वसुबारस हा दिवाळीचा पहिला दिवस. हिंदु धर्मातील हा लोकसंस्कृती आणि कृषीसंस्कृतीशी जोडला गेलेला सण आहे.
यालाच गोवत्स द्वादशी असेही म्हणतात. हा सण महाराष्ट्रात विशेष करून साजरा केला जातो. या दिवसापासून दिवाळीची धामधूम खऱ्या अर्थाने सुरू होते.
या पारंपारिक सणाचे महत्त्व या लेखातून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
अश्विन महिन्यातील वद्य द्वादशी हा दिवस म्हणजे गोवत्स द्वादशी!!!!
गाय आणि तिचे वासरु यांची आपल्या हिंदू संस्कृतीत मोठी महती सांगितली आहे. गायीचे धार्मिक दृष्ट्या खूप महत्त्व आहे. गाईला गोमाता असे संबोधले जाते. मानवाचे भरणं पोषण करणाऱ्या गाईला मातेसमान दर्जा आपल्या संस्कृतीत दिला जातो.
महाराष्ट्रात वसुबारस कशी साजरी करतात
गाईगुरांना पूर्वापार गोधन असे म्हणतात. कृषीसंस्कृतीत ज्याचा गोठा भरलेला तो खऱ्या अर्थाने समृद्ध असे समजले जात असे.
भगवान श्रीकृष्ण सुद्धा गोपालकृष्ण म्हणजे गाईंचे पालन पोषण करणारे होते. गोकुळात बालपणी ते गोधन सांभाळत असत.
श्री दत्तगुरूंच्या प्रतिमेशेजारी गाईला स्थान दिले आहे. सवत्स धेनु म्हणजे गाय आणि तिचे वासरु हे समृद्ध कृषी संस्कृतीचे प्रतीक आहे.
वसुबारस शब्दाचा अर्थ काय?
वसु म्हणजे गाय आणि बारस म्हणजे बारावा दिवस अर्थात द्वादशी.
महाराष्ट्रातील वसुबारस पूजाविधी
या दिवशी संध्याकाळी सौभाग्यवती स्त्रिया सवत्स म्हणजे वासरासहीत गाईची पूजा करतात.
या दिवशी दूध, दुधाचे पदार्थ, तळलेले पदार्थ खात नाहीत. ज्यांच्याकडे गाईगुरे आहेत ते पुरणावरणाचा स्वयंपाक करतात.
घरातील सवाष्ण बायका गाईच्या पायावर पाणी घालून गाईंचे पाय धुतात व नंतर हळदकुंकू वाहून पूजा करतात.
गाईंना फुलांच्या माळा घालून सजवतात. निरांजन ओवाळून केळीच्या पानावर नैवैद्य वाढून गाईला दाखवतात.
ह्या दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत उपवास करतात. आपल्या मुलाबाळांना चांगले आरोग्य लाभावे म्हणून ही पूजा केली जाते.
ह्या दिवसापासून अंगणात रांगोळी काढतात आणि खऱ्या अर्थाने दिवाळीच्या सणाला सुरुवात होते.
महाराष्ट्रातील ग्रामीण भागात हा सण फार उत्साहात साजरा करण्यात येतो. ग्रामीण भागात शेती हेच उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे.
आणि गाय हा उत्पन्नाचा प्राथमिक स्त्रोत आहे. म्हणून गाईला लक्ष्मीस्वरूप मानले जाते.
धन देणारी लक्ष्मी म्हणून गाईंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वसुबारस साजरी केली जाते.
गुजरात आणि दक्षिण भारतातील काही ठिकाणी हा सण साजरा केला जातो. गुजरातेत या सणाला बाग बरस तर दक्षिणेत नंदिनी व्रत म्हणतात. नंदिनी म्हणजे गोमाता.
वसुबारस पौराणिक कथा
या कथेचा संदर्भ पुराणातील देव आणि दानव यांच्या समुद्र मंथनाशी जोडलेला आहे. समुद्रमंथनातून कामधेनू नावाची गाय बाहेर आली.
ही कामधेनू म्हणजे सात्त्विकता, मातृभाव, प्रजननक्षमता यांचे प्रतीक मानली जाते. हे सर्व गुण मानवी जीवनाचे पोषण करणारे आहेत म्हणून गाईला मातृस्वरुपात पूजतात.
ज्या जोडप्यांना अपत्य प्राप्तीची इच्छा आहे ते यादिवशी उपवास करतात. आणि बालगोपालाच्या नावाचा मंत्रजप करतात.
या दिवशी गाईंच्या शरीरातून विष्णू रुपाने भारलेल्या चैतन्याचे उत्सर्जन होते म्हणून शारीरिक ऊर्जा वाढते असे मानले जाते.
आधुनिक शास्त्रानुसार गाईचे महत्त्व
आधुनिक शास्त्रानुसार केलेल्या संशोधनात गोमूत्र आणि गाईच्या शेणात अनेक प्रकारचे उपयुक्त बॅक्टेरीया आढळून आले आहेत.
तसेच रेडीएशन मुळे होणारे किरणोत्सर्ग आणि त्यामुळे निर्माण झालेली उष्णता शोषून घेण्याची क्षमता बऱ्याच प्रमाणात गाईच्या शेणात आहे असे आढळले आहे. यावर जगभरात अनेक ठिकाणी संशोधन चालले आहे.
त्यामुळे ग्लोबल वॉर्मिग साठी गाय हा प्राणी उपयुक्त आहे. गाईचे शेण हे उत्तम नैसर्गिक खत आहे.
अशाप्रकारे आधुनिक काळातही गाईचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.
गाईचे आपल्या संस्कृतीत आणि आयुष्यात किती महत्त्व आहे हे या लेखातून तुम्हाला समजले असेल.
वसुबारस या सणाची माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करुन सांगा. आपली संस्कृती आणि परंपरा सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी लेख लाईक व शेअर करा.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
Khup chan mahiti