भारताच्या ताफ्यात नव्याने सामील झालेली शक्तिशाली पाणबुडी आय.एन.एस. अरिहंत

कालच आय.एन.एस. अरिहंत ने डीटरन्स पेट्रोल यशस्वीरीत्या पूर्ण केले. डिटरन्स पेट्रोल पूर्ण केले म्हणजे नक्की काय? त्याने भारताला काय फायदा होणार? आय.एन.एस. अरिहंत मध्ये असं काय वेगळं आहे? याचं महत्व कदाचित सामान्य माणसाला कळणार नाही. मिडियामध्ये दिसणाऱ्या फोटो वरून असाच एखादा उद्घाटनाचा कार्यक्रम पंतप्रधानांनी केला इतकंच सामान्य माणसाची बुद्धी विचार करते. पण हे सगळं समजून घेणं महत्वाचं आणि तितकच रंजक आहे.

आय.एन.एस. अरिहंत

आय.एन.एस.अरिहंत ही अरिहंत क्लास मधली एक पाणबुडी आहे. अरिहंतचा अर्थ होतो “विनाश करणारी”. शत्रूच्या गोटात खळबळ माजवणारी ही पाणबुडी तब्बल ६००० टन (१ टन म्हणजे १००० किलो) वजनाची आहे. इतक्या महाकाय असणाऱ्या पाणबुडीचं वशिष्ठय म्हणजे त्याला शक्ती देणारं फ्युएल आहे, आण्विक उर्जा. १९९८ मध्ये तत्कालीन संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडीस ह्यांनी २.९ बिलियन अमेरिकन डॉलर किमतीच्या अश्या एडव्हांस टेक्नोलॉजी व्हेसल प्रोजेक्ट ला मान्यता दिली. ज्यात ४ अरिहंत क्लास आण्विक पाणबुड्या बनवल्या जाणार होत्या. ह्यात सगळ्यात महत्वाची होती ती म्हणजे अणुभट्टी. जगातील अमेरिका, रशिया ह्या देशाखेरीज पाणबुडी मधील अणुभट्टीचं तंत्रज्ञान कोणाकडेच नव्हतं आणि ह्यातला कोणताही देश भारताला हे तंत्रज्ञान देणाऱ्यातला नव्हता. भारताचा भरवशाचा मित्र असणाऱ्या रशिया ने पण मागच्या दाराने काही मदत देण्याचं मान्य केलं. तरीही पाणबुडीच्या आकारात बसेल अशी अणुभट्टी तयार करून ती सुरक्षिततेच्या सगळ्या मापदंडात बसवणं हे खूप मोठं शिवधनुष्य भारताच्या संशोधकांपुढे होतं. भाभा अणुसंशोधन केंद्र, मुंबई आणि कल्पकम येथे असलेले Madras Atomic Power Station.  ह्यांनी मिळून ह्या पाणबुडीसाठी ८३ मेगावॉट ची अणुभट्टी तयार केली. एनरीच युरेनियम वर चालणारी ही अणुभट्टी ‘क्रिटीकल’ करणं हेच मुळी कठीण काम होतं. १० ऑगस्ट २०१३ ला अणुभट्टी क्रिटीकल झाली म्हणजे ह्यात निर्माण होणारे न्युट्रॉन पुढे युरेनियमच्या अणुचं विखंडन करत राहतात आणि अश्या तऱ्हेने अणुउर्जेचा स्त्रोत सुरुच राहतो.

ह्या पाणबुडीच्या आकाराची निर्मिती L & T  ने तर कंट्रोल सिस्टीम टाटा पॉवर एस.ई.डी. ने केली आहे. ह्या पाणबुडीचं टर्बाईन अणुउर्जेचा वापर करत तब्बल ४७,००० हॉर्सपॉवर ची निर्मिती करते. पाण्याखालून ४४ किमी/ तास वेगाने तर पाण्यावरून २८ किमी/ तास वेगाने ही पाणबुडी जाण्यास सक्षम आहे. एकावेळेस ९५-१०० माणसांना घेऊन ही कितीही लांब आणि कितीही दिवस प्रवास करू शकते. कारण ह्यातील उर्जेचा स्त्रोत हा न संपणारा आहे. (फक्त त्यावर असणाऱ्या माणसांना लागणारे खाद्यपदार्थ किंवा इतर कारणांसाठी तिला जमिनीकडे यावे लागते.) उर्जेचा अखंड स्त्रोत असल्याने पाण्याखालून ३५० मीटर खोलीतून जगाच्या कानाकोपऱ्यात जाण्यास सक्षम आहे. ह्या पाणबुडीवर अतिशय घातक अशी के ४ मिसाईल बसवली असून ह्याची क्षमता तब्बल ३५०० किमी. पर्यंत मारा करण्याची आहे.

ह्या पाणबुडीचं नियंत्रण न्युक्लीअर कमांड ऑथोरीटीकडे (NCA ) असून ह्याचे अध्यक्ष हे भारताचे पंतप्रधान असतात. भारताकडे जमिनीवरून मारा करणारी अग्नी बलास्टिक मिसाईल आहेत तर हवेतून सुखोई तसेच इतर बॉम्बर विमान बलास्टिक मिसाईल डागू शकतात. पण फक्त दोन देशांकडे असलेली आणि पाण्याखालून असणारी ही क्षमता आज भारताने मिळवली आहे. डिटरन्स पेट्रोल म्हणजे आता ही पाणबुडी पाण्याखालून शत्रूवर हल्ला करण्यास तयार आहे. कारगिल विजय दिवसाच्या दिवशी २६ जुलै २००९ ला तत्कालीन पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग ह्यांनी आय.एन.एस. अरिहंत ला हिरवा झेंडा दाखवला होता. आता सगळ्या चाचण्यांमधून पास होऊन, देशाच्या सागरी किनारे आणि आजूबाजूचा समुद्र ह्यांच्या संरक्षणाची धुरा पेलण्यास ती समर्थ झाली आहे. ही पाणबुडी पाण्याखालून शत्रूच्या शहरांवर क्षेपणास्त्र हल्ला करून त्यांच्या नजरेपासून लपून राहू शकते. कारण जमिनीवरून शत्रूच्या शहरात किंवा हवेतून शत्रूच्या ठिकाणी हल्ला करताना त्यांच्या नजरेत येण्याची खूप शक्यता असते. पण पाण्याखालून अशी मारक क्षमता असल्याने पाणबुडी हि युद्धनीतीतली एक बलाढ्य कडी ठरू शकते. आजवर अमेरिका, रशिया ही दोनच राष्ट्र अशी क्षमता राखून होते पण आता त्यात भारताचा समावेश झाला आहे. चीननेही आपल्या पाणबुडीच्या २०१५ पासून चाचण्या सुरु केल्या आहेत. चीन हिंद महासागरात आपली ताकद वाढवत असताना भारताकडे अशी क्षमता असणं खूप गरजेचं होतं. आज आपण ती क्षमता ग्रहण केल्याने भारताची ताकद वाढणार आहे.

एक सामान्य माणूस म्हणून ह्या गोष्टी आपल्यासाठी महत्वाच्या नसल्या तरी ज्या वैज्ञानिकांच्या, संशोधकांच्या प्रयत्नांनी भारताला पाण्याखालची परमाणु शक्ती असणारा देश असा गौरव प्राप्त झाला आहे ते सर्वच कौतुकास पात्र आहेत. आय.एन.एस. अरिहंत च्या निर्मितीमागे असणाऱ्या सर्वच लोकांना माझा सलाम.

मनाचेTalks च्या लेखांबद्दल वाचकांच्या प्रतिक्रिया….

वाचण्यासारखे आणखी काही…

खगोल / अंतराळ
प्रेरणादायी/MOTIVATIONAL


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।