तुम्हाला सतत जांभया येतात का? कोणालाही वारंवार जांभया येत असतील तर त्याचा संबंध सहजपणे झोप न होण्याशी आणि कंटाळा येण्याशी जोडला जातो.
परंतु सतत जांभया येणे हे खरंतर शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्याचे लक्षण आहे.
शरीरातील ऑक्सिजन चे प्रमाण कमी झाले की शरीराची एनर्जि लेवल कमी होते आणि थकवा किंवा कंटाळा आल्यासारखे वाटते, झोप आल्यासारखे वाटते आणि त्याचे निर्देशक म्हणून जांभया येऊ लागतात.
जांभयांमधून शरीर जास्त प्रमाणात ऑक्सिजन मिळवण्याचा प्रयत्न करू लागते.
तसेच आपल्या आजूबाजूला घडत असणाऱ्या गोष्टीत, घटनेत, चर्चेत आपल्याला फारसा रस वाटत नसेल, कंटाळा आला असेल तरीही जांभया येऊ लागतात.
शिवाय आपण सर्व हे जाणतोच की जांभया येणे संसर्गजन्य आहे, ग्रुपमध्ये एखाद्याला जांभया येऊ लागल्या की सर्वांना आपोआप जांभया येऊ लागतात.
जांभया येणे हे अत्यंत नैसर्गिक आहे.
झोप आलेली असताना किंवा कंटाळा आलेला असताना जांभया येणे हयात काळजी करण्यासारखं काही नाही.
परंतू एखाद्या व्यक्तीला एका मिनिटात एकापेक्षा जास्त जांभया ह्या वेगाने सतत जांभया येत असतील तर त्या काहीतरी आजारामुळे येत असण्याची शक्यता आहे.
त्यामुळे कधीतरी जांभया येणं हे निरुपद्रवी असलं तरी सतत जांभया येत असतील तर त्याची कारणे शोधून त्यावर उपाय करणे गरजेचे आहे.
एखाद्या व्यक्तीला सतत जांभया येण्याची कारणे खालीलप्रमाणे
१. अपुरी किंवा अशांत झोप
कामाचे तास वाढल्यामुळे तसेच कामाकरिता कराव्या लागणाऱ्या प्रवासमुळे अनेक लोकांना रात्री झोपण्यास खूप उशीर होतो.
तसेच सध्याच्या काळात टीव्ही, मोबाइल, इतर ओटीटी माध्यमे ह्यामुळे रात्री जगून स्क्रीन वर काही ना काही पाहण्याचे प्रमाण वाढले आहे.
त्यामुळे अनेक लोकांना रात्री गाढ व शांत झोप मिळत नाही, पुरेशी झोप मिळत नाही.
झोपेपर्यंत हातात मोबाइल असल्यामुळे झोप लागल्यावरही डोक्यात काही ना काही विचार चालू राहतात आणि त्यामुळे झोप डिस्टर्ब होते.
ह्या सर्व प्रकारामुळे दिवसा अस्वस्थ वाटणे, दमल्यासारखे वाटणे, कंटाळा येणे, कामावर लक्ष केंद्रित न होणे असे होऊ लागते.
आणि सतत जांभया येऊ लागतात.
परंतु हे टाळता येणे सहज शक्य आहे. प्रत्येकाने आपले झोपेचे टाइम टेबल नीट आखून घेतले पाहिजे.
रात्री ८ तासांची पुरेशी शांत व गाढ झोप मिळेल हयाकडे कटाक्षाने लक्ष दिले पाहिजे.
म्हणजे मग दिवसा सतत जांभया येण्याचा त्रास होणार नाही.
२. चिंता आणि नैराश्य
ज्यावेळी कोणतीही व्यक्ति एखाद्या चिंतेने किंवा नैराश्याने घेरलेली असते तेव्हा त्या व्यक्तीला त्या विचारांमुळे रात्र रात्र झोप लागत नाही आणि त्यामुळे अर्थातच दिवसा ह्या गोष्टीचा परिणाम होऊन दिवसभर जांभया येत राहणे, उत्साह न वाटणे असे होऊ लागते.
तसेच चिंता आणि नैराश्याचा परिणाम आपल्या हृदय गतीवर, श्वासावर देखील होतो, त्यामुळे देखील शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊन जांभया येणे वाढते.
काही वेळा ह्या आजारांसाठी दिलेल्या औषधांमुळे देखील जांभया येण्याचे प्रमाण वाढते.
३. हृदयाचे विकार
वेगस नावाची नस आपल्या शरीरात मेंदूच्या टोकापासून ते मज्जातंतु च्या सहाय्याने संपूर्ण शरीरात पसरलेली असते.
ही नस जर काही कारणाने उत्तेजित झाली तर माणसाची हृदयगती कमी होते.
श्वास घेण्याचे प्रमाण कमी होते. ज्यामुळे शरीरातील ऑक्सिजन चे प्रमाण कमी होऊन सतत जांभया येऊ लागतात.
ह्यास शास्त्रीय भाषेत वेसोवेगल रिएक्शन असे म्हणतात.
४. थंड हवेचे प्रदेश
जर एखाद्या ठिकाणची हवा थंड असेल, ते ठिकाण उंचावर असेल तर तेथे लोकांना जास्त प्रमाणात जांभया येतात.
त्यामुळे त्यांच्या शरीरातील ऑक्सिजन चे प्रमाण वाढते तसेच शरीराचे तापमान वाढून थंडी कमी होते.
५. फीट येणे
काही लोकांना फीट येण्याचा त्रास असतो. अशा वेळी अर्धवट फीट आलेली असताना शरीरातील ऑक्सिजन कमी होऊन खूप जांभया येऊ लागतात.
तर ही आहेत सतत जांभया येण्याची काही कारणे.
जांभया येणं हे तसं निरुपद्रवी असलं तरीही सतत जांभया येणं हे अर्थातच चांगलं लक्षण नव्हे.
त्यामुळे असे होत असेल तर त्यामागचे कारण शोधून काढा आणि त्यावर योग्य ते उपाय करा.
स्वस्थ रहा आनंदी रहा.
रक्तातली ऑक्सिजनची पातळी वाढवण्याचे उपाय वाचण्यासाठी येथे क्लिक करा
लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.