आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवरात्राची सुरूवात होते. हा उत्सव स्त्री शक्तीचे पूजन करण्याचा.
नवरात्र म्हटले की आपल्याला पटकन आठवतो तो गरबा, दांडीया. संध्याकाळ झाली की दिव्यांच्या झगमगाटात मैदाने, चौक उजळून निघतात आणि गरब्याच्या गाण्यांचे सूर आसमंत दणाणून सोडतात.
पण आपली खरी मराठमोळी परंपरा म्हणजे भोंडला. आज या परंपरागत भोंडल्याची माहिती जाणून घेऊया.
काय आहे भोंडला
नवरात्रात आदिशक्तीची पूजा केली जाते. नवरात्र सुरू झाले आणि सूर्याचा हस्त नक्षत्रात प्रवेश झाला की दुसऱ्या दिवशी पासून भोंडला खेळला जातो. जसा गुजरात मध्ये गरबा, रास, दांडीया तसाच आपल्या महाराष्ट्रात हा भोंडला!!!
भोंडला कसा खेळतात
पूर्वी घराच्या अंगणात किंवा एखाद्या पटांगणात भोंडला खेळत असत.
एका पाटावर हत्तीचे चित्र काढून हा पाट मध्यभागी ठेवतात. या पाटाभोवती सुंदर रांगोळी काढतात आणि मग स्त्रिया आणि मुली गोल रिंगण करून खास भोंडल्याची पारंपारिक गाणी म्हणतात.
भोंडल्याचा प्रसाद म्हणजे खिरापत. आज कोणती खिरापत हे ओळखून दाखवायचे असते. घराघरांतून अगदी उत्साहाने हा भोंडला खेळला जात असे.
हस्त नक्षत्राचे वाहन हत्ती म्हणून हत्तीचे चित्र काढतात. लक्ष्मी देवीच्या प्रतिमे शेजारी आपल्याला हत्ती दिसतो.
नवरात्रात देवीची विविध रूपे पूजली जातात त्यापैकी एक आहे गजान्तलक्ष्मी.
म्हणून प्रतिकात्मक रूपात हत्तीचे चित्र काढत असावेत.
भोंडल्याच्या विविध प्रथा
महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणी भोंडला खेळला जातो. पश्चिम महाराष्ट्रात याला हादगा म्हणतात. तर विदर्भात भुलाबाई या नावाने हा खेळ खेळला जातो.
याचप्रमाणे मराठवाडा, कोकण या ठिकाणी सुद्धा भोंडल्याची परंपरा आहे. काही ठिकाणी नऊ दिवस, सोळा दिवस तर भुलाबाई महिनाभर खेळतात.
थोड्याफार फरकाने पूजेची पद्धत बदलत असली तरी सर्वत्र उत्साह मात्र सारखाच असतो.
भोंडल्याचे लोकपरंपरेतील महत्त्व
आपला भारत हा कृषिप्रधान देश आहे. पूर्वीच्या काळी जी समाजव्यवस्था होती त्यानुसार घर, संसार यांची जबाबदारी स्त्रीवर होती.
एकत्र कुटुंब, शेतीसाठी बाळगलेली गायीगुरे, श्रमाची कामे यामुळे घरातील स्त्रीच्या मागे व्याप खूप मोठा असायचा. या सर्व रामरगाड्यामधून तिला स्वतःचे असे काही क्षण मिळावेत, बायकांनी एकत्र येऊन सोशल गॅदरिंग करण्याची एक संधी म्हणून भोंडल्याचे खूप महत्त्व होते.
या काळात पावसाळ्यात होणारी खरीप शेती जवळपास तयार झालेली असते त्यामुळे कामाची तशी गडबड नसते. त्यामुळे माहेरवाशिणी सुद्धा याच निमित्ताने माहेरी येऊ शकत असत. लहान मुलींसाठी ही पारंपारिक गाणी आणि खिरापत हे मुख्य आकर्षण असायचे.
या निमित्ताने वेगवेगळ्या घरांमधल्या खिरापती चाखता यायच्या. भोंडल्यानंतर बंद डब्यात खाऊ ठेवून तो ओळखायचा कार्यक्रम खूपच मजेशीर असे.
डबा वाजवून त्यावरून आत कोणता पदार्थ असेल याचा अंदाज बांधणे हे एक कसबच आहे किंवा मग गाण्यांमधून सूचकपणे त्या पदार्थाचा उल्लेख केला जायचा.
आणि कोणालाच ओळखता नाही आलं तर मग खिरापतीचं नाव जाहीर केलं जायचं. या दिवसांत शेतातील हरभरा, ज्वारी, मूग, काकड्या, चिबूड पिकलेले असतात.
त्यांचा वापर करुन ही खिरापत बनवली जायची. घरातील सर्व कामे आटोपून दिवेलागणीला या मुलीबाळी एकत्र येऊन भोंडला खेळत. आधी देवीची पूजा करुन खेळाला सुरुवात होत असे.
आणि हळदीकुंकू, खिरापत वाटून याची सांगता होत असे. वर्षभरातील हे स्त्रियांच्या हक्काचे असे मौजमजेचे क्षण!!!
हे मनमुराद उपभोगून परत ही स्त्री नव्या ऊर्जेने कामाच्या धावपळीत व्यस्त होत असे. भोंडला हे एक उत्तम “स्ट्रेस बस्टर” असं म्हणायला काहीच हरकत नाही.
भोंडल्याची पारंपारिक गाणी
वेगवेगळ्या प्रदेशातील बोलीभाषेचा प्रभाव या गाण्यांवर दिसून येतो.
- ऐलमा पैलमा गणेश देवा
- एक लिंबू झेलू बाई दोन लिंबू झेलू
- कारल्याचं बी पेर गं सूनबाई
- अक्कण माती चिक्कण माती
- यादवराया राणी रुसून बसली कैसी
- श्रीकांता कमलाकांता
- खारीक खोबरं बेदाणा sss
अशी अनेक गाणी फेर धरून म्हटली जातात. या गाण्यांचा अर्थ मिश्किल, चेष्टा मस्करीचा, वातावरण हलकेफुलके करणारा असा असतो.
बऱ्याच गाण्यांमधून माहेरची स्तुती आणि सासरी जगणं कसं त्रासाचं हे विनोदी धाटणीने वर्णन केले आहे. याचबरोबर पती, सासरे, दीर यांचा मान राखणारी गाणी पण आहेत.
सासू-सून, नणंद-भावजय या नात्यांमधील नोकझोक, कुरघोडी यांचं पण सुंदर वर्णन केलेलं दिसतं.
आजच्या काळात भोंडला का जपावा
आपली लोकसंस्कृती आणि कृषीसंस्कृती यांचा सुंदर मिलाफ म्हणजे हा भोंडला. आजची स्त्री जरी स्वतंत्र असली तरी परंपरागत ज्ञान तिला असतेच असे नाही आणि त्या अनुषंगाने केल्या जाणाऱ्या पूजा, विशिष्ट प्रकारचे नैवेद्य यांचा ऋतुमानाशी, अन्नधान्याशी काय संबंध आहे याचा अभ्यास या भोंडल्या द्वारे करता येतो.
ध्वनिप्रदूषण करणारे कर्कश्य संगीत, काळजात धडकी भरवणारी डीजे साऊंड सिस्टीम याऐवजी छान तालासुरात चालणारा भोंडला अगदी नादमधुर वाटतो.
याच निमित्ताने मोकळ्या हवेत मैदानावर काही काळ घालवला की स्ट्रेस, टेन्शन कमी होते. पारंपारीक विनोदी गाणी आपल्याला पोटभरून हसवतात आणि यानंतर मिळणारी पौष्टिक खिरापत म्हणजे दुधात साखरच जणू !!!
गावांमध्ये अजूनही भोंडल्याची प्रथा सुरू आहे पण शहरांमधून मध्यंतरीच्या काळात भोंडला गायब होत चालला होता. आता मात्र सार्वजनिक स्वरूपात हा भोंडला सोसायटीच्या अंगणात किंवा शाळांच्या मैदानावर आयोजित केला जातोय. या निमित्ताने आपण पुन्हा आपल्या लोकसंस्कृती कडे वळतोय ही खूप समाधानाची बाब आहे.
या नवरात्रात तुम्ही सुद्धा घरच्या घरी, मैत्रिणीं सोबत भोंडला जरूर खेळा, खिरापतीचा आनंद घ्या आणि हातात हात गुंफून मुक्त मनाने म्हणा,
“ऐलमा पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडू दे करीन तुझी सेवा…..”
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.