स्मार्ट माणसं कधीच करत नाहीत या आठ चुका

मित्रांनो, सध्याच्या काळात  स्मार्ट असणं खूप गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणाल, आहोतच की आम्ही स्मार्ट!!!

पण नीट समजून घ्या. फक्त फॅशनेबल कपडे घालणं, फाडफाड इंग्लिश बोलणं किंवा अगदी आधुनिक गॅजेट्स वापरणं एवढ्यापुरतंच हे मर्यादित नाहीय.

तर त्यापलीकडे जाऊन समाजात वावरताना तुम्ही इतर माणसांशी कसं वागता, रोजच्या आयुष्यात येणाऱ्या समस्या सोडवताना तुम्ही कशाप्रकारे विचार करता आणि अडचणीच्या काळात स्वतःला कसं सावरता हे फार महत्त्वाचं आहे.

स्मार्ट म्हणजे चतुर किंवा प्रसंगावधान बाळगणारी व्यक्ती. तुम्ही जर आजूबाजूच्या माणसांचा थोडा अभ्यास केलात तर लक्षात येईल की काही माणसं खूप बुद्धिमान असतात, पण व्यवहारात मात्र ते त्यामानाने यशस्वी होत नाहीत.

त्यांना मतभेद कसे सोडवावेत हे समजत नाही. पण काही माणसे मात्र याच्या अगदी विरुद्ध असतात.

भलेही ते खूपच हुशार किंवा अगदी स्कॉलर नसतील पण जीवनाच्या शाळेतले धडे ते नीट शिकतात आणि मग आयुष्यात जे परीक्षा पहाणारे प्रसंग येतात त्यातून सहजपणे पास होऊन पुढे जातात. ही खरी स्मार्ट माणसे, नाही का?

पण मग यांची वैशिष्ट्ये कोणती असतात बरं? अशा कोणत्या सवयी आहेत की ज्यामुळे यांचं रोजचं जगणं, रोजचा दिवस अगदी छान पार पडतो. काही छोटीमोठी कुरबुर झालीच तरी ते आपलं काम शांतपणे कसं करतात? 

हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर हा लेख शेवटपर्यंत वाचा आणि नीट समजून घ्या.

या लेखातून आम्ही वाचकांसाठी काही खास टिप्स सांगणार आहोत. यांचा योग्य ठिकाणी आणि योग्य त्या वेळी वापर केलात तर तुम्ही सुद्धा एक स्मार्ट व्यक्ती म्हणून ओळखले जाल.

स्मार्ट कोणाला म्हणायचे?

ज्या व्यक्तीला काय बोलायचे, कधी बोलायचे हे समजते तो चतुर असतोच पण ज्याला कधी मौन धारण करायचे, कोणत्या प्रसंगात गप्प राहून भांडण होण्याची वेळ येऊच द्यायची नाही हे अचूक कळते तो खरा स्मार्ट !!!

यावरुन तुमच्या लक्षात आले असेलच की, काय करायचं हे तर सर्वांनाच समजते, पण काय नाही करायचे हे ज्याला पक्के ठाऊक असते, तो बाजी खरी मारतो!!

आता आम्ही तुम्हाला अशा आठ गोष्टी सांगणार आहोत ज्या स्मार्ट माणसे कधीच करत नाहीत.

१. स्वतःचे मोठेपण जगाला सांगत बसणे.

ज्या लोकांना आपलेच मोठेपण सर्वांना सांगायची सवय असते, त्यांना इतरांपेक्षा आपण किती श्रेष्ठ आहोत हे दाखवून द्यायचे असते.

विशेषतः आपल्या श्रीमंतीचे गोडवे जी माणसे स्वतःच्याच तोंडाने गात असतात ती आपण कोणीतरी विशेष आहोत असे समजतात. वास्तविक पाहता असे वागणे चारचौघात चांगले दिसत नाही.

अशा सवयीचा काही उपयोगही नसतो आणि त्यातून काहीच साध्य होत नाही.

याउलट स्मार्ट माणसे सतत काम करत रहातात. त्यांनी उभे केलेले उत्कृष्ट काम हीच त्यांची खरी ओळख असते.

जर का तुमची कृती आणि विचार यातून तुम्ही कसे आहात हे सर्वांना समजत असेल तर उगाचच तोंडाची वाफ दवडण्यात काय अर्थ आहे? 

२. कसलीच जबाबदारी न घेणे.

काही माणसांना सर्व चुकीच्या गोष्टींचे खापर इतरांवर फोडण्याची सवय असते. पण स्मार्ट माणसे मात्र असे दोषारोप कधीच करत नाहीत.

त्यांचा फोकस असतो आलेल्या अडचणीतून कसे बाहेर पडता येईल हे पहाण्याकडे. त्यामुळे आपले काय चुकले हे त्यांना शिकता येते.

प्रत्येक वाईट अनुभव हा त्यांच्यासाठी एक धडाच असतो. त्यातून योग्य ती शिकवण घेऊन ही माणसे पुढे जातात.

चूक कोणाच्याही हातून होऊ शकते. पण त्यानंतर  तुम्ही त्यातून काय शिकलात हे सर्वात महत्वाचे असते. जेव्हा एखादा चुकीचा निर्णय घेतला जातो, तेव्हा स्मार्ट माणसे त्या निर्णयाची जबाबदारी स्विकारतात.

आणि त्यांच्या याच गुणामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व परिपक्व होत जाते. कारण जबाबदारी घेणे म्हणजे अधिकाधिक अनुभव घेणे.

जी व्यक्ती कोणतीच जबाबदारी घेत नाही तिला अनुभव तरी कसे येतील? आणि कोणतेही अनुभव नसलेली व्यक्ती स्मार्ट कशी होणार? 

३. सर्वांसमोर एखाद्याच्या कमतरता दाखवून देणे.

या जगात शंभर टक्के परीपूर्ण अशी कोणतीही व्यक्ती नाही. प्रत्येकात काही गुणदोष आहेत.

स्मार्ट माणसांना ही गोष्ट बरोबर माहीत असते. त्यामुळे प्रत्येक माणसात कोणते वैशिष्ट्य आहे, कोणती जमेची बाजू आहे याचा शोध ते घेत असतात.

टीममध्ये काम करत असताना प्रत्येक माणूस आपापले योगदान देऊन अंतिम ध्येय किंवा टार्गेट गाठण्यासाठी मदत करत असतो. अशावेळी स्मार्ट माणसाला कोणाकडून कोणते काम करुन घ्यावे हे चांगले समजते.

आणि या कामात एखाद्याची चूक होत असेल, काही कमतरता रहात असेल तर स्मार्ट माणसे चारचौघात त्याला कधीच ओरडत नाहीत.

त्याला एकट्याला वेगळे भेटून कामात काय सुधारणा अपेक्षित आहे हे सांगतात. यामुळे त्या व्यक्तीचा अपमान होत नाही.

शिवाय आपल्याला वेगळे बोलावून, समजावून सांगितले म्हणून त्यांना जबाबदारीची जाणीव जास्त चांगल्या प्रकारे होण्याची शक्यता असते.

४. इतरांना रंगरुपावरुन नावे ठेवणे.

कोणत्याही माणसाचे दिसणे, त्याचा रंग किंवा रुप यावरून कुचेष्टा करणे हे काही शहाणपणाचे लक्षण नाही.

खरंतर प्रत्येक व्यक्ती म्हणजे निसर्गाचा एक स्वतंत्र आविष्कार आहे. जन्माला येतानाच तो आपली गुणवैशिष्ट्ये घेऊन आलेला आहे.

स्मार्ट माणसांना ही गोष्ट माहीत असते. त्यामुळे रंगरूपापेक्षा एखाद्या व्यक्तीच्या गुणांना ही माणसे जास्त महत्त्व देतात.

विविधतेमध्ये एकता कशी निर्माण करता येईल हाच यांचा दृष्टिकोन असतो. आणि अशा विभिन्न प्रांतातील, देशातील माणसांशी सलोख्याचे संबंध ठेवून स्मार्ट माणसे नातेसंबंध जोपासत असतात.

सर्वांशी समान वागणूक असल्याने कामाच्या ठिकाणी स्मार्ट माणसांना सर्वांचे सहकार्य मिळते.

५. इतरांचे लक्ष वेधून घेणे.

एखाद्याने आपल्याला महत्त्व द्यावे म्हणून त्याचे लक्ष वेधून घेण्यासाठी धडपडणे याचा अर्थ काय होतो?

याचाच अर्थ असा की तुमचा आत्मविश्वास कमी आहे. जेव्हा तुम्हाला असुरक्षित वाटते तेव्हाच तुम्ही इतरांसमोर पुढे पुढे करता किंवा त्यांचे लक्ष वेधले जाईल असे बोलता.

स्मार्ट माणसे असे कधीच करत नाहीत. त्यांचा स्वतःच्या वागण्या बोलण्यावर पूर्ण विश्वास असतो.

इतरांची बळजबरीने अनुमती मिळवण्यात त्यांना रस नसतो. जर त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यात इतरांनी स्वारस्य दाखवले नाही तर ते शांतपणे बाजूला होतात.

पण आपले मत कोणाच्या गळी उतरवण्याचा ते कधीच प्रयत्न करत नाहीत. त्याऐवजी ज्यांना आपली कदर आहे त्यांच्याशी संवाद साधणे त्यांना आवडते. 

६. आपल्या क्षमता वाढवून सांगणे.

स्मार्ट माणसांना आपले प्लस पॉइंट नेमके ठाऊक असतात. आपली कौशल्यं आणि क्षमता याबाबत त्यांना ठाम विश्वास असतो.

त्याचप्रमाणे आपल्या कमतरता कोणत्या हे सुद्धा त्यांना माहीत असते. त्यात सुधारणा कशी करता येईल याचा ते  सतत विचार करतात.

त्यामुळे खोटे बोलण्याची त्यांना काहीच गरज नसते.

जी माणसे एखादी गोष्ट येत नसताना सुद्धा बिनदिक्कत खोटे बोलतात त्यांना समस्या पूर्ण जाणून घेण्यात इंटरेस्ट नसतो.

त्यांना फक्त वरवर विचार करण्याची सवय असते. किंवा कमी श्रम करून लवकर प्रगती करायची असते.

याउलट स्मार्ट माणसे वस्तुस्थितीची जाणीव ठेवून वागतात. आपल्या शब्दांची किंमत ठेवणे त्यांना आवडते त्यामुळे उगाच नसत्या बढाया मारत नाहीत.

७. धरसोड वृत्ती असणे.

जर आयुष्यात तुम्हाला खरंच काही चांगलं काम करायचं असेल तर परीश्रम करावेच लागतात.

याचबरोबर संयम ठेवणे सुद्धा तितकेच गरजेचे आहे. काहीतरी भव्यदिव्य करायचे असेल तर दोन चार दिवसांत करता येईल का?

स्मार्ट माणसे आपण पाहिलेले स्वप्न जीवनभर जपतात आणि ते प्रत्यक्षात आणण्यासाठी वर्षानुवर्षे मेहनत करतात. इन्फोसिस, टाटा गृप यांनी स्वतःचे साम्राज्य उभारले, पण त्यासाठी त्यांनी आपल्या आयुष्यातील किती वर्षे खर्ची घातली हे लक्षात घेतले पाहिजे.

अनंत अडचणींवर मात करून आज ते या स्थानावर पोहोचले आहेत. स्मार्ट माणसांना माहीत असते की जेव्हा अवघड परिस्थिती निर्माण होते, तेव्हा आपल्या क्षमता अजून वाढविणे, जास्त परिश्रम करणे, नवीन कल्पना शोधून काढणे हाच उपाय असतो.

जर का त्यावेळी निराश होऊन काम करणेच थांबवले तर काहीच होऊ शकत नाही. मग फक्त तुम्ही चाचपडत रहाल.

एखादी गोष्ट सुरु करायची आणि काही अडचण आली की ती सोडून द्यायची. पुन्हा नवीन गोष्टीच्या मागे लागायचं याला काही अर्थ नाही.

स्मार्ट माणसे ध्येय ठरवतात आणि त्या दिशेने काम करत रहातात. वाटेत अडचण आली तर ते आपला मार्ग बदलून, नवीन रस्ता गाठतात पण काही करून ध्येयापर्यंत पोहोचतात.

रस्ता सापडत नाही म्हणून ध्येयच सोडून देणे याला स्मार्टनेस म्हणत नाहीत.

८. वादावादी करणे.

स्मार्ट माणसांना माहीत असते की प्रत्येकाला स्वतःचे मत असते. आणि इतरांशी वादावादी करुन काही साध्य होत नाही.

मग तुम्ही म्हणाल की प्रत्येकाशी सहमत व्हावे का?

तर अजिबात नाही. फक्त आपले म्हणणे पटवून देण्यासाठी किती शक्ती खर्च करायची, किती जुळवून घ्यायचे हे तुम्हाला समजले पाहिजे.

जर एखाद्या विषयाचा काथ्याकूट करत बसलात तर वेळ आणि एनर्जी दोन्ही वाया जातील. याशिवाय संबंधांमध्ये कटुता येईल. वादावादी करून तुम्ही कदाचित भांडणात जिंकाल, पण आयुष्यात नाही!!! 

त्यामुळे अतिरेक न करता शांतपणे इतरांना हे सांगता आले पाहिजे की तुमच्या मतावर ठाम रहाण्याचा तुम्हाला अधिकार आहे पण मी यापुढे एकाच गोष्टीवर माझी शक्ती खर्च करणार नाही.

यामुळे पुढचे भांडण टळते. रागाच्या भरात एकमेकांना अपमानास्पद बोलले जाऊ शकते ते सुद्धा टाळता येते. स्मार्ट माणसे आत्मविश्वासपूर्ण असतात. ती इतरांचे म्हणणे ऐकून घेतात आणि त्यांच्याप्रती संवेदनशील असतात. पण भावनेच्या भरात ती वाहवत जात नाहीत. आपल्या मुद्द्यावर आक्रमक न होता आग्रही व ठाम रहाणे त्यांना जमते. यामुळेच स्मार्ट माणसे प्रभावी ठरतात.

तर मग मित्रांनो यापुढे या आठ गोष्टी लक्षात ठेवा. या नकारात्मक गोष्टींचा तुम्ही त्याग केलात की तुम्ही सुद्धा एक स्मार्ट व्यक्ती म्हणून ओळखले जाल. 

यापैकी कोणती गोष्ट तुम्हाला जास्त आवडली किंवा पटली हे कमेंट्स करुन आम्हाला सांगा.

हा लेख तुम्हाला आवडला तर लाईक व शेअर करा. स्मार्ट वर्क करा आणि चतुराईने आपले प्रश्न सोडवा.

यासारखेच इतर माहितीपूर्ण लेख वाचण्यासाठी मनाचेTalks ला सबस्क्राईब करा. 

Manachetalks

रहस्य जगण्याचे : समाधानी आयुष्याचे पुस्तक अमेझॉनवर खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे या पुस्तकाची अनुक्रमणिका खाली दिलेली आहे.

Manachetalks

 

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।