हॉर्मोन्स म्हणजे आपल्या शरीरात तयार होणारे एक प्रकारचे केमिकल असते जे रक्ताच्या माध्यमातून शरीराच्या सर्व अवयवांपर्यंत पोहोचते.
हार्मोन्स शरीराच्या विविध क्रियांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. शरीराची वाढ होण्याची प्रमुख क्रिया हार्मोन्समुळे घडते. शारीरिक विकास, पौगंडावस्था, प्रजनन, चयापचय, स्वभाव आणि मूड सांभाळणे या सर्व प्रक्रियांमध्ये हार्मोन्सचा महत्त्वाचा सहभाग असतो. हार्मोन्स अतिशय प्रभावी असतात आणि त्यांचे संतुलन रहाणे शरीराच्या आरोग्याच्या दृष्टीने फार महत्त्वाचे असते.
हॉर्मोन्सचे असंतुलन म्हणजे नक्की काय?
शरीरात योग्य त्या प्रमाणात हार्मोन्सची निर्मिती होणे आणि ते योग्य रीतीने रक्ताद्वारे शरीराच्या सर्व अवयवांपर्यंत पोहोचून सर्व अवयवांची कामे योग्यरितीने होणे हे हॉर्मोन्सचे संतुलन असणे आहे.
परंतु हार्मोन्स अतिशय प्रभावी असल्यामुळे त्यांच्या मात्रेमध्ये थोडा जरी फरक पडला तरी त्याचा शरीरावर मोठ्या प्रमाणात परिणाम होऊ शकतो. जास्त प्रमाणात हार्मोन्स उत्पन्न होणे अथवा हॉर्मोन्सचे उत्पन्न कमी होणे या दोन्ही परिस्थितीमध्ये हॉर्मोन्सचे असंतुलन झाले आहे असे लक्षात येते. त्याचा थेट परिणाम शारीरिक प्रक्रियांवर होतो.
हार्मोन्सचे निर्मितीचे प्रमाण कमी अधिक झाले तर शरीरातील चयापचय, शारीरिक विकास, प्रजनन ह्या आणि अशा इतर प्रक्रियांवर परिणाम होतो.
हॉर्मोन्सचे निरनिराळे प्रकार आहेत. ते खालील प्रमाणे
१. ग्रोथ हॉर्मोन
या हार्मोनची उत्पत्ती डोक्याच्या मागच्या बाजूला होते. ग्रोथ हॉर्मोन शरीराची वाढ, शारीरिक विकास, स्नायूंची मजबुती अशा कामांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. योग्य प्रमाणात उंची वाढणे ह्या हार्मोनच्या उत्पत्ती वर अवलंबून असते. तसेच चयापचय करण्याच्या कामात देखील हे हॉर्मोन महत्त्वाचे ठरते.
२. थायरॉईड हॉर्मोन
हे हॉर्मोन गळ्यामध्ये श्वासनलिकेच्या वर असणाऱ्या ग्रंथींमध्ये तयार होते. हाडे आणि मेंदू यांच्या विकासासाठी हे हॉर्मोन महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.
३. इन्शुलीस हॉर्मोन
हे हॉर्मोन पोटात असणाऱ्या स्वादुपिंड यामध्ये तयार होते. अन्नातील कार्बोहायड्रेटचे ऊर्जेत रूपांतर करण्याचे प्रमुख काम हे हार्मोन करते. रक्तातील शुगर नियंत्रित ठेवण्याचे महत्त्वाचे काम हे हार्मोन बजावते.
४. कॉर्टीसोल हॉर्मोन
हे एक प्रकारचे स्ट्रेस हॉर्मोन आहे. आपल्याला मानसिक दृष्ट्या स्वस्थ आणि निरोगी ठेवण्याचे महत्त्वाचे काम हे हार्मोन करते. एखादी व्यक्ती जास्त चिंता किंवा तणावात असेल तर शरीरातील कोर्टीसोलचे उत्पादन वाढते.
५. इस्ट्रोजेन हॉर्मोन
महिलांमधील मासिक पाळी, पौगंडावस्था, प्रजनन आणि मेनोपॉज ह्या टप्प्यांमध्ये हे हॉर्मोन महत्त्वाची भूमिका बजावते. वयात येणाऱ्या मुलींमध्ये ह्या हॉर्मोनच्या असंतुलनाची समस्या अलीकडे जास्त प्रमाणात दिसून येते.
६. टेस्टेस्टेरॉन हॉर्मोन
पुरुषांमधील पौगंडावस्था, लैंगिक अवयवांचा विकास आणि प्रजनन ह्या टप्प्यांमध्ये हे हॉर्मोन महत्त्वाची भूमिका बजावते. ह्या हॉर्मोन्सचा अभाव पुरुषांमध्ये दुर्बलता, चिडचिड, नैराश्य निर्माण करू शकते.
हॉर्मोन्सचे संतुलन का बिघडते?
हॉर्मोन्सचे संतुलन बिघडण्याची अनेक कारणे आहेत. अनियमित जीवनशैली हे त्यातील महत्त्वाचे कारण आहे.
१. अनियमित जीवनशैली असणे.
२. पौष्टिक आहार न घेता जंक फूड आणि पॅकबंद फुडचे अधिक सेवन करणे.
३. व्यायाम आणि शारीरिक हालचालींचा अभाव, बैठी जीवनशैली
४. अपुरी झोप
५. वेळेवर भोजन न करणे
६. ताण तणाव आणि चिंता
७. स्थूलपणा, उंचीच्या प्रमाणात वजन जास्त असणे.
हॉर्मोन्सचे असंतुलन होऊ नये म्हणून काय करावे?
आपण आधी पाहिल्याप्रमाणे हॉर्मोन्सचे असंतुलन अनियमित जीवनशैलीमुळे होते. जीवनशैलीमध्ये सुधारणा हा हॉर्मोन्सचे असंतुलन थांबविण्याचा प्रमुख उपाय आहे.
१. योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात पौष्टिक आहार घेण्याची सवय लावून घ्यावी.
२. हिरव्या पालेभाज्या आणि ताजी फळे भरपूर प्रमाणात खावीत.
३. भरपूर पाणी प्यावे. दिवसाला किमान सात ते आठ ग्लास पाणी प्यावे.
४. योग्य प्रमाणात झोप घेणे आवश्यक आहे. कमीत कमी सात तास झोप घ्यावी. जागरणे करू नयेत.
५. आनंदी आणि तणावमुक्त राहण्याचा प्रयत्न करावा. तरुणांमध्ये हार्मोन्सच्या असंतुलनाचे महत्त्वाचे कारण तणाव हे आहे.
६. वजन आटोक्यात ठेवावे. स्थूल असणे देखील हॉर्मोन्सचे संतुलन बिघडवू शकते.
हॉर्मोन्सच्या असंतुलनावरील घरगुती उपाय
१. नारळाचे तेल
नारळाच्या तेलाचा आहारात समावेश करावा. त्यामुळे हॉर्मोन्सचे संतुलन होऊन वजन देखील आटोक्यात राहते. पदार्थ बनवताना फोडणीसाठी नारळाचे तेल वापरता येते.
किंवा शुद्ध स्वरूपाचे नारळाचे तेल दररोज एक चमचा ह्या प्रमाणात पिणे देखील फायद्याचे ठरते.
२. ग्रीन टी
ग्रीन टीचे नियमित सेवन चयापचय वाढवून वजन आटोक्यात ठेवते. तसेच हॉर्मोन्स संतुलित करते.
३. ओट्स
ओट्स पौष्टिक असल्यामुळे शरीराचे पोषण तर करतातच शिवाय रक्तातील साखरेचे प्रमाण देखील नियंत्रित करतात. त्यामुळे हार्मोन्स देखील नियंत्रित राहतात.
४. दालचिनी पावडर
चहामध्ये घालून किंवा इतर कोणत्याही प्रकारे दालचिनी पावडरचे सेवन करावे. त्यामुळे इन्शुलिन नियंत्रित राहून हॉर्मोन्सचे नियंत्रण होते. रक्तातील साखर नियंत्रणात राहते.
५. ऑलिव्ह ऑइल
कोणत्याही रिफाइंड तेलाऐवजी आहारात ऑलिव्ह ऑईलचा समावेश करावा. त्यामुळे हॉर्मोन्सचे संतुलन होण्यास मदत होते.
६. दही
आहारात दररोज एक वाटी दह्याचा समावेश करावा. त्यामुळे शरीरातील चांगल्या बॅक्टेरियामध्ये वाढ होऊन हॉर्मोन्स संतुलित राहतात.
७. गाजर
गाजरामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असल्यामुळे त्याचा उपयोग पचनशक्ती वाढवण्यासाठी होतो. महिलांमध्ये मासिक पाळीच्या समस्या दूर करण्यासाठी गाजराचा उपयोग होतो. गाजराचे सेवन कच्चे अथवा शिजवून असे दोन्ही प्रकारे करता येते. त्यामुळे हॉर्मोन्स नियंत्रणात राहण्यास मदत होते.
८. डार्क चॉकलेट
चिंता, ताण तणाव, डिप्रेशन असेल तर डार्क चॉकलेटचे सेवन करावे. त्यामुळे अंतर्गत हॉर्मोन्सचा स्त्राव वाढवून नैराश्य कमी होते.
तब्येतीच्या दृष्टीने डार्क चॉकलेट खाण्याचे ‘हे सात फायदे’ आहेत
९. आळशीच्या बिया किंवा flax seeds –
आळशीच्या बियांचे नियमित सेवन हॉर्मोन्सचे संतुलन राखते. ह्या बियांचे भाजून पूड करून सेवन करावे.
१०. अश्वगंधा
२ ते ३ ग्राम अश्वगंधा चुर्णाचे दररोज नियमित सेवन करावे. त्यामुळे हॉर्मोन्सशी निगडीत सर्व समस्या कमी होण्यास मदत होते. अनियमित पाळी, चिडचिड, जास्त अथवा कमी रक्तस्त्राव होणे ह्या समस्यांवर हा उपाय प्रभावी आहे.
तर हे आहेत हॉर्मोन्सच्या असंतुलनावरील घरगुती उपाय. ह्या उपायांचा जरूर वापर करा आणि सशक्त आणि निरोगी रहा. तुमचे अनुभव आम्हाला जरूर कळवा.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.