सध्याच्या काळात महिलांना घर आणि करीयर या दोन्ही ठिकाणी तारेवरची कसरत करावी लागते.
डेडलाईन, प्रेझेंटेशन याचबरोबर किचनमध्ये काय करायचं याचं टेन्शन.
स्वयंपाक टेस्टी आणि पौष्टिक ही व्हावा असं प्रत्येक महिलेला वाटतं.
त्यासाठी ब-याच वेळ द्यावा लागतो पण नेहमी धावाधाव होत असते
त्यासाठी आम्ही आणल्या आहेत खास किचनटीप्स या काळजीपूर्वक वाचा आणि शक्य तेंव्हा शक्य तितक्या नक्की फॉलो करा
स्वयंपाक घरात कामाचं नियोजन करा आणि कमी वेळात स्वयंपाक करा.
या टीप्स एकदा तरी वापरून पहाच .
1) कुरकुरीत ब्रेडक्रंप्स करण्यासाठी ब्रेड आधी ओव्हनमध्ये कडक करून घ्या.
2) अळूवड्या करताना त्या कुरकुरीत होण्यासाठी पानं स्वच्छ पुसून घ्या त्यावर थोडेसं तेल लावा आणि मग पीठ पसरा.
3) डोसा करायचा तर तो कुरकुरीत व्हायला हवा. त्यासाठी डोशाच्या पीठात पोह्याचा चुरा मिक्स करा किंवा पोहे भिजवून घाला.
4) आमटीला किंवा मिसळीच्या कटाला तवंग हवा असेल तर फोडणीमध्ये चिमूटभर साखर घाला.
5) साबुदाण्याची खिचडी गोळा होतेय?
तर आधी साबुदाणा हलका भाजून घ्या, गार झाल्यावर भिजवा.
नीट भिजला की खमंग फोडणी द्या. दुध किंवा ताक शिंपडा. छान वाफ येऊ द्या. मऊ मोकळी आणि हलकी खिचडी तयार.
6) वरण छान शिजण्यासाठी तुरीच्या डाळीत चिमूटभर हिंग, हळद, चमचाभर साजूक तूप घाला आणि डाळ कुकरला लावा. डाळ छान शिजते, वरणाला स्वादही छान येतो.
7) पालेभाज्या, कोथिंबीर फ्रीजमध्ये नीट ठेवल्या नाहीत तर कुजतात तरी किंवा वाळून तरी जातात.
त्यामुळं बाजारातून आणल्या आणल्या निवडा मग पेपरमध्ये गुंडाळा ही गुंडाळी प्लॅस्टीक डब्यात ठेवा आता हा डबा फ्रिजमधे ठेवा. पालेभाजी आणि कोथिंबीर बरेच दिवस ताजी राहील.
8) पालक, शेपू, मेथी अशा पालेभाज्या शिजल्यावरही हिरव्यागार दिसाव्या असं वाटत असेल तर त्यांत चिमूटभर मीठ आणि दोन थेंब लिंबाचा रस टाका.
9) खुसखुशीत पु-या आवडत असतील तर पीठ मळताना त्यात किंचित दूध आणि जरासं डाळीचं पीठ म्हणजेच बेसन मिक्स करा.
10) पिझ्झा, सँडविच यावर चीज घालताना किसणीला थोडे तेल किंवा तूप लावून घ्या म्हणजे चीज किसणीला चिकटणार नाही.
11) टोमॅटो प्यूरीसाठी लाल टोमॅटो गॅसवर एका भांड्यात पांच मिनीटे उकळून घ्या. गार झाल्यावर सालं काढून मिक्सर मधे प्युरी करा.
प्युरीत किंचित व्हिनेगर घालून किंवा नुसतीच एअर टाइट डब्यात घाला आणि फ्रिजमध्ये ठेवा. चार पाच दिवस ही प्युरी छान टिकते.
12) स्वयंपाकाचा वेळ वाचवण्यासाठी लसूण सोला, चमचाभर तेलात वाटा ही पेस्ट फ्रिजमध्ये आठवडाभर टिकते.
13) लसणाप्रमाणं आल्याचं ही साल काढा, किसा किंवा तुकडे करा, जरासं मीठ लावून पेस्ट करुन फ्रिजमधे ठेवा. ही पेस्टसुद्धा आठवडाभर छान टिकते.
14) हिरव्या मिरच्यांच्या ठेच्यात जरासा लिंबाचा रस, चवीपुरतं मीठ घाला, तुमचा ठेचा आठवडाभर उत्तम राहील.
15) आयत्या वेळी सोललेले बदाम हवे असतील तर एका डिशमध्ये पाणी घ्या त्यात बदाम बुडवा डिश एक मिनिट मायक्रोवेव्ह मध्ये ठेवा.
न भिजलेले बदामसुद्धा मऊ होतात आणि सालं सहज निघतात.
16) पाहुणे येणार असतील मसालेदार भाजी किंवा करीचा बेत असेल तर सख्यांनो, ही करी दाट होण्यासाठी त्यात तिळाची पेस्ट घाला.
17) एखाद्या पार्टीत सॅलेड ताजंतवानं दिसायला हवं? मग एक काम करा सॅलेड चिरायच्या आधी त्या सगळ्या भाज्या बर्फाच्या पाण्यात टाका, थोड्या वेळाने चिरा.
18) भरल्या वांग्याचा स्वाद वाढवण्यासाठी दाण्याचा अर्धबोबड कुट करा. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात थोडे थोडे दाणे घालून किंचित फिरवून बाहेर काढा. दाण्याचा अर्धबोबडे कुट मिळेल भाजीचा स्वाद वाढेल.
19) बरं का सख्यांनो, भाजलेल्या दाण्याची सालं अजिबात काढू नका. सालासकटच दाण्याचा कूट करा ,कारण शेंगदाण्यांच्या या सालात अँटी ऑक्सिडंट्स असतात, जे हृदयाचे आरोग्य राखण्यासाठी मदत करतात.
20) सफरचंदाला थोडसं मीठ चोळलं तर काळं पडणार नाही मग तुम्ही टिफिनमध्ये हे चिरलेलं सफरचंद बिनधास्त देऊ शकता.
21) फरसबी, मटारचे दाणे, ढबु मिरची या भाज्या शिजवताना आधी हळद, मीठ घालून पाण्यात शिजवून घ्या. रंग हिरवागार कायम राहतो.
22) छोले भिजवताना त्यांत मूठभर हरभरा डाळ घाला, छोलेचा रस्सा छान आणि दाटही होतो.
23) ओट्यावर किंवा फरशीवर लिंबाच्या रसाचे पांढरे डाग पडले तर त्यावर आल्याचा तुकडा घासा, डाग जातील.
24) बाजारातून कढीपत्ता आणला तर तो बराच उरतो आणि सुकून जातो. त्यासाठी कढीपत्याची पानं तेलात तळा आणि हवाबंद डब्यात भरुन ठेवा. हिरवा रंग तर टिकतोच पण कढीपत्याचा स्वाद ही टिकतो.
25) गाजर, टोमॅटो, काकडी, बीट, मुळा या भाज्या सुरकुतल्या, वाळल्या तर रात्रभर मिठाच्या पाण्यात घालून ठेवा. सकाळी तुम्हांला ताज्या आणि टवटवीत भाज्या मिळतील.
तर किचनमधल्या या टिप्स तुमचा वेळ आणि श्रम दोन्ही वाचवतील.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.