आम्ही पूर्ण पणे Vegetarian आहोत असे म्हटले तर मग दुध, तूप, लोणी, मध असे प्राणीजन्य पदार्थ खाणं टाळावे लागेल. आश्चर्य म्हणजे आपल्या धर्मात ह्या गोष्टी उपासाला देखील चालतात. अन्न हे फक्त पोषक द्रव्याची सरमिसळ न राहता ते माणसाच्या जीभ, नाक, डोळे, त्वचा अशा सर्व संवेदनांना उद्दीपित करणारा उच्च प्रतीचा शृंगार बनून जातो. इतर कोणत्या प्राणीमात्रात हे आढळते?
शाकाहार मांसाहार असे म्हटले कि लगेच माणूस मूलतः Vegetarian की Non Vegetarian? हा प्रश्न लोक विचारू लागतात. आणि त्यावर आपापली मतंही अभिनिवेशाने मांडू लागतात. आता Non Vegetarian चं भाषांतर अ-शाकाहारी असे काहीतरी होईल, मांसाहारी नाही म्हणून मुद्दाम वरच्या प्रश्नात तसे लिहिलेले आहे. आम्ही पूर्ण पणे Vegetarian आहोत असे म्हटले तर मग दुध, तूप, लोणी, मध असे प्राणीजन्य पदार्थ खाणं टाळावे लागेल. आश्चर्य म्हणजे आपल्या धर्मात ह्या गोष्टी उपासाला देखील चालतात. (मला कधी कधी कळतंच नाही आपल्या धर्माचं, म्हणजे एकादशी, चतुर्थीला भाज्या पण चालत नाहीत पण हे उपरोल्लेखित प्राणीजन्य पदार्थ चालतात. गणेश चतुर्थीला कांदा लसूण पण चालत नाही असे म्हणताना कोकणात अनेकांच्याकडे गणेशोत्सवात जेव्हा गौरी बसतात तेव्हा त्यांना मांसाहाराचा/मत्स्याहाराचा नैवेद्य असतो. इतर धर्मांच तसं नसावं. म्हणजे मुसलमानांना डुकराच मांस चालत नाही, तर कधीच चालत नाही. काही विशिष्ट वेळी चालते आणि काही विशिष्ट वेळी चालत नाही असं त्यांच्यात नसतं.)
बरं प्युअर मांसाहारी म्हणावं तर तसे कोणीच नसते म्हणजे मांस शिजवायला लागणारे मसाले, तेल इ. पदार्थ काही मांसाहारामध्ये येत नाहीत. हिंसा, अहिंसा तत्व पाहायचे म्हणावे तर आपण काहीच खाऊ शकणार नाही. कारण वनस्पतींना जीव असतोच. धान्य, बिया फळ फळावळ हि त्यांची पिल्लं/गर्भं असतात कि नाही. आणि झाडांना फळ, फुलं, बिया तुमच्या पोटभरीसाठी येत नाहीत. आपल्या खाण्याचे प्रयोजन म्हणून तयार होणारे अन्न खायचे म्हणावे तर मग आपण फक्त काही फळच खाऊ शकतो उदा. आंबा, चिकू, फणस वगैरे (पवित्र नारळ नाही). यांचा स्वादिष्ट गर इतर प्राण्यांनी ती फळ खावीत आणि बिया कुठेतरी नेऊन टाकाव्यात ज्यामुळे त्या झाडांची प्रजा वाढेल असा हेतू त्यामागे असतो. पण आपण किती जण खाल्लेल्या फळांच्या १ टक्का तरी बिया कुठे तरी पेरतो. आणि खाणंच का? ह्य न्यायाने मग रेशीम, चामडे, सौंदर्य प्रसाधने, औषधे, काही काही वापरता येणार नाही. मग काय करणार?
मुळात माणूस शेती करू लागला तेव्हाच माणसाला संस्कृती उभी करता आली म्हणून पुढे हे हिंसा-अहिंसा, शाकाहारी-मांसाहारी वगैरे चोचले पुरवायची सोय झाली. शेतीचा गंधही नसलेल्या आदिवासींना हि असली थेरं परवडत नाहीत. तसल्या कल्पनाही त्यांच्यात नसतात. जेव्हा शेतीचा शोध लागलेला नव्हता तेव्हा आदिमानव जो अन्न जंगलात शोधून गोळा करून उपजीविका चालवायचा (hunter- gatherer) त्याला मोठी लोकसंख्या पोसणे सभ्यता, संस्कृती विकसित करणे जमलेच नव्हते. तेव्हा शेतीचा शोध लागला म्हणून एवढी मोठी लोकसंख्या पोसणे आणि अन्न शोधण्यापेक्षा इतर उद्योग करणे आपल्याला शक्य झाले आहे. एवढी प्रगती होणे शक्य झाले आहे. आणि शेती म्हणजे फक्त पिकं किंवा फळ फळावळच नसते तर गायी म्हशी कोंबड्या शेळ्या हे पण त्यात येतात.
नव्हे पशुपालन हा तर माणसाचा शेती पेक्षाही पुरातन उद्योग आहे. तोच शेतीचा Precursor आहे. ह्यामागची मूळ कल्पना/ गरज अशी कि अन्न आपल्याला सदा-सर्वकाळ आणि विनासायास उपलब्ध व्हावे. शिवाय त्याबरोबर आपल्याला चामडे, साल वस्त्र अशा इतर वस्तू सहज आणि मुबलक प्रमाणात उपलब्ध होतात. हे सर्व प्राणी आणि पिकं आपण आपल्या सोई प्रमाणे संकरीत, विकसित केली आहेत. (जंगलात हि पिकं, ह्या कोंबड्या २ महिनेही टिकू शकणार नाहीत.) ती आपल्या विविधतेने नटलेल्या समृद्ध संस्कृतीचा भाग आहेत.खाद्यसंस्कृती म्हटल्यावर त्यातफक्त उदरभरण हा भाग न येता इतर अनेक गोष्टी येतात.
अन्न हे फक्त पोषक द्रव्याची सरमिसळ न राहता ते माणसाच्या जीभ, नाक, डोळे, त्वचा अशा सर्व संवेदनांना उद्दीपित करणारा उच्च प्रतीचा शृंगार बनून जातो. इतर कोणत्या प्राणीमात्रात हे आढळते? संस्कृती हि गोष्ट आपल्या जगण्याला इतर प्राणी मात्राच्या जगण्यापेक्षा भिन्न करते. ‘जीवो जीवस्य जीवनम’ वगैरे सुभाषितं खरी पण खाद्य संस्कृती त्याहून भिन्न, उच्च अभिरुचीपूर्ण अशी आहे. मानवी इतिहासात अनेक मोठ मोठ्या संस्कृत्या आल्या भरभराट पावल्या आणि काळाच्या उदरात गडप ही झाल्या. त्यांच्यात आपसात रक्तरंजित संघर्षही झाले पण खाद्य संस्कृती अजूनही टिकून आहे आणि ती उत्तरोत्तर अधिक समृद्ध होते आहे. मानवी जीवन समृद्ध, संपन्न आणि अभिरुची पूर्ण बनवण्याचे अत्यंत महत्वाचे काम तिने केले आहे. कुठल्याही संस्कृतीचे तेच मूळ उद्दिष्ट असते नाहीका? मानवी संस्कृतीमध्ये खाद्य-संस्कृती हि म्हणूनच महत्वाची आणि मोठी विलोभनीय गोष्ट आहे तिचं संगोपन, संवर्धन आपण आपल्या मगदुराप्रमाणे करत राहणं हे आपलं सांस्कृतिक कर्तव्य आहे.
वस्त्र संस्कृती हि अशीच पशुपालन (लोकर) आणि कापसाच्या शेतीमुळे शक्य झालेली गोष्ट आहे. माणूस कापसाची शेती काय अन्न मिळवण्यासाठी करतो कि काय? सगळ्या देवांना चालणारे रेशीम कोणत्या वनस्पतींपासून बनते? त्या करता कोशात गेलेल्या आळीला उकळत्या पाण्यात घालून क्रूर पणे मारले जाते. ते बरे चालते आपल्याला. व्याघ्राजीनावर किंवा मृगाजिनावर बसणारे बाबा, स्वामी लोक ती कातडी कोणत्या अहिंसक मार्गाने गोळा करतात? आणि चामडी कशाला हवी बसायला? बुडाला कापूस लागला तर मुळव्याध होते काय त्यांना? मधासाठी मधमाशाना मारून किंवा हाकलून देऊन किंवा त्यांना फसवून मध काढून घेतला जातो. आतातर त्या बिचाऱ्या कीटकांना शेळ्या मेंढ्यासारखे पाळून, त्यांनी कष्ट करून मिळवलेला मध आपण हिसकावून घेतो. जंगलात त्या बिचाऱ्या उंच झाडावर, लपवून पोळी बांधायच्या, ते शोधून वणवण करून आपण मध गोळा करायचो. आता तेवढाही त्रास नाही.
तेव्हा अन्न ग्रहण करताना हिंसा-अहिंसा, धर्म-अधर्म, पाप-पुण्य, भक्ष्य-अभक्ष्य, पेय-अपेय काय असेल? असले फालतू विचार सोडा आणि आपल्या शरीराला (आणि अर्थात पर्यावरणालाही) काय झेपतंय, आणि जिभेला काय रुचतय, आपल्याला कशाची अलर्जी आहे, असल्या निव्वळ भौतिक गोष्टी पाहून त्याप्रमाणे वागा. उगाच उपास मोडला तर पाप लागेल अन श्रावण नाही पाळला तर नरकात जावे लागेल. अमका प्राणी मारून खाल्ला तर धर्म नियमाचे उल्लंघन होईल अशा तद्दन भिकार गोष्टी बोलून स्वतःच्या आणि समोरच्याच्या डोक्याची मंडई करू नका.
फक्त ‘जगा आणि जगू द्या’ नाही तर मनसोक्त खा आणि खाऊही द्या, आनंदाने, सुखाने.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.