आपल्या भारतीय समाजात स्त्रियांची मासिक पाळी हा एक असा विषय आहे ज्यावर उघडपणे काही बोललं जात नाही, अनेक गैरसमज आणि अंधश्रद्धा आहेत आणि पुरुष तर जाऊदे पण स्त्रिया देखील ह्या विषयावर जागरुकतेने बोलणं, नीट शास्त्रोक्त माहिती करून घेणं टाळतात.
आपल्या समाजात पाळी आलेल्या स्त्रीला बाजूला बसवण्याची प्रथा आहे. चार दिवस तिने कुणालाही शिवायचे नाही, घरातल्या कुठल्याही वस्तूंना, ठेवणीतल्या पदार्थांना हात लावायचा नाही असे अनेक घरांमध्ये पाळलं जातं.
पाळी आलेल्या स्त्रीने हात लावला तर लोणचं खराब होतं इथपासून ते तिनी कोणाला हात लावला तर देवांचा प्रकोप होतो इथपर्यंत वाटेल ते गैरसमज आहेत.
आज आपण ह्या सगळ्या समजुती कशा चुकीच्या आहेत हयाबद्दल आणि मासिक पाळी म्हणजे काय ह्याबद्दल अजून जाणून घेणार आहोत.
मासिक पाळी म्हणजे नक्की काय
वयात आलेल्या प्रत्येक स्त्रीच्या गर्भाशयाच्या आतल्या भागाला पेशी आणि रक्ताचे एक अस्तर असते.
हे अस्तर ती स्त्री गरोदर झाली असता गर्भाच्या पोषण आणि संरक्षणाकरता वापरले जाते. परंतु जर ती स्त्री गरोदर नसेल तर ते अस्तर गर्भाशयातून योनिमार्गाद्वारे बाहेर टाकले जाते.
आणि नवीन अस्तर तयार होते. ही प्रोसेस दर महिन्याला घडते. त्यामुळे गरोदर नसलेल्या प्रत्येक स्त्रीला प्रत्येक महिन्याला योनिमार्गातून असा रक्तस्त्राव होतो. त्यालाच मासिक पाळी असे म्हणतात.
मासिक पाळीची सुरुवात किशोरावस्थेतील ९ ते १५ वर्षे वयाच्या मुलींमध्ये दिसून येते. आणि साधारणपणे वयाच्या ४५ ते ५५ वर्षांपर्यंत स्त्रियांना पाळी येते. त्यांनंतर पाळी येणे बंद होते.
मासिक पाळी बद्दल अधिक माहिती
मासिक पाळी ही साधारणपणे दर २८ ते ३० दिवसांनी येते. रक्तस्त्राव ३ ते ५ दिवस होतो.
पहिले २ दिवस त्याचे प्रमाण जास्त असते. पाळी आल्यानंतर साधारण १४ दिवसांनी ओवरी मधून एक बिजांड बाहेर पडतं, जर सं_भो_गा द्वारे त्या बिजांडा चा संपर्क स्पर्मशी आला तर गर्भधारणा होते. गर्भधारणा झाली नाही तर पुन्हा पुढील महिन्यात मासिक पाळी येऊन रक्तस्त्राव होतो.
तर असे हे मासिक पाळीचे चक्र चालू असते. लहान मुलींमध्ये सुरूवातीची २ वर्षे पाळी अनियमित असू शकते, आणि पाळी जाण्याच्या वयात (ज्याला मेनोपॉझ म्हणतात) देखील ती अनियमित बनते.
‘मेनोपॉझ’ची लक्षणे आणि त्रास कमी करण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स वाचा या लेखात
परंतु मधल्या संपूर्ण काळात नियमितरित्त्या पाळी येणे हे स्त्रीच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे.
पाळीबद्दल आणि पाळी आलेल्या स्त्री बद्दल असलेल्या अंधश्रद्धांना कोणताही शास्त्रीय आधार नाही.
१. पाळी आलेली स्त्री अपवित्र असते.
२. ती ४ दिवस कोणालाही शिवू शकत नाही.
३. तिने हात लावला असता वस्तु अपवित्र, खराब होतात.
हे आणि अशा प्रकारचे सर्व समज बिन बुडाचे आहेत.
पण पाळी बद्दल आणखी काही गैरसमज देखील आहेत. ते कोणते ते आपण विस्ताराने पाहूया.
१. पाळी दरम्यान सं_भो_ग केला असता गर्भधारणा होत नाही
बहुतेक स्त्रियांची अशी समजूत असते की त्यांची पाळी नियमित स्वरूपात येत असेल तर पाळीचे पहिले २ दिवस असुरक्षित सं_भो_ग केला तरीही गर्भधारणा होत नाही.
परंतु हे सत्य नाही, कारण स्त्रीच्या शरीरात स्पर्म ५ दिवस पर्यन्त जीवंत राहू शकतो, त्यामुळे जर काही कारणाने बिजांड बाहेर येण्याची प्रक्रिया लवकर झाली तर गर्भधारणा होऊ शकते.
त्यामुळे जर गर्भधारणा नको असेल तर सुरक्षित सं_भो_ग करणेच योग्य आहे.
२. पाळी दरम्यान व्यायाम करणे योग्य नाही
हा एक मोठा गैरसमज आहे. नियमित व्यायाम करणे हे शरीरासाठी आवश्यक आहेच परंतु योग्य स्वरूपाचा व्यायाम पाळी दरम्यान करणे हे पाळी दरम्यान होणारे शारीरिक त्रास कमी करते.
त्यामुळे हलका, योग्य व्यायाम अवश्य करावा.
मासिक पाळी दरम्यान कोणते व्यायाम करावेत ते वाचा या लेखात
३. पाळी मुळे शरीरातील रक्त खूप कमी होते
सर्वसाधारणपणे असा समज असतो की पाळी दरम्यान शरीरातून खूप रक्त जाते.
परंतु हे खरे नाही, पाळी दरम्यान फक्त ८० मिलि इतकाच रक्तस्त्राव होतो. ८० मिली पेक्षा जास्त म्हणजे साधारण ५ दिवसांपेक्षा जास्त रक्तस्त्राव झाला तरच तो अति रक्तस्त्राव असतो.
४. पाळी दरम्यान जाणारे रक्त हे दूषित असते
हे सत्य नाही. पाळी दरम्यान होणारा रक्तस्त्राव हा नॉर्मल रक्ताचाच असतो. त्यात काहीही अशुद्ध, घाण नसते.
५. पाळी आधी किंवा दरम्यान होणारे त्रास खरे नसतात
हे देखील सत्य नाही. पाळी सुरू होण्याआधीच्या काळात शरीरात हॉर्मोन्स मध्ये होणाऱ्या बदलांमुळे सारखे मूड स्विंग होणे, रडू येणे, पोट दुखणे, पिंपल्स येणे, बद्धकोष्ठ अथवा जुलाब होणे असे त्रास होऊ शकतात.
तर हे आहेत पाळी बाबत होणारे गैरसमज.
आता पाहूया मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या तक्रारी
जर तुम्हाला खालीलपैकी कोणताही त्रास होत असेल तर स्त्री रोग तज्ञांना जरूर भेट द्या.
१. पाळी दरम्यान खूप जास्त प्रमाणात रक्तस्त्राव
२. मासिक पाळी अजिबात न येणे
३. पाळी दरम्यान पोटात तीव्र वेदना होणे
४. अनियमित मासिक पाळी
तर अशी ही मासिक पाळी, स्त्रियांच्या आरोग्याशी निगडीत असणारी त्यांची जणू सखीच. मासिक पाळी बद्दल सर्व माहिती जाणून घेऊन त्रास असेल तर योग्य उपचार करून घेऊन निरोगी रहा.
स्वस्थ रहा आनंदी रहा.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.