तुमच्या घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारची पीठं साठवलेली असतात. तसेच घरामध्ये इतरही अन्नधान्याचा साठा केलेला असतो.
काही पिठं रोजच्या रोज वापरली जातात तर काही पिठांची रोज गरज नसते.
बंद डब्यात साठवलेल्या या गव्हाच्या, तांदळाच्या, बेसनाच्या पिठामध्ये किंवा मैद्यामध्ये किडे, अळ्या किंवा जाळी तयार होते.
डब्याचं झाकण उघडल्यानंतर अंगावरती हे किडे उडून येतात.
या माश्या किंवा किडे एका दिवसामध्ये भरपूर अंडी घालतात, आणि त्यांची संख्या प्रचंड वाढत जाते.
मुळात हे किडे होऊच नयेत म्हणून काळजी घ्या. जी पीठं रोज लागत नाही ती थोड्याच प्रमाणात तयार करून हवाबंद डब्यात साठवून ठेवा.
तुमचं स्वयंपाक घर स्वच्छ ठेवा.
त्याचबरोबर या किडीला रोखण्यासाठी तुम्ही आणखीन काय करू शकता हे पाहूया.
1) अन्नपदार्थात वाढणा-या किड्यांचं किंवा अळ्यांचं मूळ ठिकाण शोधून काढा.
खरं तर या माशा घरभर उडू शकतात मात्र त्या जास्तीत जास्त वेळ अन्नपदार्थांजवळ राहणं निवडतात.
प्रत्येक गृहिणीला पटकन् लक्षात येतं की ही कीड फक्त पिठात नाही तर बाकीच्या अन्नपदार्थातही सापडते.
घरामध्ये पाळीव प्राणी असतील तर, त्यांचं जर वेगळे अन्नं असेल तर त्यातही हे किडे वाढतात.
तुम्ही तुमच्या घरात नेमक्या कुठल्या पदार्थाला हे किडे लागलेले आहेत हे आधी शोधा.
या पदार्थांमध्ये हे किडे,अळ्या नक्की सापडतील.
1) धान्यं
2)कडधान्यं
3) डाळी
4) तांदूळ
5) कोंडा
6) मसाले
7) आयुर्वेदिक चूर्ण
8) शेवया
9) ड्रायफ्रुट्स
10) चॉकलेट्स
2) किड लागलेले अन्नपदार्थ वापरू नका.
छोटे छोटे लाल रंगाचे किडे, अळ्या किंवा उडणारे कीटक तुम्हाला पिठामध्ये किंवा अन्नपदार्थांमध्ये दिसतात.
पण त्यांनी अन्नपदार्थांमध्ये घातलेली अंडी तुम्हाला डोळ्यांनी दिसत नाहीत.
त्यामुळे असे पदार्थ खाण्यासाठी वापरू नका. त्यांची विल्हेवाट लावा.
ज्यामध्ये किडे आहेत असे पदार्थ स्वयंपाकासाठी ही चुकूनही वापरू नका.
साठवलेल्या वस्तू वापरताना नीट वरखाली तपासून मगच त्या शिजवण्यासाठी घ्या.
3) किचन नियमित धुवा.
मैत्रिणींनो, तुम्ही तुमचं स्वयंपाकघर वेळोवेळी साफ करा.
कपाटातल्या रॅकमधल्या सगळ्या वस्तू बाहेर काढून ती जागा नीट स्वच्छ करून घ्या.
शक्य असेल तर व्हँक्युम क्लिनर चा वापर करा.
साठवणीचे पदार्थ पीठ, मसाले, पापड, शेवया, धान्य, जिथं असेल ती जागा ओल्या फडक्याने पुसून घ्या.
व्हँक्युम क्लिनरचा डबा स्वयंपाक घरातल्या कचऱ्याच्या डब्यात रिकामा करू नका, तो लगेच बाहेर नेऊन रिकामा करा.
मैत्रिणींनो, कुटुंबियांना मदतीला घेऊन तुम्ही तुमचं किचन नेहमी स्वच्छ ठेवलं तर तुम्हाला रासायनिक कीटकनाशकांचा वापर करावा लागणार नाही.
4) निलगिरी तेल आणि व्हाईट विनेगर चा वापर करा
किचन मधली कपाटं स्वच्छ ठेवण्यासाठी ओल्या फडक्यानं पुसून घेतल्या नंतर अर्धा कप पाणी, अर्धा कप निलगिरी तेल किंवा अर्धा कप व्हिनेगर एकत्र करून कपाटांमध्ये स्प्रे करा.
यामुळं किडींना मुळापासून रोखलं जाईल.
या किडीला थांबवण्यासाठी कडुलिंबाचं तेल, देवदार तेल, किंवा चहाच्या झाडाचं तेल सुद्धा तुम्ही वापरू शकता.
5) खाद्यपदार्थांसाठी हवाबंद डबेच वापरा.
अन्नपदार्थात होणाऱ्या अळ्या किंवा किटक पुठ्ठे, पिशव्या सुद्धा कुरतडू शकतात.
त्यामुळे सगळे खाद्यपदार्थ एअर टाईट डब्यातच साठवा.
बेकरीतले पदार्थ, पावडरी आणल्यानंतर आधी नीट तपासा. जर त्यात अळ्या नसतील तरच ते खोक्यातून काढून डब्यात भरून ठेवा.
मसाले किंवा काही पावडरी खोक्यातूनच विकत मिळतात.
त्यावर तो पदार्थ करण्याची कृती असते. अशा वेळेला ते पदार्थ आधी हवाबंद डब्यात भरा आणि डब्यावरती तो कागद चिकटवून ठेवा.
A) किडींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाय
तुमच्या घरातल्या व्यक्तींच्या संख्येच्या प्रमाणात जितके गरजेचं असेल तितकंच पीठ साठवा.
जास्तीत जास्त आठ ते पंधरा दिवसात लागणारं पीठ साठवा.
कारण पीठ महिनोन् महिने साठवलं तर त्यात नक्की अळ्या, कीटक यांचा उपद्रव होतो, आणि घरभर ते पसरतात.
त्यामुळं पीठं ताजीच वापरा लवकर संपवा.
ताज्या पिठामध्ये अळ्या, किडींची लागण लवकर होत नाही.
B) अन्नपदार्थ फ्रिझ करा.
धान्याचं पीठ करून आणल्यानंतर किंवा तयार पीठं घरी आणल्यानंतर ते फ्रिजर बँगेत पॅक करून आठवडाभर फ्रिजर मध्ये ठेवा.
त्यामुळे त्यातल्या अळ्या, किडे आणि त्यांची अंडी नष्ट होतील.
आठवडाभरानंतर हे पीठ बाहेर काढून हवं तर हवाबंद डब्यात भरा किंवा तुम्ही हे पीठ पुन्हा फ्रिजर मध्ये सुद्धा साठवू शकता.
C) पिठामध्ये ताजी तमालपत्रं ठेवा
पिठामध्ये ताजी तमालपत्रं ठेवल्यामुळं त्यात अळ्या किंवा कीड लागत नाही असं मानतात.
यासाठी विश्वासार्ह दुकानातून ताजी तमालपत्रं आणा.
कृषी उत्पादनं जिथं मिळतात त्या दुकानातून तुम्ही चांगली तमालपत्रं मिळवू शकता.
D) फेरोमन सापळे
शेतामध्ये कीटकांना पकडण्यासाठी फेरोमन सापळे वापरतात.
घरगुती वापरासाठी लहान आकाराचे ही फेरोमन सापळे मिळतात.
किडे याकडं आकर्षित होतात आणि चिकटतात.
किचनच्या कोपऱ्यामध्ये हे सापळे लावा. भरल्यानंतर बदला.
जर तुमचं किचन अस्वच्छ असेल, धान्य मोठ्या प्रमाणात साठवलं असेल तर किडींचा, अळ्यांचा उद्रेक होऊ शकतो.
अशा वेळेला जाणकार व्यवसायिक व्यक्तीला बोलावूनच कीडनियंत्रण म्हणजे पेस्ट कंट्रोल करा.
E) किचन वारंवार तपासा
महिन्यातून एक दोनदा तरी किचन बारकाईनं तपासा.
काही किडे किंवा अळ्या वर्षभर पदार्थांमध्ये जगू शकतात.
त्यामुळे जे पदार्थ साठवणीचे असतात, जिथे रोज हात फिरत नाही ती जागा अधून मधून नीट तपासा आणि किडींना वेळेवर रोखा.
कीड नियंत्रणासाठी किचन टिप्स
मैत्रिणींनो, कीचनच्या तपासणी मध्ये जर तुम्हांला अळ्या, किडे सापडले तर किचनमधल्या कचऱ्याच्या डब्यात त्यांना टाकू नका.
त्यांना किचनमधून बाहेर न्या. घंटागाडी किंवा कचरा जिथे एकत्र केला जातो तिथे नेऊन ठेवा.
त्यामुळं किचन मधल्या कीटकांची संख्या वाढणार नाही.
पीठ विकत आणल्यानंतर चाळुन घ्या. त्यात किडे अळ्या दिसल्या तर लगेचच दुकानदाराकडे परत घेऊन जा.
किचन मधल्या कपाटांमध्ये तुम्ही जर पेपर अंथरले असतील तर ते वेळच्या वेळी बदला.
सफाई करताना या पेपरच्या खाली पण स्वच्छता आवर्जून करा.
किचनची नियमित सफाई करताना या वस्तू हाताशी ठेवा
1) मजबूत स्वच्छ एअरटाईट डबे
2) व्हँक्युम क्लिनर
3) स्वच्छ जुनी फडकी
4) भांडी घासण्याचा साबण किंवा लिक्विड
5) निलगिरी तेल किंवा व्हाइट व्हिनेगर
6) प्लॅस्टिक फ्रिजर बँग
7) तमालपत्र
महिलांची मक्तेदारी असल्याचे समजले जाणाऱ्या किचनमध्ये, किचन मधल्या अन्नपदार्थांमध्ये किडे, कीटक, अळ्या होऊ नयेत म्हणून महिलांसह घरातल्या प्रत्येकाने लक्ष दिलं पाहिजे. तरच तुमचं किचन स्वच्छ सुंदर आणि हायजेनिक ठरेल.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.