१५ ऑगस्ट १९४७, भारताचा स्वातंत्र्य दिन.
गेली ७४ वर्षे हा दिवस आपण स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो. ‘भारताचा स्वातंत्र्य दिन चिरायू होवो’ अशा सगळीकडे घोषणा दिल्या जातात.
स्वातंत्र्य संग्रामात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना प्रत्येक जण मनोमन आदरांजली वाहतो. दिवस मावळल्यावर हा उत्साह तसाच विरून जातो.
ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी, योद्धांनी आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवलं त्या घरातल्या माणसांचं पुढे काय झालं, या स्वातंत्र्याचा उपभोग ते घेताहेत का, सरकारनं जाहीर केलं त्याप्रमाणे प्रत्येक स्वातंत्र्य वीराच्या कुटुंबाला सरकारकडून आधार मिळतोय का असे एक ना अनेक प्रश्न असतात.
मग आपण साजरा करतो तो खरंच स्वातंत्र्य दिन म्हणावा की नुसताच बेगडीपणा???
अशाच एका कुटुंबाची, कुटुंब कोणतं माहित आहे? चक्क वीरांगना झाशीच्या राणीचं!! स्वतंत्र भारतातली सद्यस्थिती काय आहे ते आपण या लेखात पाहुया…
१८५७ चं स्वातंत्र्य समर म्हणजे झाशीची राणी लक्ष्मीबाई हे नाव सहज आठवतं.
इवलंसं पोर पाठीवर घेऊन स्वातंत्र्य संग्रामात उडी घेणारी एक निर्भिड आई.
ती युद्धात सहभागी होणार आहे, असे तिचे अनेक फोटो, पुतळे आपण पाहतो.
पण पाठीवर असलेल्या त्या इवल्याशा मुलाचं पुढं काय झालं, ते कुटुंब आज स्वतंत्र भारतात कुठे आहे याची कोणालाच फारशी कल्पना नाही.
राणी लक्ष्मीबाई यांचे दत्तक पुत्र दामोदर राव यांना इंग्रज सरकारने पेंशनच्या रूपात मदत केली.
पण स्वतंत्र भारतात मात्र ती परिस्थिती राहिली नाही. दुर्दैवाने भारत सरकारकडून कोणतीही मदत आज या कुटुंबाला मिळत नाहीये.
अर्थार्जनासाठी त्यांच्या पतवंडांनी इंदौरच्या एका कचेरीत टायपिंगचं काम सुरू केलं.
राणी लक्ष्मीबाई आणि गंगाधर राव यांच्या मुलाचं निधन झाल्यानंतर इंग्रजांच्या तावडीतून आपलं संस्थान टिकवण्यासाठी त्यांनी दत्तक पुत्र घेण्याचं ठरवलं.
त्याप्रमाणे त्यांनी संस्थानातले तहसीलदार काशीनाथ हरिभाऊ यांचे चुलत भाऊ वासुदेव यांच्या दामोदर नावाच्या मुलाला दत्तक घेतलं.
वसुदेवांनीही आनंदानं मुलाला दत्तक दिलं.
त्यांची अशी आशा होती की दामोदर राव पुढे झाशी संस्थानचे राजे होतील. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळं होतं.
इंग्रजांना हे दत्तक विधान मान्य नव्हतं. नंतर १८५७ ला युद्धात झाशीची राणी लक्ष्मीबाई धारातिर्थी पडल्या.
त्यानंतर लहानग्या दामोदर रावांच्या जीवाला धोका होता. अशा परिस्थितीत राणी लक्ष्मीबाई यांचे अंगरक्षक देशमुख यांनी दामोदर रावांना कसंबसं वाचवून इंदौरला आणलं.
दामोदर राव इंदौरमध्येच लहानाचे मोठे झाले. तिथेच माटोरकरांच्या मुलीबरोबर त्यांचा विवाह झाला.
१८७२ मध्ये त्यांच्या पत्नीचं निधन झालं. त्यानंतर बळवंत रावांच्या मुलीबरोबर त्यांचा दुसरा विवाह झाला.
पुढे लक्ष्मण नावाचा मुलगा त्यांना झाला. एक संदर्भ असा मिळतो की १८७० मध्ये इंदौरमध्ये दुष्काळ पडला. त्या दरम्यान दामोदर राव कर्जबाजारी होऊन एका सावकाराच्या तावडीत सापडले.
काही आर्थिक मदत मिळावी म्हणून दामोदर राव इंग्रज सरकारला विनवण्या करु लागले.
त्यानंतर तत्कालीन गवर्नर जनरल लॉर्ड नॉर्थब्रुक यांच्या आदेशानंतर तिथल्या रेजिडंटने त्यांना दहा हजार रुपये रक्कम तसेच दरमहा दोनशे रुपये पेंशन देण्याचं मंजूर केलं.
दामोदर रावांच्या मृत्यूनंतरही दरमहा शंभर रुपये पेंशन त्याचा मुलगा लक्ष्मण राव यांना मिळत होती. भारताच्या स्वातंत्र्यानंतर मात्र ही पेंशन बंद झाली.
लक्ष्मण रावांचे पणतू योगेश राव असं सांगतात की स्वातंत्र्य संग्राम सेनानी आश्रीतांच प्रमाणपत्रही या कुटुंबाला मिळालं नाही.
त्यामुळे स्वातंत्र्य सेनानींच्या कुटुंबाला मिळणारे कोणतेही लाभ या कुटुंबाला मिळालेच नाही.
परिस्थिती अशी झाली होती की लक्ष्मण रावांचा मुलगा कृष्ण राव यांनी चरितार्थासाठी इंदौरच्या एका कचेरीत टायपिंगचं काम सुरू केलं.
सद्यस्थितीत योगेश राव सॉफ्टवेअर इंजिनिअर असून नागपूरमध्ये आपल्या कुटुंबासह राहतात.
ही तर केवळ एका कुटुंबाची कथा आहे. असे कित्येक स्वातंत्र्य सेनानी असतील ज्यांच्या कुटुंबाला सरकारकडून अशी मदत मिळते हे माहितही नसेल.
मग आपण साजरा करतो तो स्वातंत्र्य दिन काहीसा स्वार्थीपणा नाही का!!
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.