मुस्लिम समाजाच्या पत्रिकेवर भगवान बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमा असलेली एक पत्रिका सध्या समाजमाध्यमावर जोरदार व्हायरल झालेली दिसत आहे. बुलडाणा जिल्ह्यातील हिवरा आश्रम येथील कडू शाह मकबुल शाह यांच्या कन्येच्या विवाहानिमित्त त्यांनी छापलेली पत्रिका सध्या व्हायरल झालेली आहे. मात्र यामागचे सत्य वेगळेच असून त्यांनी मुस्लिम, हिंदू आणि बौद्ध अशा तीन समाजासाठी वेगवेगळ्या पत्रिका छापल्या आहेत.
कडू शाह मकबुल शाह यांची कन्या परवीन हिचा विवाह सत्तार शाह आमद शाह यांचे चिरंजीव महेबुब शाह यांच्यासोबत १८ डिसेंबर रोजी सकाळी १०:३० वाजता मेहकर तालुक्यातील हिवरा आश्रम येथे संपन्न होणार आहे. या विवाह सोहळ्यासाठी त्यांनी अशी अनोखी पत्रिका छापली आहे.
हिवरा आश्रम येथील कडू शाह मकबुल शाह यांचा मच्छीचा व्यापार आहे. ते चिखली मेहकर, बुलडाणा अशा ठिकाणच्या व्यापार्यांना मच्छीचा पुरवठा करतात. व्यापाराच्या निमित्ताने मराठा आणि बौद्ध समाजाचे मित्र मंडळी असल्यामुळे तीन पत्रिका छापल्या आहेत. विशेष म्हणजे सर्वांसाठी वरण, भात, भाजी, पोळी असं साधं जेवण आहे, असे त्यांनी सांगितले.
शाह यांना एक मुलगा आणि तीन मुली आहेत. दोन मुलींची लग्नं झालेली असून आता शेवटच्या मुलीचे लग्न आहे. घरात मुलीचं शेवटचं लग्न असल्याने सगळ्यांना आनंदात सहभागी करून घेण्याचा प्रयत्न होता. त्यामुळे तीन्ही समाजाच्या वेगवेगळ्या पत्रिका छापून सगळ्यांच आनंद देऊ, असा माझा हेतू होता, असे कडू शाह यांनी सांगितले.
या देशात जन्माला आलो याचा मला खूप अभिमान आहे. परंतु ही गोष्ट आपण लोकांच्या घरोघरी जाऊन सांगू शकत नाही, त्यासाठी हा एक छोटासा प्रयत्न आहे. समाजात सलोखा राहावा आणि प्रेम वाढावे हाच यामागचा हेतू होता. मात्र त्याची राज्यभरात दखल घेतली जाईल, असं वाटलं नव्हतं, असेही शाह म्हणाले.
अशी अनोखी पत्रिका छापल्यामुळे राज्यभरातून फोन येत आहेत. लोक वधु-वरांना शुभेच्छा देत आहेत. माझेही अभिनंदन करत आहेत. यामुळे होणारे जावई, मुलगी, व्याही, सर्व पाहूणे मंडळी आणि मित्र मंडळींना खूप आनंद होत आहे. पण आज माझे शिक्षक बन्सोडे गुरूजी हवे होते. त्यांना आज खूप आनंद झाला असता की, आपला हा विद्यार्थी शाळा शिकला नाही पण माणूस म्हणून तो आज मोठा झाला. याचा त्यांना नक्कीच आनंद झाला असता, अशी आपल्या आवडत्या शिक्षकाची आठवण कडू शाह यांनी ताजी केली..
उपरवालेका काम है!
उर्दू पत्रिका वाचता येणार नाहीत. हा विचार सर्वात आधी डोक्यात आला. त्यानंतर मग विचार करत असतानाच अशा पत्रिका छापण्याचे ठरवले. तसं बघितलं तर मी अडाणी आहे. पंधरा दिवस शाळेत गेलो, अन् सोळाव्या दिवशी घरी आलो. बस्स झालं आपलं शिक्षण! मग शिक्षण नसताना हे काम होणं म्हणजे उपरवाल्याचंच काम आहे, असेही कडू शाह म्हणाले.
अशा आगळी वेगळी पत्रिका त्यांनी छापल्याचे जेव्हा आम्हाला समजले, तेव्हा आम्हीदेखील त्यांच्या पावलावर पाऊल टाकून तशाच पत्रिका छापल्या. त्यांनी समाजातील सलोखा राखण्यासाठी खूप मोठे पाऊल उचलले आहे. सर्व समाजातील लोकांकडून त्यांचे कौतुक होते, तेव्हा आमची छाती अभिमाने भरून येते,
सत्तार शाह आमद शाह, व्याही
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.