वॉट्सऍप ना खुप गंमतीशीर एप्प आहे. प्रत्येक माणसाच्या व्यक्तिमत्वाचं प्रतिबिंब त्याच्या पोस्ट मधुन पडत असतं. बराचद्या पोस्ट बघण्यात वेळ घालवायचा की नाही आपण पाठवणार्याचं नाव बघुन ठरवायला लागतो. उदा. यात काही प्रकार खालीलप्रमाणे सांगता येतील.
- सुसाट सैराट कॅटॅगिरी – जसा गावात मोकळा सोडलेला कटाळ्या लोकांच्या शेतात घुसतो, तशा यांच्या पोस्ट इतरांचे इनबॉक्स फुल करायचा यांनी चंग बांधलेला असतो अगदी मेमरी संपेपर्यंत. प्रत्येक पोस्ट (मग ती फालतु का असेना) प्रत्येक ग्रुपवर पोस्ट झालीच पाहीजे, असा यांचा दुराग्रह असतो, मग ती वाचणारा वाचुन, बघुन, अगदी, कोमेजुन गेला तरी यांचा मारा सतत चालुच असतो. सलाम त्यांच्या जिद्दीला.
- टाईमपास कॅटॅगिरी – यांना वॉट्सएपचं व्यसन असतं, चोवीस तास नेट ऑन न चेकिंग चालु. ह्यांच, बहुतेक करुन ऑफीसमध्ये बैठेकाम असतं, मग थोडा वेळ काम आणि खुप वेळ टाईमपास असं वेळेचं सुत्र कधी बनलं, ते कळत नाही. पण फेसबुक, वॉट्सएप यांना आपल्या पाशात आवळुन घेतात.
- सेन्सिबल कॅटॅगिरी – हे असतात सोशल मेडियावरील राजहंस. अस्ताव्यस्त पडलेल्या कचर्यातुन सुंदर मोती शोधण्याचं कसब यांनी आपल्या अंगी बाणावलेलं असतं. यांची प्रत्येक पोस्ट आवर्जुन वाचावी अशीच असते. वाचुन झाल्यावरही ती काही वेळ मनात रेंगाळते, आनंद देते, विचार करायला भाग पाडते.
जशा वोट्सएपवर तशा प्रत्यक्ष जीवनातही माणसांच्या काही कॅटॅगिरी असतात. मी माझा आर्किटेक्चर कन्सल्टन्सीचा, म्हणजे सेल्फ एम्प्लॉईड. उदा. डॉक्टर, वकील, कॉन्ट्रॅक्टर, ट्रॅव्हेल एजंट ही सर्व्हिस इंडस्ट्री. जो जितका जास्त गरजु, तितका तो समोरच्याकडून पिळला जातो, हा इथला नियम.
तुमच्यामध्येही कित्येक जण सर्व्हिस इंडस्ट्री मध्ये, सेल्फ एंप्लॉईड किंवा अशाच कुठल्याही व्यवसायात असतील, माझा कन्सल्टन्सीचा व्यवसाय करताना, क्लायंट बनुन येणार्या, माणसांचे अगदी वेगवेगळे प्रकार जवळुन अनुभवता आले, आणि समजले, की क्लायंटमध्येही माणसांच्या काही कॅटॅगिरी लपलेल्या असतात.
१) भुरटी कॅटॅगिरी – सर्वप्रथम ऑफीसमध्ये आल्याआल्या ते कठोर चेहरा ठेऊन, आपण दिलेल्या भाबड्या स्माईलचे शुन्य उत्तर देतात. मग आपल्या श्रीमंतीची छाप पाडायचा (केविलवाणा?) प्रयत्न करतात, आपल्याला काम देऊन हे आपल्यावर खुप मोठे उपकार केल्याचा आविर्भाव आणतात. बेफीकीर वृत्तीचे कटाक्ष आणतात, चेहर्यावर नापसंतीचे भाव आणतात, तुम्ही अजुनही बधला नाहीत तर ते तुमच्या परीचयातील, नात्यातील मोठमोठ्या लोकांच्या ओळखी काढतात, उदा. शहरातील सर्वच चांगले आर्किटेक्ट यांचे मित्र असतात, पण केवळ आपल्यावरील प्रेमाखातर व आपलं व्यावसायिक भलं व्हावं म्हणुन हे आपल्याला संधी देतात (असं ते छाती ठोकुन सांगतात), मधुनच आपल्या पात्रतेविषयी उलटेसुलटे प्रश्न विचारतात. यांच्या मते, शहराच्या अगदी मोक्याच्या ठिकाणी यांचा प्लॉट असतो, आणि त्यांचं काम केल्याने आपलं भाग्य फळफळणार असतो, मग हे आपल्यावर पैशाचा पाऊस पडणार असतात.
आपण एडव्हांस मागीतला, की कशाचा? असं म्हणुन यांच्या चेहर्यावर आठ्या पडतात, जसं की आपण एखादा गुन्हा केलाय..
खरं तर यांना फुकटचं एलेव्हेशन, एखादा प्लान, पदरात पाडुन घ्यायचा असतो. अशा लोकांच्या अमिषाला बळी पडायचं नसतं, यांचं फार मनोरंजनही करायचं नसतं.
यांना हाताळयची, यांच्याकडून पैसे काढण्याची एक पद्धत असते.
नम्रपणे, प्रेमाने, चहापाणी करुन, हसतमुखाने त्यांना संदेश द्यायचा की पैसे घेतल्याशिवाय आम्ही काम सुरु करत नाही. समजुन घ्या, हे एक प्रकारचं मानसिक युद्ध असतं.
गरजु व्यक्ती बरोब्बर पैसे देतो, फुकट काम करुन घेणारा चुपचाप उठुन निघुन जातो, आणि आपला वेळ वाचतो.
२) कंन्फ्युज आणि संशयी कॅटॅगिरी – कपाळावर आठ्या आणि मनात शंका घेऊन फिरणारे असतात, हे महाशय. आतुन धुर्त व कपटी असतात, आपण कितीही जीव तोडुन काम करा, यांना त्यापेक्षा चांगलं होवु शकलं असतं, असं भासवण्यात ते यशस्वी होतात. काम चांगलं झालयं हे ते खुल्या मनानं मान्य करीत नाहीत, म्हणजे आपोआप पैसे मागताना आपल्याला चाचरायला होतं, हे ही एक प्रकारचा इमोशनल गेम खेळतात.
यांनी पैसे जरी दिले, तर ते जशी एखादी मारकी म्हैस जितक्या सहजपणे दुध देते तितक्या सहजपणे हे आपली फीस देतात. यांची कामं करुन पैसे मिळाले तरी समाधान मिळत नाही. तुम्हाला आपल्या स्किलवर जितका पक्का विश्वास असेल, तितकं कन्विक्शन आपोआप बाहेर येईल. आपलं काम खुप छान आहे हे यांना पटवुन देण्यात आपण यशस्वी झालो, की हे आपल्याला मागेल तितके पैसे देतात, फक्त पोटात शिरुन ह्यांचा विश्वास जिंकायला यायला हवा.
३) जेन्युइन कॅटॅगिरी – हे एकदम प्रोफेशनल लोक, (हो, तुमच्यासारखे आणि माझ्यासारखे.) मागीतल्याबरोबर, हे चटकन एडव्हान्समध्ये पैसे देतात, आपल्याकडूनही चोख कामाची अपेक्षा ठेवतात, अन् वाजवुन काम करुनही घेतात. यांच्यासोबत काम करताना कामाचा, क्रिएटीव्हीटीचा आनंदही मिळतो आणि बर्यापैकी पैसाही मिळतो. अशा लोकांना तन, मन, धन लावुन पुर्ण सर्विस द्यायची असते, हे आपल्याला अजुन क्लायंट मिळवुन देतात.
परवापर्यंत मला वाटायचं ह्या तीनच कॅटॅगिरी असतील. पण काल एक आक्रित घडलं आणि आजचं हे लेखन घडलं. काल रात्री जुनेच ओळखीचे ग्रह्स्थ आले, त्यांना घराच्या बांधकामासाठी नगरपालिकेत ब्ल्यु प्रिंट द्यायच्या आहेत. भावाभावाच्या भांडणात हे सध्या बेघर आहेत. भाड्याच्या घरात राहतात. कोर्ट कचेरी चालु आहे, भ्रष्ट यंत्रणेपुढे हतबल झालेत. आरोग्याच्या आणि इतर कटकटी मागे लागलेल्या आहेत. होणार्या बांधकामावरही प्रश्नचिन्हच आहे. आर्थिक स्थिती यथातथाच आहे,
आमचा परीचय जुनाच, पण कधीच हक्क दाखवत नाहीत, आल्याआल्या ब्ल्युप्रिंटचे चार्जेस म्हणुन त्यांनी बळेबळेच माझ्या हातात पाच हजार कोंबले, मी म्हणालो नाही, सर प्लिज नको. पण तेही खुप जिद्दी, आणि स्वाभिमानी, नेहमीप्रमाणे त्यांनी मला अजिबात जुमानले नाही, आणि पटकन निघुन गेले, माझ्या डोळ्यात खळकन पाणी जमा झालं.
कित्येक नात्यातल्या श्रीमंत म्हणवल्या जाणार्या लोकांनी, माझ्याकडून, माझ्या करीअरच्या सुरुवातीला, गोड बोलुन फुकटात बिल्डींग बांधुन घेतल्या आणि काम झाल्यावर ओळख सुद्धा दाखविली नाही, वर निर्लज्ज्पणे खुशाल मिरवतात…
आणि एक हा माणुस,….
इतक्या अडचणीत असुन, गरीबीत सुद्धा माणुसकी आणि प्रोफेशनॅलिझम विसरला नाही, कोणत्या मातीची बनली असतील अशी माणसं?
आणि म्हणुन आज एक कॅटॅगिरी ऍड केलीये, राजा माणुस कॅटॅगिरी. …
वाचण्यासारखे आणखी काही…..
Low Cost Housing – बांधकामाची किंमत कमी कशी कराल?
प्रधानमंत्री आवास योजना – होम लोन व्याज दरावर सब्सिडी २०१७
गृहखरेदी करण्याआधी या प्राथमिक बाबी नक्की तपासून बघा!!
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.