“माझे काळ्याचे पांढरे उगीच नाही झाले…..” घराघरातून ऐकू येणारे हे वाक्य, वाढत्या वयामुळे येणाऱ्या आयुष्यातील अनुभवांबद्दल बोलले जाते. अनुभवाने शहाणी झालेली माणसे त्यांच्यापेक्षा लहानांना हे वाक्य ऐकवतात. पण मोठ्यांऐवजी लहानांचीच ही समस्या असेल तर???
वाढत्या वया बरोबर केसांचे पिकणे /पांढरे होणे ही अगदी नैसर्गिक गोष्ट आहे. ती आपण आनंदाने स्वीकारतो. पण ७-८ वर्षाच्या मुलांपासून जेव्हा अकाली केस पांढरे होण्याची समस्या निर्माण होते तेव्हा मात्र ती चिंतेची बाब ठरते.
पूर्वी चाळीशीच्या पुढे जेव्हा केस पांढरे होण्यास सुरुवात होत असे, तेव्हा नैसर्गिक म्हणून ती गोष्ट सहज स्वीकारली जात असे. पण आता केस गळणे आणि अकाली पांढरे होणे ही चिंतेची बाब बनली आहे कारण लहान मुलांपासून सगळ्यांनाच ही समस्या भेडसावते आहे.
चांगले दाट आणि काळेभोर केस हा मनुष्याच्या व्यक्तिमत्वाचा एक महत्वाचा भाग आहे. त्यामुळे आपले केस अकाली पांढरे होऊ नयेत असे प्रत्येकाला वाटणे सहाजिकच आहे.
आपल्या शरीरात मेलानिन नावाचे द्रव्य असते. त्या द्रव्याच्या शरीरातील प्रमाणानुसार त्वचेचा आणि केसांचा रंग ठरतो. त्यामुळे मेलानिनची कमतरता ही केस पांढरे होण्याचे मुख्य कारण आहे. परंतु त्याशिवाय केस अकाली पांढरे होण्याची इतरही कारणे आहेत. ती कोणती ते आता आपण पाहूया.
१. केसांची निगा नीट राखली न जाणे
पूर्वी आठवड्यातुन एकदा तेल लावून, मग शिकेकाईने अंघोळ करून केसांची निगा राखली जात असे. आता शिकेकाईची जागा केमिकलयुक्त शॅम्पूने घेतली आहे. शॅम्पूचा अतिरिक्त वापर केसांच्या रंगाला घातक ठरू शकतो.
२. असमतोल आहार
पूर्वी शक्यतो घरचं जेवण घेतले जात असे, त्या मध्ये चटण्या, कोशिंबीरी, पालेभाज्या यांचा समतोल वापर होत असे… आता आहार पद्ध्ती बदलली. ब्रेड, पिझ्झा पास्ताचा जमाना आला. तळलेल्या, चमचमीत पदार्थांचे आहारातील प्रमाण वाढले. आहारामधील जीवनसत्व B-12, D-3, ओमेगा 3 फॅटी ऍसिड, लोह, कॉपर, आयोडिन, प्रथिने(केराटिन), व्हिटामिन A, बायोटिन यांची कमतरता केस पांढरे होण्यास कारणीभूत होते. पॅक फूड, जंक फूड, रिफाइंड आणि प्रोसेसज्ड अन्न पदार्थ वापरल्याने केसांच्या समस्या उद्भवतात.
३. अतिरिक्त ताण-तणाव
अतिरिक्त ताण-तणाव हा सध्याच्या जीवन शैलीचा एक भाग झालाय. अतिरिक्त ताणामुळे शरीरात नॉर- एपीनेफ्रीन नावाचे केमिकल तयार होते. त्यामुळे मेलानोसाइट स्टेम सेल्स वर परिणाम होतो आणि शरीरातील मेलनीनचे प्रमाण कमी होते. परिणामी केसांचा रंग पांढरा होऊ लागतो.
४. अनुवंशिकता आणि हार्मोनल इमबॅलन्स
अनुवंशिकता म्हणजे एका पिढी कडून दुसऱ्या पिढीकडे जाणारे जेनेटिक गुण. ह्या जेनेटिक गुणांमुळे परिवारात आधीच्या पिढीत अकाली केस पांढरे होण्याची समस्या असेल तर ती पुढच्या पिढीत देखील असण्याची शक्यता जास्त वाढते.
हार्मोनल इमबॅलन्स म्हणजेच होर्मोन्सचे असंतुलन हे वाढत्या वयाच्या मुलामुलींमध्ये दिसून येते. त्यामुळे लहान वयात केसांच्या समस्या उद्भवताना दिसतात. तसेच महिलांमध्ये मेनोपॉज म्हणजे पाळी जाण्याच्या काळात देखील अशा समस्याना तोंड द्यावे लागते.
५. हायपोथायरॉयडीझम
थायरॉईड होर्मोनचे शरीरातील प्रमाण कमी झाले की हा आजार होतो. त्यामुळे केस गळणे, अकाली पांढरे होणे अशा समस्या उद्भवतात. ह्या त्रासावर योग्यवेळी उपचार केले तर त्याचे केसांवर होणारे परिणाम टाळता येतात.
६. बद्धकोष्टता आणि अनिमिया
बद्धकोष्टता असेल तर, हिमोग्लोबिनचे रक्तातील प्रमाण आणि रक्तातील फेरीटीनचे प्रमाण कमी असेल तर केसांच्या समस्या उद्भवतात.
७. कोंडा
तसेच केसातील कोंडा म्हणजे एक प्रकारचं फंगल इन्फेक्शन हे ही एक कारण असू शकतं.
तर ही आहेत अकाली केस पांढरे होण्याची काही कारणे. त्यावर काय उपाय करता येतील ते आता आपण पाहूया.
१. केसांची योग्य निगा राखा
आठवड्यातून एकदा मेडिकॅटेड तेलाने मसाज करा आणि दुसऱ्या दिवशी कोमट पाण्याने (अगदी गरम नको) केस धुवा. केस हलक्या हाताने पुसा. ड्रायरचा वापर टाळा.
२. समतोल आहार घ्या
जंक फूड टाळा. चटणी, कोशिंबीर, पालेभाजी असा आहार घ्या. काजू बदाम मशरूम, बटाटा यांचा वापर आहारात योग्य प्रमाणात करा. बदाम, अक्रोड, लाल भोपळ्याच्या बिया या मेलानीन तयार करण्यास मदत करतात.
व्हिटॅमिन B-12 साठी अधमोरं दही, पनीर, केळं, गाजर, हिरव्या भाज्या आहारात असुदे. त्यामुळे शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढून पेशी स्वस्थ राहण्यास मदत होते. पर्यायाने केस मजबूत आणि सिल्की होतात.
३. पुरेसा व्यायाम आणि शांत झोप घ्या
हे अतिरिक्त ताण-तणाव घालवण्यासाठी उपयुक्त आहेत. दिवसातून एकदातरी २०-२५ मिनिटे चालणे/ पी.टी.चे व्यायाम करा.
तसेच १५ मिनिटे डोळे मिटून शांत बसा. ध्यानधारणा करा. दीर्घश्वसन, प्राणायाम अवश्य करा.
अनुवंशिकता आणि हार्मोनल इमबॅलन्सने होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी देखील पुरेसा व्यायाम आणि ध्यानधारणा उपयोगी ठरू शकेल.
४. हायपोथायरॉयडीझमचे उपचार
हायपोथायरॉयडीझम वर डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घेऊन मात करता येते.
५. बद्धकोष्ठता घालवण्यासाठी भरपुर पाणी प्या आणि पालेभाज्यांचा आहारात समावेश करा. फळांचे ज्यूस प्यायच्या ऐवजी नुसती फळे खा. शक्य असतील ती फळे सालासकट खावी.
हिमोग्लोबिन वाढण्यासाठी लोह युक्त आहार जसे बीट, खजूर, राजगिरा, नाचणी, पालक असे पदार्थ आहारात असणे गरजेचे आहे
६. कोंडा घालवण्यासाठी आठवड्यातुन एकदा केसांना दही, कोरफडीचा गर किंवा लिंबाचा रस लावा आणि नंतर कोमट पाण्याने केस धुवा जेणे करून इन्फेक्शन निघून जाईल.
तसेच केस धुण्यासाठी अति गरम पाणी वापरणे, कडक उन्हात फिरणे, टाळावे. तसेच धूम्रपान करू नये.
केसांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी औषधी तेलाचा वापर अवश्य करावा. असे तेल घरच्या घरी तयार करणे सहज शक्य आहे. कसे ते आपण पाहूया.
१) आवळा व खोबरेल तेल मिळून केलेलं तेल,
२) कांद्याचा रस, मेंदी+एरंडाचे तेल+लिंबू मिळून केलेलं तेल,
३) मेथी/तीळ भिजल्यावर केलेली पेस्ट केसांना लावणे हे उपाय केसांची समस्या काही प्रमाणात सोडवतात.
४) ५०० मि. लि. खोबरेल तेल + १ चमचा कांदा बिया + १ चमचा मेथी बिया + १० कडीपत्ता पाने एकत्र उकळा. नंतर ५ दिवस उन्हात ठेवा आणि वापरा.
५) आवळा हा अँटी ऑक्सिडंट असतो. आवळा पाण्यात उकळून ते पाणी केस धुवायला वापरा.
६) आवळा रस + बदाम तेल + लिंबू + खोबरेल तेल एकत्र करून वापरा.
७) आठवड्यातून एकदा गाईच्या दुधापासून तयार केलेले लोणी केसांना लावा.
८) दोडका उन्हात वाळवून त्याची पावडर करा. त्यात खोबरेल तेल घालून ५ दिवस उन्हात ठेवा. ते तेल केसांना वापरा.
९) हैड्रोजन पेरॉक्साइडमूळे अकाली केस पांढरे होतात. कांद्याचा रस आणि लिंबाचा रस एकत्र करून लावल्यास फायदा होतो.
१०) चहा उकळलेल्या पाण्यात मेहंदी भिजवून केसांना लावल्यास केसांचा रंग बदलण्यास मदत होते. केमिकलयुक्त डाय वापरण्यापेक्षा नैसर्गिक पदार्थ केसांना लावून केसांचा रंग बदलता येऊ शकतो.
तर मित्र मैत्रिणींनो, ही आहेत केस अकाली पांढरे होण्याची कारणे आणि त्यावरचे काही उपाय. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
Dhanyawad 🙏