तुमच्या घरात आरोग्य नांदतं की नाही पडताळून पहा या कसोटीवर
१) किचन ओट्यावर कोणकोणते पदार्थ आहेत ?
घरातल्या प्रत्येकाच्या उत्तम आरोग्यासाठी चांगल्या गोष्टी निवडा.
ताजी फळं, ताज्या भाज्या, पौष्टिक धान्य, आणि ताजं मांस मटन यांची निवड करा.
जर ताज्या गोष्टी तुमच्या आसपास मिळत नसतील तर कॅनफूडमध्ये स्वतःच्याच रसात पॅक केलेली फळे निवडा, फळांचे सिरप घेऊ नका
मीठ किंवा साखर यांचा जरूरीपुरता वापर करा.
२) स्वयंपाकघरातील टेबल धुळीने माखलेलं आहे का?
सध्याच्या प्रचंड व्यस्त जीवनशैलीमुळे तुम्ही कदाचित फक्त रात्रीचंच जेवण घरात जेवत असाल.
पण यावेळी तरी तुम्ही कुटुंबासोबत एकत्र जेवता की नाही?
जर तुम्ही दिवसातलं किमान एकवेळचं जेवण एकत्र जेवत नसाल तर ते तुमच्या मुलांच्या आरोग्यासाठी हानीकारक आहे.
लहान मुलांना खाण्याच्या चांगल्या सवयी लावण्यासाठी त्यांचे प्रॉब्लेम समजून घेण्यासाठी एकत्र जेवणाला पर्याय नाही.
या वेळेत मिळणारा जिव्हाळा आणि प्रेम मुलांना आत्मविश्वास देतात.
त्यामुळे किमान एकदा तरी टेबलावर एकत्र बसून जेवण्यासाठी वेळ काढा.
३) तुमच्या ताटाचा आकार किती मोठा आहे?
तुमच्या जेवणाच्या ताटाचा आकार तुमच्या कंबरेच्या आकारावर परिणाम करू शकतो हे तुम्हाला माहीत आहे का?
अहो खरचं! संशोधनातून असं समोर आलंय की जेंव्हा लोक मोठ्या ताट, वाट्या वापरतात तेंव्हा भरपूर जेवण वाढून घेतात, म्हणजे ब-याच वेळेला ते गरजेपेक्षा जास्त खातात.
मग वजन वाढायला कितीसा वेळ लागतो?
वजनावर नियंत्रण ठेवायचं असेल तर एक युक्ती वापरुन पहा.
मोठ्या आकाराच्या ताटात फक्त पौष्टिक पदार्थ घ्यायचे, आणि चटपटीत पदार्थांसाठी छोटी छोटी ताटं वापरायची.
त्यामुळे पोटभर पौष्टिक आणि चवीपुरतं जंक फूड हे समीकरण तुम्ही पाळू शकाल.
४) तुम्ही शिळ्या अन्नाची साठवणूक योग्य पद्धतीने करता ना?
कोणताही पदार्थ उरला म्हणून टाकून देणं चुकीचचं.
अन्न तयार व्हायला जी मेहनत लागते ती मेहनत आणि पैसे वाया घालवण्यापेक्षा अन्न व्यवस्थित साठवून लवकरात लवकर वापरा.
शिळं अन्न लगेच दुसऱ्या दिवशी संपवा. खाण्यापुर्वी ते व्यवस्थित गरम करून घ्या.
५) तुमच्या बेडरूममध्ये किती स्क्रीन आहेत?
सध्याच्या काळात स्क्रीनशिवाय जगणंच अशक्य आहे!
तुम्ही रात्री झोपायच्या आधी नेट सर्फिंग करता की टीव्ही शोज बघता?
तुम्हाला माहिती आहे का या स्क्रीनमुळे तुमच्या झोपेचं खोबरं होतं.
इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सचा प्रकाश तुमच्या मेंदूच्या भागांना जागृतीसाठी चालना देतो.
त्यामुळे पुरेशी झोप होत नाही. त्यामुळे बेडरूममध्ये स्क्रीनची संख्या मर्यादित ठेवा.
६) पाळीव प्राण्यांना कुशीत घेऊन झोपता का?
मांजरीला कुरवाळणं किंवा कुत्र्याला कुशीत घेऊन झोपणं ही तशी चांगली गोष्ट आहे.
पण त्याला काही मर्यादा आहेत, पाळीव प्राणी तुमच्या पलंगावर जागा व्यापतात, दंगा करतात आणि फिरतात.
यामुळे तुमची झोपमोड होऊ शकते. शिवाय हे प्राणी आजारी असतील तर तुम्हांला जंतुसंसर्ग होऊ शकतो.
त्यामुळे प्राण्यांना त्यांच्या स्वतंत्र बिछान्यात झोपायला लावा.
७) तुमचा बिछाना आरामदायी आहे ना?
सकाळी उठताना तुमची पाठ आणि कंबर आखडलेली असते का?
मग तुमचा बिछाना, गादी योग्य पद्धतीची नाही हे लक्षात घ्या.
झोपेसाठी प्रत्येकाला ताठ, कठीण बिछान्याची गरज नसते.
तुमच्या शरीराला योग्य बिछाना कोणता हे पुरेशी झोप झाली की तुमच्या लक्षात येईल.
तुमची गादी दर ८ वर्षांनंतर नक्की बदला.
तुमची गादी आकारहीन विसविशीत झाली असेल तर नवी गादी आणि उशा वापरा.
८) प्रथमोपचार साहित्य घरातल्या प्रत्येकाला सापडू शकतं का?
जेंव्हा किरकोळ दुखापत किंवा आजार होतात तेव्हा योग्य प्रथमोपचार घेणं चांगलं असतं.
जवळच्या मेडिकल स्टोअरमधून प्रथमोपचार किट घरी आणून ठेवा.
या किटमध्ये कोणकोणत्या गोष्टींसाठी औषधं आहेत ती कशी वापरायची याची माहिती करून घ्या.
घरातल्या सदस्यांचे आजार कोणते त्याविषयी तुमच्या डॉक्टरांशी बोला.
तुमची प्रथमोपचार किट सगळ्यांना सहज मिळेल अशा ठिकाणी ठेवा.
मात्र त्या जागी लहान मुलांचा हात पोचणार नाही याची खात्री करून घ्या.
त्यातल्या औषधांच्या एक्सपायरी तारखा वेळोवेळी चेक करुन नवी औषधं ठेवा.
९) सौंदर्य प्रसाधनं कशी साठवता?
दागिने किंवा मेकअपचं साहित्य तुम्ही रोज किंवा काही विशेष प्रसंगी वापरत असाल, तर ते जंतूमुक्त असल्याची खात्री करा.
सौंदर्य प्रसाधनं नेहमी थंड, कोरड्या हवेशीर जागी साठवा आणि वापरण्यापूर्वी तुमचे हात धुवा.
त्यातल्या साहित्याला थेट स्पर्श करणं टाळा.
त्यात पाणी घालू नका, आणि कुणाबरोबर ही हे साहित्य शेअर करू नका.
१०) तुमची बाथरूममध्ये बुरशी साठली आहे का?
जेंव्हा बाथरूम हवेशीर नसतं, तेव्हा बुरशी, शेवाळं वेगानं पसरतात.
बाथरूम स्वच्छ कोरडं नसेल तर नाकात आणि घशात जळजळ होण्यापासून गंभीर संसर्गापर्यंत ब-याच प्रकारच्या आरोग्याच्या समस्या उद्भवतात.
पंखा किंवा उघड्या खिडकीने तुमच्या शॉवरची वाफ बाहेर काढा.
बाथरुमध्ये नेहमी चांगली स्वच्छता ठेवा.
११) व्यायामाची साधनं तयार आहेत का?
उत्तम आरोग्यासाठी तुमच्या शरीराला आठवड्यातून किमान १५० मिनिटे एरोबिक व्यायामाची आवश्यकता असते.
पण तुमच्याकडे योग्य शूज नसतीत, तर रोज पाय मुरगळू शकतो, वेदना होऊ शकतात.
त्यासाठी ते आरामदायक शूज निवडून व्यायामासाठी तयार रहा.
१२) तुमच्या घरातली सजावट तुम्हांला विचार करायला मदत करते का?
संशोधनात असं लक्षात आलंय की, विशिष्ट रंग आणि सर्जनशीलता, त्याचबरोबर रंग आणि घरातल्या व्यक्तींची कार्य करण्याची क्षमता यांच्यात संबंध असतो.
जेंव्हा तुम्ही तुमच्या भिंतींसाठी रंग निवडाल तेंव्हा ते फ्रेश असावेत, तुम्हांला प्रोत्साहन देणारे असावेत.
१३) तुमच्या घरातलं पाणी स्वच्छ आणि चवदार आहे का?
जेंव्हा अस्वच्छ पाणी तुमच्या पोटात जातं तेंव्हा पोटदुखीपासून न्यूरोलॉजिकल विकारांपर्यंत काहीही होऊ शकते.
सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या सुरक्षिततेचे नियम कठोर असतात.
पण तुम्ही विहिरीचं, बोअरचं पाणी वापरत असाल तर ते स्वच्छ असल्याची खात्री करून घेणं तुमचं काम आहे.
तुमच्या घरातील पाण्याची चव चांगली असावी याविषयी काळजी घ्या.
योग्य चौकशी करून चांगला फिल्टर तुम्ही निवडू शकता.
वॉटर फिल्टरची निवड कशी करावी? याबद्दल चा लेख शेवटी दिलेला आहे.
१४) तुमच्या घरात ताजी आणि स्वच्छ हवा खेळती आहे का?
हवेमुळेसुध्दा आरोग्याला त्रास होऊ शकतो.
तुमचे डोळे, नाक आणि घसा यांना कोंदट हवेमुळे इन्फेक्शन होऊ शकते.
घरात हवा खेळती नसेल तर घरातल्या सदस्यांना डोकेदुखी होऊ शकते किंवा चक्कर येऊ शकते.
कर्करोग, श्वसनाचे रोग आणि हृदयरोग यासारख्या दीर्घकालीन गंभीर समस्यासुद्धा उद्भवू शकतात.
घरातलं वायू प्रदूषण कमी करण्यासाठी, ताजी हवा तुमच्या घरात येऊ शकते याची खात्री करा.
सकाळी लवकर आणि शक्य असेल तेंव्हा तेंव्हा खिडक्या उघडा.
तुमच्या घरात योग्य वायुवीजन असल्याची खात्री करा.
जास्त समस्या असतील, तर एअर क्लीनिंग डिव्हाइसचा विचार करा.
१५) तुमचं नाव तुमच्या घरात साठणा-या धुळीत लिहिता येतं का?
अस्वच्छता आणि पसा-यापेक्षा साठलेली धूळ ही जास्त भयंकर आहे.
घरातली कोणतीही गोष्ट धुळीत माखून जाऊ शकते, फरशा, कपाटं साफसफाईची उत्पादनं आणि फर्निचरसुद्धा.
जमिनीवर खेळणा-या लहान मुलांना धुळीमुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असते.
त्यासाठी HEPA फिल्टरसह एअर क्लीनर वापरा.
तुमचे हात पुन्हा पुन्हा धुवा.
घरातला प्रत्येक कोपरा आठवड्यातून एकदा तरी झटकला गेला पाहिजे शिवाय त्या जागा ओल्या कापडाने किंवा ओल्या मॉपने स्वच्छ करा.
वॉटर फिल्टरची निवड कशी करावी? याबद्दल चा लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.