कागदी फुलझाडं म्हणजे कागदाचे नाही निसर्गात असणारे. त्याचे शास्त्रीय नाव मला माहित नाही. मी लहानपणापासून त्याचे नाव हेच ऐकत आलो आहे.
रोजच पाहतो मी त्याला जाता येता. हा उभा रस्त्याच्या मधोमध खंबीर.
अनेक वाहने जातात. धुरळा उडवतात याच्या अंगावर. काही फरक नाही याला.
काही तर कित्येक दिवस पी. यु. सी. न केलेली वाहनं. भकाभका धूर उडवतात याच्या अंगावर.
तरी हा स्थितपज्ञ उभा. आता निर्जीव असता तर समजून घेतले असते. पण याच्यात चैतन्य आहेच की.
अंगावर उडणार्या धुळ धूर याचा काही फरक नाही त्याला. अंगाची लाही लाही करणारे वाढत्या पार्याचे प्रमाण पण याला तसूभर विचलित करत नाही.
या पठ्ठयाला निसर्गाने वरदानच दिले आहे. न कोमेजण्याचे….
याच्या साैंदर्याला बाह्य वातावरण कितीही प्रतिकूल असू द्या याला काही फरक नाही. याला पाहिलं का मला आठवण येते. एखाद्या सुंदर शेतकरी महिलेची.
ती ऊन पावसात काम करत असते. कधी सूर्याचा पारा पंचेचाळीस अंशाला सोडून गेला असतो.
त्याला न घाबरता ऊभी असते. शेतात काही तरी शेत कामाचे अवजार घेऊन. घामाघूम झालेली असते.
घामाच्या धारा तिच्या साैंदर्यात आणखीनच भर घालत असतात. कधी मुसळधार पावसात डोक्यावर काहीतरी क्षुल्लक पावसापासून बचाव करण्याचे साधन असते.
तर कधी गोठणार्या आठ नऊ अंश थंडीमध्ये कानाला लोकरीचे मफलर बांधून गुरांच्या गोठ्यामध्ये शेण साफ करतांना दिसते. ह्या सर्व बदलणार्या हवामानात ती जशी तसूभर ही न खचता, हसत मुख दिसते. ह्या ठिकाणी ती कधी माझी आई, बहिण, पत्नी कुणीही असली तरीही मला सुंदरच वाटते.
असा वाटला हा कागदी फुल वृक्ष. आनंदाने ऊभा डिव्हायडरवर. जणू गंमत पाहतो सर्वांची तो. येणार्या जाणार्यांची. सर्वांचे चेहरे वाचत असेलच तो.
पण मुळात स्थितपज्ञ असल्या कारणाने त्याला फरक काय पडणार आहे. रोजच पाहतो तो ट्राफिकमुळे वैतागलेली माणसं. ट्राफिकमुळे नको असलेले आवाज देणारी वाहनं.
आता हा रोज जाता येता मला पाहतो. ओळखीचा होउन गेला माझ्या. आता त्याच्या कडे पाहिलं का मला वाटायला लागते. ह्या योग्याची स्थितप्रज्ञता ढळली बरं का?.
आता मी त्याला स्मितहास्य देतोय. मग त्याने पण मला स्मितहास्य द्यायला सुरवात केलीय.
हा रोजच पाहतो माणसांना वैतागलेला. वाचतोय रोज प्रत्येकाचे चेहरे. कुणी वरिष्ठांकडून यथेच्छ सुनावणी घेतलेली आहे. कुणाला दिवसभर बायकोने फोन करून परेशान केले आहे. ट्राफिक जाम मुळे एखादी भगिनी रडकुंडीला आली आहे. कारण तीचा स्वयंपाक झाला नाही. पाळणा घरातील बाळाला पती घेऊन आला असेल पण आता तो आई . . आई ओरडत असेल. फोनवर नवर्याला सूचना देतेय. कुकर मध्ये डाळ किती टाकायचं पाणी किती. ऐकतो हा कागदी फुलाचा वृक्ष सारे.
पण त्या बरोबर हे सांगतो. एक दिवस तुमचे दिवस बदलणार आहेत. मला बघा मी कसा ऊभा आहे. आता कदाचित तुम्हाला वाटले असेल काय दिसले याला ह्या कागदी फुलझाडात. दुसरी पण सुंदर फुलझाडे आहेत. ज्यांच्याकडे सुगंधित फुल आहे. हाताला मुलायम स्पर्शाचा अनुभव देणारी आहेत. .
पण हाच मला आवडला हा कुठल्याही परिस्थतीत हसरा आनंदित राहणारा आहे. याला कुठल्याही प्रतिकूल परिस्थतीत हसत खेळत राहता येते. म्हणून आज याच्या बद्दल मला लिहावंस वाटले.
पुन्हा निसर्गाला धन्यवाद देतो. तू मला नेहमी सारखे आज पण काहीतरी दिलेस प्रेरणदायी.
पुनश्च धन्यवाद निसर्गा…
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी किंवा तुमचे स्वतःचे लेखन मनाचेTalks वर प्रकाशित करण्याची इच्छा असल्यास येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.