तुमचा कान सतत खाजतो का? सतत कॉटन बड घेऊन कान खाजवायची तुम्हाला सवय आहे का?
किंवा त्याहीपेक्षा भयंकर म्हणजे काहीतरी टोकदार वस्तु कानात घालून तुम्ही कान खाजवता का? असे करत असाल तर थांबा. तुम्ही स्वतःचे नुकसान करून घेत आहात.
आज आपण जाणून घेऊया की आपल्या कानासाठी काय योग्य आणि काय अयोग्य आहे.
कान, नाक, घसा तज्ञ डॉक्टर असे सांगतात की थोड्या प्रमाणात कान खाजणे हे अगदी नॉर्मल आहे. सर्वांनाच तसे होत असते.
त्या गोष्टीची फार काळजी करण्याची गरज नाही. परंतु कानाबाबत काही गोष्टींचा अतिरेक करून किंवा काही लक्षणांकडे दुर्लक्ष करून कान खाजण्याचा त्रास लोक स्वतःहून ओढवून घेतात. कसा ते पाहूया…
१. कान अति स्वच्छ करणे
कानात मळ साठला आहे असे वाटून लोक सतत कान स्वच्छ करतात. परंतु कानातला मळ म्हणजेच इयर वॅक्स हे खरंतर कानाच्या संरक्षणासाठी असते.
इयर वॅक्सच्या आवरणामुळे कानात कोणत्याही प्रकारचे जिवाणू शिरण्यास मज्जाव होतो आणि कानाचे इन्फेक्शनपासून संरक्षण होते.
परंतु हा मळ किंवा घाण आहे असे वाटून तो अति प्रमाणात स्वच्छ केल्यामुळे कानाचे संरक्षक कवच नष्ट होते आणि कानात इन्फेक्शन होऊन वारंवार जास्त प्रमाणात खाज सुटते.
म्हणून कानात इयर वॅक्सचे प्रमाण जास्त आहे असे वाटल्यास डॉक्टरांनी सुचवलेले ड्रॉप्स घालून तो वॅक्स केवळ सैल करून घ्यावा. सतत कान कोरून तो काढून टाकू नये.
२. त्वचाविकार
शरीराच्या इतर भागाप्रमाणेच कान देखील त्वचेच्या आवरणांचा बनलेला असतो. त्यामुळे जर तुम्हाला एक्झेमा किंवा सोरायसीस सारखा त्वचविकार असेल तर त्याची लागण कानात देखील होऊ शकते आणि त्यामुळे कान खाजणे सुरु होते. जर असे होत असेल तर त्वरित त्वचाविकार तज्ञ किंवा कान, नाक, घसा तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषधे सुरु करावीत.
३. कानातील इन्फेक्शन
जर वारंवार कान खूप खाजत असेल तर ते कानात इन्फेक्शन असण्याचे प्राथमिक लक्षण असू शकते.
ह्यातून पुढे कानात वेदना होणे आणि काही प्रमाणात ऐकण्याच्या शक्तीवर परिणाम होणे असे त्रास होऊ शकतात. त्यामुळे वेळीच डॉक्टरांकडून कानाची नीट तपासणी करून घेणे आवश्यक आहे.
तसेच जर तुम्ही ऐकू येण्याचे मशीन वापरत असाल तर ते पूर्णपणे निर्जंतुक करून वापरणे आवश्यक आहे.
ह्यावरून असे लक्षात येते की कान खाजणे ही एक नॉर्मल गोष्ट आहे आणि कान खाजणे जर तात्पुरत्या स्वरूपाचे असेल तर त्याची विशेष काळजी करायची गरज नाही.
परंतु जर जास्त दिवस कान खाजत राहिला किंवा त्याबरोबर इतरही लक्षणे जसे की कानदुखी, ऐकू कमी येणे दिसु लागली तर मात्र त्वरित डॉक्टरांना भेटावे.
तसेच कान योग्य पद्धतीने स्वच्छ करावा. तर मित्रांनो ह्या लेखातील माहितीचा लाभ घ्या आणि आपले कान निरोगी ठेवा.
कानातला मळ (Ear Wax) काढण्याचे घरगुती उपाय
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.