जगाच्या इतिहासात बोटावर मोजण्याइतके हुकुमशहा होऊन गेले. कारण हुकूमशाहीचं विष हळूहळू तळागाळापर्यंत भिनवणं हे तितकं सोपं नसतं….
हुकूमशहा म्हंटल कि सर्वात आधी डोळ्यासमोर येतो तो ‘अडॉल्फ हिटलर’
हिटलर ज्याला आपण अतिशय माजलेला, उन्मत्त हुकूमशहा मानत आलोय, अशा माणसाचे कधी काळी करोडोच्या संख्येने अनुयायी होते आणि नुसतेच अनुयायी नाही तर तथाकथित कट्टर राष्ट्रप्रेमी आणि हिटलरचे अंधभक्त होते असं म्हणायला हरकत नाही.
त्याने अशा करोडो लोकांचा विश्वास कसा संपादन केला, त्यांचे मतपरिवर्तन कसे केले आणि असं करण्यासाठी त्याने कोणत्या युक्त्या आणि क्लुप्त्यांचा वापर केला याचा इतिहास मोठा रंजक आहे.
जगाच्या इतिहासात डोकावून पहिले तर, कुठलाही हुकूमशहा हा त्याची निरंकुश सत्ता उभी करण्यासाठी सहा तंत्रांचा वापर करतो. ती कोणती, याचा आढावा आपण या लेखात घेणार आहोत, शेवट्पर्यंत नक्की वाचा.
1) मतपरिवर्तन करणारी तंत्र
ग्रीक विचारवंत Aristotle ने लोकांची मनं वळणारी तीन तंत्र सांगितली आहेत. ती म्हणजे ‘ethos’, ‘logos’ आणि ‘pathos’.
ही तीनही तंत्र आजच्या तारखेला एम. बी. ए. च्या मार्केटिंग कोर्स मध्ये शिकवले जातात. त्यापैकी ‘ethos’ म्हणजे, आपण देत असलेली गोष्ट किती अधिकृत आहे हे पटवून देणे.
म्हणजे मला जर एक टूथपेस्ट विकायची आहे, तर ethos नुसार मी असं सांगेन की “90 टक्के डेंटिस्ट्सने ही टूथपेस्ट चांगली आहे असे सर्टिफाइड केले आहे.”
हेच मला logos म्हणजेच लॉजिक नुसार सांगायचं असेल तर मी याच टूथपेस्ट ची जाहिरात करताना सांगेन की “या टूथपेस्टमध्ये fluoride आहे जे दातांना किडण्यापासून वाचवते”
आणि pathos म्हणजे तुमच्या भावनांचा उपयोग करून तुमचं मन वळविण्या करिता सांगेन मी असं सांगेन की “या टूथपेस्ट मध्ये देशाचं ‘मीठ’ वापरलेलं आहे!!”
हे उदाहरण झालं टूथपेस्टचं! पण जेव्हा तुम्ही पानमसाला विकत असाल तर, यात तुम्ही पानमसाला विकण्यासाठी कोणतंही लॉजिक वापरू शकत नाही.
तिथे तुम्हांला लोकांच्या भावनांचा वापर करूनच आपलं इप्सित साध्य करून घ्यावं लागेल. म्हणजे अशी एखादी टॅग लाईन जी इमोशनल असेल… लोकांच्या भावनांना हात घालेल.
2) भावनात्मक आवाहन
राजकारणात हुकूमशहा हा वरच्या पानमसाल्या सारखा असतो. ज्याला कोणी लॉजिकली निवडूनच आणू शकत नाही. मग त्याला गरज पडते pathos म्हणजेच लोकांच्या भावनांचा वापर करण्याची. एक सर्वसामान्य सद्सदविकेक बुद्धीचा माणूस जो स्वतः चे तर्कशास्त्र (लॉजिक) वापरतो तो एखाद्या हुकूमशाला आपलं राजकीय नेतृत्व कधीच देणार नाही. मग अशावेळी त्या हुकूमशाहाला लोकांच्या भावनांना हात घालावा लागतो.
हेच एडॉल्फ हिटलरने केले. एडॉल्फ हिटलर महायुद्धनंतर त्याच्या भाषणांमधून जर्मन जनतेला वारंवार सांगत राहिला, “जर्मन पूर्वपदावर आणणे सोपी गोष्ट नाही, त्यासाठी तुम्हाला स्वतःला झोकून द्यावे लागेल. जर्मनीला पंगू बनवणाऱ्या ज्यूंना ठेचले तरच राष्ट्र बलवान बनेल” हे सगळे अमान्य करणारे लोक देशद्रोही म्हणून हिनवले जाऊ लागले. हळूहळू लोक हिटलरला आपलं प्रबळ नेतृत्व मानायला लागले.
“जर तुमचं तुमच्या देशावर प्रेम आहे तर मला साथ द्या”, “जर तुमचं तुमच्या सैन्यावर प्रेम असेल तर त्यांच्या हिताकरिता मला पाठिंबा द्या” अशा भावनात्मक आवाहनांची पेरणी हिटलरच्या भाषणांमध्ये असायची.
अशी भावनात्मक शब्द लोकांच्या मनाला भावतात. पण तर्कबुद्धी वापरणारे लोकं या इमोशन्सना बळी पडत नाहीत. मग अशा वेळी हुकूमशहाला फक्त pathos वापरून उपयोग नसतो. मग गरज असते ती लोकांची तर्कबुद्धी नष्ट करण्याची…
3) तर्कबुद्धी नष्ट करणे
एडॉल्फ हिटलरने 10 मे 1933 ला नाझी पार्टी ऑपरेशन द्वारे बर्लिन मध्ये 25,000 पुस्तके जाळली, ही जळताना ही पुस्तके नाझी विरोधी आहेत, देशद्रोही लेखन असेलेली आहेत असा कांगावा केला.
याआधी काही पुस्तकांवर बंदी आणली आणि याच काळात नाझी सरकारकडून पुस्तक जाळण्याचा प्रकार वारंवार होतं असे.
वास्तविक ही पुस्तके सगळया प्रकारची होती. साहित्य, मानसशास्त्र, लोकशाही इ. तसेच ज्यु लोकांनी, परदेशी लोकांनी लिहिलेली, तसेच कला, नाटक इ. विषयांवर लिहिलेल्या पुस्तकांचा यामध्ये समावेश असे.
जी जी पुस्तके नाझी पार्टीला स्वतःच्या विचार सरणी विरुद्ध वाटत असत, ती जाळली जात.
याच काळात वर्तमानपत्र किंवा समाजमाध्यमातून असे लेख छापले जात, जे लोकांचे तर्कशास्त्र संपूर्ण खोटं ठरवत असत. त्याच बरोबर असे काही खोटे वैज्ञानिक रिसर्च प्रसिद्ध केले ज्यात जर्मन कसे श्रेष्ठ आहेत बाकी सगळे लोक आपल्याहून खालच्या दर्जाचे सामान्य लोक आहेत असे लिहिलेले असे.
त्या काळात एक संशोधक होऊन गेला. ज्याला एका रात्रीत साक्षत्कार झाला की चंद्र बहुदा बर्फाचा बनलेला असावा कारण तो पांढरा दिसतो.
आणि त्याने सगळं जग आणि इतर ग्रह बर्फाने बनलेत अशी “World Ice Theory” तयार केली आणि प्रसिद्ध केली. आपल्याला वाचताना अतिशयोक्ती वाटेल पण हिटलर ने ही थेअरी प्रोमोट केली आणि नाझी सरकारने या संशोधकाला एक ‘Honorary Doctorate’ सुद्धा देऊन टाकली.
अशातच देशातील प्रॉफेसर, संशोधक, इतिहासकार यांच्यासारख्या बुद्धीजीवी लोकांवर दबाव आणला जात असे. शाळा कॉलेज, जिथे अशी वैचारिक संपन्न माणसं एकत्र येऊन विचार विनिमय करत, अशा युनिव्हर्सिटीजवर नाझी पार्टीचा पूर्ण ताबा होता.
नाझी विचार सरणी विरुद्ध कोणती गोष्ट शिकवणे अशक्य होते. टॉप युनिव्हर्सिटीज मधील तज्ञ प्रोफेसर नाझी पार्टी द्वारे नियुक्त केले जात असत आणि अभ्यासक्रमात फक्त नाझी विचारसरणी असलेले किंवा तसेंच विषय शिकवले जात.
कोणी या विचारसरणीच्या विरुद्ध जायचा प्रयत्न केल्यास त्याची नोकरीवरून हकालपट्टी ठरलेली असे. अशा वातावरणात खुप कमी लोकांची बोलण्याची हिम्मत होती आणि त्यातले एक उदाहरण म्हणजे अलबर्ट आईन्स्टाईन…
अल्बर्ट आईन्स्टाईन आणि जर्मनीचे नाझी यांचे संबंध:
हिटलर सत्तेवर आल्यावर, लोकांची तर्कबुद्धी नष्ट करण्याच्या हिटलरच्या प्रयत्नांना विरोध दर्शविण्यासाठी अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी बर्लिन मधील ‘Prussan Acadamy Of Science’ येथून राजीनामा दिला इतकेच नव्हे तर देश सोडण्याची इच्छा व्यक्त केली.
या परिस्थिती मध्ये हिटलरला विकल्या गेलेल्या प्रसिद्धी माध्यमांनी अल्बर्ट आईन्स्टाईन यांच्यावर प्रचंड टीका केली. त्यांच्या विरुद्ध लेख लिहिले गेले. त्यांची ज्यु लोकांसारखी दिसणारी कार्टून छापली गेली. इतकेच नाही तर अल्बर्ट आईन्स्टाईन यांचे रिसर्च पेपर्स सुद्धा जाळून टाकले.
अशी परिस्थिती निर्माण केली, की आईन्स्टाईन यांना ‘राजद्रोही’ म्हणून गणले जाऊ लागले. आणि त्यांच्या जिवाला देखिल धोका निर्माण झाला व त्यामुळे ते बेल्जीयमला निघून गेले.
तसेच नंतरच्या काळात त्यांना मारून हजर करण्यासाठी नाझी सरकारने बक्षीस ठेवलं होतं. मग ते आपला जीव वाचवण्या साठी इंग्लंडमधल्या छोट्याश्या गावात जाऊन राहिले.
जिथे 24 तास बॉडीगार्ड त्यांच्या बाजूला हजर असतं. आणि अशा परिस्थितीत त्या छोटयाश्या गावात राहून आईन्स्टाईन ने ‘Unified Field Theory’ (सापेक्षतावादाचा सिद्धांत) लिहिली.
4) भीती निर्माण करण्याचं तंत्र
अडॉल्फ हिटलरचं अजुन एक तंत्र होतं ज्याचा उपयोग त्याने लोकांमध्ये आपलं स्थान निर्माण करताना केलं.
ते म्हणजे भीती निर्माण करणे! आणि ही भीती कोणाची तर एक असा शत्रू ‘जो’ अस्तित्वातच नाही.
त्याची भीती घालून लोकांना घाबरवायचं आणि आपण मसीहा बनून लोकांना कसं वाचवतोय हे दाखवायचं जेणेकरून आपण लोकांच्या नजरेत हिरो ठरू.
आणि असा नसलेला शत्रू त्यावेळी ‘ज्यु’ हा होता. हिटलरने सतत लोकांचा मनावर “ज्यु हे पहिल्या महायुद्धात जर्मनीला पत्कराव्या लागलेल्या पराभवासाठी कसे कारणीभूत आहेत, तसेच ज्यु हे देशाचे अंतर्गत शत्रू आहेत” “ज्यूं पासून देशाला धोका आहे.” असे बींबवले. तशी पोस्टर त्या काळी छापली आणि जागोजागी चिकटवली जात असतं.
आता तुम्हाला असे वाटेल की जनतेने या सगळ्या गोष्टींवर सद्सद्विवेक बुद्धीने विचार न करता, विश्वास कसा काय ठेवला.
तर त्याची दोन प्रमुख कारणं होती. एक म्हणजे मीडिया, प्रसिद्धी माध्यमे पूर्णतः हिटलरला विकली गेलेली होती जी फक्त हिटलरला हव्या असलेल्या बातम्या दाखवत असत.
आणि त्यामुळे लोकांकडे खरं जाणून घेण्याचा दुसरा काहीही मार्गच उपलब्ध नव्हता. आणि दुसरं बेरोजगारी खुप होती ज्यामुळे लोकं या सगळ्या गोष्टीत अडकत चालले होते.
5) या सगळ्याचा तारणहार ‘मीच’ हे भासवणे:
स्वतःला जनतेचा मसीहा म्हणून भासवण्याच्या प्रयत्नात, तुम्ही खुप मोठ्या संकटात आहात आणि फक्त मी तुम्हाला या सगळ्यातून वाचवू शकतो हे हिटलर लोकांच्या मनावर बिंबवत राहिला.
1923 मध्ये हिटलरची बायोग्राफी लिहिली गेली होती त्यात हिटलरला “जीजस ख्रिस्त” म्हणुन संबोधलं गेलं होतं, जो येऊन जर्मनीला वाचवणार आहे”. कालान्तराने हे कळलं की ही बायोग्राफी हिटलरने स्वतःच लिहून घेतली होती फक्त नाव दुसऱ्याचं दिलं गेलं होतं.
यानंतर 2 वर्षाने हिटलरने ऑटोबायोग्राफी पण लिहिली त्यात त्याने मी गरीब कुटुंबांतून आलोय, रोजंदारी करायचो” असं खोटं खोटं लिहिलं जे नंतर बाहेर पडलं.
मीडिया ला खरेदी करणं सोपं होतं का? तर नाही, निम्मी प्रसिद्धी माध्यमे दबाव तंत्राने अखत्यारीत आणली आणि निम्मी पैशाने.
नेस्टले, कोडॅक, बी. एम. डब्लू. यासारख्या खुप नामांकित कंपन्या हिटलरला पैसा पुरवत होत्या ज्याचा भविष्यात त्यांना खुप पश्चाताप झाल्याचे अनेक पुरावे आजही अस्तित्वात आहेत.
एवढंच काय तर भारतात देखिल हिटलरला आणि त्याच्या तंत्राला पुरस्कृत करणारे लोक होते यात, सावरकर, गोळवलकर हे समाविष्ट होते. आणि असेच इतर अनेक देशांमध्ये त्याचा चाहता वर्ग अस्तित्वात होता.
या सगळ्या गोष्टी ऐकल्यावर मित्रांनो, लॉजिकली विचार करा आणि ‘Pathos’ म्हणजेच भावनेच्या आहारी जाऊन कुठल्याही राज्यकर्त्यांना हुकूमशाहीची मार्ग मोकळे करून देऊ नका. देश जर या दिशेने जाऊ लागला तर हळूहळू परतीचे सगळे मार्ग बंद होतील.
सर्व संदर्भ विकिपीडिया वर मिळू शकतील.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.