मधुमेहाच्या रुग्णांनी भात खावा की नाही? खायचा असल्यास कुठला तांदूळ खावा? संपूर्ण माहिती वाचा या लेखात
मधुमेह म्हणजेच डायबेटीस हा आता एक अगदी कॉमन आजार झाला आहे. जवळ जवळ प्रत्येक घरात एक तरी मधुमेहाचा रुग्ण आढळतो. भारत ही हळू हळू संपूर्ण जगभरात मधुमेहाची राजधानी बनत चालली आहे.
मधुमेहाचे निदान झाले की डॉक्टर त्या रुग्णाला आहार आणि जीवनशैली मध्ये बदल करण्यास सांगतात. मधुमेह झाला असता रुग्ण काय आहार घेतो ह्याला अतिशय महत्त्व आहे.
मधुमेहामध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवणे अतिशय आवश्यक असते. त्यासाठी असे पदार्थ ज्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे त्यांचे सेवन करणे जास्त योग्य ठरते. तसेच आहारातील कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण देखील कमी करणे उपयुक्त ठरते.
मधुमेह आटोक्यात ठेवण्यासाठी आहार नियंत्रण म्हणजे डाएट कंट्रोल करणे अतिशय आवश्यक असते अन्यथा मधुमेहामुळे उद्भवणाऱ्या हृदय विकार, किडनीचे विकार आणि इतर काही गंभीर आजारांचा सामना करावा लागू शकतो.
मधुमेह म्हणजेच डायबिटीस होण्याचे प्रमुख कारण शरीराची इन्शुलिन निर्मितीची क्षमता कमी होणे हे आहे. शरीरात योग्य प्रमाणात इन्शुलिन तयार न झाल्यामुळे रक्तातील साखरेचे योग्य प्रकारे विघटन होत नाही आणि त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते.
असे असल्यामुळे “साखर” मधुमेहाच्या रुग्णांसाठी अतिशय वाईट आहे असे आपण नेहमीच ऐकतो. त्याच बरोबर “भात” देखील मधुमेहाच्या रुग्णांसाठी चांगला नाही असे सांगितले जाते. भातामध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण जास्त असते. तसेच त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स देखील जास्त असतो. त्यामुळे भात मधुमेहासाठी चांगला नाही असे सांगितले जाते.
ग्लायसेमिक इंडेक्स हे एक असे मापन आहे ज्यामुळे कोणत्याही पदार्थाचा रक्तातील साखरेच्या प्रमाणावर काय परिणाम होईल हे ठरते. ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असणाऱ्या पदार्थांमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण अनियंत्रित होते आणि त्यामुळे डायबेटिसचा धोका वाढतो.
मधुमेहाच्या रुग्णांनी भात खाऊ नये, हे खरे आहे का? यावर आतापर्यंत काय संशोधन झाले आहे? मधुमेहाच्या रुग्णांनी नक्की कोणत्या प्रकारचा तांदूळ खावा? ही सर्व माहिती आपण आज जाणून घेणार आहोत.
मधुमेहाचे रुग्ण आणि त्यांच्या आहारातील भाताचे प्रमाण ह्यावर आजपर्यंत भारतात आणि विदेशात भरपूर संशोधन झाले आहे. त्यापैकी काही संशोधनांचे निष्कर्ष खालीलप्रमाणे आहेत.
१. ब्रिटिश मेडिकल जर्नल मध्ये असे संशोधन प्रसिद्ध झाले आहे की जे लोक पांढऱ्या तांदुळाचा भात जास्त प्रमाणात खातात त्यांना टाईप टू मधुमेह होण्याची शक्यता दहा टक्के जास्त असते. त्यामुळे जे लोक प्रीडायबिटिक म्हणजेच डायबिटीस होण्याच्या उंबरठ्यावर आहेत किंवा ज्यांना आधीच मधुमेह झालेला आहे अशा लोकांनी पांढऱ्या भाताचे सेवन कमीत कमी प्रमाणात करावे.
२. हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी लिहिलेल्या शोधनिबंधात असे म्हटले आहे की ज्या लोकांना भविष्यात मधुमेह होऊ नये असे वाटते आहे त्यांनी पांढऱ्या तांदुळाच्या भाताचे सेवन कमीत कमी करावे. पांढरा भात खाणाऱ्या चीन, ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिका येथील जवळजवळ तीन लाख लोकांच्या सर्वेक्षणातून असे दिसून आले आहे की पांढरा भात जास्त प्रमाणात खाणाऱ्या लोकांमध्ये मधुमेह होण्याचे प्रमाण 27 टक्के जास्त आहे. आशिया खंडातील लोकांच्या आहारात पांढऱ्या भाताचे प्रमाण जास्त असल्यामुळे ह्या लोकांमध्ये मधुमेह होण्याचे प्रमाण सर्वात जास्त आढळते. या संशोधनासाठी केलेल्या सर्वेक्षणातील सर्व लोक आधी मधुमेह नसणारे होते. त्यामुळे ह्यावरून असे आढळून येते की पांढरा भात जास्त प्रमाणात खाल्ल्यास मधुमेह होण्याची शक्यता अनेक पटीने वाढते.
३. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डायबिटीज अँड डायजेस्टिव्ह अँड किडनी डिसीज यांनी सादर केलेल्या शोधनिबंधात असे म्हटले आहे की डायबिटीसच्या रुग्णाने कार्बोहायड्रेटचे सेवन मर्यादित स्वरूपात करावे. तसेच त्यासाठी सालीसह असणारे धान्य आणि कडधान्याचे सेवन करावे. अशा कार्बोहाइड्रेटचे शरीरात पचन होत असताना रक्तातील साखर बर्याच प्रमाणात वापरली जाऊन तिचे प्रमाण नियंत्रणात राहू शकते. ह्याचाच अर्थ पॉलिश केलेली धान्ये आहारात असू नयेत.
डायबिटीसच्या रुग्णांनी आपण खात असलेल्या सर्व पदार्थांचा ग्लायसेमिक इंडेक्स आणि त्यात असणारे कार्बोहायड्रेटचे प्रमाण माहित करून घेणे अतिशय आवश्यक आहे.
पण मग याचा अर्थ डायबिटीसचा रुग्णांनी कधीच भात खाऊ नये असा आहे का? कोणता तांदूळ डायबेटिसचे रुग्ण खाऊ शकतात यावर काही संशोधन झाले आहे का ते आपण आज जाणून घेऊया.
विविध ठिकाणी केलेल्या संशोधनाअंती असे सिद्ध झाले आहे की खालील तीन प्रकारचे तांदूळ डायबिटीस झालेले लोक खाऊ शकतात.
१. ब्राउन राईस
२. वाइल्ड राईस
३. लांब दाणा असणारा बासमती तांदूळ
पांढऱ्या, बारीक तांदळापेक्षा वरील तिन्ही तांदळामध्ये फायबर, न्यूट्रीअंट्स आणि विटामिन जास्त प्रमाणात असतात. वरील तिन्ही तांदूळांचा ग्लायसेमिक इंडेक्स देखील बारीक तांदूळापेक्षा कमी असतो.
त्यामुळे या तीन पैकी कुठल्याही एका तांदुळाचे सेवन करणे मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरते. त्याचबरोबर भात किती प्रमाणात खाल्ला जातो यावर लक्ष ठेवणे देखील आवश्यक आहे. दररोज एक प्रमाण ठरवून त्याच प्रमाणात भात खाणे आणि तसा पक्का निश्चय करणे श्रेयस्कर ठरते. कोणत्याही परिस्थितीत भाताचे जास्त प्रमाणात सेवन करू नये.
तसेच मधुमेहाच्या रुग्णांनी भात शिजवण्याच्या पद्धतीत बदल करणे आवश्यक आहे. हल्ली सगळेजण भात शिजवण्यासाठी प्रेशर कुकरचा वापर करतात. परंतु असे न करता भात प्रेशर कुकरमध्ये न शिजवता डायरेक्ट गरम पाण्यात उकळून शिजवावा. त्यानंतर जास्तीचे पाणी गाळून टाकून द्यावे. असे करण्यामुळे भारतातील अतिरिक्त स्टार्च आणि जास्तीचे कार्बोहायड्रेट निघून जातात. असा शिजवलेला भात पचायला हलका, पौष्टिक आणि रक्तातील साखरेचे प्रमाण न वाढवणारा असतो.
तर अशा रीतीने जगभरातील सर्व संशोधनाअंती असे आढळून आले आहे की डायबेटिस झाला असता नेहमीच्या पांढरा भाता ऐवजी ब्राऊन राईस खाणे जास्त उपयुक्त आहे. अशा ब्राऊन राईस मध्ये फायबर, मॅग्नेशियम, पोटॅशियम, आयर्न, फोलेट आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे असा भात जास्त पौष्टिक असतो.
डायबिटीसच्या रुग्णांना वजन आटोक्यात ठेवणे आवश्यक असते. ब्राउन राईस वजन कमी करण्यास देखील मदत करतो. याचाच अर्थ योग्य प्रमाणात ब्राउन राईस खाणे डायबिटीसच्या रुग्णांसाठी हानीकारक नाही.
तर मित्रांनो, नेहमीच चांगल्या प्रतीच्या ब्राऊन राईसचे सेवन करा आणि मधुमेहाचा धोका टाळा. ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी हा लेख शेअर करायला विसरू नका.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.