थंडीच्या दिवसात तिळगुळ, गुळाची पोळी घेऊन येणारा सण तीन दिवस साजरा केला जातो.
मकर संक्रातीच्या आधल्या दिवशी भोगी हा सण असतो. मग मकर संक्रात आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी क्रिंक्रांत त्या दिवशी हळदी कुंकू करून गाजर, मटार, उसाची ओटी भरतात.
आपले बरेचसे सण चंद्र भम्रणावर अवलंबून असतात. मात्र मकर संक्रांत हा सुर्याच्या भ्रमणावर असतो. सुर्याचा मकर राशीत प्रवेश होतो त्या दिवशी मकर संक्रांत.
तिळगुळ आणि गुळाची पोळीपेक्षा भोगीला जी मिश्र भाजी असते ती तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरीवर लोणी पसरुन खाल्ली तर भन्नाट लागते.
भोगीची भाजी कशी करायची हा प्रश्न पडलाय का ? चिंता करू नका. आज भोगीच्या भाजीचे दोन स्वादिष्ट प्रकार पाहूया.
याकाळात मटार, गाजर, वांगी, रसरशीत असतात आणि मोठ्या प्रमाणात तयार होतात.
त्यामुळे या सगळ्या भाज्या एकत्र करून, त्यात तिळाचे कूट किंवा तीळ घालून भाजी तयार करतात.
तर भोगीची भाजी करायची प्रत्येक गृहिणीची स्वतंत्र पद्धत असते.
पण या दोन सोप्या. रेसिपी तुम्हांला नक्की आवडतील.
तर पहिल्या रेसिपीच्या साहित्याकडे वळूया
- 3 वांगी
- 1/2 वाटी वर्णे
- 1/2 वाटी, ताजे मटार
- 1/2 वाटी हिरवे हरभरे
- 1/2 वाटी भिजवलेले कच्चे शेंगदाणे
- 2 चिरलेली गाजरं
- 1 बारीक चिरलेला कांदा
- 1 टेबल स्पून, तीळ किंवा तीळकूट
- 1/2 वाटी ओलं खोबरं, कोथिंबीर
- 2 चमचे तिखट
- मीठ – चवीनुसार
- हळद
- हिंग
- 1/4 वाटी तेल
- 2 चमचे गूळ
- 1 चमचा गरम मसाला पावडर
इतकं साहित्य आपल्याला लागेल.
कृती
सुरवातीला भाज्या स्वच्छ धुवून चिरून घ्या.
सगळ्या भाज्या एकत्र करा.
कढईत तेल तापवून कांदा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्या.
हिंग, हळद घाला.
मिक्स केलेल्या भाज्या फोडणीत घालून छान परतून घ्या.
तिखट, मीठ, गरम मसाला पावडर, तीळ, खोबरं घालून छान एकजीव करा. गूळ घाला.
गरजेनुसार पाणी घालून झाकून शिजवून घ्या.
शेवटी कोथिंबीर घाला.
भोगीच्या दिवशी ही भाजी, बाजरीची भाकरी, भाकरीवर लोण्याचा ताजा गोळा हा नैवेद्य दाखवायचा आणि मस्त आडवा हात मारायचा.
भोगीच्या भाजीचा आणखी एक प्रकार आम्ही तुम्हांला सांगणार आहोत.
त्यासाठी साहित्य काय काय लागेल ?
- १ मोठा बटाटा
- १ मध्यम वांगं
- १ गाजर
- १/२ कप भिजवलेले हरभरे
- १/४ कप भिजवलेले शेंगदाणे
- १/४ कप पावटा
- ५/६ शेवग्याच्या शेंगा
- २ टेस्पून तेल
- मोहोरी
- हिंग
- १/४ टिस्पून हळद
- १/२ टिस्पून लाल तिखट
- १/४ टिस्पून जिरे
- ३-४ कढीपत्तयाची पानं
- २ टेस्पून भाजलेल्या तिळाचा कूट
- २ टिस्पून काळा/गोडा मसाला (नसेल तर गरम मसाला किंवा तुम्ही भाजीसाठी जो वापरता तो मसाला)
- २ टेस्पून चिंचेचा दाटसर कोळ
- १ टेस्पून गूळ
- १/४ कप ओलं खोबरं चवीपुरते मीठ
कृती
भोगीच्या या किंचित कमी तिखट असणाऱ्या या भाजीच्या रेसिपी कडे वळूया.
सुरवातीला भाज्या स्वच्छ धुवून त्याच्या फोडी करुन घ्या. कढईत तेल गरम करून मोहरी, जिरे, हिंग, हळद, लाल तिखट, आणि कढीपत्ता घालून खमंग फोडणी करा.
त्यात बटाटा, हरभरे, पावटे, शेवग्याच्या शेंगा आणि शेंगदाणे घाला झाकून ठेवा, चांगली वाफ येऊ द्या.
चांगली वाफ आल्यावर वांगं आणि गाजर घाला. सगळी भाजी परतून एकत्र करा .
पाणी घाला पुन्हा झाकून ठेवा. मध्यम आचेवर शिजू द्या.
सगळ्या भाज्या शिजत आल्या की त्यात चिंचेचा कोळ, काळा / गोडा मसाला घाला.
गरज वाटली तरच पुन्हा पाणी घाला. गूळ, तिळाचा कूट, खोबरं घाला.
भाजीचा खमंग वास दरवळायला लागेल. वाफाळलेली ही भोगीची भाजी बाजरीच्या तीळ लावलेल्या भाकरीबरोबर एंजॉय करा
या दोन्ही रेसिपी तुम्हांला कशा वाटल्या आम्हांला नक्की कळवा.
भोगीच्या भाजीची तुमची वेगळी रेसिपी असेल तर ती ही आम्हांला कमेंट करून कळवा.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.