भारतात अशी अनेक ठिकाणं आहेत की त्या ठिकाणी असलेल्या अनेक गोष्टींचं आकलन आजही होत नाही. आजूबाजूची ठिकाणं अगदी सर्वसाधारण असताना त्या ठिकाणी मात्र आपल्याला वेगळी स्थिती बघायला मिळते. त्यामागे अनेक पौराणिक गोष्टींचा संदर्भ असला तरी त्या मागे वैज्ञानिक कारणंही आहेत. पौराणिक संदर्भांवर विश्वास न ठेवणारे विज्ञानाच्या कक्षेतून जेव्हा ह्या गोष्टीची उत्तरं शोधतात तेव्हा काही ठोस निष्कर्ष ही काढता येत नाहीत. कारण अश्या प्रश्नांची उत्तरं अनेकजण आपापल्या परीने मांडत असतात. ह्या दोन्ही बाजू किती खऱ्या आणि किती खोट्या ह्याचा विचार प्रत्येकाने करावा. पण तरीही त्या ठिकाणा मागचं गूढ किंवा रहस्य आजही न उकललेलं आहे. असंच एक ठिकाण कावेरी नदीच्या तिराशी वसलेलं आहे. ४५ किमी म्हैसूर आणि १३३ किमी बंगलोर पासून कर्नाटक राज्यात असलेलं “तलकड” हे ठिकाण आजही अनेक रहस्य आपल्यामध्ये लपवून आहे.
तलकड च्या मागे एक शाप आहे. साधारण १६ व्या शतकात ह्या भागावर विजयनगर साम्राज्याचा ताबा होता. त्यांचा प्रतिनिधी म्हणून ह्या भागाचं राज्य राजा श्रीरंगय्या त्याची पत्नी राणी अलेमलामा सोबत बघत होता. आपली तब्येत ढासळत असताना आपल्या पश्चात ह्या राज्याची मालकी राजा श्रीरंगय्या ने म्हैसूर चा राजा वडियार कडे दिली. राजा वडियारला राणी अलेमआला कडे असलेल्या अतिशय दुर्मिळ आणि तेजस्वी अश्या हिरे आणि दागिन्यांची लालसा झाली. राजा वडियार ने आपल्या सैनिकांना हे दागिने राणीकडून आपल्या ताब्यात घ्यायला सांगितले. राणीने हे बघताच आपल्या कंबरेला सगळे दागिने बांधून कावेरीच्या पत्रात जलसमाधी घेतली. ती घेताना तिने एक शाप दिला.
“Talakadu managali, Malangi madwagali, Mysooru arasarige makkalu aagadirali” which translates to ‘Let Talakad be covered by sand, let Malangi become a whirlpool and henceforth, the Mysore Rajas will not produce heirs’. To this day, the curse still haunts the dynasty.
आजवर ह्या शापातून वडेआर कुटुंबाची सुटका झालेली नाही असे म्हंटल जाते. ही पौराणिक कथा मानून आपण विज्ञानात ह्या गोष्टी स्वीकारणार नाहीत. पण वडेआर कुटुंबाचा १७ व्या शतकापासून इतिहास बघितला तर ह्या शापाचं अस्तित्व दिसून येते. १७ व्या शतकापासून ह्या कुटुंबातल्या १९ पेकी फक्त ७ राजांना पुत्रप्राप्ती झाली आहे. आपल्या पाठीमागे आपल्या चुलत्यांना आपल्या राजकारभाराची जबाबदारी द्यावी लागली आहे. २०१३ मृत्यू झालेले श्रीकांतदत्ता नरसिंह वडेआर हे पण निपुत्रिक होते. कोणी ह्या मागे योगायोग म्हणेल अथवा जेनेटिकल प्रोब्लेम. ( ह्या राजांनी आपल्या कुटुंबातील जवळच्या व्यक्तींसोबत लग्न केलेली आहेत. त्यामुळे त्यांना पुत्र प्राप्ती ला अडचण येत असावी असा एक तर्क आहे. पण ह्याचं शास्त्रीय उत्तर अजून मिळालेलं नाही. ) तरीपण पौराणिक कथेचा भाग आणि राजाच्या कुटुंबाचा शाप हा गेल्या ४०० वर्षापासून दिसून येत आहे हे पण खरं आहे.
तलकड चं रहस्य म्हणजे हा पूर्ण भाग एक वाळवंट आहे. कावेरी सारख्या मोठ्या नदीच्या बाजूला असूनही हा पूर्ण भूभाग मातीच्या वाळवंटात दबलेला आहे. कावेरी नदी तलकड मध्ये अचानक आपल्या पात्राच्या दिशेत बदल करते. ह्याच ठिकाणी हे वाळवंट पसरलेलं आहे. तलकड एका काळी एक समृद्ध ठिकाण होतं. तलकड मध्ये ३० पेक्षा जास्ती मंदिरांच निर्माण चोला आणि विजयनगरी साम्राज्यात झालं होतं. ११ व्या शतकाच्या सुमारास चोला राज्याचं शासन तलकड वर होतं. त्या वेळी तलकड मध्ये ७ इतर शहरं आणि ५ मठ होते. १४ व्या शतकात विजयनगर साम्राज्याकडे तलकड चा ताबा आला. ह्या सर्व काळात तलकड एक सर्व संपन्न शहरांचा भाग होतं. नुकत्याच झालेल्या अभ्यासात अनेक रहस्यमयी गोष्टी समोर आल्या आहेत. नॅशनल इन्स्टीट्युट ऑफ एडव्हान्स स्टडीज आणि ए.एस.आय. सारख्या संस्था ह्या अभ्यासात समाविष्ट होत्या. इन्फ्रारेड आणि रडार सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ह्या भागाचं सर्वेक्षण केल्यावर ह्या भागात कालव्यांचं अतिशय योग्य रीतीने प्लानिंग केलेलं जाळ दिसून आलं आहे. म्हणजेच हा भाग एकेकाळी प्रचंड अश्या समृद्ध नागरी जीवनाचं अस्तित्व दर्शवत आहे.
आत्ता झालेल्या संशोधनात हे स्पष्ट झालं की एकेकाळी तलकड हे संपन्न शहर होतं. मुख्य म्हणजे ज्या पद्धतीने इकडे कालव्यांच जाळं दिसून आलं त्यातून हे ही स्पष्ट होते की इकडे पाण्याचं पूर्ण नियोजन करून तलकड शहरात पाणी पुरवण्यात आलं होतं. मग असं अचानक काय झालं की तलकड हे सर्वसंपन्न शहर एक वाळवंट झालं. पौराणिक कथेला बाजूला ठेवून वैज्ञानिक दृष्टीकोनातून जर बघितलं तर संशोधकांच्या मते असं होण्यामागे काही कारणं आहेत. तलकड हे पेनिन्सुला आहे. पेनिन्सुला म्हणजे तलकड ३ बाजूने कावेरी नदीने वेढलेलं आहे. कावेरी नदी ह्या भागात इंग्रजी “U” आकाराप्रमाणे वळण घेते. ह्याला मेंडर असंही म्हंटल जातं. १५ व्या शतकात विजयनगर साम्राज्यात भारतातील सगळ्यात पाहिलं बोल्डर (मोठे मोठे दगड) रचून धरण इकडे बांधल गेलं. ह्या धरणामुळे कावेरी नदीचं पाणी ह्या भागात मेंडरमुळे अतिशय हळू वाहू लागलं. ह्यामुळे नदीच्या पाण्याने आपल्या सोबत वाहून आणलेली वाळू ह्या भागात जमा होण्यास सुरवात झाली. बघता बघता एका शतकात तलकड एक समृद्ध शहरातून एका वाळवंटात रुपांतरीत झालं.
तलकड आजही एक रहस्य आहे. कारण इकडे असलेल्या फक्त काही मंदिरांना वाळूच्या दबलेल्या ढिगाखालून मोकळं करण्यात यश आलेलं आहे. एकदा वाळू काढल्यावर एका वर्षात ही मंदिरं पुन्हा वाळूच्या ढिगाखाली गाडली जातात हा अनुभव आहे. बाहेर काढलेल्या मंदिरांच्या भोवती आजही वाळूंचे ढिगारे असून त्यातून वाळू पुन्हा पुन्हा ह्या मंदिरांत पडत असते. स्थानिक लोकांच्या मते दरवर्षी सरकार आणि ए.एस.आय. ह्या ठिकाणी वाळू बाजूला काढते पण पुन्हा ही मंदिर अगदी त्याच्या कळसापर्यंत वाळूत लुप्त होतात. तलकड च्या वाळूच्या खाली आजही अनेक मंदिर आणि तिथल्या त्या काळाच्या शहराचे अवशेष लपलेले आहेत. ज्याचं उत्खनन होणं अजून बाकी आहे. उत्खनन केलेली मंदिरं आपल्या सोबत अनेक तंत्रज्ञान आणि कला घेऊन भारताच्या संस्कृतीचा वारसा आज आपल्याला दाखवत आहेत. इथल्या मंदिरांविषयी मंदिरांचं विज्ञान ह्या लेखमालेत सविस्तर लिहेन पण एकेकाळी वैभवशाली इतिहासाचा साक्षीदार असलेलं तलकड आजही एक रहस्य आहे.
वाचण्यासारखे आणखी काही…
खगोल / अंतराळ
ललित
प्रेरणादायी/MOTIVATIONAL
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.