बोम्मीरेड्डी नागी रेड्डी आणि अलुरी चक्रपाणी ही दोन नावं आम्हाला माहिती असलीच पाहिजे असे काही नाही….. ती ओळखीची आहेत का? म्हणजे दक्षिण भारत वजा जाता… तर तसेही नाही… आणि आता तर अशा कालखंडातुन आम्ही जात आहोत की शेजारी नेमके कोण आहेत याचाही आम्हाला पत्ता नसतो… अर्थात ग्रामीण भागात वेगळे असू शकते साहित्याच्या प्रांतात आम्हाला लेखकांचा परीचय होतो तो त्यांच्या जादूई शब्दभांडारामुळे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून आम्हाला उर्जा देण्याचे काम या शब्दप्रभूनी केलंय. आमच्या पर्यंत ते किंवा त्यांच्या पर्यंत आम्ही सदेह पोहचू शकत नसण्याचा एक काळ होता. त्याकाळात ते आम्हाला भेटत ते पुस्तक किंवा मासिकांतुन…. वरची दोन नावं कदाचित् आम्ही मासिकातुन वाचली असतील याचीही शाश्वती नाही…… थोडक्यात काय तर ही नावे आम्हाला फारशी परिचीत आहेत यावर एकमत होऊ शकते………
पाताळ भैरवी, पैगाम, राम और श्याम, घर घरकी कहानी, ज्युली, यही है जिंदगी, स्वर्ग नरक, श्रीमान श्रीमती……वगैरे चित्रपट मात्र आमच्या चांगल्याच लक्षात आहेत…. या सर्व चित्रपटाच्या नामावलीत निर्माता बी.नागी रेड्डी हे नाव तुम्हाला हमखास दिसेल…. तर वरचे बुसीपल्ली नागी रेड्डी म्हणजेच बी. नागी रेड्डी….. चित्रपट व्यवसायातील मोठी आसामी. १९८६ मध्ये यांना दादासाहेब फाळके या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले….
दुसरे अलुरी चक्रपाणी किंवा अलुरी व्यंकट सुब्बाराव म्हणजे तेलुगू चित्रपटसृष्टीतील बहुमूखी व्यक्तीमत्व… उत्कृष्ट कथा-पटकथाकार, दिग्दर्शक व निर्माते…… हे दोघेही तेलुगू चित्रपटसृष्टीतील मातब्बर आसामी. आशिया खंडातील सर्वात मोठा चित्रपट स्टुडिओ “विजया वाहिनी स्टुडिओज’’चे दोघेही प्रमूख भागीदार व संस्थापक…. मात्र चित्रपट व्यवसायात येण्यापूर्वी किती तरी आगोदर एक दिवस त्यांच्या डोक्यात एका छानशा कल्पनेने जन्म घेतला. दोघेही कल्पक आणि प्रतिभावान… त्यांच्या या छानशा कल्पनेच्या बाळाचं नाव होतं- “अंबुली मामा” जुलै १९४७ रोजी या मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला. मुलांसाठी प्रकाशीत होणाऱ्या या मासिकाचे संपादक होते अलुरी चक्रपाणीचे जिवलग मित्र कोंडावतीगनती कुटुंब राव… ज्यांनी २८ वर्षे या मासिकाची धूरा समर्थपणे सांभाळली… या मासिकाने अल्पावधित अफाट लोकप्रियता मिळवली…. यातील गोष्टीं आणि सुंदर चित्रांनी लहानच नाही तर सर्वच वयोगटातील वाचकांनी डोक्यावर घेतले…. यातील “राजा विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. तलवार उपसून पुन्हा तो झाडावर चढला अन फांदीवर लटकणाऱ्या प्रेताला खांद्यावर घेऊन मौनपणे मांत्रिकाच्या कुटीचा रस्ता चालू लागला. त्यासरशी प्रेतामधला वेताळ पुन्हा एकदा सजग होऊन बोलता झाला.’’…… हे वाक्य तर परवलीचे झाले होते….. होय मी हे “चांदोबा” या मासिका विषयी बोलतोय. आकाशातील खऱ्या चांदोबा विषयी जितके लिहले वाचले गेले नसेल तितके या चांदोबा विषयी नक्की लिहले वाचले गेले असेल.
तेलुगू व तमीळ अंबुली मामाने मग १९४९ मध्ये कन्नड, १९५० मध्ये हिंदी व मराठी आणि १९५२ मध्ये मल्याळम (अंबिली अमावन) भाषेत प्रवेश केला. पूढे १९५४ मध्ये गुजराथी, १९५५ मध्ये इंग्रजी, १९५६ मध्ये उडीया व सिंधी, १९७२ मध्ये बंगाली, १९७५ मध्ये पंजाबी, १९७६ मध्ये असामी १९७८ मध्ये सिंहली, १९८४ मध्ये संस्कृत आणि २००४ मध्ये संथाळी भाषेत प्रवेश केला… इ.स. १९८० मध्ये चांदोबाच्या सर्व भाषा मिळून सुमारे ९ लाख प्रती विकल्या गेल्या. इ.स. १९८० मध्ये नागीरेड्डी यांचा थोरला मुलगा प्रसादचे निधन झाल्यावर नागीरेड्डींना नैराश्याचा झटका आला. . नोव्हेंबर, इ.स. १९९९ मध्ये विश्वम यांनी पुन्हा प्रकाशन सुरु केले आणि तेव्हापासून सर्व भाषांतील चांदोबाची प्रतिवर्षी २ लाख प्रतींची विक्री होते. एखाद्या मासिकाने इतक्या भारतीय भाषेत वाचकवर्ग निर्माण करण्याची ताकद किमान भारतात तरी अन्यत्र दिसत नाही. यातील पंजाबी, सिंधी आणि सिंहली आवृत्त्या मात्र कमी कालावधी नंतर बंद झाल्या. ऑक्टोबर १९५७ ते जून १९७० या काळात इंग्रजी आवृत्तीही बंद होती. तर १९९८ मध्ये मजूर विषयक वादामुळे यावर किमान वर्षभर बंदी होती त्यावेळी चांदोबाची सहा लाख प्रतींची विक्री होती पण नंतर परत प्रकाशनास सुरूवात झाली. १२ भारतीय भाषा आणि इंग्रजी अशा एकूण १३ भाषेत प्रकाशित होणारे हे मासिक नुकतेच बंद झाल्याचे फेसबूकवर वाचण्यात आले…. आणि बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या.
या मसिकाचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे यातील वास्तववादी शैलीतील अप्रतिम रंगीत चित्रे… एम.टी.व्ही. आचार्य, टी. वीरा राघवन, वड्डादी पप्यैया, केशवराव हे पहिल्या कालखंडातले चित्रकार होते ज्यांनी कथेत जिवंतपणा आणला. नंतर एम.गोखले, के. सिवसकंरन उर्फ शंकर हे नावमवंत चित्रकार १९५१ च्या काळात दाखल झाले व शेवट पर्यंत काम करत राहिले…. या सर्व कलावंतानी जवळपास ६ दशकं आम्हाला वाचनास प्रवृत्त केलं. नतंर मग या समूहात शक्ती दास, एम.के. बाशा, गांधी, पी.महेश या तिसऱ्या नामवंत चित्रकारांनी चांदोबा सजविले. चांदोबांचे मुखपृष्ठ चार रंगी तर आतील पाने एक किंवा दोन रंगी असत. विशेष म्हणजे यातील प्रत्येक पानावर चित्र हमखास असे. अर्थात चांदोबा हे कॉमिक मासिक मात्र कधीच नव्हते.. मी शाळेत असतानां चांदोबाच्या पहिल्या पानावर संपादक: चक्रपाणी हे नाव वाचल्याचे स्मरणात आहे.
चांदोबाने बदलत्या काळा बरोबर स्वत:ला जुळवत नेटच्या मोहजालातही स्वत:ला सामील केले व आपले स्थान कायम ठेवले. चांदोबात छापून येणाऱ्या पौराणिक-कथा, धार्मिक-कथा, संस्कार-कथा, परी कथा, निती कथा, इतिहास कथा, काल्पनीक कथा वगैरेवर भलेही चर्चा-वाद-मतभेद होऊ शकतात. मात्र या मासिकाने सलग तीन पिढ्या विशेषत: मुलांनां वाचनाची गोडी लावली हे एक सत्य आहे. शिवाय प्रकाशन व्यवसायात असणाऱ्या लेखक, मुद्रक व चित्रकारानां आर्थिक बळ आणि प्रसिद्धी मिळवून दिली हाही एक महत्वाचा विशेष आहे…… १९१३ पासून आज पर्यंतचे प्रकाशित झालेले चांदोबाचे सर्व अंक ऑन लाईन उपलब्ध करून देण्यात आले होते. जुलै २०१६ मध्ये चांदोबाची वेबसाईट ड्रॉप करण्यात आली…. आणि आता तर चांदोबा बंद झाल्याचे समजतेय….. बातमी नक्की खरी आहे का? माहित नाही… पण आज साठ-सत्तरीत असणारी पिढी या बातमीने नक्कीच हळवी झाली असेल यात शंकाच नाही………..
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.