गाढविणीचे दूध असा शब्द ऐकल्यावर आपण एकदम कल्पना करू शकत नाही की ते काही उपयोगाचे असेल.
कारण गाढव म्हटलं की ओझी वाहणारा एक प्राणी ह्यापलिकडे आपण फार विचार करत नाही.
परंतु, ही गोष्ट खरी आहे. गाढविणीचे दूध हे अतिशय उपयुक्त आहे. गुणवत्तेच्या बाबतीत ते चक्क मानवी दुधाच्या जवळ जाणारे आहे.
त्यात प्रोटीनची मात्रा कमी असली तरी लॅक्टोजची मात्रा जास्त असते. तसेच ह्या दुधात फॅटचे प्रमाण अतिशय कमी असते. परदेशातील अनेक नोकरदार महिला आपल्या तान्ह्या मुलांना हल्ली गाढविणीचे दूध देत आहेत.
फार पूर्वीपासून गाढविणीच्या दुधाचा सौन्दर्यप्रसाधन म्हणून उपयोग होतो. अतिशय सुंदर असणारी इजिप्तची महाराणी क्लिओपात्रा ही नेहेमी गाढविणीच्या दुधाने आंघोळ करत होती असे उल्लेख आढळले आहेत.
सध्या अनेक उत्तमोत्तम सौन्दर्यप्रसाधनांची निर्मिती करताना गाढविणीच्या दुधाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.
उत्तम जातीच्या गाढविणींची पैदास करून त्यांची निगा राखून त्यांच्या दुधाची विक्री करणे हा सध्या मोठा व्यवसाय बनला आहे. गाढविणीचे दूध हे जास्त काळ टिकत नसल्यामुळे आणि त्यापासून पनीर देखील बनवता येत नसल्यामुळे ते फार काळजीपूर्वक वितरित करावे लागते.
तसेच ह्या दुधाला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे आणि त्यामानाने हा व्यवसाय करणारे लोक कमी आहेत त्यामुळे ह्या दुधाची किंमत इतर दुधापेक्षा जास्त आहे.
परदेशात जरी ह्या व्यवसायचं प्रमाण जास्त असलं तरी भारतात मात्र हा व्यवसाय अजून तितकासा प्रचलित नाही, ह्याचे प्रमुख कारण म्हणजे गाढविणीच्या दुधाविषयी अधिक माहिती अजून आपल्या इथे लोकांपर्यंत पोचलेली नाही.
गाढविणीचे दूध अतिशय पौष्टिक आहे, त्यात मोठ्या प्रमाणात लॅक्टोज, विटामीन डी, विटामीन बी १ , बी ६ आणि बी १२ तसेच विटामीन ई असते, तसेच मोठ्या प्रमाणात अँटी ऑक्सिडंट्स असतात.
गाढविणीचे दूध हे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त असते म्हणून युरोपात कोरोनाव्हायरसीची सुरुवात झाल्यापासून या दुधाला मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे.
परंतु भारतात ह्यावर अजून संशोधन होण्याची, आणि उत्पादनक्षमता वाढवण्याची गरज आहे.
भारतात स्थानिक पातळीवर हा गाढविणीच्या दुधाचा व्यवसाय चालतो परंतु मोठ्या प्रमाणावर ह्या व्यवसायाची वाढ अजून झाली नाही.
एक गाढविण एका दिवशी साधारण अर्धा लिटर इतके दूध देऊ शकते. त्यामुळे मुळात ह्या दुधाचे उत्पादन कमी आहे.
तसेच आजमितीला भारतात गाढवांची संख्या कमी होत चालल्यामुळे देखील उत्पादन कमी होत आहे. हे देखील हे दूध महाग असण्याचे एक कारण आहे.
भारत सरकारच्या संशोधन केंद्र आणि पशू वैद्यकीय खात्यातर्फे मात्र आता ह्या दुधाच्या बाबतीतल्या संशोधनाला तसेच उत्पादनता वाढवण्याला प्रोत्साहन दिले जात आहे.
भारतीय कृषि अनुसंधान परिषदने नुकतीच अशी घोषणा केली आहे की हिलारी जातीच्या गाढवांची एक डेअरी स्थापन केली जाईल आणि त्यात मोठ्या प्रमाणात उत्तम अशा हिलारी जातीच्या गाढवांची पैदास करून त्यांचे उत्तम जतन करून मोठ्या प्रमाणात गाढविणीचे दूध काढले आणि वितरित केले जाईल.
त्यामुळे मोठ्या प्रमाणावर गाढविणीचे दूध उपलब्ध होईल आणि त्याची किंमत कमी होऊन ती सर्वसामान्यांना देखील परवडू शकेल.
सध्या भारतात गाढविणीच्या दुधापासून साबण, मॉईश्चरायजर आणि स्कीन क्रीम अशी सौन्दर्य उत्पादने तयार केली जातात. ही उत्पादने वापरणारा एक मोठा वर्ग भारतात आहे.
ही उत्पादने ऑनलाइन शॉपिंग साइट वर उपलब्ध आहेत. तसेच काही प्रमाणात पोटाच्या विकरावरील औषधे देखील तयार केली जातात.
सध्या तरी भारतात गाढविणीच्या दुधाची विक्री करणारी डेअरी उपलब्ध नाही. काही लोक खाजगी स्वरूपात वेबसाइटद्वारे ह्या दुधाची विक्री करतात.
स्थानिक पातळीवर हे दूध साधरण रु.५०००/- प्रती लिटर इतक्या दराने विकले जाते. परंतु प्रत्यक्ष किंमत त्या विक्रेत्याकडूनच कळू शकेल.
तर असे हे बहुगुणी गाढविणीचे दूध. भविष्यात भारतात देखील सहजपणे उपलब्ध होऊन सर्वांना उपयोगी पडेल हे नक्की.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.