मी आत्तापर्यंत खूप खंबीर व्यक्ती पाहिल्यात, ज्यांची जीवन ऊर्जा अतिशय जबरदस्त होती, अतिशय प्रभावशाली, रुबाबदार व्यक्तिमत्त्व, आजूबाजूंच्या सहकाऱ्यावर प्रचंड प्रभाव, कठीण प्रसंगी पटापट निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यात होती.
दुसरे एक परिचित नेव्हीमध्ये उच्चपदस्थ होते, त्यांना ऑफिसमध्ये न्यायला अतिशय चकाकणारी काळ्या रंगाची शोफर ड्रीवन अँबेसेडर यायची, अतिशय वैभवशाली आयुष्य होते त्यांचे आणि दराराही खूप होता, आम्ही त्यांच्यापुढे जायला चळा चळा कापायचो
एक परिचित रेल्वेत उच्च पदावर होते, त्यांचे वागणे असे होते की जशी रेल्वे त्यांच्यामुळेच सुरळीत चालतेय, प्रचंड संतापी स्वभाव, दरारा, कोणतीही कठीण परिस्थिती न डगमगता त्यांनी अतिशय लीलया हाताळलेली आम्ही जवळून पाहिली आहे
एक परिचित एका सरकारी खात्यात उच्च पदावर होते, अतिशय झपाट्याने निर्णय घेणे, आजूबाजूच्या लोकांना त्यांच्या धडाडीच्या वागणुकीने दडपून जायला व्हायचे, यांची कार्यक्षमता वाखाणण्यासारखी होती
अश्या अनेक अतिशय धडाडीचे, प्रचंड कार्यक्षम माणसांना मी अगदी जवळून पाहिले आणि हेही पाहिले की त्यांच्या कारकिर्दीत त्यांच्या आजूबाजूचे लोक, नातेवाईक त्यांच्या फटकळ बोलण्याने आणि त्यांच्या स्वतःला सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ समजण्याच्या सवयीने मनाने दूर होत गेलीत, परंतु अतिशय जवळच्यानी प्रेमाखातर किंवा सामाजिक बांधिलकी मुळे त्यांना अतिशय खंबीर साथ दिली.
मात्र ही माणसे जेव्हा त्यांच्या वयानुसार निवृत्त झाली, तेव्हा त्यांचे पद, पूर्वीचा रुबाब, आजूबाजूला सतत शब्द झेलणारी माणसं नसल्याने आणि दिवसभर घरीच राहिल्याने प्रथम मनाने आणि मग शरीराने कमकुवत होत गेली.
त्यांना वयपरत्वे दमा, हृदयविकार, पार्किन्सन्स, अल्झायमर अश्या अतिशय गंभीर व्याधी किंवा नैराश्याने ग्रासले, आज त्यांचा रुबाब, त्यांचा दरारा, त्यांचे तेज सगळे लोप पावले आहे, अतिशय दारुण मनःस्थितीत ही कधीकाळची दैदिप्यमान कारकीर्द गाजवलेली व्यक्तिमत्वे एकाकी आयुष्य कंठताना दिसतात.
आणि त्यांच्या उभारीच्या काळातील अहंकारी, फटकळ वागण्याने मोठ्या प्रमाणात लोकांना दुखवल्याने यांना उभारी देणारा,आधार देणारा, आनंद देणारा मित्रपरिवार त्यांच्यापासून चार हात दूरच राहतोय.
आपले पद, पैसा, मानमरातब ,प्रतिष्ठा या सर्व गोष्टी तात्पुरत्या असतात आणि मनाने जोडलेली माणसे आयुष्यभर साथ देतात हे सगळ्यांना माहीत असूनही किती जण त्यांच्या उत्तम उभारीच्या काळात साधी राहतात, सगळ्यांना धरून राहतात ?
थोडी सी बेवफाई चित्रपटातील एका उत्कृष्ट गाण्याची एक ओळ किती अर्थपूर्ण आहे
तैश उतरेगा वक्त का जब भी
चेहरा अंदर से जर्द निकलेगा
म्हणजे हे जे आपल्या चेहऱ्यावर तेज आहे ते परिस्थितीचं आहे आणि जेव्हा ही परिस्थिती नसेल तेव्हा तो तेजहीन चेहरा अतिशय केविलवाणा दिसेल.
अझीझ नाझा यांची प्रसिद्ध कव्वाली ही खाडकन डोळे उघडणारी आहे :
हुए नामावर बे निशान कैसे कैसे
जमीन खा गयी, नौ जवां कैसे कैसेचढता सुरज धीरे धीरे ढलता है ढल जायेगा
पण आपले डोळे आपल्या धुंदीतून उघडले तर त्याचा आपल्या वागण्यावर वेळेवर परिणाम होऊ शकतो , नाहीतर आपल्या ही वाट्याला हीच किंबहुना याहूनही भीषण परिस्थिती ओढवेल यात शंका नाही .
पूर्वीच्या काळात तरी एकत्र कुटुंब पद्धत होती, त्यामुळे भाऊ, बहिणी, इतर जवळच्या नातेवाईकांचे खूप जिव्हाळ्याचे संबंध होते, त्यामुळे आजही या जुन्या पिढीतील लोकांना मुले, भाऊ आधार देताना दिसतात, चित्र काळजी करण्यासारखं असलं तरीही एकदम भयंकर नाहीये, पण आपल्या पिढीचे काय होणार, मुले १ किंवा २, मोबाईलरुपी राक्षसाने सगळ्यांचे स्वतंत्र विश्व बनल्याने, कोणाला कोणासाठी खूप काही करण्याची इच्छा ही नाही आणि असे काही केले पाहिजे ही जाणीवही नाही.
त्यामुळे जेव्हा आपली मुले मोठी होऊन आपल्या संसारात गुरफटतील, दुसऱ्या शहरात किंवा देशात स्थायिक होतील आणि आपण आपले पद, कार्यक्षमता, तेज, समाजातील वलय गमावलं असेल आणि मुलांशी फक्त फोनवरच संवाद होत असेल, तर आपल्या पिढीची अवस्था जुन्या पिढीतील लोकांहूनही भयावह होईल.
यासाठी आतापासूनच खऱ्या विश्वातील माणसे जोडणं, जरा आपला अहंकार बाजूला ठेऊन जास्तीत जास्त जनसंपर्क वाढविणे, कोणत्या तरी संस्थेबरोबर काहीतरी सामाजिक कार्याला स्वतःला वाहून घेणे हे आतापासूनच करायची तातडीची गरज आहे.
यात दाखवलेला फोटो प्रतीकात्मक आहे.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTALKS ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी किंवा तुमचे स्वतःचे लेखन मनाचेTALKS वर प्रकाशित करण्याची इच्छा असल्यास येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.