सध्या भारतामध्ये दिवाळीच्या सुट्ट्यांचं आनंदाचं, आणि उत्साहाचं वातावरण आहे.
त्याच बरोबर कोरोनाची भिती सुद्धा जरा कमी झालेली दिसते आहे, आणि म्हणूनच थोडीशी ढिलाई सुद्धा आपल्या सगळ्यांमध्ये आलेली आहे.
पण वेळीच सावध व्हा. कारण सध्या रशियामध्ये कोरोनाचं जे वातावरण निर्माण झालेलं आहे ते भारतासमोर एक उदाहरण ठरू शकतं.
रशियामध्ये हे कोरोनाचं तांडव का सुरू आहे?
मित्रांनो, रशियामध्ये कोरोनाची चौथी लाट ही अक्षरशः प्रलय घेऊन आलेली आहे.
रोज 40 हजारांहून जास्त संक्रमित पेशंट सापडत आहेत.
तर अकराशेहून जास्त मृत्यू रोजच्या रोज होत आहेत.
रशिया सरकारने 30 ऑक्टोबर पासून 7 नोव्हेंबर पर्यंत सुट्टीचे आदेशही दिले आहेत.
तर मॉस्कोमध्ये अकरा दिवसांसाठी अर्धलॉकडाऊनची स्थिती सुरु आहे.
दुकानं शाळा रेस्टॉरंट बंद आहेत.
रशियामध्ये याआधी कोरोनाच्या तीन लाटा येऊन गेलेल्या आहेत.
त्याच बरोबर 32 % व्यक्तींचं लसीकरण सुद्धा झालेलं आहे.
या स्थितीत भारतामध्ये काय परिस्थिती आहे ?
तर भारतामध्ये याआधी कोरोनाच्या दोन लाटा येऊन गेलेल्या आहेत आणि 31 % लोकांना लसीचे दोन्ही डोस मिळालेले आहेत.
याचा अर्थ रशिया प्रमाणे भारतातही साधारण 69 टक्के लोकांना कोरोनाचा धोका आहे. रशियाप्रमाणे परिस्थिती निर्माण होईल अशी शक्यता आहे आणि म्हणूनच भारतानं सावधगिरीची योग्य पावलं ही उचलायला हवी आहेत का?
रशियामध्ये इतकी वाईट परिस्थिती का निर्माण झाली आहे?
युरोपमध्ये या व्हायरसमुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या रशियात सगळ्यात जास्त आहे.
यामागे नेमकी कोणती कारणं आहेत?
समोर येणा-या बातमीतून असं लक्षात येतं आहे की बरेच सामान्य नागरिक लसीकरण करून घ्यायला तयार नाहीत.
आणि कित्येक वेळा तर घरामध्येच थांबायला सुद्धा राजी नाहीत.
म्हणजे लसीकरण न झालेल्या लोकांची जर सार्वजनिक जागी गर्दी केली तर कोरोनाचा धोका वाढत जाईल.
राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांनी असे म्हटलं आहे की “लोकं लसीकरण घ्यायला टाळाटाळ का करत आहेत हेच कळत नाही आणि लोकांनी जर अशीच टाळाटाळ केली तर कोणती वाईट परिस्थिती ओढवू शकते.
याचा अंदाज करता येणार नाही”.
काही रिपोर्टमध्ये असं मांडण्यात आलेलं आहे की लोकांमध्ये लसीविषयी संभ्रम आहे कारण या लसी अतिशय घाईघाईने तयार करण्यात आल्या आहेत शिवाय त्यांची योग्य पद्धतीने पुरेशी वैद्यकीय चाचणी घेतली गेलेली नाही.
दुसऱ्या एका रिपोर्टमध्ये असं निरीक्षण मांडण्यात आलेलं आहे की लोकांमध्ये अशी भीती आहे की कोरोनाव्हायरस आणि लस हा एका मोठ्या कटाचा भाग आहे.
लोकसंख्या कमी करण्यासाठी त्याचा वापर केला जात आहे.
जगामध्ये प्रतिथयश संस्थेने केलेल्या सर्वेक्षणामध्ये असं लक्षात आलं आहे की ज्या लोकांनी लसीकरण केलेलं नाही त्यांच्यापैकी 75 टक्के लोकांचा म्हणणं असं आहे की लस फुकट जरी दिली तरी ती आम्ही घेणार नाही.
लसीकरण पुरेसं न झाल्यामुळे रशियामध्ये डेल्टा वेरीअँट वेगानं पसरतो आहे.
रशियात पेशंट इतके वाढलेले आहेत की देशातल्या सगळ्याच हॉस्पिटलमधले सगळे बेड फुल्लं झालेले आहेत.
आणि देश लॉकडाऊनच्या उंबरठ्यावरती उभा आहे.
रेस्टॉरंट आणि हॉटेल मध्ये फक्त पार्सल सुविधेला परवानगी देण्यात आलेली आहे.
नाईट क्लब आणि मनोरंजनाच्या इतर साधनांना रात्री अकरा ते सकाळी सहापर्यंत परवानगी नाकारण्यात आली आहे.
संग्रहालयं आणि काही सार्वजनिक ठिकाणी क्यू आर कोड चा वापर करून दोन्ही लसी झाल्या असतील तरच परवानगी देण्यात येत आहे.
पूर्व युरोपात कित्येक देशात कोरोनाचं संक्रमण पुन्हा सुरू झालेलं आहे.
रशिया शिवाय रोमानिया, बुल्गारिया, लिथुआनिया, लातविया या देशांमध्येसुद्धा कोरोनाचं प्रमाण वाढत आहे.
या देशांमध्ये जिथे 30 % कमी लसीकरण झालेलं आहे तिथे मृत्यूचा दर जास्त आहे.
भारतात किती लोकांनी लस घेतली आहे ?
भारतामध्ये सुद्धा लसीचे दोन्ही डोस घेणाऱ्या व्यक्तींची संख्या ही रशिया सारखीच आहे.
भारतातल्या प्रौढ व्यक्तींमध्ये 31 % लसीकरण झालेले आहे.
भारतात सुद्धा लसींविषयी संभ्रम आणि लसी घेण्याविषयी टाळाटाळ दिसून येत आहे.
भारतात भलेही शंभर करोड लोकांचं लसीकरण झालेलं असलं तरी दोन्ही लसींचा डोस झालेल्या व्यक्ती या फक्त 33 % आहेत.
तसं पाहायला गेलं तर भारतातून कोरोनाचा उच्चाटन झालेलं दिसून येत आहे.
पण तरीही नियम न पाळणे, प्रचंड गर्दी याच्यामुळे कोणात्याही क्षणी धोका पुन्हा वाढू शकतो.
मास्क आणि सुरक्षित अंतर राखण्यासाठी पूर्वी जितकी सावधानता बाळगली जाई तितकी आत्ता दिसत नाही.
उलट बेजबाबदारपणा बेपर्वाई जास्त दिसून येते आहे.
याआधी झालेलं नुकसान बघता, सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करणे, मास्क लावणे हे उपाय आपण व्यवस्थित केले पाहिजेत.
आपली, आपल्या परिवाराची काळजी घेतली पाहिजे.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.