आयुष्यात तुम्ही तुमचे नातेवाईक निवडू शकत नाही. त्यामुळे विचित्र स्वभाव असणाऱ्या माणसाला सहन करण्यावाचून तुमच्याकडे पर्याय नसतो.
विचित्र, विक्षिप्त माणसांशी संवाद साधून ही, स्वतः ला रिलँक्स कसं ठेवायचं ही एक कलाच आहे. ती कला साध्य करा आणि निवांत आयुष्य उपभोगा.
नेमकं काय करायला हवं? चला पटकन जाणून घेऊया.
1) शांत राहा.
ही गोष्ट फारच अवघड आहे असं तुम्हांला वाटत असेल. कारण असे बरेच नातेवाईक असतात जे कोणत्या ना कोणत्या मुद्यावर तुम्हांला चिडवण्याचा नाहीतर डिवचण्याचा प्रयत्न करतात.
पण त्यांचा हा प्रयत्न तुम्ही यशस्वी होऊ देऊ नका. तुम्ही बिल्कुल चिडू नका. राग आला तरी व्यक्त करू नका.
रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी अलगद गर्दीतून बाजूला व्हा, मोकळ्या हवेत जा.
दीर्घ श्वास घ्या. 1 ते 100 आकडे मनातल्या मनात मोजा. शांत झालात की सगळ्यांच्यात पुन्हा मिसळा.
2) “मी” यावर भर द्या.
एखाद्या नातेवाईकाशी तुमचं जुळत नसेल, तर धुसफूस करण्यापेक्षा स्पष्ट शब्दांत तुम्ही काय करु शकता याची कल्पना त्या नातेवाईकांना द्या.
“मी” स्वतः हे करु शकतो, माझ्या वतीने तुम्ही माझं मत सांगू नका हे त्यांना स्पष्टपणे सांगा.
3) अपराधीपणाचा प्रतिकार करा.
गिल्ट-ट्रिपिंग हे ब-याचदा नातेवाईकांकडून केलं जातं. तुमच्याकडूनच तुम्हांला दोषी वदवून घेऊन आपल्या मतानं निर्णय घेणं अशा काही गोष्टी हे नातेवाईक सहज करतात.
आता हे उदाहरण बघा, कि कधी तुमच्या घरी काही कार्यक्रम असतो. आणि तुमचे एखादे आप्त ठसक्यात, तुमच्या चुकीवर बोट ठेऊन सांगतात “मागच्या वेळी तुम्ही सांगितलेले पदार्थ संपले, सगळयांना पुरलेच नाही त्यामुळं आता मी तुम्हांला सांगतो/सांगते किती आणि काय करायचं ”
अशावेळी न घाबरता किंवा आपल्या चुकांनी दबून न जाता सांगा की, “चुका करतच आम्ही शिकतो, त्यामुळं गोड पदार्थ काय असावा तेव्हढं सुचवा, बाकी आम्ही विचार करुन ठरवू आणि पुरेसं मागवू.” हे बोलतांना खेळी-मेळीचं वातावरण संभाळल जाईल याची मात्र काळजी घ्या!!
4) नातेवाईकाचं म्हणणं नीट समजावून घ्या.
काही वेळेला काय होतं की एखाद्या व्यक्तीविषयी सगळयांचं एक मत तयार झालेलं असतं.
तुम्हांला ही त्यांच्या विषयीचं हे मत खरंच वाटतं, आणि कटकट म्हणून त्यांच्या कडे तुम्ही दुर्लक्ष करता.
अशा वेळी त्या व्यक्तीशी शांतपणे संवाद साधा, त्यांचे विचार समजून घ्या, आणि मग त्या व्यक्ती विषयी आपलं मत तयार करा.
त्या व्यक्तीचं म्हणणं योग्य असेल तर तिच्या बाजूने ते सर्वांना पटवून द्या, चुकीचं असेल तर सौम्य भाषेत त्या व्यक्तीला वस्तुस्थिती पटवून द्या.
मला खात्री आहे असे कटकटी नातेवाईक तुमच्याशी चांगला संवाद साधतील आणि तुमच्या समस्या कमी होतील.
5) प्रत्येकाला त्याच्या आवडीचं काम द्या.
काही विचित्र माणसं रोजच्या कामात किंवा एखाद्या कार्यक्रमात सतत दोष शोधत असतील तर त्यांना पण छोटीशी जबाबदारी द्या.
रोजच्या कामात हे असंच झालं पाहिजे ते तसंच व्हायला हवं असा अट्टाहास करणाऱ्या व्यक्तीला छोटीशी जबाबदारी द्या.
आपल्या आवडीच्या कामात गुंतलेली व्यक्ती मग दुसऱ्यांच्या चुकांकडे दुर्लक्ष करते.
एखाद्या कार्यक्रमात ही मौल्यवान वस्तू सांभाळण्याची जबाबदारी अशा व्यक्तीला द्या जी सतत कटकट करत असते.
या जबाबदारीमुळे ती व्यक्ती सुखावेल आपलं काम मन लावून करेल आणि त्यामुळं दुसऱ्यांना त्रास होणार नाही.
6) विसंवादी नातेवाईकांशी संवाद साधा
प्रत्येक घरात वेगवेगळे नमुने असतातच. काही हँपी गो लकी असतात तर काही सतत तार सप्तकातच बोलतात.
प्रत्येक कुटुंबात अशी एखादी तरी जोडी असते ज्यांचं आपआपसात जमतच नाही, सतत वाद होतात.
अशा जोडीमध्ये तुम्ही असाल तर समोरच्या व्यक्तीशी कधीतरी संवाद साधण्याचा प्रयत्न करा.
त्यांनी बदलावं अशी तुमची अपेक्षा असेल तर थांबा, आधी स्वतः त बदल घडवा.
तुम्ही स्वतः त बदल केलेत की आपोआप तुमचा विसंवाद कमी होईल.
दुसऱ्यांना त्रासदायक ठरणारी व्यक्ती तुम्हांला मात्र मदत करायला लागेल.
7) व्यक्तीतले सकारात्मक गुण शोधा.
कानफाट्या असं नाव एखाद्या व्यक्तीला मिळाल़ं की प्रत्येक जण त्याच नजरेनं त्या व्यक्तीकडे पहातात.
हळूहळू अशा व्यक्तीचे वाईट गुण सातत्यानं हायलाईट केले जातात, त्या व्यक्तीचे चांगले गुण बाजुला पडतात.
सतत चिडचिड करणारी एखादी काकू सुगरण असते, मात्र तिच्या या गुणाचं कुणी कौतुक करत नाही.
तुम्ही हळूहळू त्या काकूंच्या स्वयंपाकाची तारीफ करा, काकूंच्या स्वभावात चांगला फरक पडतो की नाही पहा.
8) नात्यातला ताण कमी करा.
काही नाती नेहमी ताणलेली असतात. त्यांच्यात जरूरीपुरता संवाद होतो.
एकमेकांसमोर या व्यक्ती अवघडलेपण अनुभवतात.
आपल्या कुटुंबात जावा-जावा, नणंद भावजय, सासरा, जावई अशा नात्यात हे अवघडलेपण दिसत़ं.
तुम्ही या नात्यातली एक व्यक्ती असाल तर पुढच्या वेळी ठरवून मोकळं बोला.
कधी कौतुक करा, कधी तुमच्या आयुष्यातील एखादी गोष्ट सहज शेअर करा, तुमच्या नात्यातलं अवघडलेपण कधी संपलं तुम्हांला कळणार नाही.
9) स्वतः ला वेळ द्या.
तुमचं आयुष्य कुटुंबाभोवती नातलगांभोवती फिरत असतं.
तुमच्या वर नात्यांची जबाबदारी असते. त्यात तुम्ही गुरफटून जाता. स्वतः कडे दुर्लक्ष करता.
दुसऱ्यांचा विचार करता करता, त्यांची जबाबदारी पेलताना तुमच्या मनात येतं “मी ईतकं दुसऱ्यांसाठी केलं पण त्याची कुणाला किंमतच नाही”
या विचारानंच नात्यातला दुरावा वाढायला लागतो.
जिथं ज्याला जितकी गरज आहे, तिथं तेव्हढाच सपोर्ट करून बाजूला व्हा.
रोज स्वतः साठी वेळ काढा. थोडसं फिरणं, एखादा चित्रपट यासाठी आवर्जून वेळ ठेवा.
तुम्ही तुमच्या मनाला जितकं फ्रेश ठेवाल तितकी तुमची नाती बहरतील.
10) नात्यात अंतर राखा.
काही वेळा एखाद्या आवडत्या व्यक्तीला मदत करताना तुम्ही काळ वेळ याचा विचार करत नाही.
झोकून देऊन मदत करता. इतकी मदत करत सुटता की काही वेळेला गरज नसली तरी तुम्ही मदत करता.
अशावेळी तुम्ही मदत करणारच हे गृहीत धरलं जातं.
मग पुढं पुढं तुमची सोय गैरसोय यांचा विचारच केला जात नाही.
त्यामुळं जेव्हढी मदत गरजेची आहे तेव्हढीच करा, नंतर तिथून सहज बाजूला होऊन स्वतः कडे लक्ष द्या.
तुम्हांला कुणी मदतीला बोलावलं तर जरूर जा पण मी माझी अमुक एक कामं झाल्यावर येईन आणि काही वेळाने माझ्या कामासाठी परतेन हे नीट समजावून द्या.
नात्यांमध्ये योग्य अंतर ठेवलंत तर ती फुलायला मदतच होईल.
11) ठाम निर्णय घ्या.
काही कठीण प्रसंगात तुमचे नातेवाईक तुम्हांला सल्ला द्यायला पुढे असतात.
वडीलकीच्या जोरावर ते सल्ले तुम्ही पाळलेच पाहिजेत हा आग्रह असतो.
घरातील जेष्ठ नागरिकांविषयी बरेच सल्ले दिले जातात, ज्यामुळं या जेष्ठ नागरिकांना आणि तुम्हांला त्रास होणार असतो.
अशावेळी स्पष्ट बोला. सांगा त्यांना “तुमची काळजी योग्यच आहे, काका, तुमचे डॉक्टर उत्तम आहेत यात ही शंका नाही, पण पेशंटच्या वयाचा विचार करून, हॉस्पिटलमध्ये करावी लागणारी ये जा यादृष्टीने नेहमीचे डॉक्टर जवळ पडतात आणि आमच्यासाठी ते सोईचं ठरतं. त्यामुळं तुम्ही आता कोणताही हट्ट धरु नका.”
12) कधीतरी एकट्याने वेळ घालवा.
अशी कितीतरी कुटुंब आहेत जी प्रत्येक गोष्ट संपूर्ण परिवारासह करत असते.
भाजी आणण्यापासून लॉंग ट्रीपपर्यंत तीच तीच माणसं सतत एकत्र असतील तर ही साखळी कधीतरी तोडा.
कधीतरी मित्रमैत्रिणींबरोबर वेळ घालवा.
सतत त्याच त्याच व्यक्तींबरोबर राहिल्यामुळं नात्यात ताण येऊ शकतो.
जरा मोकळेपणानं आजुबाजुच्या व्यक्तींना ही भेटा.नव्या गोष्टी जाणून घ्या. नात्यातला तोचतोचपणा आणि ताण कमी करा.
13) नाती सुधारण्यासाठी नात्यांची मदत घ्या.
तुम्हांला तुमची नाती सांभाळताना नात्यांचीच मदत लागू शकते.
दुसऱ्या गावी असणाऱ्या मावशीकडे जाऊन एखादा छोट्याशा कोर्ससाठी तिथं काही दिवस राहणं किती महत्त्वाचं आहे हे काका किंवा चुलत भांवडांना समजावून द्या.
ते तुम्हांला नक्की पाठिंबा देतील , मदत करतील.
14) नाती सावरायला मित्रांची मदत जरूर घ्या.
लहानपणापासून तुमच्या आजुबाजुलाच राहणा-या तुमच्या मित्रमैत्रिणी तुम्हांला आणि तुमच्या कुटुंबाला चांगलं ओळखत असतात.
घराबाहेर घडलेल्या एखाद्या घटनेत, ही मित्रमंडळी तुमच्या कुटुंबाला नक्की काय झालं ते सांगून तुमच्यातले गैरसमज दूर करू शकतात.
त्यांची मदत जरुर घ्या.
15) गरज पडेल तिथे नात्यात ब्रेक घ्या.
नातं फुलण्यासाठी दोन्ही बाजूंनी प्रयत्न करणं गरजेचं असतं.
काही वेळा तुम्ही तुमच्या नात्याला वेळ देता , एनर्जी देता पण संबंध काही सुधारत नाहीत, समोरच्या व्यक्तीच्या अपेक्षा संपत नाहीत.
तेंव्हा घरातील जेष्ठ व्यक्तीशी सल्ला मसलत करुन तुम्ही या नात्यापासून काही काळ दूर राहण्याचा मार्ग निवडा.
नातं हे दोन्ही बाजूंनी सांभाळायचं असतं. एकाच बाजुला भार पडला तर समतोल बिघडतो.
आयुष्यातली नाती आपल्याला टाळता येत नाहीत त्यामुळे संघर्ष टाळून नात्यांचे रेशमी बंध अनुभवा.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.