आयुष्यातलं दीर्घ नातं हे पती पत्नीच्या सहजीवनाचं असतं.
या नात्यातले सुरवातीचे गुलाबी क्षण फुलपाखरासारखे उडून जातात.
या दिवसांत मौज मजा, मस्ती, हास्यविनोद यामध्ये दिवस कसे भुर्रकन जातात कळतच नाही.
मौज मजा संपून आयुष्याला खऱ्या अर्थाने जबाबदारीने सुरुवात होते तेंव्हा नात्याचे खरे रंग दिसतात.
आदर मानसन्मान हा कुठल्याही नात्याचा पायाच असतो.
सहजीवनात तर आदर सन्मान फार महत्त्वाचे ठरतात.
तुमचा मान राखला जातो आहे, की नाही हे वेळीच जाणून घ्या त्यामुळे नात्यातल्या समस्या गंभीर होण्याच्या आतच तुम्ही त्या सोडवू शकता.
जोडीदाराकडून मिळणार्या मान सन्मानामुळेच सुरक्षिततेची भावना मनात निर्माण होते.
कोणत्याही हेल्दी रिलेशन साठी सुरक्षिततेची भावना असणं फार महत्त्वाचं आहे.
जिथं जोडीदाराला फारशी किंमत दिली जात नाही, तिथं कटकटी निर्माण होतात, भांडणं एव्हढी टोकाला जातात की वेगळं होण्यावाचून पर्याय उरत नाही.
तुमचं नातं तुटण्यापासून वाचवायचं असेल तर सुरुवातीपासूनच काही गोष्टींकडे काळजीपूर्वक लक्ष द्या.
या 9 गोष्टी तुम्हाला तुमच्या नात्यातील अनादर स्पष्टपणे दाखवून देतील. आणि अशा वेळी हे लक्षात घ्या कि तुम्हाला तुमच्या जोडीदाराबरोबरच्या नात्याला नवी झळाळी देण्याची गरज आहे.
1) वैयक्तिक गोष्टींवर जोडीदाराचं आक्रमण
एकाच घरात एकाच छताखाली वर्षानुवर्षे राहात असतानाही प्रत्येकाची स्वतःची एक स्पेस असते.
तुमच्या स्वतःसाठीचा ठराविक वेळ, ठराविक पैसा किंवा ठराविक वस्तू सुद्धा असते.
तुमचा जोडीदार जर तुम्हाला तुमचा वेळ वापरू देत नसेल, तुमच्या वस्तू वापरू देत नसेल, जबरदस्तीने पैसे हिसकावत असेल तर त्याच्या मनात तुमच्याविषयी अजिबात आदर नाही हे तुमच्या लक्षात यायला हवं.
2) खोटं बोलणं
विश्वासाच्या मजबूत पायावरती नात्याची इमारत उभी राहत असते. पाया डळमळीत झाला तर ही इमारत कोसळायला वेळ लागणार नाही.
या विश्वासाच्या चिंधड्या उडतात ते जोडीदाराच्या खोट्या बोलण्यानं, किंवा लपवाछपवी करण्यानं.
ज्या नात्यात एकमेकांविषयी नितांत आदर आहे तिथे कोणत्याही गोष्टीसाठी खोटी कहाणी रचली जात नाही, उडवाउडवीची उत्तरे दिली जात नाहीत.
कारण खोटेपणा केला तर तो पटकन उघड होतो.
त्यामुळे अशी गोष्ट तुमच्या लक्षात आली तर समजून घ्या की तुमच्या विषयीचा अनादर तुमच्या जोडीदाराच्या मनात आहे.
समजा तुम्हाला शॉपिंग ला जायचं आहे मात्र तुमच्या जोडीदाराने तुमच्याशी खोट बोलून येणं टाळलं तर निश्चितच तो तुमचा अनादर आहे.
3) प्रतिक्रिया न देणं
एखादं नातं तेंव्हाच फुलतं जेंव्हा एकमेकांच्या आयुष्यातील आनंदी, दुःखी घटनांवरती प्रतिक्रिया दिली जाते.
जेव्हा तुमचा जोडीदार तुमचं म्हणणं किंवा तुमच्या आयुष्यातला महत्त्वाचा प्रसंग थंडपणे ऐकत असेल त्यावर आनंद किंवा दुःख व्यक्त करत नसेल तर, कुछ तो गडबड है, हे जाणून सावध व्हा.
अगदी एखाद्या भांडणाच्या वेळी सुद्धा जोडीदाराने तुमचं म्हणणं एका कानानं ऐकून दुसऱ्या कानानं सोडून दिलं तर ही तुमच्यासाठी धोक्याची घंटा ठरू शकते.
तुम्हाला ऑफिस मध्ये प्रमोशन मिळालेलं आहे आणि त्याविषयी तुम्ही उत्साहानं सांगत आहात मात्र तुमचा जोडीदार हं अशी थंड प्रतिक्रिया देत ते म्हणणं ऐकतो आहे तर त्याच्या मनात तुमच्याविषयी आदर उरलेला नाही.
4) असुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर
तुमच्या भावना प्रेम, द्वेष, भीती या मोकळेपणानं तुम्हाला तुमच्या जोडीदारासमोर मांडता आल्या पाहिजेत.
तुमच्या स्वभावाची छोटी छोटी सिक्रेट्स तुमच्या जोडीदाराकडं सुरक्षित असल्याची भावना तुमच्यात निर्माण व्हायला हवी.
ज्या गोष्टींची तुम्हाला भीती वाटते, ज्या विषयी असुरक्षित वाटतं त्या गोष्टींचा वापर जोडीदाराकडून जाणून बुजून केला जात असेल, त्यावरून तुम्हाला वाईट बोललं जात असेल, त्याची चेष्टा केली जात असेल तर त्याच्या मनात तुमच्याविषयी यत्किंचितही आदर नाही.
उंचावरून खाली बघण्याची भीती तुम्हाला वाटते तर एखाद्या ट्रिपच्या वेळी सगळ्यांसमोर त्याच्यावरून तुमची कुचेष्टा करणं हे तर अनादराचंच लक्षण आहे.
5) तुमच्या नावाचा उल्लेख
मी केलेली गोष्टच कशी बरोबर आहे याचं समर्थन करताना तुमचा जोडीदार तुमच्या नावावर जोर देत असेल तर त्याच्या मनात आदर नाही हे स्पष्ट होतं.
घालून पाडून बोलणं तर सतत चेष्टा करत दोषांवर बोट ठेवणं ही सगळी लक्षणं तुमच्या जोडीदाराच्या मनातला अनादर तुम्हाला दाखवतात.
6) तुमच्या बोलण्यात अडथळा निर्माण करणं
रोजच्या आयुष्यात तुम्ही अनेक गोष्टी करत असता अनुभवत असता.
असा एखादा छानसा अनुभव जोडीदाराशी शेअर करताना, एखादी समस्या त्याला सांगताना जर तुमच्या जोडीदारानं तुमचं बोलणं मध्येच थांबवून वेगळ्याच विषयाला हात घातला तर लक्षात घ्या तुमचं बोलणं आणि तुम्ही त्याच्यासाठी अजिबात महत्त्वाचे नाहीत.
7) तुमच्या वेळेची किंमत नसणं
एखाद्या कार्यक्रमाला, शॉपिंगला किंवा मुव्हीला जायचं तुम्ही ठरवता.
सगळं आवरून जोडीदाराची वाट पाहता.
पण जोडीदार वेळेवर येत तर नाहीच पण खूप उशिरा आल्यानंतरही आपण वेळ पाळली नाही याचं त्याला वाईट वाटत नाही.
यावरुन एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल की तुमच्या नात्यात आदर नाही .
8) वैयक्तिक सवयी
प्रत्येक व्यक्तींमध्ये गुण आणि दोष असतातच .
दोष नसलेली अशी कोणतीही व्यक्ती जगात नसते.
पण आपल्या ज्या गुणांमुळे जोडीदाराला त्रास होतो ती गोष्ट बदलायला तयार नसलेल्या जोडीदाराला आपल्या पार्टनरची काहीही किंमत नसते.
अन्नाची नासाडी करण्यासारख्या बेसिक चुकीच्या सवयी बदलल्या पाहिजेतच.
घातक व्यसनांच्या सवयी बदलायला तुमचा जोडीदार नकार देत असेल, त्यावरून चारचौघात तुम्हाला लाजीरवाणं व्हावं लागत असेल तर तिथं नात्यात आदर उरलेला नसतो.
9) स्वातंत्र्याची गळचेपी
तुम्ही आर्थिक दृष्ट्या जोडीदारावरती अवलंबून असला किंवा नसला तरीही तुम्ही कुठं, कधी कोणाबरोबर जायचं किंवा जायचं नाही हे ठरवायचा अधिकार तुम्हाला नसेल तर तुम्ही पारतंत्र्यात आहात.
तुमच्या पारतंत्र्याच्या अर्थ असा की जोडीदार तुम्हाला एक व्यक्ती म्हणून अजिबात किंमत देत नाही तुमचा मान राखत नाही.
तुमचं नातं नेहमी सुदृढ रहावं असं तुम्हाला वाटत असेल तर या नात्याकडे डोळे उघडून नीट पहा, त्रयस्थपणे पहा.
यापैकी कोणतीही गोष्ट तुम्हाला आढळली तर या नात्याचा पुन्हा एकदा नीट विचार करा.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.