कोंबडा आरवला तशी शेवंती झोपेतून खाडकन उठली..
गोधडी घडी करून ठेवली, आप्पा निपचितपणे खाटेवर पडून होता..
आप्पा तिचा नवरा… त्याची पांघरुणात हालचाल सुरू झाली होती तसं तिच्या ध्यानात आलं..
आप्पाचे नित्यविधी तिने आटोपले नी स्वतःचे सुद्धा…
चुलीवर चहाचे आंधण ठेवले तेवढ्या वेळात तिने रात्रीची उरलेली भाकर नी त्यावर मिरचीचा ठेचा घेऊन एका फडक्यात बांधली…
नागो (मुलगा) अजून झोपलाच होता.
रहू दे त्याले झोपला, बरा रहीन झोपला तं…
म्हणून मनातच पुटपुटली…
बांधलेली शिदोरी, पाण्याचं लहानसं मडकं व विळा तिने एका टोपल्यात टाकले..
टोपलं डोक्यावर घेतलं, कवाड लावले आणि बाहेर येऊन अंगणात ठेवलेली तुटकी ताटकी वहाण पायात सरकावून तिची पावलं झपाझप वावराच्या दिशेने निघाली….
दोन दिवसात तिला तिचं काम पूर्ण करायचं होतं, पटापट कामाला लागली..
पोटात कळ निघायला सुरुवात झाली तशी तिने आपली शिदोरी काढली नी कशी बशी रात्रीची भाकर पोटात ढकलली..
गटागटा पाणी प्यायली… परत लागली आपल्या कामाला….
सूर्य देवाने आता आग ओकायला सुरुवात केली होती. घामाने अंग चिप चिप झाले होते…
तसं तं आजचं काम झालं….
एक सुस्कारा सोडला नी निघाली घराकडे जायला…
गावात ऊन्हामुळे शुकशुकाट दिसत होता.. पाखरं आपापल्या घरट्यात विसावली होती, नेहमी भुंकणारी कुत्री सुद्धा सावलीचा आधार घेऊन मुटकुळी मारून झोपली होती. घराजवळ आली तसा कमलीने आवाज दिला…
शेवंते ,कोणाचं काम घेतलं वं…?
शेवंती…
अवं, हरिपाटलाच्या वावरातलं फनं येचाचं काम उधळं घेतल, परवडला नाई बापा लई गिदाडा हाय…अखीन दोनक दिस लागण.
कमली…
आप्पा कसा हाय? अन, चालते का नइ वं?
आप्पा एक महिन्यापासून खाटेवर.….झाड तोडायला गेला आणि खाली पडला त्यामुळे कमरेचे हाड मोडले होते… गावठी उपचार केले ,मलमपट्टी केली…अजून उठता येत नव्हते.
कमली ने चौकशी करीत विचारले,
नागो कुठीसा भायेर गेला काय? नई म्हतलं सक्कईस त्याच्यासंग दोन तीन पोरं पाह्यले, थे पोरं कई बरे नाय वाटले…!!
शेवंती…
कवून व इतक्या चौकशा करून राह्यली? तूही नजर काय माह्या पोरावरच असते काय बापा….मी पहून घिन मावलं..
कमली पुटपुटली,
ज्याचं करावं भलं तो म्हणतो आपलंच खरं
आणि तरातरा निघून गेली.
शेवंतीने कवाड उघडले पहाते तर वासरू हंबरडा फोडत होते…
तिथे गेली.. त्याला पाणी पाजले अंगावरून हात फिरवला तसं ते तिला वात्सल्याने चाटायला लागले…
मुक्या जनावराले तरी समजते, थे तरी माया लावते पण नागो ले कवा समजन हे सारं….. माह्या कर्माचे भोग……!!
नंतर स्वयंपाक केला, आप्पाला जेवायला दिले आणि ती नागोची वाट बघत बसली. वाटत होते लवकर जेवण करून थोडंस अंग टाकावे कारण तिला परत पाटलीन बाईने काही कामासाठी वाड्यावर बोलवले होते.. बिचारी एकटी कुठे कुठे धावणार? थकलेलं अंग तसच जमीनीवर पहुडलं..
तेवढ्यातच दोन मुले धावत आली आणि काके… काके करून दम न घेताच बोलली,
तुह्या नागोले पोलिसांनी पकडून नेला
तिची तंद्री भंग पावली.
काय? नई रे नागो नसन थो
इतकं बोलतेच तर मुले पळून सुद्धा गेली..
घोर लावला बापा या पोरानं. माणूस पण खाटल्यावर.. किती जीव लावू या पोराला… मायचं पिरिम काय असते कसं सांगू रे तुले
आतडी पिळवटून निघत होती तशीच उठली, डब्यातील साठवलेले पैसे घेवून पोलिसपाटलाकडे गेली आणि त्याला सोडवून आणला तरी त्याने मायच्या केविलवाण्या चेहऱ्याकडे बघितले सुद्धा नाही. दिवसेंदिवस त्याचे व्यसन वाढतच होते आता तो आवाक्याबाहेर जायला लागला होता नंतर तिला कुणीतरी सांगितले की, त्याला व्यसनमुक्ती केंद्रात घेऊन जा. जाणार तरी कशी? नवरा असा एका जागेवर, हाताशी पैसा नाही, एकटी किती राब राब राबणार….!
तरी तिने हिम्मत केली आपल्या भावाला बोलवले आणि गावातील दोन लोक सोबत घेऊन त्याला तालुक्याच्या ठिकाणी घेऊन गेली. तेथूनही तो पळ काढायचा प्रयत्न करीत होता शेवटी तेथील लोकांनी सांगितले याला आम्ही व्यसनमुक्ती केंद्रात भरती करून घेतो… काही फरक पडला तर आम्ही बोलवू आता तुम्ही निघू शकता..
आता नागो दोनक महिने घरी नाय इन…?
हमसून हमसून रडायला लागली.
काय कमी पडल रे बाबा ह्या मायच्या हातानं. चांगला शिकला असता त आता हातभार लागला असता.. तू माह्या मनातलं सल नइ हेरलं, तुह्यासाठी मी माही कूस नाही उजवू दिली लेकरा…….!! कसं सांगू रे तुले… तुह्यासाठी किती उपास तापास केलते, नवस केलते पण तू सुदरला नई. अन मले माय ही म्हणलं नई… सग्या मायनही इतक नसतं केलं तितकं म्या तुह्यासाठी केलं… मरमर मरते म्या तुह्या कायजी पाई….!
नागो आप्पाचाच मुलगा… शेवंतीची मोठी बहीण गिरजा आणि आप्पा यांचा मुलगा म्हणजेच नागो…
नागो जसाजसा मोठा होत होता तसा हट्टी बनत होता… ज्या गोष्टी हे घेऊ शकत नव्हते त्या गोष्टी तो मागत होता, वरून आजीचे पण लाड…!! परिस्थिती जेमतेम..! हातकमाईवर गुजारा…. नागो ३-४ वर्षांचा असेल तेव्हा अचानक साथीच्या रोगांनी शेवंतीचा देहान्त झाला…
लहानगा नागो आईला पाहून माय माय करून रडत होता… इवलासा जीव आईविना पोरका झाला…. त्याचे हट्ट वाढतच होते. परिस्थिती अभावी ते शक्यही नव्हते. कदाचित आईच्या प्रेमाला पारखा म्हणून तर नसेल? दुसऱ्या लग्नाची तयारी सुरू झाली…
शेवंतीचे वडील म्हणाले,
आमचीच शेवंता आहे की.. भयनीच पोर चांगल वागवंन दुसरीची काय खात्री?
पण शेवंताला कोण विचारणार? तिच्या मताला काही महत्व होते का? शिक्षित असो किंवा अशिक्षित प्रत्येक मुलीचे एक लग्नानंतरचे सुरम्य स्वप्न असते.. आपल्याच बहिणीचे पोर म्हणून तयार झाली म्हणा किंवा सर्व भावनाच गोठवून बोहल्यावर उभी राहिली. पहिल्या दिवसापासूनच तिला नागो ने त्रास द्यायला सुरूवात केली.. दिवसेंदिवस तो जास्तच बिघडत चालला होता.. हट्ट करून मिळाले नाही तर चोरी करायलाही कमी करीत नव्हता. तिने त्याला खूप समजावण्याचा प्रयत्न केला पण पालथ्या घड्यावर पाणी.. काही गोष्टींचा तिला पश्चाताप ही होत होता काय करणार बिचारी…
नागोला भरती करून पंधरा दिवस झाले होते, मामा भेटून आला तेव्हा उपचार सुरू आहेत आणि थोडा बरा वागतो म्हणून सांगितले तेव्हा शेवंताला खूप गहिवरून आले आता म्या अजून खूप काम करणार, पैसे पण पाठवायचे आहे म्हणून ती जोमाने कामाला लागली होती, मिळेल ते काम करायला लागली दिवस रात्र कशाचे भान नाही.. डोळ्याला तिच्या झोप म्हणून कशी नव्हतीच. खाण्याचे भान नाही सतत कामच काम…..!
पण डोळ्यात एक स्वप्न घेऊन… माह्या नागो चांगला माणूस बनून येणार..!!
स्वतःकडे दुर्लक्ष केल्यामुळे ती आजारी पडली. लक्ष दयायला कुणीच नाही दोन दिवस तशीच पडून होती.. पोटात दोन दिवसांपासून अन्न पाणी काहीच नव्हते..
शेवंती दिसली नाही म्हणून शेजारच्या कमलाबाईचे लक्ष गेलं तिने आरडाओरडा केला तेव्हा गावातील लोक जमा झाले होते. तापानी फणफणली होती, एकीकडे आप्पा… एकीकडे ही..
आता काय करायचं? यांची जबाबदारी कोण घेणार? तेवढ्यात कुनीतरी गावातल्या डॉक्टरला आणले.. पोटात काहीच नव्हते औषध तरी कसे देणार? ती बोलत सुद्धा नव्हती. डॉक्टर म्हणाले यांना मोठ्या दवाखान्यात भरती करावे लागेल.. तात्पुरती त्यांनी सलाईन लावून दिली होती..
एक रात्र उलटली तरी ती तशीच पडून होती पण ओठी हलकेसे शब्द ना…गो…वेडी माय..!!
कमली मात्र रात्रभर तिथे बसून होती..
सकाळ झाली, पक्ष्याचा चिवचिवाट सुरू झाला, कुणी अंगणात सडा, रांगोळी टाकत होते तर कुणी आपापल्या घरात काम करण्यात व्यस्त होती पण शेवंताची सकाळ नेहमीप्रमाणे नव्हती. शांतपणे झोपली होती ती जणू इतक्या दिवसाचा शीण ती भरून काढत होती…
तेवढ्यात… कुणीतरी सांगितले की, आज नागोचा मामा नागोला आणणार आहे.. हलकासा आवाज तिच्या कानावर गेला.. दुपार उलटून सायंकाळचे वेध लागले होते, संध्याछायांनी गगनाला ग्रासले होते, कुण्या चित्रकाराने आकाशफलकावर नानाविध रंग उधळले होते, वाराही अवखळ जनावरासारखा भन्नाट बनला होता, घरट्याच्या ओढीनं थव्या थव्याने परतणाऱ्या पक्षीगंणानी अवकाशात दाटी केली होती, दुरूनच डोंगराआड लपू पाहणारा सूर्य गोलाचा लालबुंद अर्धगोल नजरेत भरत होता…आणि
शेवंताचा भाऊ नागोला घेऊन आला होता.. नागो पण खूप कसातरी अशक्त दिसत होता पण चेहऱ्यावर एक समाधान होतं…
जणू सर्वजण बदललेल्या नागोचे स्वागत करण्यास सज्ज होते. क्षणभर नागो भकास नजरेनी इकडे तिकडे बघत होता… आता त्याची नजर काहीतरी शोधत होती त्याला ते अजूनही सापडले नव्हते आणि एकाएकी त्याने जोराचा टाहो फोडला.. एकच गगनभेदी आवाज मा..य…य…य !!!!!
आज त्याला मायची खरी किंमत कळली होती आणि जोराजोरात रडायला लागला होता त्याचे अश्रूंचे दोन थेंब शेवंतीच्या चेहऱ्यावर पडले आणि तिने डोळे उघडले… अस्पष्ट शब्द न…ना-गो- माहय लेकरु, आणि त्याला आपल्या कुशीत ओढून घेतले… माय.. तो रडतच होता….
इस वरसापासून म्या ह्या शब्द ऐकासाठी कान तरसले होते.. अज माही कूस खरंच उजवली..!
माय लेकाचे ते प्रेम सर्वलोक डोळ्यात पाणी घेऊन बघत होते… दुरूनच… त्या लालबुंद अर्धगोल सुर्याप्रमाणे… आणि गोठ्यातील वासरू सुद्धा जोरात हंबरायला लागले… मला सुद्धा तुमच्यामध्ये बोलवा म्हणून…
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी किंवा तुमचे स्वतःचे लेखन मनाचेTalks वर प्रकाशित करण्याची इच्छा असल्यास येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.