भारतात अनेक अशी ठिकाण आहेत जी आपल्या सोबत आजही अनेक रहस्य घेऊन आहेत. ह्या प्रत्येक ठिकाणामागे आपल्या पूर्वजांनी देव, संस्कृती किंवा पौराणिक कथांची गुंफण केली आहे. त्याकाळी विज्ञानाच्या चष्म्यातून काही गोष्टींची उत्तर न देता आल्याने ही सर्वच ठिकाणे काहीतरी गूढ आणि रहस्यमय असं वलय घेऊन एकतर दूर ठेवली गेली किंवा त्याला चमत्काराची जोड देण्यात आली. एकविसाव्या शतकात विज्ञान, तंत्रज्ञान इतकं प्रगत झालं कि अश्या ठिकाणांमागचं गूढ उकलायला तंत्रज्ञानाने मदत केली. असं असून सुद्धा आजही काही ठिकाणं अशी आहेत कि ज्यांची उकल होणं आजही शक्य झालेलं नाही. ह्यात आजही आपल्याकडे तेवढं प्रगत तंत्रज्ञान नसेल असं म्हणू अथवा ते वापरण्याची अनुमती त्या ठिकाणी नसल्याने किंवा इतर तत्सम बाबींमुळे आजही त्यांच्या मागील गूढ वलय त्यांना रहस्यमय बनवते.
असंच एक रहस्यमय ठिकाण भारताच्या मध्य प्रदेश ह्या राज्यात आहे. भीमकुंड ह्या नावाने ओळखलं जाणारं हे ठिकाण छत्तरपूर जिल्ह्यापासून ७७ किमी अंतरावर आहे. नावावरून अंदाज आलाच असेल कि हे कुंड महाभारताशी जोडलेल आहे. पांडव वनवासात असताना द्रौपदीला ह्या भागात आल्यावर तहान लागली. कुठेही पाणी न मिळाल्यामुळे मग भीमाने आपली गदा पूर्ण ताकदीने जमिनीवर मारली. त्यानंतर ह्या कुंडाचा उगम झाला अशी पौराणिक कथा ह्या कुंडाची सांगितली जाते. ह्याचं निर्माण भीमाने केलं असल्यामुळे ह्याला भीमकुंड (Bhimkund) असं म्हणतात.
जमिनीपासून आत ३० मीटर खोलीवर एका गुहेच्या मुखाशी हे कुंड आहे. ह्या कुंडाच रहस्य म्हणजे त्याची खोली. भीमकुंडाची खोली आजही अज्ञात आहे. अनेक संशोधकांनी भीमकुंडाची खोली मोजण्याचा प्रयत्न केला पण अजून पर्यंत त्यांना यश आलेलं नाही. पाणाच्या खोली शिवाय जगभरच्या संशोधकांच लक्ष ह्या कुंडाकडे वळायला कारणीभूत झाली ती २००४ साली आलेली त्सुनामी. अनेक लोकांचा जीव घेणाऱ्या ह्या त्सुनामीमुळे त्याचा अभ्यास करणाऱ्या संशोधकानी अशी त्सुनामी भविष्यात आलीच तर त्याची ताकीद आधीच मिळावी ह्यासाठी अभ्यास सुरु केला. भीमकुंड ह्या सगळ्यात कुठे बसते असा प्रश्न सगळ्यांच्या मनात येण स्वाभाविक आहे. कारण हे कुंड जिकडे आहे तिकडून समुद्र बराच लांब आहे. पण २००४ त्सुनामी च्या आधी ह्या कुंडातील पाण्याची पातळी तब्बल १५ मीटर पर्यंत अचानक वाढली होती. ज्यावेळेस त्सुनामी आली होती त्यावेळेस हि १५ फुटापर्यंत पाण्याची पातळी वाढली होती. असाच प्रकार नेपाळ भूकंपाच्या वेळेस हि ह्या कुंडात अनुभवायला मिळाला.
ह्यानंतर अनेक वैज्ञानिक आणि संशोधकांच लक्ष ह्या कुंडाकडे वळाल. त्सुनामी आणि भूकंपाचा ह्या कुंडातील पाण्याचा कसा काय संदर्भ आहे? ह्यासाठी डिस्कवरी चॅनलच्या टीम ने इकडे अत्याधुनिक उपकरणांच्या आणि पाणबुडीच्या साहाय्याने ह्या कुंडाचा तळ शोधण्याचा प्रयत्न केला. तळ शोधण्यापेक्षा इथे असलेल्या जलस्त्रोत्राचा आणि भारताच्या आसपास होणाऱ्या पृथ्वीच्या भूभागांच्या हालचालीचा काय संबंध लागतो का? ह्या प्रश्नांचं उत्तर ते शोधत होते. कुंडाच्या पाणाच्या पातळीतील वाढ किंवा कमी होणं ह्याचा सबंध जर आपण भूकंपाशी किंवा त्सुनामीशी लावू शकलो तर कदाचित भूकंपांची आणि त्सुनामीची पूर्वसूचना मिळायला मदत होईल जे कि आज विज्ञानाला शक्य झालेलं नाही. पण डिस्कवरी चमू ला इकडून रिकाम्या हातांनी परतावं लागल. असं असल तरी त्यांना ह्या पाण्यात खोलवर वेगळेच जलचर आणि वनस्पती दिसून आल्या.
भिमकुंडा च पाणी पूर्ण निळशार आहे. काही लोक ह्याला निळकुंड असही म्हणतात. हे पाणी अतिशय पारदर्शक असून ह्या पाण्यात विहार करणारे मासे आणि अन्य जलचर ह्यांना आपण खूप खोली पर्यंत बघू शकतो. ह्या पाण्यात आंघोळ केल्याने आजार नाहीसे होतात अशी इथल्या लोकांची मान्यता आहे. माणूस मेल्यावर त्याचं प्रेत पाण्यावर तरंगते पण इथल्या कुंडात ते पाण्यात बुडून जाते अस लोक म्हणतात. ह्या भागात अनेक गुहा आहेत पण अजून त्यावर संशोधन झालेलं नाही. एकूणच भीमकुंड आजही रहस्य आहे. एखाद्या नैसर्गिक आपत्तीच्या वेळेस पाणाच्या पातळीत होणारा बदल ते भीमकुंडाची खोली न उलगडलेल्या गोष्टी आहेत. तसेच डिस्कवरी चमू ला दिसलेल्या वेगळ्या अश्या जलचरांवर संशोधन होण गरजेच आहे. अनेक रहस्यमयी आणि गूढ गोष्टींनी वेढलेल्या भीमकुंडाला एकदा भेट नक्कीच द्यायला हवी.
ता. क. :- वरील माहिती गुगल तसेच इतर अनेक वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या माहितीवरून लिहिली आहे. ह्या रहस्यमय जागेबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी यु ट्यूब, गुगल तसेच इतर वेबसाईट वर असलेल्या माहितीचा आधार घ्यावा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.