धकाधकीच्या जीवनात जेव्हा अनेक संकटं येतात, परिस्थिती, काळ, वेळ जेव्हा आपल्या बाजूने नसते तेव्हा आश्वस्त करणारं कोणी भेटलं की तोच आपल्यासाठी साधू, संत, देव किंवा मसीहा ठरतो. पण ह्याच काळात आपण आपला कॉमन सेन्स गहाण ठेवतो. कारण त्या कठीण परिस्थतीत आपली सारासार विचार करण्याची बुद्धी कुठेतरी मागे पडलेली असते. नेमकी हीच वेळ हेरून अनेक बाबा आणि अवतार असणारे आपलं दुकान उघडतात. खरे तर उघडतात म्हणण्यापेक्षा आपली सावज शोधतात. अशी सावज मिळायला जास्ती काही लांब जाण्याची गरज नसते. कारण ते स्वतःहून त्यांच्या जाळ्यात येत असतात.
व्हाट्स ऍपवर फिरणारे भोंदूगिरी चे अनेक व्हिडीओ पहिले की नक्की कोण अशिक्षित आणि कोण सुशिक्षित असा विचार मनात आल्याशिवाय रहात नाही. एका व्हिडीओ मध्ये तर एक कोण बाबा आयुष्यातली संकट दूर करण्यासाठी स्त्री च्या उन्नत भागांना आणि पार्श्वभागांना बिनदिक्कतपणे त्यांच्या कुटुंबासमोर स्पर्श करत आहेत. ह्या वेळेस कुटुंबातले सर्व जण डोकं खाली घालून बाबांच्या जपात व्यस्त आहेत. समोर काय चालू आहे ते योग्य चालू नाही हे दिसत असून सुद्धा ते सर्व निमुटपणे सहन करण्याची मानसिकता कोणत्या श्रद्धेचा भाग आहे हे मला अजूनतरी कळलेलं नाही. हा सर्व प्रकार मोबाईल मध्ये पकडणारे पण त्यांना अडवण्याचा कोणताही प्रयत्न करताना दिसत नाही. त्या पलीकडे ज्या स्त्रीवर हे प्रकार केले जात आहेत ती ही शांतपणे सगळं झाल्यावर पाया पडून बाजूला होऊन आपल्या मुलीला पुढल्या कार्यासाठी पुढे करत आहे.
असे अनेक व्हिडीओ आपल्याला यु ट्यूब, व्हाट्स ऍपवर बघायला मिळतील. मला त्या बाबा लोकांची चीड येण्यापेक्षा लोकांच्या मूर्खपणाची कीव येते. आजकाल आपण इतके तकलादू झालो आहोत की संकटाची छोटी मालिका पण आपल्याला पूर्ण अस्वस्थ करते. कठीण प्रसंग, संकट, वाईट घडामोडी ह्या आयुष्याचा भाग आहेत. त्यातून कोणी सुटलेलं नाही. ह्या संकटाची व्याप्ती कधी जास्त, कधी कमी तर कधी कधी पूर्ण आयुष्यभर पुरणारी असते. पण म्हणून कोणी बाबा आपल्याला त्यातून मुक्तता देईल हा विचार इतक्या सहजरीत्या स्वीकारला जातो की बायकोला ड्रेस न घालू देणारे बाबांच्या हातांना कुठेही स्पर्श करण्याची स्वीकृती देऊन तो आपल्या भक्तीचा भाग आहे असं समजतात.
मुंबईच्या लोकल ट्रेन मध्ये अनेकदा बाबा बंगाली ची पोस्टर बघून विचार करायचो की लंडनच्या कोणत्यातरी तत्सम कॉलेज मधून गोल्ड मिडलिस्ट असणारा डॉक्टर वशीकरण, सुखद संसारिक जिवनाच्या चाव्या तसेच सेक्स लाइफ मधील प्रश्न कसे काय सोडवू शकतो? म्हणजे भारतात ह्याचं निवारण करणार एकही कॉलेज नाही का? फक्त लंडन मधून अश्या गोष्टी शिकवल्या जातात का? ह्या बाबांना अशी कोणती सिद्धी असते की ज्याच्यासोबत आपण आयुष्य घालवतो त्याला समजून नाही घेऊ शकत आणि हा बाबा एका मिटिंग मध्ये आपल्यातील बेनबनाव मिटवू शकतो आणि आपलं सेक्स लाईफ सुधारू शकतो. प्रश्न हा नाही की कोणी काय उपाय सुचवते? प्रश्न हा आहे की आपण आयुष्यातल्या अडचणीला योग्य तऱ्हेने सामोरे जात आहोत का?
संत, साधू, मार्गदर्शक ह्या सगळ्यांबद्दल मला नितांत आदर आहे. कारण त्यांचा ऑरा मोठा असतो. पण भोंदूगिरी करणारे मात्र आपलं दुकान लावून सावज शोधत असतात. त्यामुळे ह्यातल्या नक्की कोणाला कसं ओळखायचं हे आपल्याला शिकायला हवं. अडचणीच्या काळात मदत करणारं, धीर देणारं, दोन शब्द सांगणारं कोणीतरी लागतेच. आयुष्यातल्या तक्रारींचा पाढा कोणापुढे तरी सांगितल्यावर हलकं वाटण साहजिक आहे किंवा त्यावर कोणी सहानभूती दाखवल्यावर आपल्याला थोडं बळ मिळतं पण मग हेच तर काम समूपदेशक करत असतात. पण त्यांच्याकडे जायला किती जणांची तयारी असते. मानसोपचार तज्ञ म्हंटल की मला वेड लागलं आहे का? असा प्रश्न असतो पण कोणा बाबाचा उतारा आणि उपाय करायला हेच लोक डोळे बंद करून गर्दी करतात.
भोंदूगिरी ची दुकानं आज रोजरोस सुरु आहेत आणि राहतील. कारण आज बाजारात डिमांड आहे तर सप्लाय होणारच. आभासी जगात रमणारी, संवाद कमी झालेली पिढी ह्यामुळे तर आधीच कमकुवत असलेली मनं आता आधीच बेघर झालेली आहेत. मग अश्या बाबा लोकांना धंदा चालू करण्यासाठी जास्ती काही करावं लागत नाही. दोन शब्द पण अश्या बिथरलेल्या मनांना शांत करतात. त्या जाळ्यात अडकायला मग वेळ लागत नाही. आपण इतके त्यात हरवून जातो जसं की पिंजऱ्यातला पोपट उडायची आपली कला विसरून जातो त्याच प्रमाणे आपण आपली विचार करण्याची शक्तीच हरवून बसतो. मग आपण आपल्यासोबत अनेकांना ह्यात गुंतवतो.
भोंदूगिरी करणाऱ्या लोकांना आपण श्रद्धेच्या नावाखाली उत्तेजन देत नाही न? ह्यात गुंतलेल्या लोकांना आपल्या परीने बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो आहोत का? ह्यात आपला प्रगल्भपणा आहे. लोकं मूर्ख असतात असे बोलणारे संकटांच्या काळात पण बुवाबाजी च्या मागे जातात हा अनुभव आहे. श्रद्धा आणि अंधश्रद्धा ह्यामध्ये एक धूसर लाईन असते. ती लाईन ओलांडायची नसेल तर आपला कॉमन सेन्स आपण वापरायचा असतो. तो गहाण ठेवला की भोंदूगिरी च्या दुकानात एक नवीन गिऱ्हाईक म्हणून आपण प्रवेश केला हे नक्की.
वाचकांच्या लेखांबद्दल प्रतिक्रिया
मनाचेTalks चे लेख वाचून बरेच लोक काही समस्यांसाठी आम्हाला संपर्क करतात. तर या लेखाच्या निमित्ताने अशा अडचणीच्या वेळी भोंदूगिरीच्या आहारी जाण्यापेक्षा कौन्सिलिंग साठी येथे संपर्क केला तर शक्य ती मदत करण्याचा येथे प्रयत्न होतो.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.