बांधकाम क्षेत्रात असलेली मरगळ दूर व्हावी, अर्धवट रखडलेले प्रकल्प पूर्ण व्हावेत या हेतूने 10 हजार कोटी रुपयांचा निधी अलीकडेच केंद्र सरकारने उपलब्ध करून दिला आहे. यामध्ये भारतीय स्टेट बँक आणि भारतीय आयुर्विमा महामंडळ 15 हजार कोटी रुपयांची भर घालेल. त्यामुळे या क्षेत्रासाठी 25 हजार कोटी रुपयांचे अतिरिक्त भांडवल उपलब्ध होईल. (संदर्भ: 6 नोव्हेंबर 2019 चा इकॉनॉमिक्स टाइम्स) सध्या बाजारात उपलब्ध सार्वभौम निधी (Sovereign Funds) आणि निवृत्ती निधी (Retirement Funds) यांच्याकडून भविष्यात होणाऱ्या गुंतवणुकीतून या निधीत वाढ होऊ शकते.
देशभरातील 4 लाख 58 हजार बांधकाम प्रकल्पापैकी 1600 हून अधिक रखडलेल्या प्रकल्पाना याचा फायदा होऊन त्या अनुषंगाने बांधकाम उद्योगाला चालना मिळेल अशी अपेक्षा आहे. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले आणि पैशांच्याअभावी रखडलेले, दिवाळखोरी जाहीर केलेल्या प्रकल्पाचा यासाठी विचार होऊ शकतो. हा निधी ही विनापरतीची मदत नसून कर्जस्वरूपात उपलब्ध करून दिलेले भांडवल आहे.सेबीच्या पर्यायी गुंतवणूक निधी (Alternetive Investment Funds) 2012 च्या नियमावलीतील प्रकार 2 नुसार व्यावसायिक गुंतवणूक व्यवस्थापकांकडून (Fund Manager) ही योजना राबवण्यात येईल. यासाठी एस बी आय व्हेंचर कॅपिटल निधी व्यवस्थापक म्हणून काम पाहातील.
यासाठी पर्यायी गुंतवणूक निधी (AIF) म्हणजे काय? त्याचे कार्य कसे चालते याची अधिक माहिती करून घेऊयात.
१) पर्यायी गुंतवणूक निधी हा मोठया प्रमाणात परस्पर निधीच्या (Mutual Funds) जवळपास जाणारा प्रकार असून यातील गुंतवणूक ही जे लोक मोठया प्रमाणात गुंतवणूक करू शकतील असे मोठे वैयक्तिक गुंतवणूकदार, बँका, देशी व परदेशी गुंतवणूक संस्था यांच्याकडून जमा केली जाते. ही गुंतवणूक प्रामुख्याने साहस प्रकल्प, लघु आणि मध्यम उद्योगांत खाजगी भांडवली सहभाग, गुंतवणूक धोका व्यवस्थापन, भविष्यवेधी योजना यात केली जाते. थोडक्यात हा निधी हा गुंतवणुकीचाच एक प्रकार असून तो पारंपरिक गुंतवणूक किंवा समभाग, रोखे, युनिट याहून थोडा वेगळा आहे. समभाग किंवा युनिटप्रमाणे अल्प गुंतवणुकीतून ही गुंतवणूक करता येत नाही.
२) सेबी कायदा 2012 च्या परिशिष्ट 2(1)(b) नुसार असे फंड निर्माण करण्यासाठी वेगळी कंपनी, एखादया कंपनीचा गुंतवणूक विभाग, न्यास (Trusts) किंवा मर्यादित भागीदारी कंपनी (LLP) स्थापन करावी लागेल.
३) यासाठी जमा केलेला निधी हा मोठे गुंतवणूकदार आणि संस्थात्मक गुंतवणूकदार यांच्या कडून मिळवला जात असून यातील किमान गुंतवणूक ही समभाग किंवा म्युच्युअल फंडांच्या तुलनेत खूपच अधिक असते.
सेबीच्या नियमानुसार पर्यायी गुंतवणूक निधीच्या फंडांचे तीन प्रकार असून त्याचे अजून उपप्रकार आहेत.
पर्यायी गुंतवणूक निधी फंड प्रकार 1 याचे 4 उपप्रकार आहेत.
१. साहस भांडवल निधी (Venture Capital Fund) : यातील गुंतवणूक ही प्रामुख्याने स्टार्टअप उद्योगांच्या भविष्याचा अंदाज घेऊन केली जाते ही गुंतवणूक उद्योग प्राथमिक अवस्थेत असताना जी पैशांची गरज भागविण्यासाठी केली जात असल्याने नवीन उद्योग व त्यातून भविष्यातील मोठे उद्योजक तयार होऊ शकतात. अशा गुंतवणुकीत मोठा धोका असला तरी त्यातून मिळणारा परतावा खूप मोठा असतो. ही गुंतवणूक नवीन उद्योगाच्या शेअर्सच्या स्वरूपात केली जाते. जे गुंतवणूकदार अधिक जोखीम घेऊ शकतात त्याच्याकडून त्याचप्रमाणे परदेशस्थ भारातीयांकडून यात गुंतवणूक करण्यासाठी निधी मिळवला जातो. त्याची विभागणी प्रमाणशीर पध्दतीने विविध उद्योगात केली जाते.
२. पायाभूत सुविधा गुंतवणूक निधी (Infrastructure Investment Fund) : पायाभूत सुविधा जसे रस्ते, वाहतूक, विमानतळ, संदेशवहन या सारख्या उद्योगांना मोठया प्रमाणात भांडवलाची जरुरी असते. या उद्योगांना पूर्ण होण्यास अधिक कालावधी लागत असून त्यानंतर त्यातून लाभांश आणि मूल्यवृद्धी असे दुहेरी लाभ होतात.
३. बीजभांडवल निधी (Angel Fund): अनेक व्यक्तींकडून जमा केलेला निधी नवीन उद्योगाचे भांडवल म्हणून वापरला जातो.
४.सामाजिक कल्याण साहस निधी (Social Venture Fund): यातील गुंतवणूक ही फायदा मिळवण्यासाठी केली असली तरी त्याची यामागे सामाजिक विकास हे महत्वाचे उद्दिष्ट असते.
पर्यायी गुंतवणूक निधी प्रकार 2 फंडाचे 3 उपप्रकार आहेत.
१. खाजगी समभाग फंड (Private Equity Fund) : याची गुंतवणूक प्रामुख्याने बाजारात नोंदणी न केलेल्या कंपन्यांच्या समभागात केली जाते.
२. कर्जरोखे फंड (Debt Fund) : याची गुंतवणूक नोंदणी केलेल्या किंवा न केलेल्या कंपन्यांच्या कर्जरोख्यात केली जाते. चांगले भविष्य असलेल्या परंतू तात्पुरत्या आर्थिक अडचणीत असल्याने ज्यांचे मूल्यांकन कमी आहे अशा अधिक परतावा देणाऱ्या कंपन्यांच्या कर्जरोख्यात यातील गुंतवणूक केली जाते. ही गुंतवणूक कर्जरोख्यातच करावी लागते थेट कर्ज यातील गुंतवणुकीतून देता येत नाही. प्रस्तावित सरकारी व सरकार पुरस्कृत संस्थांची बांधकाम क्षेत्रास नियोजित गुंतवणूक या प्रकारात असेल. यापूर्वी म्हटल्याप्रमाणे अशा गुंतवणुकीतून मुद्दल व परतावा मिळणे हे सरकारला अपेक्षित आहे. थोडक्यात बांधकाम उद्योगास केलेली ही कर्जस्वरूपातील मदत आहे. या पद्धतीत थेट कर्ज देता येत नसल्याने त्याचे नियम काय असतील ते लवकरच स्पष्ट होईल. परंतू पैशांभावी रखडलेले प्रकल्प, मध्यम वर्गीयांसाठीचे परवडणाऱ्या घरांचे बंद प्रकल्प, जवळपास पूर्णावस्थेतील परंतू पूर्ण न झालेले, रेरा नोंदणीकृत आणि ज्यांचे मूल्यांकन अधिक आहे अशा मालमत्ता यासाठी यासाठी पात्र असून जे प्रकल्प अनुत्पादक मालमत्ता (NPA) म्हणून जाहीर झाले आहेत अथवा ज्यांची प्रकरणे राष्ट्रीय कंपनी कायदा लवाद (NCLT) यांच्याकडे प्रलंबीत आहेत त्यांचाही यासाठी विचार केला जाईल.
३. फंडांचा फंड निधी (Fund of Funds) : म्युच्युअल फंडांच्या फंड ऑफ फंडस सारखाच पर्यायी निधी गुंतवण्याचा हा प्रकार असून यातील गुंतवणूक अन्य पर्यायी गुंतवणूक निधीदारांकडे किंवा एखादया विशिष्ट क्षेत्रात केली जाते. यासाठी सरकारकडून कोणतीही विशेष सवलत दिली जात नाही.
पर्यायी गुंतवणूक निधी फंड प्रकार 3 चे 2 उपप्रकार आहेत.
१. हेज निधी (Hedge Fund) : वेगवेगळ्या प्रकारच्या गुंतवणुकीतील असलेल्या जोखमीचे डिरिव्हेटिव्हज सारखी साधने वापरून व्यवस्थापन केले जाते. या गुंतवणुकीतून अधिक फायदा मिळवण्यात येतो याचे व्यवस्थापन करण्याची फी (जास्तीतजास्त 2%) म्हणून तसेच त्यातून होणाऱ्या नफ्याच्या हीश्यातील वाटा म्हणून काही रक्कम / टक्केवारी (जास्तीतजास्त 20%) कापून घेतली जाते.
२. खाजगीरीत्या समभाग खरेदी निधी (Private Investment in Public Equity Fund): यातील गुंतवणूक ही नोंदणीकृत कंपनीचे समभाग कंपनी प्रवर्तकाकडून कमी भावाने मिळवून किंवा दुय्यम बाजारात नोंदणीपूर्व गुंतवणूक करून कंपनीतील हिस्सेदारी वाढवण्यासाठी करण्यात येतो. यामुळे प्रवर्तकांची प्राथमिक गरज भागते. हे समभाग नंतर बाजारात नोंदवले जात असल्याने यातील गुंतवणूक कधीही मोकळी करता येते.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTALKS ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी किंवा तुमचे स्वतःचे लेखन मनाचेTALKS वर प्रकाशित करण्याची इच्छा असल्यास येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.