाल घरात शिरत नाही.
पंख्यासमोर लसूण पाकळी ठेवल्यास त्याचा वास घरात पसरतो. लसणाचा रस पाण्यात मिसळून पाली येणाऱ्या जागेवर फवारावा. त्यामुळे पाल घराबाहेर जाते.
३. कांदा :
कांद्यामधे असणारा गंधकाचा उग्र वास पाल सहन करू शकत नाही.
यासाठी कांद्याचे काही तुकडे घराभोवती ठेवावे. कांद्याचा रस पाण्यात मिसळून पाली येणाऱ्या जागेवर फवारावा.
त्यामुळे पालींचा घरात शिरकाव कमी होतो.
४. फ्लायपेपर :
घरात माशा पकडण्यासाठीचा फ्लायपेपर पाल पकडण्यासाठी वापरता येतो.
एखाद्या भिंतीवर हा पेपर चिकटवल्यास पाल त्यात शिरल्यावर बाहेर येऊ शकत नाही.
अलगदपणे ती बाहेर टाकता येते.
५. फिनेलच्या गोळ्या :
घरात फिनेलच्या गोळ्या पाल फिरणाऱ्या पण लहान मुलांचा हात पोचणार नाही अशा जागेवर ठेवल्यास पाल घराबाहेर निघून जाते.
फिनेलचा उग्र वास पाल हकलायला मदत करतो.
६. गवतीचहा :
गवतीचहाचा वास माणसांना हवाहवासा वाटला तरी पालींना नकोसा असतो.
यासाठी गवतीचहाची काही पानं घरात लावून ठेवावी.
त्यामुळे घरात सुगंध दरवळतोच पण पाल पळून जाते.
७. टबॅस्को सॉस :
एक दोन चमचे टबॅस्को सॉस पाण्यात मिसळून पाल फिरणाऱ्या जागेवर फवारावा. त्यामुळे पाल निघून जाते.
८. अंड्याचं टरफल :
अंड्याचा वास पाल सहन करू शकत नाही. म्हणून पाल फिरणाऱ्या जागेवर अंड्याचं टरफल ठेवल्यास पाल निघून जाते.
९. डांबरगोळ्या :
पाल फिरू नये अशा ठिकाणी डांबरगोळ्या ठेवाव्या. कपाट, ड्रॉवर घरातले कोपरे अशा ठिकाणी डांबरगोळ्या ठेवाव्या.
त्यामुळे हमखास पाल घरात फिरत नाही. पण अशा वेळी लहान मुलांच्या हाताला डांबरगोळी लागणार नाही याची काळजी घ्यावी.
१०. कॉफी :
कॉफी आणि तंबाखू एकत्र करून त्याची गोळी कोपरात ठेवावी. तिच्या वासाने पाल निघून जाते किंवा खाऊन मरते.
११. काळी मिरी :
काळी मिरी पावडर पाण्यात मिसळून पाल येणाऱ्या जागेवर फवारावी. त्यामुळे पालीच्या त्वचेवर जळजळ होते. नंतर त्या भागात पाल येत नाही.
१२. थंड पाणी :
पाल उष्ण जागी राहते. थंड हवेचा, थंड पाण्याचा संपर्क आल्यास पाल तिथून निघून जाते.
१३. अन्न झाकून ठेवणे :
उरलेलं अन्न उघडं राहिल्यास हमखास मुंग्या, माशा येण्याची शक्यता असते. त्यांना खाण्यासाठी पाल त्या भागात फिरते.
म्हणून उरलेलं अन्न झाकून ठेवावं, वेळेवर संपवाव, किंवा त्याची योग्य विल्हेवाट लावावी.
१४. मोरपीस :
भिंतीवर मोरपीस लावून ठेवल्यास त्या भागात पाल फिरत नाही.
अशा घरगुती उपायांव्यतिरिक्त इतर काही उपायांनी पालींना घराबाहेर करता येईल.
१. पेस्ट कंट्रोलचे काही फवारे मारल्यावर पाली मरून जातात.
२. पेस्ट कंट्रोलच्या गोळ्या ठेवल्याने पाल आणि इतर किटकही नाहिसे होतात.
३. इलेक्ट्रॉनिकच्या काही वस्तू पाल आणि किटक मारायला मदत करतात.
पाल घरातून हाकलून लावण्यापेक्षा ती घरात येऊच नये असे उपाय करणं जास्त सोयीचं होईल. त्यासाठी कोणत्या गोष्टी कराव्या आणि काय करू नये हे पाहुया…
१. घर जास्तीत जास्त स्वच्छ, धूळमुक्त, हवेशीर ठेवावं.
२. घरातली अडगळ वेळीच काढून टाकावी.
३. घराची दारं, खिडक्या किमान जाळी लावून बंद करावी.
४. पाल येईल अशी भिंतीतली भोकं, चिरा वेळीच बुजवावी.
५. पाल आणि किटक लाईटकडे आकर्षित होतात. म्हणून गरज नसेल तेव्हा लाईट बंद ठेवावे.
६. खिडकीवर धातूचं आवरण लावावं.
७. फर्निचर मधे पाल येऊ नये यासाठी मोजकं आणि भिंतीपासून ठराविक अंतरावर फर्निचर असावं.
८. घरात पाल येऊ नये यासाठी मांजर पाळणंसुद्धा सोयीचं असतं.
९. कमीत कमी फ्रेम भिंतीवर असाव्या. त्यामुळे त्यामागे पाल लपून बसणार नाही.
१०. फरशीवर अन्न सांडू देऊ नये.
११. घरात कुठेही पाणी साचून राहू नये. त्यामुळे त्यात डास, पाल, इतर किटक तयार होणार नाहीत. फ्रिजचा ट्रे, फुलांच्या कुंड्या, ड्राय बाल्कनी अशा जागा कायम स्वच्छ ठेवाव्या.
अशा काही सोप्या पद्धतीने तुम्ही तुमच घर स्वच्छ टापटीप आणि किटकमुक्त सहजपणे ठेवू शकाल.
Image Credit: Pest Wiki
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.