थंडीत किंवा पावसाळ्याच्या दिवसात पायांना भेगा पडणे ही एक अगदी कॉमन समस्या आहे. बहुतेक सर्वांनाच कमी-अधिक प्रमाणात हा त्रास होतोच. आज आपण पायांना भेगा पडण्याची कारणे आणि त्यावरचे घरगुती उपाय व घ्यायची काळजी जाणून घेणार आहोत.
पायांना भेगा पडण्याची अनेक कारणे आहेत. वजन वाढलेले असणे हे त्यातील एक प्रमुख कारण आहे. पावलांची त्वचा नाजूक असते. जास्त वजनाचा भार त्यावर पडला की तिथे भेगा पडतात. अशा भेगांमुळे चालताना पावले दुखणे तसेच भेगांमधून रक्त येणे असा त्रास होऊ शकतो. याशिवाय थंडी आणि पावसाळ्याच्या दिवसात त्वचा कोरडी पडते. त्यामुळे देखील पावलांना भेगा पडतात.
पावलांच्या भेगांमुळे शरीरात इन्फेक्शन होण्याचा देखील धोका असतो. आयुर्वेदात पायाच्या भेगांवर अनेक घरगुती उपाय सांगितले आहेत. ते कोणते ते आज आपण पाहूया.
पायांना भेगा पडणे म्हणजे नक्की काय?
पायांची टाचेकडची त्वचा तसेच अंगठ्याच्या बाजूची त्वचा थंडीत किंवा पावसाळ्यात कोरडी पडते. त्यामुळे तेथे चिरा पडून त्वचेचा आतील स्तर दिसू लागतो. त्यालाच पायांना भेगा पडणे असे म्हणतात. क्वचित काही जणांना संपूर्ण पावलावर देखील भेगा पडतात. ज्यांची त्वचा जास्त कोरडी असते त्यांना हा त्रास जास्त प्रमाणात होतो.
पायांना भेगा पडण्याची प्रमुख कारणे
१. कोरडी त्वचा
त्वचा कोरडी असणे हे पायांना भेगा पडण्याचे सर्वात प्रमुख कारण आहे. अशी त्वचा नाजूक असते त्यामुळे ती लवकर फाटते. थंडी व पावसाळ्याच्या दिवसात त्वचेला जास्त कोरडेपणा येऊन जास्त त्रास होतो.
२. मधुमेह
पायांना भेगा पडण्याचे दुसरे प्रमुख कारण म्हणजे मधुमेह. एखाद्या व्यक्तीला मधुमेह झाला आणि त्या व्यक्तीच्या रक्तातील साखरेचे प्रमाण योग्य राहत नसेल तर पायाकडे होणाऱ्या रक्ताभिसरणावर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे पायाची त्वचा कोरडी पडत जाते आणि पावलांना भेगा पडतात.
अशा पायांना ‘डायबेटीक फुट’ म्हणतात. मधुमेही व्यक्तीने आपल्या पावलांची विशेष काळजी घेतली पाहिजे. कारण अशा पावलांना झालेल्या जखमा आणि भेगांमधून पसरणारे इन्फेक्शन लवकर बरे होत नाही.
३. थायरॉईड
शरीरात थायरॉइड हार्मोनचे असंतुलन असेल तर पावलांना भेगा पडण्याचे प्रमाण वाढते.
४. आंघोळ करताना खूप गरम पाणी वापरले तर त्वचा कोरडी पडून पावलांना भेगा पडतात.
५. द्रवरूप आहार आणि पाणी यांचे सेवन कमी प्रमाणात करण्यामुळे देखील शरीरात कोरडेपणा येऊन पावलांना भेगा पडतात.
६. योग्य पोषक आहार न घेणे, जंक फूडचे अतिरिक्त सेवन आणि स्थूलता यामुळेदेखील पावलांना भेगा पडतात.
७. अनवाणी पायांनी चालण्यामुळे पावलांच्या भेगांचा धोका वाढतो. अनवाणी पायांनी लहान खडे, काटे असणाऱ्या रस्त्यांवर जाऊ नये.
८. सोरायसिस किंवा संधिवात अशा आजारांमुळे देखील पायांना भेगा पडू शकतात.
तर ही आहेत पायांना भेगा पडण्याची काही कारणे.
पायांना पडणाऱ्या भेगांवर करायचे घरगुती उपाय
१. पिकलेले केळ
पिकलेले केळे कुस्करून ते पावलांच्या भेगांवर लावावे. पंधरा मिनिटे ठेवून त्यानंतर धुऊन टाकावे. बराच फरक पडतो.
२. सोडियम आणि व्हॅसलीन
एका टबमध्ये गरम पाणी घ्या. त्यामध्ये सोडियम तसेच व्हॅसलीन मिसळा. त्या पाण्यात अर्धातास पाय बुडवून बसा. त्यानंतर पावले विशेषतः पायाच्या टाचा स्वच्छ करून पायांना एखादे मलम लावा. दररोज झोपण्याआधी हा उपाय केल्यास पंधरा दिवसात फरक पडतो.
३. तांदुळाचे पीठ
तांदुळाच्या पिठात मध मिसळून ते पावलांवर रगडले असता पावलांची मृत त्वचा निघून जाण्यास मदत होते. त्यामुळे भेगा कमी होतात.
४. मध
मध अनेक प्रकारे गुणकारी आहे. रात्री झोपताना भेगांना मध लावून पायमोजे घालून झोपल्यास भेगा कमी होतात.
५. नारळ
नारळाचे पाणी पिणे पायाच्या भेगांसाठी उपयोगी आहे. नारळाचे सत्व असणारे मलम भेगांना लावल्यास बराच फरक पडतो. खोबरेल तेलाची मालीश पावलांना करण्याचा देखील उपयोग होतो.
६. मेण आणि मोहरीचे तेल
मेण आणि मोहरीच्या तेलाचा वापर करून घरच्या घरी भेगांसाठी मलम तयार करता येते. त्यासाठी ५० मिली. मोहरीचे तेल गरम करा. तेल उकळू लागले की त्यात २५ ग्रा. मेण घाला. मेण वितळले की मिश्रण गार होऊ द्या. थोडे कोमट असताना त्यात भीमसेनी कापूर मिसळा. असे तयार केलेले मलम पायाच्या भेगाना नियमीतपणे लावा.
७. पॅराफीन मेण
पायाच्या भेगांवर पॅराफीन मेण थेट लावणे हा रामबाण उपाय आहे. मात्र असे मेण शुद्ध स्वरूपात असले पाहिजे.
८. कडुलिंबाची पाने
मूठभर कडूलिंबाची पाने वाटून त्यांची पेस्ट करून घ्या. त्यात तीन चमचे हळद मिसळा. तयार मिश्रण पावलांना लावून अर्धा तास ठेवा. त्यानंतर पावले गरम पाण्याने धुऊन टाका. भेगा कमी होण्यास मदत होते.
९. पेट्रोलियम जेली
पेट्रोलियम जेली हादेखील कोरडी त्वचा आणि पायांच्या भेगा ह्यावरचा रामबाण उपाय आहे. चांगल्या प्रतीची पेट्रोलियम जेली औषधांच्या दुकानात उपलब्ध असते. कोरडे पडणारे ओठ, कोपराची नाजुक त्वचा ह्यासाठी देखील पेट्रोलियम जेलीचा उपयोग होतो.
१०. लिंबाचा रस
एका टबमध्ये कोमट पाणी घेऊन त्यात दोन-तीन चमचे लिंबाचा रस मिसळा. त्या पाण्यात पंधरा ते वीस मिनिटे पाय बुडवून बसा. त्यानंतर पावले स्वच्छ फडक्याने कोरडी करा.
पायांना भेगा पडत असतील तर करायचे इतर उपाय
१. पायांना भेगा पडत असतील तर नियमित पणे पायमोजे घालण्याची सवय लावून घ्या.
२. घरामध्ये देखील महू स्लीपर वापरा.
३. बाहेरून आल्यावर पाय स्वच्छ धुवा.
४. आठवड्यातून एक दिवस गरम पाणी करून त्यात पाय बुडवून बसण्याची सवय लावून घ्या.
५. पायांना नियमितपणे चांगल्या प्रतीचे फुट क्रीम लावा.
पायांना भेगा पडत असतील तर आहार कसा असावा?
१. भरपूर पाणी पिणे.
२. आहारात फळे व पालेभाज्या यांचे प्रमाण जास्त असावे.
३. दूध, दही, तूप, अशा स्निग्ध पदार्थांचा आहारात समावेश असावा.
४. योग्य प्रमाणात मांसाहार करावा किंवा त्या प्रमाणात प्रोटीन घ्यावे.
५. रुक्ष व कोरडा आहार घेऊ नये.
६. जंक फूड तसेच धूम्रपान आणि मद्यपान टाळावे.
तर हे आहेत पायाच्या भेगांवर करण्याचे घरगुती उपाय. ह्यांचा लाभ जरूर घ्या.
परंतु ह्या उपायांनी ही जर भेगा कमी होत नसतील, तसेच वारंवार भेगांमधून रक्त येणे, चालताना पाय खूप जास्त दुखणे असा त्रास होत असेल तर मात्र तज्ञ डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या. मधुमेह असेल तर रक्तातील साखर नियंत्रणात ठेवा. आपल्या पावलांवरच तर आपण उभे असतो. त्यांची काळजी घेणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.