मुंबईच्या इतिहासातल्या पहिल्या-वहिल्या दंगलीची रंजक गोष्ट

पारशी लोक म्हटले कि आपल्याला ही गोष्ट अगदी आवर्जून सांगितली जाते कि ते ८ व्या कि ९ व्या शतकात इराण मधल्या मुसलमानी आक्रमणामुळे पलायन करून गुजरात मधल्या संजाण नावाच्या गावी आले आणि त्यांनी तिथल्या राजाकडे (जाधव राणा किंवा यादव राणा) आश्रय मागितला मग त्याने दुधाने भरलेला वाडगा पाठवला.

तुमच्या करता इथे जागा नाही हे सुचवायला, तर त्या पारशी लोकांच्या प्रमुखाने त्यात मूठभर साखर टाकली, ‘ह्या साखरेप्रमाणे आम्ही तुमच्यात मिसळून जाऊ आणि उलट गोडवाच वाढवू’ असे सुचवण्याकरता.

आता ही गोष्ट कितपत खरी आहे ते माहिती नाही. पण खरी नसावी.

कारण पारशी लोक संजाण गावी यायच्या आधीपासून भारतात व्यापाराच्या निमित्ताने ये जा करत होते अगदी सिकंदराच्या स्वारीच्या आधीपासून आपले त्यांचे संबंध होते त्यामुळे ते आपल्या चांगलेच ओळखीचे होते.

त्यामुळे शक्यता अशी आहे कि ते जरी असे निर्वासित होऊन आले असले तरी त्यांना येऊन आमच्या राज्यात वसू नका असे सांगावे, असे काही त्या राजाला वाटले नसावे आणि ते इथे अगदीच उपरे ही नसावेत.

असो पण आता जो किस्सा इथे सांगणार आहे तो थोडा वेगळाच आहे. झाले असे कि हे पारशी लोक भारतात आल्यानंतर इंग्रजांचे राज्य येई पर्यंत तसे अगदी गुप्तच होते.

म्हणजे ते होते, त्यांचा धर्म, त्यांच्या चालीरीती, त्यांचा व्यापार सगळे चालू होते पण ते राजकीय पटलावर चमकले नाहीत अगदी गप गुमान राहिले.

(बादशाहा अकबराने सर्व धर्माची चर्चा करताना त्यांचे काही धर्मगुरू आले होते असा उल्लेख सापडतो आईने अकबरीत) त्यामुळे त्यांचा फारसा उल्लेख सापडत नाही पण इंग्रज आल्यावर मात्र ह्यात फरक पडला.

एक तर त्यांची शरीरयष्टी, वर्ण बराचसा युरोपियनांप्रमाणे असल्याने, त्यानी पटकन इंग्रजी भाषा आत्मसात केल्याने आणि व्यापारउदीमात त्यांचे बस्तान आधीच बसले असल्याने ते लगेचच ह्या नव्या इंग्रजी राज्यात नावारूपाला आले.

मुंबई हे इंग्रजांमुळे भरभराटीला आलेले बंदर त्यामुळे ते गुजरातेहून तिथे येऊन स्थायिक झाले. सुरुवातीला मुंबई वसवणारे समाजगट तीनच. म्हणजे कोळी, आगरी, भंडारी पाठारे प्रभू हे मराठी लोक, पारशी आणि गुजराती व्यापारी हे गुजरातहून आलेले लोक आणि अर्थात इंग्रज.

तर ह्या पारशी आणि पाठारे प्रभूंनी लवकरच मुंबईत बक्कळ पैसा कमावून भरपूर इस्टेटी केल्या, व्यापार उदीम चालू केला.

तर ही गोष्ट आहे १८३०-३२ सालच्या सुमाराची. इस्ट इंडिया कंपनीच्या मुंबई ऑफिसात काम करणारा एक अधिकारी होता, फिशर म्हणून.

त्याला मुंबईच्या रस्त्यावरचं भटकं कुत्रं चावलं. १८३२ चा जुना काळ तो, तेव्हा कुत्रा चावल्यावर घ्यायच्या लशी आल्या नव्हत्या (त्या आल्या १८६५ नंतर) त्यामुळे हा बिचारा रेबीज होऊन मेला.

चांगले १५-२० दिवस त्याने हाल सोसले. त्यामुळे मरताना त्याने आपल्या जमा संपत्तीचा बराचसा हिस्सा इस्ट इंडिया कंपनीकडे सोपवला आणि त्याचा उपयोग मुम्बईच्या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी करावा अशी अंतिम इच्छा व्यक्त केली.

त्याप्रमाणे मग इस्ट इंडिया कंपनीने एक फंड स्थापन करून मुंबईतल्या लोकांना, जे भटके कुत्रे मारून त्यांचे शव आणून दाखवेल त्याला प्रती कुत्रा आठ आणे द्यायला चालू केले.

(हल्ली हल्ली पर्यंत कुत्रे नाहीतरी उंदीर मारायची आणि पैसे कमवायची हि योजना चालू होती.)

तर झाले असे कि १८३० ते १८४० च्या सुमारास होता दुष्काळ. आणि त्याकाळी आठ आणे ही तशीही बऱ्यापैकी मोठी रक्कम होती, त्यामुळे अनेक लोक मग कुत्रा मारून ते पैसे घेत, लवकरच मुंबईत भटके कुत्रे कमी आणि त्यांना मारणारे जास्त असे झाले.

मग ह्या लोकांनी लोकांच्या घरातले पाळीव कुत्रे पळवून नेऊन मारायला आणि पैसे घ्यायला सुरुवात केली आणि प्रॉब्लेम सुरु झाला.

तसेही पारशी भटके कुत्रे मारून टाकायच्या कंपनी सरकारच्या निर्णयाविरुद्ध होते.

त्यांच्या धर्माप्रमाणे कुत्रा हा पवित्र प्राणी असून तो मृत्युनंतर आत्म्याला परलोकात मार्गदर्शन करतो तसेच आप्त जणांचे संदेश त्यांच्या पर्यंत पोहोचवतो (आपल्या कडे कावळा किंवा जुन्या इजिप्शियन लोकांमध्ये मांजर हे असे काम करते असे मानले जाते)

त्यामुळे कंपनी सरकारला आधीच ते कुत्रे मारणे बरोबर नाही ते थांबवा अशी तक्रार करत होते त्यात अनेक पारशांनी हौसेने, प्रेमाने पाळलेले कुत्रे पळवून नेल्याच्या आणि मारून टाकून पैसे कमावल्याच्या घटना घडल्या आणि पारशी संतापले.

१८३२ मध्ये त्यांनी हरताळ केला. इंग्रज सोल्जर आणि त्यांच्या अधिकाऱ्यासाठी फोर्ट मध्ये पाव घेऊन जात असलेल्या गाड्या अडवून त्यातले पाव आणि मांस रस्त्यावर फेकले, खाटकांच्या दुकानांची मोडतोड केली, अनेक दुकाने आणि ऑफिसेस उघडू दिली नाहीत.

एवढेच नाहीतर मुंबई हायकोर्टाचे (तेव्हाचे बॉम्बे हाय कोर्ट) न्यायाधीश जे होते ते रस्त्याने जात असताना त्यांची बग्गी अडवून त्यात चक्क रस्त्यावरचा कचरा आणि २-५ मेलेल्या घुशी टाकल्या.

असा एकंदर दिवसभर बराच धुमाकूळ घातल्यावर मग शेवटी कंपनी सरकारने संध्याकाळी कुलाब्यावरून सोजीर लोकांची पलटण बोलावून गोळीबार केला, धरपकड केली आणि हा दंगा काबूत आणला.

(अजून मुंबईत पोलिस खातेसुद्धा निर्माण झाले नव्हते किंवा भारतीय दंडविधान अस्तित्वात आलेले नव्हते.)

धुमाकूळ घालणाऱ्या बऱ्याच पारशांना कैद करून २-२, ३-३ वर्षांच्या शिक्षा सुनावल्या. पण कुत्रे मारायचे मात्र लगेच बंद केले.

आणि बैलगाड्यांवर लोखंडी पिंजरे ठेवून गल्लोगल्लीच्या भटक्या कुत्र्यांना पकडणे आणि शहराबाहेर नेऊन सोडणे चालू केले.

त्यांच्या करता मग पांजरपोळ ही बांधले. आणखी एक… मागे फ्रांस मध्ये चारली हेब्डो मासिकाने पैगंबरांचे चित्र छापले म्हणून काही समाजकंटकांनी त्यांच्या ऑफिसात जाऊन गोळीबार केला होता.

अगदी तसेच १८५१ साली एका पारशी गृहस्थाने त्याच्या चित्रज्ञानदर्पण ह्या गुजराती मासिकात पैगंबरांचे चित्र छापले त्यावरून काही असाच वाद झाला.

लुटालूट एकमेकांची कार्यालये दुकाने आणि डोके फोडणे, हल्ले प्रतिहल्ले हा प्रकार जवळपास महिनाभर सुरु होता शेवटी दोन्ही समाजातल्या मान्यवर लोकांनी एकत्र येऊन सभा घेतली सलोख्याने राहण्यावर एकमत झाले.

मग ते प्रकरण एकदाचे मिटले.

अशाप्रकारे आपल्याला नेहमी शांत सभ्य कायदे पाळणारे म्हणून माहिती असणारे पारशी हे मुंबईतल्या पहिल्या वाहिल्या दंग्याचे जनक ठरले.

संदर्भ

मुंबईचे खरे मालक कोण? – वासंती फडके

बावाजीन्च्या सुरस कथा – किशोर आरस

Bombay Dog Riots – Wikipedia

 

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।