अपंगत्वावर मात करून यशाच्या मार्गाने निघालेला रवी वर्मा – Youth For Jobs (Y4J) May 23, 2022May 24, 2019 by टीम मनाचेTalks एखादी व्यक्ती जेव्हा आपली ज्ञानेंद्रिये गमावलेल्या अवस्थेत जीवन जगते तेव्हा तिचे आयुष्य किती खडतर असेल याची इतर सक्षम लोक फक्त कल्पनाच करू शकतात.त्यांच्या समोर येणाऱ्या अडचणी या आपल्या कल्पनेच्या पलीकडे असतात. आंध्रप्रदेशातील काकीनाडा इथला २४ वर्षीय रवी वर्मा.. नियतीने एक नाही दोन ज्ञानेंद्रिये हिरावून घेतली त्याच्याकडून. रवी जन्मतःच मूक-बधिर. संकटं काही एकटी येत नाहीत म्हणतात ना!! तसंच जन्मतःच दिव्यांग असलेल्या मुलाला प्रेमाने आधार द्यायला वडिलांची मात्र मनापासून इच्छा किंवा मानसिक तयारी नव्हती. कारण एकटा रवीच नाही तर त्याची बहीण सुद्धा जन्मतःच मूक-बधिर होती. रवीचे वडील आंध्रप्रदेशातील काकीनाडा येथे अंगणवाडी शिक्षक होते. पण यातून प्रपंच चालवणे कठीण म्हणून उरलेल्या वेळात ते फळं विकण्याचे काम करत. आणि अशातच रवीच्या वडिलांचा अपघात झाला. आणि सर्व जबाबदारी रवीच्या आईवर येऊन पडली. पण तिने आहे त्या परिस्थितीत मुलांना मोठे करण्याचा शिक्षण देण्याचा पक्का निर्धार केला. रवी एका सरकारी शाळेत जाऊ लागला. पण शाळा सामान्य मुलांची होती. इतर मुले मात्र रवीला एकटे पाडत त्याची टिंगल करत. यावर त्याने शिक्षकांकडे तक्रार सुद्धा केली. पण रवी सांगतो, “शिक्षकांनी माझे बोलणे समजून न घेणे हे माझ्यासाठी त्या वेळी खूप बोचणारे होते.” पुढे लवकरच तो मूक बधिरांच्या शाळेत जाऊ लागला. इतक्या अडचणींमधून रवीला लहान वयातच हे उमगलं कि या गरिबीतून बाहेर निघून अडचणींवर मात करण्यासाठी शिक्षण घेणं हाच एकमेव पर्याय आहे. बारावी करून बी. कॉमचे शिक्षण घेण्याची रवीची इच्छा होती. पण एकट्या आईची होणारी ओढाताण त्याला बघवत नव्हती. कमकुवत आर्थिक परिस्थितीमुळे त्याने शिक्षण मध्येच सोडले. लवकरात लवकर काम मिळवणे हाच एक पर्याय त्याला समोर दिसत होता. प्रयत्न करणाऱ्याला मार्ग हा सापडतोच. बरोबर ना!! काम मिळवण्याची धडपड रवीला स्वस्थ बसू देत नव्हती. विशाखापट्टणम मध्ये एक NOG आहे Youth For Jobs (Y4J). या संस्थेबरोबर जोडलं जाणं हा रवीच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट ठरला. आता जर आपण रवीला भेटलो आणि विचारलं कि तुझं स्वप्न काय? तर तो अभिमानाने सांगतो कि मला अमेझॉनमध्ये मॅनेजर व्हायचं आहे. Youth For Jobs (Y4J) हि संस्था दिव्यांगांना त्यांच्या योग्यतेच्या नोकऱ्या देऊन त्यांना आर्थिक सक्षम बनवण्याचे काम करते. Y4J कडून रवीला अमेझॉन फुलफीलमेंट सेंटरमध्ये पॅकिंग असोसिएट म्हणून नोकरी मिळाली. आता तो आई आणि बहीण असा आपला प्रपंच एकट्याने चालवतो. एवढंच नाही तर मॅनेजर बनण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अर्धवट राहिलेलं शिक्षण पूर्ण करणे गरजेचे आहे, म्हणून त्याने आंध्र युनिव्हर्सिटीमध्ये सेकंड ईयर बी. कॉम. साठी दूरशिक्षण पद्धतीने स्वतःचे नाव नोंदवले. रवी सांगतो, “मी हाय स्कुलचे शिक्षण घेतल्यानंतर घरातल्या परिस्थितीमुळे छोटे मोठे काम मिळवण्याचा खूप प्रयत्न केला. पण आज मी घराची जवाबदारी उचलू शकतो हे सगळं Youth For Jobs (Y4J) आणि अमेझॉन मुळे शक्य झालं.” याबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी आम्ही अमेझॉनशी सुद्धा बोललो तेव्हा समजले कि अमेझॉन दिव्यांगांना आर्थिक स्वातंत्र्य देण्यासाठी Youth For Jobs (Y4J) आणि V-Shesh या संस्थांबरोबर काम करते. या संस्थांच्या वेबसाईटची लिंक लेखाखाली दिलेली आहे. तसेच या दोन्ही संस्थांना संपर्क कसा करता येईल ते येथे दिलेल्या फोटोंमध्ये बघता येईल. V-Shesh च्या संपर्कासाठी माहिती रवी म्हणतो आमच्या अपंगत्वाकडे समाजाने सकारात्मकतेने बघून आम्हाला संधी दिली तर आम्ही सुद्धा त्या संधीचं सोनं करू. या संस्थांसाठी रवीची कृतज्ञता खूप काही सांगून जाते. या दिव्यांगांना गरज आहे ती मदतीच्या एका हाताची. स्वतःवर विश्वास आणि जिद्द असेल तर कुठल्याही परिस्थितीतून माणूस मार्ग काढतो. हे सांगण्यासाठी रवीचं उदाहरण बोलकं आहे. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.