अन्न खाणार्याच्या विशिष्ट रुचिनुसार विशिष्ट पद्धतीने तयार केलेले असावे.
उदाः जे खाण्याचे शौकिन असतात त्यांना कोणत्या ठिकाणी कोणता जिन्नस चविष्ट मिळतो, अगदी तंतोतंत लक्षात असते. अशा व्यक्तींना काही आजार झाल्यास, त्यांच्या आहाराची तजवीज करणे, म्हणजे ऐऱ्यागैऱ्याचे काम नव्हे. तिथे पथ्यकर पदार्थसुद्धा विशिष्ट मसाले वापरुन, काही अन्नसंस्कार करुन किंवा संयोग करुन, युक्त्या लढवून बनवणारा, कुशल स्वयंपाकिच असावा. विशेषतः लहान मुलांच्या बाबतीत, प्रत्येक स्त्रीला असेच मास्टरशेफ बनावे लागते. कारण “खाणार्याची खोड, बनवणार्यालाच माहीत असते ना”! नाहितर बर्याच लहानग्यांना न खाण्यासाठी काहितरी क्षुल्लक निमित्तच पुरेसे असते, हे मातांना नव्याने सांगायला नकोच.
काहिंना ठराविक चव आवडते तर काहिंना ठराविक पदार्थ आवडतो. मला विशेष भूक नाही म्हणणारे सुद्धा आवडीचा पदार्थ दिसला कि अन्नावर तुटून पडतात! “काहिंना मांसाहाराच्या दिवशी चार घास जास्त जातात”. काहिंना आवडत्या पदार्थांना दिलेल्या फोडणीचा वास आला तरी लाळ सुटु लागते. मांजर किंवा कुत्रा यांच्या गंधज्ञानालाही लाजवेल असे काहिंचे ऊपजत गंधज्ञान असते. अशा व्यक्तींना चुकवून काहि खाणे म्हणजे अगदि असंभव. कोणीतरी येथे पेरु खात आहे असे म्हणत मधल्या सुट्टित पेरु खाणार्यापर्यंत पोचणारी खारुताई सुद्धा मी पाहिली आहे.
अन्न स्वच्छ असावे त्यावर माश्या इ.बसणार नाहित याची काळजी घ्यावी. मेसमध्ये किंवा हाॅटेलमध्ये बर्याचदा स्वच्छतेचा विषय टांगणीला लागलेला असतो. जेवण वाढताना काका किंवा मावशी स्वच्छ ताट मळाने माखलेल्या नॅपकिनने किंवा कंबरेला गुंडाळलेल्या टाॅवेलने पुसताना आपण पाहिले असेल किंवा पाणी वाढताना बोटे तांब्यात बुडवून देणारे महाभागही आपण पाहिले असतील!
अन्न अधिक गरमसुद्धा नसावे त्याने जीभ पोळण्याची शक्यता असते. हा अनुभव बर्याच जणांनी गरमागरम चहा पिताना घेतला असेलच! अन्न गरम असले कि उत्तम पचते. भात ताजा नि गरम असतानाच खाणार अन्यथा खाणारच नाहीत असे सुद्धा व्यक्ती मी पाहिले आहेत. ताजे नि गरम अन्न व आरोग्यास हितकर अन्न केव्हाहि चांगलेच.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.