“Where there is a will, there is a way” इच्छा शक्ती जर प्रबळ असेल तर ती व्यक्ती सर्व अडचणींवर मात करते, आणि मेहनत करायला जे घाबरत नाही ते कधीही जीवनात अपयशी ठरत नाहीत… मग ते अपंग असले तरीही..
अपंगत्त्वावर मात करणारे असतात. आपले अपंगत्व जगासमोर न मांडता त्यातूनही ते मार्ग काढत असतात.
मग नकळतच शासकीय सेवेतील लोक आठवतात थोड्या थोड्या गोष्टींचा बाऊ करुन छोटंसं अपंगत्व असलं तरी ते आपला दुबळेपणा दाखवून त्यामधून पळवाटा काढत असतात आणि लोकांकडून सांत्वन करून घेत असतात…
पण ज्याला नोकरीच नाही, रोजची कमाई करून जे आणि जसं मिळतं त्यामध्येच समाधान मानावं लागतं.
अश्या काही अपंग व्यक्ती न डगमगता, आपलं अपंगत्वाचं भांडवल न करता किंवा कुणाकडून कसलीही मदत, सहानुभूती न घेता स्वबळावर जीवन जगत असतात.
आपण रोजच्या जीवनातील कितीतरी कर्तृत्ववान, यशस्वी अपंगत्वांवर मात करणारे खेळाडू, कलाकार इ. बघत असतो वर्तमानपत्र, टीव्ही वरील बातम्यांमध्ये त्यांच्या कर्तृत्वाविषयी वाचत किंवा बघत असतो.
‘खरंच हे यांना कदाचित देवाकडूनच मिळालेलं वरदान असतं…!!’
म्हणतात ना, “प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे”
अशक्यातून शक्यप्राय गोष्टी करणे..
सतत प्रयत्न करुन निरंतर काम करीत राहणे, कुणाकडेही याचना न करता किंवा कुणाचीही सहनुभूती न घेता आपल्याच विश्वात रममाण होऊन आपले काम अविरत सुरू ठेवायचे हाच यांचा मानस असावा.
असाच मानस असणारी, अंध व्यक्ती म्हणजे शामराव बांबोळे.
म्हणायला शासकीय कार्यालयात काम करणारा, पण शासकीय सेवेत नसलेली हि व्यक्ती..
दोन्ही डोळ्यांनी अंध, साधारणतः वय वर्ष ५४ -५५, किरकोळ शरीरयष्टी, काळासावळासा पण आवाजात तेवढाच कणखरपणा…
शामराव बांबोळे आशिया खंडातील दुसऱ्या नंबर वर असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे लाकडी खुर्ची (केनिंग) विणण्याचे काम मिळाले तर करीत असतात.
खरं म्हणजे आपण रोजच्या जीवनात अशा बरेच लोकांना बघत असतो पण कधी त्यावर विचारच करीत नाही किंवा हे साहजिकच आहे असे वाटायला लागते.
पण कधी कधी काही गोष्टी मनावर ठसा मारून जातात.
अंगाची लाही लाही होत होती. वातावरणातील दाह वाढत होता. तापमानाने ४६℃ चा आकडा पार केलेला असतांना हि व्यक्ती व्हरांड्यात बसून, उष्ण झळांमध्ये शांतपणे अगदी सफाईने खुर्ची विणण्याचे काम करीत हाती.
सामान्य माणसाला तिथे उभे रहायला कठीण असतांना हा आपल्याच विश्वात गुंग..! ना कुठला पंखा, ना कुलर ,ना ए. सी.!! इतक्या गर्मी मध्ये हा कसा काम करीत असेल?
पोलादाचा तर बनलेला नाही ना? एक क्षणीक विचार मनात डोकावून गेला. पण त्यादिवशी त्याचे काम बघून कुतूहल वाटायला लागले आणि डोक्यामध्ये असंख्य विचारांनी गर्दी केलीय.
डोळसालाही लाजवेल इतकं सुंदर काम!!
याला कसे दिसत असेल? किती सुंदर डिझाईन..!! हे कसे कळत असेल? त्याच्या त्या स्पर्शाने त्या जुन्या तुटक्या खुर्च्या देखील नव तरुणीसारख्या दिसायला लागल्या आणि पुन्हा नव्याने ऐटीत नवी ओढणी घेऊन रांगेत उभ्या राहिल्या.
पण मनात प्रश्न? हा आता एकटाच का दिसतो? आधी त्याच्यासोबत एक बाई यायची ती आता का दिसत नाही त्यालाच विचारावं असे ठरविले.
बरेच वर्षांपासून त्त्या दोघांना खुर्च्या विणतांना मी पहात आलेले आहे माझी नोकरी तिथेच असल्या कारणाने मी त्यांना एकमेकांचा आधार घेत असताना पाहिलेले आहे..
सारखे विचार मनात रुंजी घालत होते मग मी त्याला विचारायचेच ठरवीले. खरं म्हणजे कुणाच्या खाजगी जीवनात कशाला डोकवायचे? पण मन मानत नव्हते.
न राहवून मी विचारले “दादा, तुम्ही आता एकटेच का येता? तुमच्यासोबत ज्या बाई यायच्या त्या दिसत नाहीत आता?”
अतिशय कडक आवाजात म्हणाला, “नाही येत ती”
मला थोडावेळ वाटलं उगीचच याला आपण विचारले. किती उर्मठपणे उत्तर देतोय हा..
नंतर कळले त्याची बोलण्याची शैलीच तशी होती कारण तो डोळे बंद व दोन्ही हातामध्ये केन असल्यामुळे मला तसे वाटणे साहजिकच असावे.
मग मी थोडावेळ त्याची माहिती घेतली आणि परत म्हणाले, “दादा तुमच्याविषयी काही लिहू का?”
त्यावर तो अतिशय आनंदातच म्हणाला, “लिहा लिहा” त्याच्या चेहऱ्यावर इतका आंनद दिसत होता की, असं वाटत होतं, शिंपल्यातून जणू मोती मिळावा…
आणि मी सुद्धा हुश्शश केलंय.
तो सांगत होता मी ऐकत होते….. म्हणाला, “ताई, माझ्या आईवडिलांची दोन अपत्य म्हणजे मी आणि माझी बहिण जी माझ्यासोबत यायची.
मला जन्मताच काचबिंदू. वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली कारण परिस्थिती हालाकीची…
चार वर्ष पर्यंत मला थोडे थोडे दिसायचे नंतर हळूहळू माझ्यासाठी जगच अंधाराने भरून गेलं… पुरता अंधारातच बुडालो…
माझी बहिण डोळस.. नंतर तिलाही काचबिंदू झाला पण ती थोडं थोडं बघू शकत होती.
तिचं लग्न झालं, दोन मुली आहे तिला आणि एकीला तर नोकरी पण मिळाली, एक शिकत आहे. आईवडील पण गेले.
हि बहिणच माझा आधार होती तिच्या मदतीने मी इथपर्यंत यायचो आणि आम्ही दोघं सोबत खुर्ची विणण्याचे काम करत होतो. आता तिलापण दिसणं पूर्ण बंद झालं.
आता मी एकटाच येऊन काम करतो. गेल्या पंचवीस वर्षांपासून मी इथे येऊन खुर्ची विणण्याचे काम करतो.
८-९ किलोमीटर वरून येणे जाणे करून मी हे काम करतो.
इथल्या लोकांसोबत ओळख झाल्यामुळे मला कुणीही गाडीवर बसून घेतात नाहीतर मी ऑटो नी वगैरे जातो. इतकेच नव्हे तर सॉक्स सुद्धा विकतो, नवीन वर्ष लागले की कॅलेंडर विकायला घेऊन येतो.
आम्ही ऑफिस मधील सर्व जण त्याला तेवढाच हातभार म्हणून त्याचेकडून कॅलेंडर विकत घेतो.
याव्यतिरिक्त तो उन्हाळ्यात कुलरसेंट, अगरबत्ती पण विकतो.एकाच कामावर विसंबून न राहता तो बरंच काही करीत असतो. त्याने काही डिप्लोमा पण घेतलेले आहेत.
म्हणाला, “ताई मी डिप्लोमा घेऊन नोकरी शोधली पण अंध असल्यामुळे नोकरी मिळाली नाही आणि नोकरीसाठी पैसा मागत होते. कुठून पैसे देणार? नोकरी मिळाल्यानंतर पगारातून कापा ते पण नाही. सगळीकडे निराशाच निराशा..!!! फक्त आशा ठेऊन मी इथे येत गेलो आज नाही उद्या नोकरी मिळेलच” पण नाही मिळाली शेवटी हे काम पकडले.
कुणाला जर मी रस्ता पार करण्यास मदत मागितली तर माझ्या हातावर ते एक रुपया ठेवतात त्यांना असं वाटतं की मी अंध असल्यामुळे भीक मागत आहे तेव्हा मला खूप वाईट वाटते आणि मग मी त्यांना आवाज देऊन सांगतो तुमची ही एक रुपयाची मला भीक नको..
हे तुमचे पैसे घेऊन जा.. आणि अभिमानाने सांगतो मी मेडिकल मध्ये काम करतो आणि पैसे कमावतो…
मला फुकट पैसे नको मी कामाचाच मोबदला घेईन. हे ऐकून मलाही त्याचा अभिमानच वाटायला लागला.
खरंय हे… जगावं तर असं स्वाभिमानाने…!! आणि मनातच म्हटले शामराव सलाम तुझ्या कार्याला, तुझ्यातील प्रामाणीकतेला, एकाग्रतेला आणि निष्ठेला…🙏
असे कितीतरी शामराव असतील जे अपंग असतील आणि त्यांना शासकीय सेवेमध्ये समाविष्ट केले नसेल तर त्यांनी असंच जगावं का?
त्यांचेकडे द्यायला पैसे नसेल तर त्यांना शासकीय नोकरीच मिळणार नाही का? त्यांनी सदैव कष्ट करूनच जीवन जगावं.
असा हा शामराव बरीच काही शिकवण देऊन शेवटची खुर्ची विणून म्हणाला, “माझं आता काम संपलय…. अजून खुर्च्या विणायला मिळाल्या तर येईलच” किती आशावादी…!!
खरं तर या खुर्च्या आता सरकारी कार्यालयातून सुद्धा नामोशेष होत आहेत. मग याला कुठले काम मिळणार? पटकन हा प्रश्न मनात डोकावलाच आणि वाटायला लागले शामराव तुझ्यासमोर डोळस असून काहीही काम न करणारे, दुसऱ्यावर अवलंबून असणारे आळशी लोक पाहिले की, असे वाटते की, तू खरोखरच अंध नसून डोळस आहेस आणि मनाने किती श्रीमंत आहेस..
पुन्हा एकदा म्हणावेसे वाटते ,”शामराव तुला त्रिवार वंदन…!!” आणि पुढील वाटचालीस तुला खूप खूप शुभेच्छा.
हा लेख वाचून काही वाचकांनी शामराव बंबाळेंना काही काम देऊन मदत करता येऊ शकेल यासाठी त्यांचा पत्ता मागितलेला होता.
पत्ता: शामराव लक्ष्मण बाम्बोळे
द्वारा… कुंदा कन्हेरे
सरोज किराणा स्टोअर
पाचपावली पोलीस चौकी
सर्कल 15/21
लष्करीबाग
नागपूर…
9370329208
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी किंवा तुमचे स्वतःचे लेखन मनाचेTalks वर प्रकाशित करण्याची इच्छा असल्यास येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
अतिशय सुंदर लेख आहे आणि कृपया ह्या काकांचा फोन नंबर द्या मला होईल तेवढे अशा कामाची माहिती देईल त्यांना