अस्थिर मनाला शांत करणारी ही आहेत १५ जादूई वाक्यं !!!

जीवनात अशा काही घटना घडतात की, त्यामुळे आपली द्विधा मनस्थिती होते. समोर दोन मार्ग दिसत असतात आणि त्यातला कोणतातरी एकच निवडणं आपल्या हातात असतं. आयुष्यात जसजसे अनुभव आपल्याला येतात तसतसे अनेक प्रश्न आपल्यासमोर उभे रहातात. आपण कोण आहोत आणि आपल्याला काय हवंय हे कळत जाईल तसं आयुष्य बदलतं.

मग पूर्वी घेतलेले निर्णय चुकीचे वाटू लागतात. किंवा आपले मित्र, सहकारी, नात्यातील व्यक्ती यांची आणि आपली विचारसरणी जुळत नाही हे लक्षात येतं. वेगवेगळी ध्येयं घेऊन चालणारी माणसं एकाच रस्त्यावरुन वाटचाल करु शकत नाहीत. कोणतं तरी एक वळण असं येतं की तिथून पुढे प्रत्येकाला आपला स्वतंत्र मार्ग निवडावाच लागतो. नाहीतर एकमेकांना धरुन ठेवल्यामुळे दोघांचीही फरपट होते.

आयुष्यात पुढे जाण्यासाठी काही अवघड निर्णय घेणे भाग पडते. पण अशा वेळी मनाची अवस्था फार बिकट होते. एवढ्या वर्षांत निर्माण झालेला कंफर्ट झोन सोडून नव्या दिशेला जाणे सोपे नाही. यामुळे मनाला खूप वेदना होतात. अशाच काही हतबल करणाऱ्या घटना पाहूया.

जवळच्या व्यक्तीची आत्महत्या, जीवलग व्यक्तींचा अचानक मृत्यू होणे, नोकरी जाणे किंवा व्यवसायात भयंकर नुकसान होणे, जवळच्या नात्यात फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांच्यापासून दूर होणे, एकत्र कुटुंबात व्यावसायिक मतभेद निर्माण होणे…. अशी असंख्य कारणं आहेत ज्यामुळे मानसिक धक्का बसतो आणि नेमकं काय करावं हे सुचत नाही.

पण या पहिल्या धक्क्यातून थोडे सावरलो की आपण वास्तवाला सामोरे जातो. आयुष्य आपल्याला भानावर आणते. मनातल्या सर्व कल्पना आणि अपेक्षा ढासळताना पाहून आपण यापुढे सर्व काही मनासारखं होणार नाही हे समजून जातो.

पण अशी जीवघेणी वेदना आपल्याला शहाणं करून जाते. आयुष्य म्हणजे परीकथा नाही, यात बरेच संघर्ष आहेत ही जाणीव झाली की माणूस परिपक्व होत जातो. आंधळेपणाने इतरांवर विश्वास ठेवायचा नसतो हा लाखमोलाचा धडा मिळतो. आणि स्वतः बद्दल अधिक विचार करण्याची संधी मिळते. आपण कुठे चुकलो याचं चिंतन केलं की बऱ्याच गोष्टी समजतात.

पण यातून बाहेर पडेपर्यंत मात्र जीव अगदी कासावीस होतो. एखाद्या भोवऱ्यात अडकून गरगर फिरत राहिल्याची भावना येते. या नकारात्मक विचारांमुळे आपली एनर्जी लेव्हल कमी होते. नाकातोंडात पाणी जाऊन गुदमरून जावं तशीच मनाची अवस्था होते. अशावेळी प्रयत्नपूर्वक चांगले विचार मनात रुजवावे लागतात. नाहीतर भावनेच्या भरात वाहून जाऊन भलतेच निर्णय घेतले जाण्याची शक्यता असते.

मग मनाची समजूत कशी काढायची?

सर्वप्रथम मनाला सकारात्मक विचार द्यावेत. रोज सकाळी शांत बसून ध्यान करणे. आणि त्यातून भरकटलेल्या विचारांना जागेवर आणणे हा खूप सुंदर उपाय आहे.

यासाठी अशी काही प्रभावी वाक्यं आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की ज्यांच्यामुळे अस्थिर मन लगेच थाऱ्यावर यायला मदत होईल. यालाच कोणी सुविचार म्हणतात किंवा मंत्र, पॉझिटिव्ह अफर्मेशन्स, माईंडफुल कोट्स असंही म्हणतात !!!

आपण याला काहीही नाव दिलं तरी चालेल. पण महत्त्वाचे आहे त्यांचे चिंतन आणि मनन करणे.

आता पाहूया अशी कोणती जादुई वाक्यं आहेत ती !!!

१. शांतता ही मनाची सर्वात मोठी शक्ती आहे.

कोणत्याही परिस्थितीत आरडाओरडा न करता शांतपणे विचार करण्याची सवय लावावी. सर्व गोष्टी स्वतःवर ओढवून घेण्याची काहीच गरज नाही त्यामुळे मन स्थिर आणि शांत राहील.

२. काही गोष्टी माझ्या नियंत्रणात कधीच असणार नाहीत.

अशावेळी आपण या घटनांकडे पहाण्याचा दृष्टीकोन बदलू शकतो. त्यातच आपले हित आहे. आपल्या नियंत्रणाखाली नसलेल्या गोष्टींवर विचार करण्यात वेळ वाया घालवू नये.

३. आंतरिक शक्ती ही खरी ताकद आहे.

एक खोलवर श्वास घेऊन मनाशी निश्चय करा, की यापुढे प्रतिकूल परिस्थिती आणि माणसे यांना मी माझ्या भावनांचा ताबा घेऊ देणार नाही. या एका वाक्यात खूप मोठी ताकद आहे.

४. विचार बदला आयुष्य बदलेल.

जर तुम्ही आनंदी होऊ इच्छिता तर नेहमीपेक्षा वेगळा विचार करा. ताणतणावांना तुम्ही कसे सामोरे जाता, यावर आयुष्यात तुम्ही किती आनंदी रहाल हे ठरत असते.

५. सकारात्मक रहाणे म्हणजे वाईट विचारांवर मात करणे.

आयुष्यात वाईट घटना घडणारच. अशावेळी सकारात्मक विचार करणे म्हणजे वाईट विचार आणि भावना यांच्याकडे दुर्लक्ष करणे किंवा त्यांचा स्विकारच न करणे असा अर्थ होत नाही. तर नकारात्मक भावना पूर्णपणे स्विकारुन त्यातून बाहेर पडणे हा अर्थ आहे.

६. भविष्यकाळ चांगला हवा असेल तर जुनी विचारसरणी बदला.

एखादी मनाविरुद्ध घटना घडली, त्यावेळी तुम्ही त्रास करून घेतलाय, आदळआपट केलीत आणि तुम्हाला फक्त मनस्ताप झाला तर पुढच्या वेळी ते लक्षात ठेवा. असाच प्रसंग पुन्हा ओढवला तर पूर्वीप्रमाणेच विचार करु नका. नाहीतर भूतकाळात मिळाले तेच रिझल्ट मिळतील. नवीन पद्धतीने विचार करा म्हणजे येणारा काळ त्रासदायक असणार नाही.

७. आपण खूप भाग्यवान आहोत असाच विचार करा.

वाईट परिस्थितीत देखील सतत चांगलाच विचार करत रहा. हे अवघड आहे पण चालता बोलता, रात्रंदिवस एकच विचार करा की मी यातून बाहेर पडणारच!!! आणि खरोखरच तुम्ही कठीण प्रसंगात भाग्यवान ठराल.

८. चूक झाली तर रस्ता बदला, ध्येय नको !!!

एखादी चूक झाली तर हाती घेतलेले काम घाबरून किंवा निराश होऊन सोडून देऊ नका. काही दिवस थांबा. विचार करा आणि नवीन पद्धतीने काम सुरू करा. चांगल्या गोष्टी घडण्यासाठी काही काळ जावाच लागतो.

९. समस्या घटनेत नसून तुमच्या विचारात आहे.

एखादी घटना प्रत्यक्षात एवढी गंभीर नसते, पण आपण सतत तोचतोच विचार करून ही समस्या भयंकर कठीण करून ठेवतो. म्हणून सतत एकच वाईट विचार मनात घट्ट पकडून ठेवू नका. तो विचार सोडून द्या आणि मुक्त होऊन जगा.

१०. क्षमा करणे म्हणजे विसरून जाणे नाही.

एखादी मरणप्राय दु:ख देणारी घटना किंवा व्यक्ती यापासून मनाला मुक्त करायचे असेल तर स्वतः ला आणि इतरांना माफ करावेच लागते. त्याशिवाय पुढे जाता येत नाही. पण याचा अर्थ असा नाही की अशा व्यक्तींना सर्व काही विसरून पुन्हा जवळ करा. याचा अर्थ एवढाच की झालेल्या चुकीपासून योग्य तो धडा घेऊन पुढे जाणे. घडलेल्या घटनांचा कडवटपणा मनात न बाळगणे.

११. मीच आहे माझ्या दु:खांचा शिल्पकार.

कोणत्याही वाईट घटनेसाठी आपण इतरांना जबाबदार धरतो. त्यांच्यामुळे मला त्रास झाला असे म्हणतो. पण बारकाईने विचार केला तर लक्षात येईल की हे खरे नाही. त्यांच्या बोलण्याला आपण इतके महत्त्व दिले, त्यांचे शब्द मनाला लावून घेतले ही आपलीच चूक नाही का? त्यामुळे इतरांचे बोलणे किती मनावर घ्यायचे हा स्वतः चा चॉईस असतो.

१२. सतत फक्त समस्याच नाही तर चांगल्या गोष्टी देखील आठवून बघा.

मानवी मनाचं एक वैशिष्ट्य आहे की ते वाईट घटना सतत आठवत रहातं. आणि मग आपण तेच तेच बोलत बसतो. पण यामुळे नकारात्मक भावना अधिकाधिक घट्ट होतात. म्हणून आयुष्यात असलेली दु:खं उगाळण्यापेक्षा चांगलं काय आहे ते पहावं. आपल्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्ती, आपली स्वप्नं आणि आयुष्यात घडलेल्या चांगल्या घटना याविषयी बोलावे.

१३. बदल घडेल, थोडा धीर धरा.

कोणत्याही परिस्थितीत बदल घडवून आणण्यासाठी काही ठराविक वेळ द्यावाच लागतो. हा निसर्गाचा नियम आहे. म्हणून आपण संयम दाखवला की बऱ्याचशा गोष्टी सहजपणे मार्गी लागतात.

१४. यशाचे शिखर असो की अपयशाची खाई आपले वागणे बदलू नका.

याचा अर्थ असा की यशाने हुरळून जाऊ नये आणि अपयश आले तर निराश होऊ नये. आपले व्यक्तिमत्व समतोल असले पाहिजे. तुमची विश्वासार्हता हे खरे भूषण आहे.

१५. त्रासदायक घटनांनी मोडून पडू नका, त्यांचा वापर करून प्रगती करा.

प्रत्येक अडचणीच्या काळात त्यातून मिळालेल्या संधीचा लाभ घ्या. आयुष्यातील खडतर काळ तुम्हाला मजबूत बनवेल. तुम्ही अनुभवी झालात की जास्त चांगल्या प्रकारे प्रगती कराल.

ही छोटी वाक्ये आहेत पण त्यांचा अर्थ फार गहन आहे. ही वाक्यं एकत्र लिहून ठेवा आणि रोज सकाळी त्यावर एक नजर टाका. मेडिटेशन करत असताना यातील एक एक वाक्य निवडा आणि त्यावर चिंतन करा.

तुम्ही श्रद्धा ठेवून जर का या वाक्यांना आपलेसे केलेत तर तुमचे जीवन बदलून जाईल. मनात जे विचार घोळत असतात तेच पुढे येतात आणि त्याप्रमाणे कृती केली जाते. म्हणून ही वाक्यं मनात पुन्हा पुन्हा उच्चारत रहा. अडचणीच्या वेळी सहजपणे ती तुमच्या मदतीला धावून येतील. अलगदपणे तुमचा हात पकडून कठीण रस्ता पार करायला सोबत करतील.

या जादुई वाक्यांपैकी तुम्हाला सर्वात जास्त कोणते आवडले ते कमेंट्स करुन सांगा. कठीण प्रसंगात तुम्ही कोणता आधार घेता हे आम्हाला नक्की कळवा.

लेख उपयोगी वाटला तर लाईक व शेअर करा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

1 thought on “अस्थिर मनाला शांत करणारी ही आहेत १५ जादूई वाक्यं !!!”

  1. बदल घडेल थोडा धीर धरा. Like this one…but i lost more things in that period n i never get those practical knowledge again..

    Reply

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।