महाराष्ट्रीयन स्त्रियांचा पारंपरिक पोशाख नऊवारी लुगडं आणि त्याचा इतिहास..
माझ्या लहानपणी मुबईत माझ्या शेजारी राहाणारे बलसाड गावचे गुजराती त्यांचं वाळत घातलेलं धोतर शोधताना ‘मारू लुगडु क्यां गयु..’, असं त्यांच्या बायकोला विचारताना मी ऐकायचो, तेंव्हा मला भारी मौज वाटायची. हा माणूस धोतराला लुगडूं का म्हणतो, असा विचार तेंव्हा मनात यायचा, कारण माझ्या तेंव्हाच्या ठाम समजुतीप्रमाणे लुगडं म्हटलं की, ते नऊवारी असतं.