‘कोणतीही सेवा-सुविधा समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचायला हवी’ हे सामाजिक न्यायाचे महत्त्वाचे तत्व आहे. यामध्ये आर्थिक व्यवहारांची सुलभता हा ग्राहक म्हणून आपला हक्क आहे. अनेकदा असे होते की खास ग्राहकांसाठी काय सोई सुविधा आहेत हेच त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. ज्यांनी त्या दिल्या पाहिजेत त्यांना त्यात विशेष स्वारस्य अथवा जबाबदारीची जाणीव नाही. बँकिंग व्यवहार करताना अशा कोणत्या सोई सवलती खास ग्राहकांना उपलब्ध आहेत याची माहिती घेऊयात.
बँकिंग व्यवहार करण्यात, जेष्ठ नागरिक आणि दिव्यांग (अपंग) व्यक्ती, अंध व्यक्ती यांना येणाऱ्या अडीअडचणींचा विचार करून देशाची मध्यवर्ती बँक ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’ यांनी बँक व्यवहार करतांना काही सोईसवलती दिल्या आहेत. यासंदर्भात वेळोवेळी आदेश देऊन या सुविधा देण्यास त्यांनी सर्व बँकांना सांगितले आहे. प्रत्यक्षात अशा सेवा सुविधा दिल्या जात नाहीत किंवा काहीतरी कारणे देऊन नाकारल्या जातात. कोणत्याही बँकेने मग ती सरकारी, सहकारी अथवा खाजगी, यांनी या सुविधा संबंधितांना देणे जरुरीचे आहे. त्याचप्रमाणे अशा सुविधा दिल्या जात नसतील तर त्या बँकेविरुद्ध तक्रार करणे हे ग्राहकांचे कर्तव्य आहे. ग्रामीण प्रादेशिक बँका, अलीकडे परवानगी मिळालेल्या स्मॉल फायनान्स बँक आणि पेमेंट बँक यांनाही हे नियम लागू आहेत. या सोईसवलती कोणत्या ते पाहू.
डिजिटल व्यवहाराला प्रोत्साहन देणे असे सर्वसाधारण बँकिंग धोरण असले तरी जेष्ठ नागरिक व अपंग व्यक्तींच्या क्षमता लक्षात घेऊन त्यांना बँकेत येऊन व्यवहार करायचे असल्यास त्यास नकार देऊ नये.
असे व्यवहार करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात यावी ज्यामुळे संबंधित व्यक्ती तेथे जाऊन सुलभतेने आपले व्यवहार करेल. यासाठी शिखर बँकेने बँकांना सुचवले आहे की-
- जेष्ठ नागरिक /अपंग यांना त्यांचे व्यवहार कुठे करता येतील अथवा त्यांच्या व्यवहारांना कुठे प्राधान्य देण्यात येईल याची स्पष्ट सूचना बँकेच्या दर्शनी भागात लावावी.
- अनेक व्यक्तींना दरवर्षी पेन्शन घेत असलेल्या बँकेत जीवन प्रमाणपत्र द्यावे लागते आता संगणकीय प्रणाली (CBS) लागू झाल्याने असे प्रमाणपत्र त्या व्यक्तीस कोणत्याही शाखेत देता येऊ शकेल. अशा प्रकारे त्याचा स्वीकार करून त्यावर वेळीच कार्यवाही करावी म्हणजे त्यांना पेन्शन नियमित मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही.
- चेकबुकमधील विनंती अर्जाचा स्वीकार करून चेकबुक देण्यात यावे. एका वर्षात 25 चेक विनामूल्य देण्यात यावेत. चेकबुक घेण्यासाठी संबंधित व्यक्तीस स्वतः हजर राहण्याची सक्ती करू नये. तसेच पोस्ट, कुरियर या पर्यायाचा विचार करून देता येत असतील तर तसे देण्यात यावेत.
- शून्य शिल्लख असलेल्या बचतखातेधारकासही वर्षाला 25 चेकची सुविधा विनामूल्य देण्यात यावी.
ज्या खातेधारकांनी आपला ग्राहक ओळखा (KYC) केले आहे. त्यांच्या खात्याचे बँकेकडे असलेल्या माहितीच्या आधारे 60 वर्ष पूर्ण झाली असता वरिष्ठ नागरिक बचत खात्यात रूपांतर करण्यात यावे आणि त्यांच्या मुदत ठेवींवर अधिक देय असलेले व्याज नियमाप्रमाणे देण्यात यावे.
ज्या व्यक्तीस अंधत्व आले आहे त्याची बँकेस मान्य दोन साक्षीदारांनी ओळख पटवून सहिऐवजी अंगठा घेऊन किंवा त्याने अधिकार दिलेल्या व्यक्तीस त्याच्या वतीने व्यवहार करण्याची परवानगी देण्यात यावी. यासाठी इतर अपंगाप्रमाणे सोईसवलती त्यास देण्यात याव्यात.
ज्या व्यक्तींना 15/G अथवा 15 /H फॉर्म (लागू असेल त्याप्रमाणे) एप्रिलमध्ये द्यावा ज्यामुळे त्यांचा कर मुळातून कापला जाणार नाही.
70 वर्ष पूर्ण केलेल्या व्यक्ती, अपंग, अंध व्यक्ती किंवा गंभीर आजार असलेल्या व्यक्ती यांना त्यांना आवश्यक असे किमान बँकिंग व्यवहार जसे की पैसे भरणे, पैसे काढणे, चेक जमा करणे, धनाकर्ष (DD) घेणे, KYC ची पूर्तता करणे, जीवन प्रमाणपत्र देणे या यासाठी बँकेत यावे लागू नये. संबंधित बँकेने यासाठी त्याच्या घरी जाऊन हे व्यवहार पूर्ण करण्याची व्यवस्था करावी. तसेच अशा सुविधा या व्यक्तींना संबंधित बँकेकडून दिल्या जातात यास पुरेशी प्रसिद्धी द्यावी.
रिझर्व्ह बँकेने 70 वर्षावरील जेष्ठ नागरिक, अंध, अपंग आणि गंभीर आजाराशी सामना करणाऱ्या व्यक्तीच्या विशेष गरजांचा विचार करून यासंबंधी वेळोवेळी आदेश दिले आहेत. असे स्पष्ट आदेश देऊनही अनेक बँका अशा सुविधा नाकारून त्याची पायमल्ली करीत आहेत. तरी संबंधित सर्व ग्राहकांनी जागृत होऊन या सोई नाकारणाऱ्या बँकेविरुद्ध रिझर्व्ह बँक, बँकिंग लोकपाल यांच्याकडे तक्रार करावी. अशा सेवा सुविधा नाकारणाऱ्या बँकेवर कारवाई करण्याचे बँकिंग लोकपालांना अधिकार देण्यात आले आहेत. अधिक सविस्तर माहितीसाठी रिझर्व्ह बँकेचे मूळ परिपत्रक पहावे.
९ नोव्हेम्बर २०१७ च्या RBI च्या सर्क्युलरवर आधारित
वाचण्यासारखे आणखी काही…
उदय पिंगळे यांचा आर्थिक विषयांवरील ब्लॉग.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.