सध्याच्या कोविडच्या काळात मास्क ही एक महत्वाची गोष्ट बनली आहे. मास्क घातल्याशिवाय घराबाहेर पडणे धोकादायक आहे.
त्यामुळे सर्वांनाच मास्क वापरण्याचा आग्रह केला जातो आणि तो योग्यच आहे. परंतु मास्कमुळे खरी पंचाईत होते ती चष्मा असणाऱ्या लोकांची.
कारण चष्मा लावून मास्क घातल्यावर चष्म्याच्या काचेवर वाफ जमा होते. फक्त मास्क घातल्यावरच नव्हे तर हेल्मेट घातल्यावर किंवा स्कार्फने चेहरा पूर्ण झाकला की देखील चष्म्यावर वाफ तयार होते.
त्यामुळे नीट दिसत नाही. मग चष्मा किंवा गॉगल काढून तो पुसणे हा एक उद्योगच होऊन बसतो.
पण अशी वाफ (फॉग) चष्म्यावर येणे आपण थांबवू शकतो. चष्मा साबणाच्या पाण्याने धुणे, कोरड्या आणि मऊ कापडाने पुसणे (जे कापड आपल्याला चष्म्याबरोबर दिलेले असते) असे अनेक साधे साधे उपाय यासाठी करता येतात.
अशा पध्दतीच्या अनेक उपायांची माहिती आपण या लेखात घेऊया. जेणे करून करोना काळात मास्क लावणे आपल्याला त्रासदायक ठरणार नाही.
१) मास्क लावल्यावर चष्म्यावर वाफ येऊ नये म्हणून करायचे काही उपाय…
१. चष्मा वापरण्या आधी साबणाच्या पाण्याने स्वच्छ धुवा.
मास्क लावण्या आधी चष्मा साबणाच्या पाण्याने धुवा आणि नंतर कोरड्या आणि मऊ कापडाने स्वच्छ पुसून घ्या. चष्मा साबणाच्या पाण्याने धुतल्यावर काचेवरील तेलकटपणा निघून जातो आणि त्यावर वाफ साठून रहात नाही.
असाही शोध लागला आहे की साबणाचे पाणी चष्म्यावर एक प्रकारचे आवरण तयार करते आणि त्यावर वाफ बसू देत नाही.
२. मास्कला एक नोज क्लिप असते ती घट्ट बसवा.
मास्क नाकावर नीट घट्ट बसत नसेल तर मधल्या जागेतून उच्छ्वासावाटे बाहेर पडणारी गरम हवा बाहेर येते आणि चष्म्यावर जमते. बाजारात मिळणाऱ्या काही मास्कमधे नोज क्लिप असते ती नाकाच्या आकारानुसार घट्ट बसवली तर तिथून हवा बाहेर येत नाही आणि त्यामुळे चष्म्याच्या काचेवर वाफ जमा होत नाही.
परंतु ज्या मास्कला नोज क्लिप नसते त्यांच्यासाठी सिलिकॉनची पट्टी /क्लिप मिळते. ती हवी त्या आकारात वाकवता येते. ती मास्कवर नाकाच्या आकारानुसार घट्ट लावल्यास वाफ साठत नाही.
३. चष्म्यावर अँटी फॉग स्प्रेचा वापर करा.
चष्म्यावर अँटि फॉग स्प्रे मारल्यावर केवळ काही मिनिटांसाठीच नाही तर बऱ्याच काळापर्यंत चष्मा स्वच्छ राहू शकतो. बाजारात मिळणारे अँटी फॉग स्प्रे चष्म्यावर एक प्रकारचे पारदर्शक आवरण तयार करतात ज्यामुळे चष्म्यावर वाफ जमत नाही.
४. मास्क सरकू नये म्हणून मास्कच्या कडेला चिकटपट्टी लावा.
नाकावरून मास्क सरकू नये म्हणून मास्क आणि नाक असे एकत्र चिकटपट्टी लावू शकतो.
त्यामुळे उच्छ्वासावाटे बाहेर पडणारी हवा चष्म्यावर येणार नाही. पण चिकटपट्टीच्या चिकटपणामुळे त्वचेला काही त्रास होणार नाही ह्याची काळजी घ्या.
तुमची त्वचा जर नाजूक असेल तर या उपायाचा अजिबात विचार करू नका.
५. चष्मा थोडा खाली सरकवा.
नेत्रतज्ज्ञ असे सुचवतात की चष्मा थोडा पुढे घेऊन खाली सरकवला आणि चष्मा मास्कच्या लगेच वरच्या बाजूला घातला तर आपली समस्या दूर होईल.
हो, यामुळे आपण थोडे गंमतशीर दिसू शकतो… पण काय हरकत आहे आपली चष्म्यावर वाफ साठण्याची अडचण निघून जात असेल तर…..
थोडे गमतीशीर दिसले तरी चालून जाईल, हो ना? तसंही कोरोनाने गेल्या दोन वर्षांपासून, ‘आपण दिसतो कसे हे विचार गुंडाळून ठेवायला आपल्याला शिकवलंच आहे’
२) आपला चष्मा स्वच्छ ठेवण्याचा सगळ्यात सोप्पा उपाय कोणता?
१. चष्मा स्वच्छ करायच्या आधी हात ही स्वच्छ धुवा.
२. कोमट पाण्याने चष्मा धुवा.
३. चष्मा स्वच्छ करण्यासाठी लेन्स क्लिनरचा वापर देखील करता येईल.
४. मायक्रॉफायबर कापड (जे चष्म्याच्या दुकानातून आपल्याला मिळालेले असते) वापरूनच चष्मा स्वच्छ ठेवा.
रुमाल/ओढणी/पदर/टर्किश टॉवेल अशा कशाचाही वापर चष्मा स्वच्छ करण्या साठी करू नका.
कारण त्यामुळे चष्म्यावर ओरखडे येण्याची शक्यता असते..
५. धुऊन झाल्यावर चष्मा शक्यतो हवेमुळे वाळू द्या.
त्यामुळे त्यावर एक सरफेक्टंटचे आवरण तयार होण्यास मदत होते.
ह्या सगळ्याचा मतितार्थ असा की सध्याच्या काळात मास्क घालावाच लागतो.
श्वास घेताना हवा बाहेर पडते आणि तीच चष्म्यावर वाफ म्हणून साठते आणि आपल्याला नीट दिसत नाही.
हे होऊ नये म्हणून काय उपाय करता येतील ते आज आपण पाहिले.
थोडक्यात काय तर तुम्ही मास्क वापरा, स्कार्फ वापरा किंवा हेल्मेट, तुम्ही घरी असा किंवा बाहेर…. चष्म्यावर येणाऱ्या वाफेमूळे (फॉगमूळे) तुम्हाला दिसण्यात नक्कीच अडचणी येतात. कॉम्पुटर स्क्रीन नीट दिसत नाही, कामात चुका होऊ शकतात, गाडी चालवताना अंदाज चुकू शकतो आणि अपघाताची शक्यता वाढते, साधं चालताना सुध्दा पडू शकतो.
हे टाळण्यासाठी म्हणजेच चष्म्यावर वाफ येऊ नये म्हणून लेखात सांगितलेल्या उपायांचा नक्की वापर करा आणि तुमची दृष्टी सुधारा.
ही माहिती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोचवण्यासाठी हा लेख जरूर शेयर करा.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.