आजकाल शिक्षण किंवा नोकरीच्या निमित्ताने आपले मूळ गाव सोडून दुसऱ्या ठिकाणी जाऊन राहणे ही एक अगदी कॉमन गोष्ट झाली आहे.
अशावेळी नवीन गावात जाऊन राहणाऱ्या लोकांना घर भाड्याने घेण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. तुम्ही देखील जर अशा घर भाड्याने घेणाऱ्या लोकांपैकी एक असाल तर हा लेख तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे.
सुरुवातीला आपण एक उदाहरण पाहू या. या उदाहरणातील लोकांची ओळख गोपनीय ठेवण्यासाठी त्यांची नावे बदललेली आहेत.
१ वर्षापूर्वी तीस वर्षांच्या नितीन शर्माने पुण्यात रु. २००००/- दरमहा या दराने श्री. सावंत यांचे घर भाड्याने घेतले.
डिपॉझिट म्हणून त्याने रु. ६००००/- इतकी रक्कम दिली. सहा महिने झाल्यानंतर श्री सावंत यांनी नितीन शर्माकडे रु. २०००/- इतके भाडे वाढवून मागितले.
कारण त्या दरम्यान त्या विभागातील घरांच्या भाड्याच्या रकमेत वाढ झाली होती. त्यामुळे घर मालक स्वतःचे नुकसान करून घेण्यास तयार नव्हते.
सुरुवातीला केलेल्या भाडेकरारात योग्य नोंद नसल्यामुळे नितीन शर्माला सहा महिन्यातच घर मालकाला वाढीव घर भाडे देणे भाग पडले. जर त्याने सुरुवातीलाच भाडे करार करताना योग्य ती काळजी घेतली असती तर त्याच्यावर अशी वेळ आली नसती.
बहुतेक वेळा भाडेकरूंना भाडेकरारामध्ये काय नियम व अटी आहेत याची कल्पना देखील नसते.
भाडे करारातील अटी व नियमांची नीट माहिती करून न घेताच ते अशा करारावर सह्या करतात आणि मग त्यांचे वरील प्रमाणे नुकसान होऊ शकते.
आज आपण भाडेकरूंनी भाडेकरारावर सही करण्यापूर्वी कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे, तसेच काय काळजी घेतली पाहिजे ते सविस्तरपणे जाणून घेणार आहोत…
१. आपण ज्याच्याशी भाडेकरार करीत आहोत तोच त्या घराचा खरा मालक आहे ना याची खात्री करून घ्या.
बरेच वेळा अनिवासी भारतीय किंवा गुंतवणूक म्हणून घर घेतलेले लोक आपल्या घराची देखभाल करण्याची जबाबदारी एखाद्या एजंट किंवा संस्थेला देतात.
अशा वेळी भाडे करार करून घर भाड्याने देण्याची जबाबदारी देखील त्या एजंट किंवा संस्थेवर असते. मूळ मालकाला कल्पना दिल्याशिवाय असे एजंट स्वतः घर भाड्याने देतात.
परंतु भाडेकरूने त्यासंबंधीची संपूर्ण माहिती आधी मिळवणे आवश्यक आहे. आपण नक्की कोणाचे घर भाड्याने घेतले आहे आणि भाडे करारात नोंद केलेले सर्व नियम आणि अटी मूळ मालकाला मान्य आहेत ना याची खात्री करून घेतल्याशिवाय भाडेकरारावर सही करू नये.
२. आपण जे घर भाड्याने घेत आहोत ते बँकेकडे गहाण आहे का याची माहिती करून घ्या.
बरेच वेळा गुंतवणूक म्हणून घर खरेदी करून लोक ते भाड्याने देतात. अशा वेळी सदर घरावर त्यांनी होम लोन काढलेले असू शकते. अशा होमलोनच्या संपूर्ण परतफेडीची जबाबदारी मूळ मालकाची असून भाडेकरूचा होम लोनशी काहीही संबंध नाही याची अगोदरच खात्री करून घेतली पाहिजे. जर मूळ घरमालकाने बँकेचे हफ्ते भरले नाहीत आणि त्यामुळे बँकेने काही कारवाई केली तर ती जबाबदारी मूळ मालकाची असेल ह्याची कल्पना दोन्ही बाजूच्या लोकांना असली पाहिजे.
३. भाडे भरण्याची तारीख निश्चित करून घ्या.
भाडेकरूने घरमालकाला घरभाडे देण्याची विविक्षित तारीख भाडेकरारातच निश्चित करून घ्या. त्यामुळे कोणत्या दिवशी घरभाडे भरायचे याबाबत घरमालक आणि भाडेकरू या दोघांनाही निश्चित कल्पना असेल. त्यावरून कोणताही वाद निर्माण होणार नाही.
४. सोसायटीचा मेन्टेनन्स आणि क्लब इत्यादी सुविधा वापरण्याचे शुल्क कोणी भरायचे हे आधीच निश्चित करून घ्या.
भाड्याने घेण्याची प्रॉपर्टी ज्या सोसायटीमध्ये असेल त्या सोसायटीचा सदर प्रॉपर्टी संबंधीचा मेंटेनन्स घरमालकाने भरायचा अथवा भाडेकरूने यासंबंधीचा निर्णय करार करण्यापूर्वी योग्य चर्चा करून दोन्ही बाजूंना मान्य असणे आवश्यक आहे.
तसेच सदर सोसायटीमध्ये असणाऱ्या क्लब, जिम इत्यादी सुविधा वापरण्यासाठी काही शुल्क असेल तर ते कोणी भरायचे याचा निर्णय देखील करार करण्यापूर्वी करून घ्यावा.
अन्यथा या रकमा भरण्यावरून नंतर वाद होण्याची शक्यता असते. तसेच घरचे वीजबिल, पाणी बिल आणि गॅस बिल भरण्यासंबंधी देखील नोंद भाडेकरारात असणे आवश्यक आहे.
५. करार करताना भाड्याची जी रक्कम ठरवली असेल ती किती मुदतीसाठी आहे हे आधी निश्चित करून घ्या.
सहसा घराचे भाडेकरार हे ११ महिन्यांसाठी केले जातात. त्यामुळे सुरुवातीला जे घरभाडे ठरवले असेल ते ११ महिन्यांसाठी असणे अपेक्षित असते. त्यानंतर तोच भाडेकरू जर त्या घरात पुढे राहणार असे तर सर्वसाधारणपणे घरभाड्यामध्ये १० % वाढ होईल असे गृहीत धरले जाते. यासंबंधीची दोन्ही बाजूंना मान्य असेल अशी नोंद भाडेकरारात करणे अतिशय आवश्यक असते. अन्यथा वरील उदाहरणात नितीन शर्माच्या बाबतीत झाले त्याप्रमाणे सहा आठ महिन्यातच घरमालक भाडे वाढवून मागू शकतो.
६. घरातील किरकोळ दुरुस्ती आणि मोठी दुरुस्ती याचे डिटेल्स ठरवून घ्या
घर भाड्याने घेऊन घराचा वापर सुरू केल्यावर घरातील किरकोळ दुरुस्ती करणे ही भाडेकरूची जबाबदारी समजली जाते. परंतु घराच्या बांधकामासंबंधीच्या मोठ्या दुरुस्त्या मात्र घरमालकाने केल्या पाहिजेत असे गृहीत धरलेले असते. या संबंधीची सर्व नोंद घराच्या भाडेकरारात करून घ्या.
तसेच भाडेकरूकडून घराचे काही मोठे नुकसान झाले तर दुरुस्तीची जबाबदारी भाडेकरूची असेल अशी नोंद भाडेकरारात असते. त्याची नोंद घ्या.
अन्यथा अशा दुरुस्तीच्या रकमा डिपॉझिटच्या रकमेतून वजा करण्याची वेळ येते आणि घरमालक आणि भाडेकरू यांच्यामध्ये वाद निर्माण होतो.
७. करार संपवण्यासाठीचा नोटीस पिरियड आधीच ठरवून घ्या.
घर मालक अथवा भाडेकरू या दोघांपैकी कोणालाही जर सदर भाडेकरार रद्द करायचा असेल तर त्याने समोरील व्यक्तीला किती मुदतीची नोटीस देणे आवश्यक आहे (उदाहरणार्थ १ महिना) हे करार करताना ठरवून घ्या.
अशी मुदत आधीपासून ठरवलेली असणे हे घरमालक आणि भाडेकरू या दोघांच्याही सोयीचे आहे.
तर मित्र-मैत्रिणींनो या आहेत अशा सात बाबी ज्यांची पूर्तता भाडे करार करण्यापूर्वी करणे आवश्यक आहे. तुम्ही जर एखादे घर भाड्याने घेत असाल किंवा कोणाला घर भाड्याने देत असाल तर या सात बाबी पूर्ण होत आहेत ना याकडे कटाक्षाने लक्ष द्या आणि काळजीपूर्वक भाडेकरार करा.
ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा लेख शेयर करायला विसरू नका.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.