रत्नजडित अभंग, ओवी अमृताची सखी
चारी वर्णांतुनी फिरे, सरस्वतीची पालखी
रसरंगात भिजला, येथे शृंगाराचा स्वर
येथे अहंता द्रवली, झाले वसुधेचे घर
कुसुमाग्रज…
मराठी भाषेचा अभिमान कविवर्य कुसुमाग्रज यांनी असा व्यक्त केला आहे. आपल्या सर्वांनाही मराठी भाषेचा अभिमान असतोच… आणि आजचा दिवस मराठी बाबत असणारी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. आज आहे, मराठी भाषा दिन.
चला तर मग या निमित्ताने आपल्या प्रिय मराठी भाषेविषयी अधिक जाणून घेऊया…
२७ फेब्रुवारी हा मराठीतील अग्रगण्य कवी वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस. हा त्यांचा जन्मदिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो.
अनेक शाळा आणि महाविद्यालयांमध्ये आजच्या दिवशी मुलांना मराठी भाषेचे महत्व पटवून दिले जाते. निबंध, लेख, कवितेच्या विविध स्पर्धा घेतल्या जातात.
मराठी भाषा ही महाराष्ट्र राज्याची अधिकृत भाषा आहे. भारतातील प्रमुख २२ भाषांमध्ये सर्वात जास्त बोलल्या जाणाऱ्या भाषेत मराठीचा तिसरा क्रमांक आहे आणि जगात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांत एकोणीसावा क्रमांक मराठीचा लागतो.
मराठी भाषेची निर्मिती संस्कृत भाषेपासून झाली आहे.
जरी ही महाराष्ट्राची अधिकृत भाषा असली तरी माय मराठी फक्त महाराष्ट्रापुरतीच मर्यादित नाही बरं का! भारतातच नव्हे तर जगातील कित्येक देशांमध्ये मराठीचा संचार आहे.
गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, आंध्र, तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू या सोबतच मॉरिशस, युरोप, अमेरिका अश्या कित्येक ठिकाणी मराठी बोलली जाते.
जगभरात मराठी टक्का दिवसेंदिवस वाढतच आहे. ही जवळपास नऊ कोटी लोकांची प्रथमभाषा आहे आणि दोन कोटी लोकांची द्वितीय भाषा!
मराठी भाषेला दैदिप्यमान असा इतिहास आहे. अनेक पुस्तके, कादंबऱ्या, कविता, साहित्याचे असंख्य प्रकार या भाषेत रचले गेले आहेत.
संस्कृत पासून प्राकृत आणि प्राकृत पासून मराठी असा या भाषेचा प्रवास झाला आहे. मराठीत लिहिलेला सर्वात जुना लेख म्हणून श्रवणबेळगोळ येथील शिलालेख समजला जात होता.
मात्र त्याही पूर्वीचा लेख असण्याचा मान आता रायगड जिल्ह्यातील अक्षी शिलालेखाला मिळाला आहे. अनेक ठिकाणी सापडलेल्या लेखांचा अभ्यास करून साधारणतः मराठी भाषेचे वय पंधराशे वर्षांचे मानले जाते.
पैठण येथील सातवाहन राजाच्या काळात मराठीचा प्रशासकीय वापर होण्यास सुरुवात झाली. देवगिरीच्या यादव राजवटीत मराठीची आणखी भरभराट झाली.
सन १२५० ते १३५० असा हा शंभर वर्षाचा काळ होता. याच काळात महानुभाव पंथाची स्थापना झाली. ‘लिळाचरित्र’ हा ग्रंथ म्हाईंभट यांनी सन १२७८ मध्ये लिहिला.
त्यानंतर संत ज्ञानेश्वरांनी १२९० मध्ये ज्ञानेश्वरी लिहिली. अनेक संत साहित्यिकांनी मग बहुविध साहित्य पोवाडे, अभंग, ओव्या रचून मराठी भाषेची गोडी आणखीनच वाढवत नेली.
त्यानंतर मात्र या गोडव्याला ओहोटी लागली. कारण महाराष्ट्रावर परकीय भाषेचे आक्रमण सुरू झाले होते. सन १३५० ते सन १६०० हा मुस्लिम राजवटीचा काळ होता.
त्यांना स्थानिक भाषेची जपणूक करण्यात काहीही स्वारस्य नव्हते. अनेक उर्दू आणि फारसी शब्द या कालखंडात मराठीमध्ये घुसडण्यात आले आणि ते रूढही झाले.
पण तरीही अश्या विपरीत परिस्थितीत अनेक संतांनी भक्तिमय काव्यरचना करून मराठी जिवंत ठेवली.
मराठीला खरोखर सुदिन आले ते इसवी सन १६०० नंतर! छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वतंत्र मराठी स्वराज्याची स्थापना करून या भाषेला राजाश्रय दिला आणि मराठीवर होणारा परकीय अत्याचार थांबला.
याच काळात मराठी भाषा सोप्या काव्यरचनेमुळे जनमानसात लोकप्रिय होऊ लागली. मराठी ही महाराष्ट्राची अधिकृत भाषा असण्यावर शिक्कामोर्तब झाले.
पेशव्यांच्या काळात या भाषेला आणखी बहर आला. शृंगार रस आणि वीर रस प्रामुख्याने रचले जाऊ लागले. पोवाडा आणि लावणी याच काळात लोकप्रिय झाले.
नंतर आले इंग्रजांचे राज्य… आतापर्यंत फक्त पद्य रचना केली जात होती पण आता गद्य रचना सुद्धा करण्यास सुरुवात झाली. इंग्रजांनी आणलेल्या छपाईच्या तंत्राने मराठी भाषा फोफावण्यास मदत झाली.
वर्तमानपत्र, नियतकालिके छापली जाऊ लागली आणि मराठी भाषा घरोघरी विराजमान झाली.
हा झाला मराठीचा थोडक्यात इतिहास. सध्या मुख्य भाषा मराठी असली तरी यात अनेक बोलीभाषा सुद्धा आहेत हे आपल्याला माहीत आहेच.
कोकण पट्ट्यात कोकणी बोली बोलली जाते, विदर्भात वऱ्हाडी, उत्तर महाराष्ट्रात अहिराणी इत्यादी. पण मराठीची आणखी एक खास बोलीभाषा आहे हे आपणास माहीत आहे का? ती आहे तंजावुरी मराठी.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे बंधू व्यंकोजी राजे हे दक्षिण दिग्विजयासाठी गेले होते तेव्हा अनेक मराठी लोक त्यांच्यासोबत होते. ती माणसे तामिळनाडू मधील तंजावर या गावी कायमस्वरूपी स्थायिक झाली.
त्यांनी आपल्या सोबत नेलेली मराठी भाषा तिकडे पिढ्यानपिढ्या जपली आहे. महाराजांच्या काळात बोलले जाणारे अनेक मराठी शब्द आजही तिकडे बोलीभाषेत प्रचलित आहेत.
अर्थात थोडासा तामिळ प्रभावही काळाच्या ओघात त्या भाषेवर पडला आहेच पण परकीय मुलखात आपली मातृभाषा इतकी वर्षे जपणे म्हणजे हे मराठी वरील प्रेमच दिसून येते.
ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंटबॉक्स मध्ये जरूर कळवा आणि हा लेख नक्की शेअर करा. आणि आजच्या मराठी भाषा दिन निमित्ताने गर्वाने म्हणा…
माझ्या मराठीची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजासी जिंके
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
New and different information.