मराठी चित्रपट – साहित्यातही या शोकांतिकेच्या भावनेची प्रचीती येते. पण चित्रपट टाळून इथे एका अलौकिक कवितेचा उल्लेख करावासा वाटतो.
गेले द्यायचे राहून तुझे नक्षत्रांचे देणे
माझ्यापास आता कळ्या आणि थोडी ओली पाने..आलो होतो हासत मी काही श्वासांसाठी फक्त
दिवसांचे ओझे आता, रात्र रात्र शोषी रक्त.आता मनाचा दगड घेतो कण्हत उशाला
होते कळ्यांचे निर्माल्य आणि पानांचा पाचोळा..
चि.त्र्यं. खानोलकर उर्फ आरती प्रभू यांच्या या कवितेचे दोन वेगवेगळे अर्थ लावले गेले. एक अर्थातच प्रेमाच्या प्रकटीकरणाचा होता. आपण आयुष्याच्या या सारीपाटावर सोंगट्या हलावे तसे आपसूक हलत राहतो आणि आपल्या प्रिय व्यक्तीला आपले प्रेम, आपली माया, आपली संवेदना आणि अंतरीचे भाव व्यक्त करायचे राहून जाते.
पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीत दिलेल्या आणि आशाताईंनी गायलेल्या या अर्थपूर्ण भावगीताला रसिकांनी हृदयात जे स्थान दिले ते आजही कायम आहे.
गाणे म्हणून प्रसिद्ध मिळण्याआधी या कवितेच्या आशयाकडे पाहिले तर एक प्रकारची खिन्नता मनात दाटून येते. जीवनात प्रत्येकाला खूप काही करावेसे वाटत असते, खूप काही द्यावेसे वाटत असते पण कालौघाच्या रहाटगाडग्यात आपण असे काही पिसलो जातो की त्या गोष्टी राहून जातात.
ते क्षण पाण्याच्या बुडबुड्याप्रमाणे निसटून जातात आणि आपण रितेच राहतो. आपल्या भावना तशाच गोठून राहतात आणि ते देणे द्यायचे राहून गेले याची एक हुरहूर मनाला चटका लावून जाते.
चि.त्र्यं. खानोलकर उर्फ आरती प्रभू यांच्या या कवितेचे दोन वेगवेगळे अर्थ लावले गेले. एक अर्थातच प्रेमाच्या प्रकटीकरणाचा होता. आपण आयुष्याच्या या सारीपाटावर सोंगट्या हलावे तसे आपसूक हलत राहतो आणि आपल्या प्रिय व्यक्तीला आपले प्रेम, आपली माया, आपली संवेदना आणि अंतरीचे भाव व्यक्त करायचे राहून जाते. आपण नुसतेच जगत जातो.
त्यातून मनाला अपराधी भावनांची सल येते. शेवटी आपण ते देणे द्यायला जातो पण ती वेळ निघून गेलेली असते अस लक्षात येतं. तर खानोलकरांच्या काही घनिष्ठ मित्रांनी या कवितेचा दुसरा अर्थ लावताना या कवितेत खानोलकर इतके हळवे का झाले याचा वेगळा अर्थ दिला.
खानोलकरांचा मुलगा जेंव्हा अंथरुणाला खिळला तेंव्हा त्यांना झालेली अपराधाची जाणीव ही या कवितेची पार्श्वभूमी आहे अस त्यातून सूचित होतं.
खरे तर माझ्या मुलाला मी अख्ख्या विश्वाचे तारांगण तुझ्या ओंजळीत द्यावे, आनंदाची नक्षत्रे त्यात प्रफुल्लीत व्हावीत असं काही तरी मी द्यायला पाहिजे होतं पण ते मी देऊ शकलो नाही.
खरे तर मी तुला वेळही दिला नाही, आता माझ्यापाशी उरले आहेत केवळ आठवणींच्या कळ्या अन अश्रूंनी भिजलेली त्या कळ्यांची पाने!
तुझे शेवटचे हे काही क्षण आता बाकी राहिले आहेत अन् मी तुझ्या पुढ्यात बसलो आहे. आता त्याचा काय उपयोग होणार आहे ? कारण मी जे काही तोंडदेखले हसत आहे ते केवळ काही काळासाठी हे मला ठाऊक आहे.
त्यानंतर मात्र प्रत्येक दिवसाचा हरेक क्षण माझ्या जगण्यासाठी श्वासाचे ओझे बनून राहणार आहे. आयुष्यातील प्रत्येक रात्र माझ्यासाठी जणू काळरात्र होऊन माझ्या गात्रांचे निव्वळ शोषण करणार आहे.
कारण तु गेल्यानंतर जगण्यासाठी कसली उर्मी उरणारच नाही. शुष्क श्वासांचे कोरडे जगणे शेष असणार आहे.
दिवसभर भले आपण आपले सुख-दुःख कामाच्याअन् काळाच्या ओघात विसरू शकु पण जेंव्हा रात्र होते, पाठ जमिनीला टेकते तेंव्हा मात्र आठवणींचे जे मोहोळ उठते ते मनाला ध्वस्त करून जाते.
अशावेळेस आठवणींच्या वेदनांनी दग्ध झालेल्या जीवाला आपण आधार म्हणून ती दुःखेच उशाला घेऊ शकतो, म्हणूनच खानोलकर लिहितात, ‘माझ्या मनाचा दगड घेतो कण्हत उशाला…’
पण यातूनही फार काही निष्पन्न होत नाही, जीवनाचे अस्तित्व क्षणभंगुर होऊन जाईल अन श्वासांच्या कळ्यांचे निर्माल्य होणार हे निश्चित आहे.
मर्मबंधाच्या कुपीत जतन केलेल्या आसावल्या आठवणींच्या पानांचाही पाचोळा होऊन जाईल असे ते विमनस्कपणे लिहितात. एक उदासवाणी झाक या कवितेच्या प्रारंभापासून ते अंतापर्यंत जाणवत राहते.
कविता वाचून झाल्यावर आपण दिग्मूढ होऊन जातो. कवितांमधून क्वचित वापरले जाणारे शब्द ते वेगळ्या अर्थाने प्रतिमा म्हणून वापरतात अन कवितेला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतात.
ही त्यांची खासियत या कवितेत मनस्वी पद्धतीने अनुभवायला मिळते. ही शोकांतिका म्हणावी की शोकभावनेचं अत्युत्तम प्रकटीकरण म्हणावं याचा निर्णय करता येत नाही.
लोकांनी काळजात गोंदवून घेतलेली हि कलाकृती सिद्ध करते की, आयुष्यातून कारुण्य आणि दुःख वजा केलं तर सुखाला किंमत शून्य उरते. शोकांतिकेच्या गाथेचा हा अर्थ जगणं आणखी समृद्ध करतो.
शोले….शोकांतिकेची गाथा..(भाग २)
टायटॅनिक….शोकांतिकेची गाथा..(भाग १)
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
अप्रतिम…..
छान विवेचन
फारच छान,
अनेक वेळा ऐकलेल्या कवितेची दुसरी बाजू..
हे गाणं कैक वेळा बरेच वर्ष ऐकतो आहे ह्याचं संगीत गायकी आणि शब्द यांच्या बद्दल काय बोलावे, सगळं अलौकिक, संगीताच्या नशेत बरेच वेळा कधी भानच नाही राहिले की कवीला काय सांगायचं हे वाचायच्या अगोदर पर्यंत मला अर्थच माहिती नव्हता आज कळला कविवर्य आरती प्रभू यांना मानाचा सलाम.