पावसाळ्यात कशी राखाल झाडांची निगा? जाणून घेण्यासाठी लेख संपूर्ण वाचा.  

पावसाळ्यात अशी घ्या झाडांची काळजी

पावसाळ्यात आपल्या बागेतील किंवा बाल्कनीतील झाडांची काळजी घेण्यासाठी उपयोगी पडणाऱ्या ६ टिप्स .

झाडांवर पडणारी कीड, सतत राहणारा ओलावा आणि विविध रोगांचा होऊ शकणारा संसर्ग ह्या पावसाळ्यात झाडांची हानी होण्यासाठी कारणीभूत असणाऱ्या प्रमुख समस्या आहेत.

आला पावसाळा, झाडांचे आरोग्य सांभाळा. 

तुम्ही म्हणाल की पावसाळा हा तर हिरवाईचा,  निसर्गाचा आणि झाडांच्या वाढीचा ऋतू आहे.  असे असताना पावसाळ्यात तर झाडे छान जोमाने वाढली पाहिजेत. मग त्यांचे आरोग्य सांभाळण्याची काय गरज?  परंतु असे नाही.

पावसाळ्यात आपल्या बागेतील किंवा  बाल्कनी  आणि टेरेस मधील झाडांची विशेष काळजी घेणे आवश्यक  असते.

याचे प्रमुख कारण म्हणजे पावसाळ्यात हवेत असणारा दमटपणा आणि झाडांवर पडू शकणारी विविध प्रकारची कीड हे आहे.  त्याचप्रमाणे झाडांना निरनिराळ्या प्रकारच्या रोगांचा संसर्ग होण्याची सुद्धा पावसाळ्यामध्ये शक्यता असते.

या सगळ्यापासून आपल्या झाडांची काळजी घेण्यासाठी  उपयोगी पडणाऱ्या  सहा महत्त्वाच्या टिप्स आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

यामध्ये झाडांना नेमके किती प्रमाणात पाणी घालावे,  कुंड्यांमधील माती नेमकी कशी असावी,  झाडांवर पडणारी कीड आणि वेगवेगळे रोग यांपासून त्यांचे संरक्षण कसे करावे  अशा महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश आहे.

१.  आपण झाडांना नेमके किती पाणी घालतोय यावर लक्ष ठेवा. 

झाडांची चांगली वाढ होण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते हे तर आपल्याला सर्वांनाच माहिती आहे परंतु  झाडांना पाणी घालायचे म्हणून भरमसाठ पाणी घालून चालत नाही. 

त्यामुळे झाडांचे नुकसानच होऊ शकते. पावसाळ्यात कुंड्यांमधील माती ओली राहते अशावेळी पुन्हा पुन्हा खूप पाणी घातल्यास त्या मातीला बुरशी येण्याची शक्यता असते.  त्यामुळे पावसाळ्यात झाडांना आवश्यक तितकेच पाणी घालावे.

प्रत्येक झाडाची पाण्याची  गरज वेगवेगळ्या प्रकारची असते.  उदाहरणार्थ तुळशीच्या रोपट्याला दररोज पाणी  घालणे आवश्यक आहे परंतु अगदी थोड्या प्रमाणात. तसेच गुलाबाच्या रोपांना देखील खूप जास्त पाणी घालणे योग्य नाही.  परंतु आपल्या बागेत असणारी मोठी फळझाडे किंवा फुलझाडे यांना मात्र भरपूर पाण्याची आवश्यकता असते.

पावसाळ्यात  कुंडीतील अथवा झाडांच्या मुळाशी असणारी माती  जास्त वेळ ओली  असण्याची शक्यता असते. 

त्यामुळे माती कितपत ओलसर आहे हे पाहून  झाडांना किती पाणी घालायचे हे ठरवावे. 

झाडांच्या मुळाशी असणारी माती खूपच ओली असेल तर पाणी घातले नाही तरीसुद्धा चालू शकते. 

त्याचप्रमाणे झाडांना पाणी घालताना झारीचा  (स्प्रिंकलर) उपयोग करावा जेणेकरून खूप जास्त पाणी एका ठिकाणी न पडता संपूर्ण झाडावर पाणी शिंपडले जाते.

२.   कुंड्यांमधील अथवा झाडांच्या मुळाशी असणारी माती मोकळी करा.

वारंवार नुसते पाणी घालत राहिल्यामुळे कुंड्यांमधली माती घट्ट होऊ लागते.  त्यामुळे झाडांच्या मुळांपाशी असणारी माती कोरडी होऊ शकत नाही तसेच झाडांच्या मुळांना हवेचा योग्य प्रमाणात संपर्क होऊ शकत नाही.  असे झाल्यास झाडे मलूल  होतात, त्यांची वाढ योग्य प्रमाणात होत नाही किंवा  काही वेळा झाडे कुजूही शकतात. 

त्यामुळे खुरप्याच्या सहाय्याने कुंड्यांमधील माती नेहमी मोकळी करावी.  तसेच आवश्यक प्रमाणातच पाणी घालावे असे करण्यामुळे झाडांच्या मुळांना व्यवस्थित हवा लागते.

त्यांना श्वासोच्छ्वास घेता येतो.  तसेच तेथील अडकलेले बाष्प बाहेर पडू शकते.  त्यामुळे कुंडीतील मातीला बुरशी येण्याची भीती उरत नाही.

३.   निरनिराळी कीड आणि बुरशी याच्या संसर्गापासून झाडांचे रक्षण करा.

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये झाडाला बुरशी लागणे किंवा झाडाच्या मुळांना कीड लागणे याचे प्रमाण जास्त असते. असे होऊ नये म्हणून विशेष काळजी घ्यावी लागते. 

निरनिराळी कीड आणि बुरशी याच्या संसर्गापासून  झाडांचे रक्षण करण्यासाठी पावसाळा सुरू होण्याआधीच बागेतील झाडे अथवा कुंड्यांमधील झाडे यांची योग्य स्वच्छता करा. 

आसपास पडलेली वाळलेली पाने,  इतर केरकचरा उचलून टाका. तसेच पावसाळ्यापूर्वी झाडांची योग्य प्रमाणात छाटणी करा.  त्यामुळे झाडांना होऊ शकणारा संसर्ग तर  आटोक्यात येईलच  शिवाय झाडांची वाढ नव्या जोमाने होऊ लागेल.

पावसाळ्यात झाडांना प्रामुख्याने धोका असतो तो पावडर बुरशीचा (powdery mildew).  यामध्ये झाडाच्या पानांवर बारीक बारीक पांढरी बुरशी जमा होऊ लागते आणि हळूहळू ते पान वाळून गळून पडते. 

अशी सगळीच पाने संसर्गाने बाधित होऊन झाड खराब होते.  असे होऊ नये म्हणून जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा झाड उन्हात ठेवावे.  पावसाळ्यात अजिबातच सूर्यप्रकाश मिळाला नाही तर झाडाच्या पानांना थोडेसे कडुनिंबाचे तेल लावावे. 

अशा तेलामुळे झाडाचा बुरशी पासून बचाव होतो.  त्याचप्रमाणे बुरशीचा संसर्ग झालेल्या झाडाची छाटणी करणे आवश्यक असते जेणेकरून इतर चांगल्या झाडाला संसर्ग होणार नाही.

४.  योग्य कीटकनाशके आणि खते यांचा वापर करा. 

पावसाळ्याच्या दिवसात झाडांचे बुरशी आणि इतर संसर्गापासून रक्षण करण्यासाठी चांगल्या प्रतीच्या कीटकनाशकांचा वापर करा.  हायड्रोजन पेरॉक्साईड हे अतिशय उपयुक्त असणारे कीटकनाशक आहे ज्यामुळे झाडांवर पडणाऱ्या बुरशीचा समूळ नायनाट करता येतो.  अशा कीटकनाशकांची दर पंधरा दिवसातून एकदा झाडांवर फवारणी करावी.  त्याचप्रमाणे चांगल्या प्रतीची खते झाडांच्या मुळांशी  घालावी. खतांमुळे झाडांची वाढ जोमाने होऊ शकते.

५.  कुंड्यांमध्ये अथवा कुंड्यांखाली पाणी साठून राहणार नाही याची काळजी घ्या. 

झाडांच्या मुळांना बुरशी लागणे किंवा झाडांची मुळे कुजणे ही  झाडांच्या आरोग्याबाबतची पावसाळ्यातील  प्रमुख समस्या आहे.  त्यामुळे झाडांच्या मुळाशी असणारे जास्तीचे पाणी वाहून जाईल याची काळजी घेतली पाहिजे. 

त्याचप्रमाणे कुंड्याखाली असणाऱ्या प्लास्टिकच्या ताटल्यांमध्ये पाणी साठून राहणार नाही  याची सुद्धा काळजी घेतली पाहिजे.  जर असे पाणी  साठून राहिले  तर तेथे बुरशीचे प्रमाण वाढते आणि त्याचा संसर्ग झाडांना, त्यांच्या  मुळांना होतो.

तसेच कुंड्यांमधील माती वेळोवेळी तपासत रहा जर ती माती प्रमाणापेक्षा जास्त ओलसर किंवा चिकट असेल तर माती बदलून झाडे पुन्हा लावणे जास्त योग्य ठरेल. 

सतत ओल्या मातीत राहिल्यामुळे झाडांची मुळे कुजण्याची शक्यता असते.

६.  झाडांच्या कुंड्या माती आणि खताने संपूर्णपणे भरा. 

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये बाल्कनीत अथवा टेरेस मध्ये ठेवलेल्या झाडांवर थेट पाऊस पडून कुंड्यांमध्ये पाणी साठून राहण्याची शक्यता असते. 

असे होऊ नये म्हणून झाडांच्या कुंड्या  माती आणि खताने संपूर्णपणे भरा.  तसेच ती माती खुरप्याने मोकळी करून ठेवा. 

जेणेकरून कुंड्यांमध्ये जास्त पाणी पडले तरी ते योग्य प्रकारे वाहून जाईल.  तिथेच साठून राहणार नाही  आणि झाडांना बुरशी येण्याचा अथवा इतर कुठला संसर्ग होण्याचा धोका  टळेल. 

झाडांच्या कुंड्यांमध्ये पाणी साठून राहिल्यास  मुळांपर्यंत हवा आणि पोषक द्रव्य पोहोचत नाहीत ज्यामुळे झाडांचे आरोग्य धोक्यात येते. 

ओलसरपणामुळे बुरशी येण्याचे प्रमाण वाढते.  त्यामुळे पावसाळ्यात झाडे  शक्य तितकी कोरडी ठेवण्याचा प्रयत्न करणे आवश्यक असते.

तर ह्या आहेत अगदी सोप्या सहा टिप्स ज्यांचा वापर करून आपण पावसाळ्यात आपली झाडे सांभाळू शकतो.  त्यांची वाढ जोमाने कशी होईल ते पाहू शकतो तसेच आपल्या झाडांची योग्य त्या पद्धतीने निगा राखू शकतो.

मित्र मैत्रिणींनो आता पावसाळा आला आहे.  तर हा लेख जास्तीत जास्त शेअर करून यातील टिप्स आपल्या जास्तीत जास्त मित्र-मैत्रिणींना वाचायला मिळतील यासाठी आपण सगळे प्रयत्न करूया.  तुमच्याकडे याव्यतिरिक्त काही टिप्स असतील तर त्या कमेंट्स मध्ये नक्की लिहा.  तसेच हा लेख तुम्हाला कसा वाटला हेही आम्हाला नक्की सांगा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।