भारतीय रस्त्यांवरून धावणाऱ्या कार तुम्हाला माहीतच आहेत. रोज वेगवेगळ्या कार चे मॉडेल बाजारात दाखल होत असते. अनेक कंपन्या आज भारतात स्वतःचा प्रकल्प स्थापन करून कारची निर्मिती करत आहेत.
यात परदेशी आणि भारतीय दोन्ही कंपन्या अग्रेसर आहेत. दिवसेंदिवस नवनवीन कार घेण्याचा टक्का वाढतोच आहे. पण भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्राविषयी तुम्हाला किती माहिती आहे?
सध्याच्या घडीला भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्र जगात आघाडीच्या देशांपैकी एक मानले जाते.
येणाऱ्या वर्षात याची आणखी प्रगती येणारच आहे. पण याची सुरुवात झाली तो काळ आणि आजचा काळ यात जमीन अस्मानाचा फरक आहे.
या दरम्यानच्या काळात अनेक शोध लागले, काही मजेशीर घटना घडल्या, अनेक गोष्टींचा परिपाक म्हणून आपण ऑटोमोबाईल क्षेत्रात आज या ठिकाणी उभे आहोत.
चला तर मग आज मनाचेTalks तुम्हाला सांगणार आहे काही विस्मयकारक तथ्ये जी तुम्हाला माहीत असण्याची शक्यता कमीच आहे. सादर करत आहोत मोजक्या आठ गोष्टी… यातल्या तुम्हाला किती माहीत होत्या ते आम्हाला जरूर कळवा.
१. भारतात बनवलेली पहिली कार.
भारतात तयार झालेली पहिली कार कोणती माहीत आहे? ती होती ‘हिंदुस्तान एम्बासिडर’. युनायटेड किंगडम देशाची मॉरिस ऑक्सफर्ड नावाची एक कार कंपनी या गाडीची मालक होती.
त्या कंपनीकडून लायसन्स मिळवून प्रथमच भारतात एम्बासिडर कार हुगळी, बंगाल येथे बनवली गेली.
या गाडीची रचना, तांत्रिक बाबी जरी मॉरिस कंपनीने तयार केल्या असल्या तरी भारतात बनवल्यामुळे तिचे नाव मॉरिस न ठेवता हिंदुस्तान एम्बासिडर असे ठेवले गेले.
ही गाडी सन १९५७ मध्ये पहिल्यांदा रस्त्यावर धावली. नंतर अनेक राजकारणी लोकांनी तिला आपलेसे केल्याने या गाडीला राजकारण्यांची गाडी अशीही ओळख मिळाली.
आज एम्बासिडर भारतीय रस्त्यांवर दिसणे दुर्मिळ झाले असले तरी एके काळी या कारने लोकप्रियतेचा कळस गाठला होता हे मात्र खरे आहे.
२. संपूर्ण भारतीय बनावटीची पहिली कार.
तुम्हा आम्हा सर्वांना परिचित असणारी ही कार आहे. टाटा इंडिका! रतन टाटा यांनी परदेशी तंत्रज्ञान वापरण्यापेक्षा अशी कार बनवण्याचे ठरवले जी संपूर्णतः भारतीय बनावटीची असेल…
आणि जन्म झाला टाटा इंडिका या गाडीचा. १९९८ ला जिनिव्हा मोटार शो मध्ये या कारचे लाँचिंग करण्यात आले आणि त्याच वर्षी भारतात ऑटो एक्स्पो मध्ये ही गाडी सादर करण्यात आली.
सर्व भारतीय कार प्रेमींमध्ये टाटा इंडिका बाबत प्रचंड उत्सुकता होती. १९९९ मध्ये जेव्हा इंडिका विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली तेव्हा ही गाडी खरेदी करण्यासाठी लोकांच्या अक्षरशः उड्या पडल्या.
आज जरी टाटांनी इंडिकाचे उत्पादन करणे थांबवले असले तरी भारतीय बनावटीची पहिली कार या आपुलकीमुळे इंडिका कायम स्मरणात राहील.
३. कार विकत घेणारे पहिले भारतीय.
किती योगायोग असतो बघा… ज्यांनी भारतीय बनावटीची पहिली कार तयार केली, त्या रतन टाटांचे आजोबा, म्हणजेच जे.आर.डी. टाटा हे होते कार खरेदी करणारे पहिले भारतीय व्यक्ती!
भारतात पहिल्यांदा कारचे आगमन झाले ते १८९७ साली. भारतात आलेली पहिली कार विकत घेतली होती ती एका इंग्रज व्यक्तीने. ते होते क्रोम्पटन ग्रिव्हजचे मि. फॉस्टर.
आणि त्याच्या पुढच्याच वर्षी म्हणजे १८९८ मध्ये जेआरडी यांनी कार विकत घेतली आणि कार खरेदी करणारे प्रथम भारतीय असा मान मिळवला.
४. भारताची पहिली इलेक्ट्रिक कार.
सध्याच्या काळात इलेक्ट्रिक वाहनांचा बोलबाला आहे. स्कुटर पासून बाईक पर्यंत, रिक्षा पासून कार पर्यंत आता इलेक्ट्रिक वाहने निघाली आहेत. तुम्हाला वाटत असेल की भारतात इलेक्ट्रिक क्रांती ही नवीनच झाली आहे.
मात्र तसे नाही. पहिली विजेवर चालणारी भारतीय कार कधी बनली होती माहीत आहे? इंडिका लॉन्च झाल्याच्या फक्त तीन वर्षानंतर! २००१ मध्ये बंगलोरच्या चेतन माईनी यांनी या कारचे डिझाइन आणि निर्माण केले.
या कारचे नाव होते ‘माईनी रेवा’. काळाच्या पुढे असणारी ही गाडी भारतात जरी कमी चालली असली तरी तिला इंग्लंड मध्ये चांगले मार्केट मिळाले होते.
५. टाटा सुमो – नावामागची कहाणी.
टाटा सुमोला कोण ओळखत नाही? एक मजबूत, दणकट आणि खेडोपाड्यापासून ते शहरापर्यंत कुठल्याही रस्त्यांवर चालणारी गाडी म्हणून ही भारतात लोकप्रिय आहे.
दिसायला एखाद्या पैलवानाप्रमाणे दिसते म्हणून हिचे नाव सुमो ठेवले असेल असे समजत असाल तर ते साफ चूक आहे!
ज्यावेळी टाटा मोटर्सने ही गाडी डिझाइन केली, त्यावेळी नाव काय ठेवायचे असा प्रश्न त्यांना पडला.
टाटाचे माजी मॅनेजिंग डायरेक्टर ‘सुमंत मुळगावकर’ यांच्याबाबत आदर दर्शवण्यासाठी त्यांच्या नावाचे आणि आडनावाचे प्रथम आद्याक्षर घेऊन त्यावर नाव ठेवले गेले ‘सुमो’.
योगायोगाने सुमोचा आकार आणि लांबीरुंदी पाहता या गाडीला हे नाव अगदी चपखल बसले. आहे की नाही गंमत?
६. भारतात पहिल्यांदा बनवलेली जीप.
भारतात पहिली जीप बनवली होती ती महिंद्रा अँड महिंद्रा या कंपनीने. या जीपचे नाव होते ‘विली’. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दोनच वर्षात, म्हणजे इसवी सन १९४९ मध्ये माझगाव, मुंबई येथे या जीपचे निर्माण झाले.
७. मारुती-८०० चे सादरीकरण आणि प्रथम ग्राहक.
इसवी सन १९८३ मध्ये मारुती-८०० लॉन्च झाली आणि या गाडीने भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्राचा चेहरा मोहराच बदलून टाकला. जनमानसाची प्रचंड लोकप्रियता या गाडीला लाभली.
एकूण तब्बल २८ लाख मारुती-८०० निर्माण झाल्या त्यात २६ लाख गाड्या तर फक्त भारतातच विकल्या गेल्या आहेत.
जपानी कंपनी सुझुकी आणि भारतीय कंपनी मारुती यांच्या सहकार्यातून ही गाडी बनवली गेली. जितक्या गाड्या बनवण्यात आल्या त्यामानाने मागणी जास्त असल्याने लकी-ड्रॉ काढण्यात येऊन वाटप झाले होते.
त्या लकी-ड्रॉ मध्ये पहिला नंबर लागला तो हरपाल सिंग यांचा. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते हरपाल सिंग यांना चावी सुपूर्द करण्यात आली होती.
८. भारताचा पहिला फॉर्म्युला वन ड्रायव्हर.
जगभरात जेव्हा फॉर्म्युला वन रेसिंग लोकप्रिय होत होती त्याचवेळी भारतात सुद्धा याचा ज्वर चढला होता. पण त्यात कुणी भारतीय ड्रायव्हर नसल्याने वेगवेगळ्या देशांच्या टीमला भारतीय लोक सपोर्ट करत होते.
यात फरक पडला तो २००५ मध्ये नारायण कार्तिकेयन या पहिल्या भारतीय ड्रायव्हरच्या रूपाने! आता भारताला सुद्धा स्वतःचा हक्काचा ड्रायव्हर मिळाला होता.
नारायण कार्तिकेयन युवा पिढीमध्ये लोकप्रिय असून त्याने रेसिंग क्षेत्राला ग्लॅमर मिळवून दिले आहे. त्याचे अनुकरण करून अनेक भारतीय तरुण या क्षेत्रात जाण्यास उत्सुक आहेत हे त्याचे मोठे यश आहे.
तर वाचकहो, हा लेख कसा वाटला ते आम्हाला कमेंटबॉक्स मध्ये जरूर कळवा. आणि हो, शेअर करायला विसरू नका.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी किंवा तुमचे स्वतःचे लेखन मनाचेTalks वर प्रकाशित करण्याची इच्छा असल्यास येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.