आपण राजाच्या घरी जन्माला यावं की गरीबाच्या घरी जन्माव हे आपल्या हातात नसतं. जीवन म्हटलं की दुःख, अस्वस्थता आणि कमतरतेच पुराण वगैरे असतं. मग गरीबाची वेगळी आणि श्रीमंतांची दुःख वेगळीच असणार, हे तर खरंच आहे पण कोणताच माणूस या जगात पाहिजे तसा सुखी नसतो. बॉलीवूडवर राज्य करतो म्हटल्यावर त्याला काय कमीये? त्याला कसला त्रास आलाय मरायला? त्याला कशाला गरीबाची दया येईल? अशी आपली भावना असते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सेलेब्रिटींच्या वैयक्तिक आयुष्यात डोकवण्यात अगदी मिडियापासून ते सामान्य माणसापर्यंत सगळ्यांनाच खूप इच्छा असते. पैशाच्या महालात राहणाऱ्याचे पाय पण मातीचे असतात आणि तो ही तीच अस्वस्थता जीवनाच्या प्रत्येक टप्प्यात अनुभवत असतो जी कधी काळी आपण पण अनुभवलेली असते. फक्त या रुपेरी दुनियेच्या वलयाने त्याबाबत एक विशेष आकर्षण आपल्या मनात निर्माण केलेलं असत. मग असाच एखादा करण जोहर, असंच एखादं पुस्तकं लिहितो आणि आपल्या जीवनाचा पट सर्वांकरता खुला करतो. मग आपल्याला कळू लागतं की या रंगेबिरंगी चेहऱ्यांच्या पाठीमागे कशी दुःख पेरली गेली आहेत. आयुष्याचा संघर्ष कोणालाच चुकत नसतो आणि आयुष्य आपल्याला कोणत्या टोकाला घेऊन जाईल हेही कळत नसतं. फक्त संघर्ष करण्याची वृत्ती, इतरांपेक्षा वेगळी विचारशैली आणि अपार मेहनतच या जगात आपल्याला तगवू शकते हे तत्व हे पुस्तक वाचून मला कळलं.
“आता मी 44 वर्षाचा आहे आणि चांगलाच स्थिरावलोय. माझ्या वैयक्तिक आयुष्यावर आधारित असणारा “ऐ दिल है मुश्किल” ने मला अमाप यश मिळवून दिलंय. मला या चित्रपटातून व्यक्त होता आलं आणि माझ्या दुःखांच सोन झाल्याचा मी अनुभव घेतला” अशी पुस्तकाची सुरुवात करण जोहर करून देतो. पुस्तकाची पान पलटत जातात तसतसं त्याच्या बरोबर आपण लहानाचे मोठे होतो अस वाटतं राहतं. तो आपल्याच तोंडची भाषा बोलतोय मग ती “आनंदाची असो किंवा अस्वस्थतेची”. बालपणाच्या उंबरठ्यावर जाड असल्यामुळे आणि एकुलता एक असल्याने शाळेत झालेली हेळसांड, घरी जाणवत असणार एकटेपण अगदी ठळकपणे त्यानं मांडलंय. त्यातच त्याला शाळेमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात लागलेला सूर आणि त्या आनंदाने त्याचं मोहरून जाणं हे आश्वासकतेच्या दिशेने केलेलं मार्गक्रमण असतं. आई वडिलांविषयीच प्रेम, वडिलांच्या कॅन्सरच आजारपण आणि त्यात सगळ्यांची होणारी भावनिक ससेहोलपट अलगद आपलेही डोळे ओले करून जाते.
आदित्य चोप्राच्या एका वाक्यावर भर देऊन त्याच बदलून गेलेलं जीवन आणि “कुछ कुछ होता है” च्या निर्मितीने दुनियेच्या पटलावर त्याचा झालेला उदय म्हणजे एखादा चमत्कार वाटावा असाच आहे. दरम्यान शाहरुखपासून इतर कलाकारांबरोबर झालेली मैत्री, वाद आणि बॉलीवूड जगताचा उभा आडवा छेद घेऊन तो वाचकांना अगदी सोप्या भाषेत मांडण्यात लेखक यशस्वी झाला आहे असं पुस्तक वाचताना राहून राहून वाटत राहतं. कोणत्याही गोष्टींचा हातचा न राहता स्वतःला जे सांगावस वाटलं ते करण अगदी मोकळेपणाने मांडतो. आजचं बॉलीवूड आणि मागच्या २० वर्षातील चित्रपट सृष्टीतील चढउतार नेमकेपणाने लेखकाने मांडले आहेत.
वयाच्या २० व्या आणि ३० व्या वर्षात प्रेमात पडून हृदयाचे तुकडे झालेला करण आपली करुण कहाणी मांडतो. त्याच्या चिंता, त्याचा प्रेमभंग झाल्यामुळे आलेलं नैराश्य आणि त्यासाठी करावा लागलेला संघर्ष, चित्रपटनिर्मितीचे आनंद देणारे आणि काळीज कोरणारे अनुभव मनाला चांगलेच भिडतात. हे दुःख इतकं विदारक असतं की त्याला मानसोपचार तज्ञाकडे उपचारार्थ जावं लागतं. याशिवाय लग्न न करण्यामुळे पुढे “आपल्यासाठी कोण?” या प्रश्नांवर त्याचा उत्तर शोधण्याचा प्रयत्न दिसतो.
तुम्ही जसं पुस्तकाच्या पोटात शिरता तसं चित्रपट निर्मितीचा पटच तुमच्या डोळ्यासमोर उभा राहतो. म्हणजेच चाहत्यांना काय आवडेल?, काय नको, चित्रपट समीक्षक कशा पद्धतीने चित्रपटाकडे बघतो अशा बारीकसारीक गोष्टींची माहिती मिळत जाते. कपडे, लोकेशनपासून ते विविध बॉलीवूड कलाकारांची, निर्मात्याची आणि दिग्दर्शकांची माहिती तर मिळतेच, त्याबरोबर एखादा चित्रपट कसा उभा राहतो, त्याची कथा कशी उभा राहते या गोष्टींचे तपशीलही मिळत जातात. एखादया कलाकृतीला जन्म देणे, त्यासाठी अपार मेहनत घेऊनही हवी ती प्रसिद्धी आणि पुरस्कार न मिळाल्यावर मनाचा बांध कसा फुटतो यावर खूपच मार्मिक विवेचन वाचायला मिळत.
करणचे प्रेम, विवाह, व्यभिचार, शारीरिक संबंध याबाबतची मत जाणून घेण्यासाठी, तसेच “आपण समलैंगिक आहोत” असा होणारा आरोप आणि त्याच्याशी संबंधित असणारे वाद समजून घेण्यासाठी हे पुस्तक तुम्हाला नक्कीच वाचायला हवं.
पुस्तकाची इंग्रजी आणि मराठी आवृत्ती..
An Unsutable Boy
खरं सांगायचं तर
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.